पार..
सगळं पार पडल्यावरच यशाचा व समाधानाचा थांबा येतो.यशाच्या मागे धावायचं कां, समाधानाच्या थांब्यावर थांबून क्षणभर विश्रांती घ्यायची हे ज्याचं त्यानं ठरवायचं असत.सुखाचा शोध घ्यायला प्रत्येक जणाला यशोशिखरा कडे जावं वाटतं,
पण सुख पायाशी लोळण घेत असतं हे अनेकांना माहीत नसतं. श्वास घेईपर्यंत अनेक गोष्टी पार पाडायच्या असतात,
अनेक कर्तव्यं पार पाडण्याची असतात.
अजून खूप पार पाडायचे आहे. आयुष्य सुखी समाधानी पार पडणं हे जीवनाचं अंतिम लक्ष. झालं एकदाचं पार पडलं, तरीही पुढे बरंच शिल्लक असतं.
पार पाडल्याची फक्त जाणीव असतें. नेणीवेंत पुन्हा असंख्य आव्हांनें असतात. पार करणे हे क्षणीक असतं. जबाबदारी पार करणं ही क्षणिकंच असतं.जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण अनेक गोष्टी पार पडत असतो, काही कर्तव्यम्हणून काही प्रेमाने. कधीकधी जाणिवेच्या आधीच, कधी जाणिवेसह कधी जाणीवे नंतर मृत्यू आपलं कर्तव्य पार पाडतो. अनेकांना चाकोरीबद्ध जीवनाची चौकट पार करायची नसते. आपल्या क्षमतेसह वर्तुळातच राहणं लोक पसंत करतात, पण वर्तुळाला ही छेद देऊन, वर्तुळ पार करून, मुक्त आकाशात मनाप्रमाणे झेप घेणारे, स्वतःच्या क्षमतेला हि पार करून, स्वतःहून, स्वतःतून उमलतात.
एव्हरेस्ट शिखर पार केलं म्हणजे सगळं पार पाडलं असं नसतं. पुन्हा पुन्हा शिखर काबीज करणं, नवीन नवीन विक्रम करणं, हेच मानवी मन. झाले एकदाचे पार पडलं, म्हणलं तरीही माणसांना विविध क्षेत्रात, विविध आघाड्यांवर, विविध पातळीवर, अनेक गोष्टी पार करायच्या असतात.
थांब माझ्या लेकराला न्हाऊ घालू दें, प्रमाणे हे थांबतंच नसतं. पार हे माईलस्टोन आहे. प्रत्येक पार उर्जा देतं.
चलो दिलदार चलो चाँद के उस पार चलो. 'टुमारो नो प्लीज' म्हणणारऱ्यांनाही मृत्यूचा पार जवळ करावासा वाटतो. सगळेच निकष पार केल्यानंतर विश्वसुंदरी चा किताब मिळतो,पण कोणत्याही निकषात न बसणारं, निकष पार न करणारं, सौंदर्य अस्तित्वात आहेच नां?
पार ही एक लक्ष्मणरेषा आहे. पूर्वी कार्य पार पडलं की समाधी घेऊन आयुष्याला पूर्णविराम दिला जात असें,आता अखेरच्या श्वासापर्यंत लोकं काही नाही काही गोष्टीत, राहिलेल्या अपूर्ण इच्छा पार करण्याच्या प्रयत्नात व स्पर्धेच्या युगात लोकांची पार वाट लागली आहे.
यश नैराश्य घेऊन येत असेल तर काय कामांच?यशाच्या मागे धावण्यांमुळे समाधानाची पार वाट लागली आहे.
काय पार करायचं, किती पार करायचं, कसं पार करायचं, याचं सर्व ताळतंत्र सुटले आहे. अपयशाला पार केले की यशच आहे. यशाला पार केले की समाधान आहेंच, असं नाही.काही गोष्टी पार करता येत नाही.
आयुष्याचा प्रत्येक क्षण वेगळ्या रंगात न्हाऊन निघतो. सगळेच क्षण सारखे नसतात. अनेक अडथळे पार करत करत शरीर मृत्यूपाशी थांबतं. मानवी जीवन म्हणजे क्षणांची मालिका तसेच 'पार' ची मालिका आहे. एक पार पडलं की, दुसरं तयारंच असत.
प्रत्येक आव्हान पार पाडणं, यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. माणसें असहाय्य झाली की प्रभूला विनवणी करतात,प्रभु मेरी बिगडी नैय्यां पार करा दें.पार
सगळं पार करता येत नाही आयुष्यात
काही पार आवाक्याबाहेरचे
सगळ्यांना पार करायचंय एकमेकांना
पार करताना पार वाट लागली
तरी चालेल इतक्या निष्कर्षाप्रत
येऊन पोहोचली आहेत माणसें
सगळ्यांनाच पार करायचय
आवाक्याबाहेरचं क्षितिज
सगळ्यांना पार करायचंय यशोशिखर
नैराश्याच्या नंतरचा कडेलोट ही पार करायचा अनेकांना
समाधानाच्या थांब्यावर थांबायला
कुणालाच वेळ नाही
सगळ्यांना जिंकायची आरपारची लढाई
सगळ्या गोष्टी पारदर्शक असल्या तरीही
स्वतःचा पारदर्शकपणा पार
करायला कुणालाच आवडत नाही
उत्सुकतेचं दुसरे नाव पार
एक पार संपला की दुसरा पार
पार एक माईल स्टोन
प्रवास पार पाडण्यासाठी
एक क्षणभर विश्रांती चे स्थान
जायचे होते चंद्रा पार,पण फक्त ठसेंच उमटवलें
सगळी फुषारकी हे पार पडलं, ते पार पडलं म्हणण्यांत गेली
शेवटी काही न काही पार पाडायचं राहतंच
कार्डिओग्रामची न संपणारी रेघच करते जीवन मृत्यूची सीमापार. शरीराच्या पार असतं मन नांवाचें गांव
शब्दांच्या पार असतं भावनांचा आकाश जिथं मन मोकळं होतं
इंद्रियांना पार केलं की मनावर ताबा मिळवता येतो
मनंच मनाला मला पार करू शकतं शारीर नाही
मनाला पार करता आलं की सगळे प्रश्न आपोआप सुटतात.
डॉ.अनिल कुलकर्णी.