**** *प्रभातपुष्प* ****
*सुखी माणसाचा सदरा...* .
जीवनात सुखाचा शोध घेण्यासाठीच माणसाची सगळी धडपड चालू असते . कोणाला तो सुखाचा शोध लागतो तर बरेचसे जण आयुष्यभर त्याच्यामागे धावतच असतात . आणि सुख त्यांना कायम हुलकावणी देत राहते. पण तुम्हाला म्हणून सांगतो. मला सुखाचा शोध लागला आहे. आणि मी माझ्या जीवनात खरेच सुखी आहे . संकटे,दुःख कोणाच्या जीवनात येत नाहीत ? पण त्यामुळे खचून न जाता आलेल्या प्रसंगांना हिमतीने तोंड देणे आणि जीवन आनंदाने जगणे महत्वाचे आहे . आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय सांगता ?हे तत्वज्ञान तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर मंडळी एक मूर्तिमंत उदाहरणच तुमच्यासमोर ठेवतो. म्हणजे मग तुमची खात्री पटेल . मी सुखाचा संदेश त्यांच्याकडून घेऊन आलो.तो तुम्हालाही वाटतो आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की दुःख वाटल्याने कमी होते आणि सुख वाटल्याने वाढते. म्हणून तुम्हालाही तो घेता आल्यास जरूर घ्या आणि दुसऱ्यांना वाटता आला तर अवश्य वाटा .
ज्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती व्यक्ती म्हणजे गजाननराव कुलकर्णी . ते आज हयात नाहीत. पण त्यांचे सगळे जीवन मी जवळून पहिले आहे . गजाननराव म्हणजे एक साधा ,हसतमुख आणि निर्मळ मनाचा माणूस . एक दिलखुलास व्यक्तिमत्व . स्वच्छ धुतलेला नेहरु शर्ट , तसाच शुभ्र पायजमा . जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ . परिस्थिती अत्यंत साधी किंवा गरिबीचीच म्हणा ना . ते जळगावला एका खाजगी दुकानात नोकरी करीत असत . मालकाचा त्यांनी एवढा विश्वास संपादन केला होता की मालक त्यांच्या भरवश्यावर दुकान किंवा गल्ला सोडून जात असे. पुढे पुढे वय झाल्यावर त्यांना दुकानात जाणे जमत नसे तेव्हा मालक त्यांना घ्यायला गाडी पाठवत असे. मालक त्यानं म्हणायचा तुम्ही काम करू नका . नुसते दुकानात येऊन बसत जा. काही दिवस ते मालकाच्या आग्रहाखातर गेलेही . पण नंतर त्यांनाच ते काम न करता पगार घेणे योग्य वाटत नव्हते म्हणून शेवटी त्यांनी कामावर जाणे थांबवले.
मी कधी कधी जळगावला गेलो म्हणजे त्यांना आवर्जून भेटत असे . ते दिलखुलास स्वागत करीत आणि अघळपघळ गप्पा मारीत. कायम टाळी देण्यासाठी त्यांचा एक हात नेहमी पुढेच असे. परिस्थितीने गरीब असलेला हा माणूस त्याच्या प्रचंड लोकसंग्रहामुळे श्रीमंत होता. त्यांचे अगदी सर्वसामान्य माणसापासून ते मोठमोठ्या राजकारणी ,श्रीमंत माणसांशीही संबंध होते. पण त्या संबंधाचा त्यांनी कधी गैरफायदा घेतला नाही. आणि आपल्यामुळे कोणाला कधी अडचणीत आणले नाही .
त्यांना दोन मुले आणि एक मुलगी . अशा आपल्या पंचकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून त्यांनी आनंदाने भागविला आणि मुलांचे शिक्षण ,मुलीचे लग्न केले. त्यांना कधी गजाननराव आज काय जेवलात असे विचारण्याची वेळ आली नाही. ते बऱ्याच वेळा स्वतःहूनच सांगत . "अहो विश्वासराव , काय सांगू आज ना हिने पिठले केले होते आणि गरमागरम बाजरीच्या भाकरी. जोडीला थोडा लसणाचा ठेचा होता. इतके मस्त जेवण झाले की काही विचारू नका. अशा वेळी मी माझ्या सासरकडचा पाहुणचार घेऊन आलेलो असलो तरी माझ्या तोंडाला त्यांचे ते वर्णन ऐकून पाणी सुटायचे .
मला त्यांचे नवल वाटायचे. वाटायचं की एवढ्याशा पगारात हा माणूस एवढा आनंदी राहू शकतो ! कसं शक्य आहे? पण मूर्तिमंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होत . आणि आम्ही एवढे पैसे कमावतो पण त्यांच्यासारखे आनंदी का राहू शकत नाही. सदोदित चेहरा दुर्मुखलेला का ? जणू सगळ्या जगाची संकटं आमच्यावरच येऊन कोसळली. गजाननरावांच्या आयुष्यातही संकटं आली ,दुःख आली पण त्यांनी त्या सगळ्यांना हसतमुखाने तोंड दिले. प्रश्न पडतो त्यांना काही हौसमौज करावीशी वाटली नसेल का ? त्यांच्या काही आवडीनिवडी नसतील का ? नक्कीच असतील. पण एक गोष्ट कायम त्यांच्याकडे होती . ती म्हणजे अक्षय समाधान . आहे त्या परिस्थितीत सुख मानणे.
सुख ,समाधान तुमच्या जवळच आहे. आनंदाचा झरा तुमच्या आतमध्येच आहे. त्या झऱ्यात नहायचे की कोरडे राहायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे . मोठमोठे तत्वज्ञ ,साधुसंत असे सांगतात की जोपर्यंत तुम्हीस्वतः ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच दुखी करू शकत नाही . आणि तुम्ही स्वतःला दुःखी करून घेणार असाल तर तुम्हाला कोणी सुखी करू शकत नाही. सुखी माणसाचा सदरा तुमच्याजवळच आहे . बघा सापडतोय का
© *विश्वास देशपांडे , चाळीसगाव*
*प्रतिक्रियेसाठी 9403749932*