• 07 January 2022

    सहज सुचलं म्हणून..

    जीवनाचे बदलतेय संदर्भ...

    0 21

    जीवनाचे बदलते संदर्भ..

    आयुष्य जगताना नवीन नवीन संदर्भ

    कळत गेले की जुन्या संदर्भाची पानगळ होतें.संर्दभाची नवी पालवी वाट पहात असतें.जुन्या. संदर्भाला किती कवटाळणार. संदर्भाची नाळ तोडल्याशिवाय स्वतःचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही. इतिहासातले संदर्भ नवीन इतिहास घडवायला उपयोगी पडत नाहीत.आयुष्याच्या रेस मध्यें नुसत्या धावपळीत पळण्यापेक्षां आयुष्याचा ग्रेस समजून जगायलां हवं. सुर्यास्त रोज होतो. आशा-निराशेचा हीअस्त रोज होत असतो, पण उद्या सूर्योदय होणार आहे, नवीन आशा अंकुरणार आहेत हेही लक्षात घ्यायला हवं.

    सूर्यास्त ढळला रे ढळला दिन सखया ची आठवण करून देत असला तरीही, सुहानी चांदनी रातें हमें सोने नही देती. रात्री नक्षत्रांचं देणं पाहायचं असतं. शरदाच्या चांदण्यात चिंब भिजायचं असतं. चांदण्यात फिरतांना हवेसे हात शोधायचे असतात.तरुण आहे रात्र हें अनुभवायचं असतं, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे म्हणणारं कुणीतरी आहे व मोकळ्या केसात स्वतःला गुंतवललं की आयुष्य जगावसं वाटतं.

    आहे त्या संदर्भासहित व बदललेल्या संदर्भासहित पुन्हा नव्या उमेदीने जगायचं असतं.

    संदर्भ बदलले की जीवनशैली बदलतें.

    जीवनाच्या साच्यात स्वतःला बसवायचं असतं.

    असामान्यच स्वत:चे साचे स्वतः तयार करतात व इतरा समोर आदर्श ठेवतात.अनुकरण करणं म्हणजें आवडत्या साच्यात स्वतःला बंदिस्त करणं. चांगल्याचं अनुकरण केल्यामुळेच संस्कृती वाहती राहतें. परंपरा जिवंत राहतात. संस्कृतीबरोबर विकृतीचे साचे ही उपलब्ध आहेत.

    वर्ष संपले, स्वप्न संपले, आशा संपल्या. एवढ्यावरच थांबून चालत नाही.

    नवीन वर्ष, नवी उमेद नवी स्वप्न, नव्या आशा, फिनिक्स पक्षी जसा राखेतून उभा राहतो तसं मागील वर्षाच्या सुख दुःखाचा जास्त विचार न करता पुढील वर्षी आपण कसे अधिक सक्षम होउ याचा विचार व्हायला हवा. मागील वर्ष जाणिवेचे होते, नवीन वर्ष नेणीवेच असणार आहे.

    खूप काही करायचं आहे, खूप काही जगायचं आहे. प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे. ध्येयाच्या रस्त्यावरून चालायला तर लागा. कुणीतरी भेटेलंच आयुष्य बदलवून टाकणारं. खाचखळगें येतील, आत्महत्येचे विचार येतील. चांगलं ऐका चांगलं पहा, चांगलं वाचां चांगल्या बरोबर राहा.

    आत्महत्येचेचे विचार मनालाही शिवणार नाहीत.

    वैभवात राहण्यापेक्षा समाधानात राहायला शिका. मनावर राज्य करता आलं पाहिजे स्वतःच्या व इतरांच्याही.

    मागील वर्षांनी प्रतिसाद दिला नाही. नवीन वर्षाला साद घालून प्रयत्न करण अजून आपल्या हातात आहे. ढळलेली कोणतीही गोष्ट संध्याछाया याची जाणीव करून देते, पण उद्याचा दिवस माझा ही असू शकतो ह्या आशेने जगायचं.मागील वर्षातील सुखाची घडी, जीवनात ही घडी अशीच राहू दे म्हणलं तरी ती राहत नाही. परीट घडी मोडते पुन्हा नवीन परीट घडी, हेच आयुष्य आहे. मळलेले कपडे स्वच्छ धुणें, पुन्हा परीट घडी,हे अव्याहत चालू ठेवायलाच हवं.

    चेहरे आणि मुखवटे ओळखूनच जगता यायला हवे. शूद्र विचारांची माणसे खड्यासारखी दूर करता यायला हवीत.

    निराशेच्या चिखलाचे भवताल असूनही, कमळा सारखं उमलावं लागणार आहे.

    नवीन वर्षात ग्रहणही असणार आहे व इंद्रधनुष्यही असणार आहे. शब्दांच्या पलीकडे जा, नक्षत्रांचे देणे आपली वाट पाहतेय.

    डॉ अनिल कुलकर्णी.९४०३८०५१५३ anilkulkarni666@gmail.com



    Anil Kulkarni


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!