*उगवतीचे रंग*
*कल्हईवाला...*
परवाच्या दिवशी खूप दिवसांनी कल्हईवाला आमच्या घराजवळून चालला होता. एक जुनी पुराणी सायकल, त्यावर टांगलेली एक जाड ताडपत्री पिशवी आणि अंगात साधा पायजमा आणि सदरा असा त्याचा वेष होता. खूप दिवसांनी कल्हईवाला दिसल्याने माझ्या बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या. जास्त जुने नाही पण साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात तांब्या पितळेची भांडी आपण वापरायचो. वापरून वापरून आतला मुलामा झिजल्याने किंवा अगदीच न वापरल्यामुळे त्यावर एक प्रकारचा गंज चढायचा. अशा वेळी अधूनमधून भांड्याना कल्हई करून घेणे आवश्यक असायचे. त्याशिवाय त्यात भाज्या, अन्नपदार्थ शिजवता यायचे नाहीत.
माझ्या दारावरून जाणाऱ्या त्या कल्हईवाल्याला मी थांबवले. सौ. ला म्हटलं आपल्याकडे जुनी पितळेची भांडी आहेत. आपण त्यांना कल्हई करून घेऊ या का ? कधी कधी माझ्या एखाद्या प्रस्तावाला ती चटकन होकार देते...! तसे यावेळी झाले. फक्त अडगळीत ठेवलेली भांडी काढून देण्याचे काम माझ्यावर आले. ती चार लहानमोठी पितळी पातेली आणि एक पितळेची बादली मिळाली. बरेच दिवस वापरात नसल्यामुळे ती खराब झाली होती. आतील मुलामा निघून गेला होता.
कल्हईवाल्याने आपल्या हातपंख्याच्या भट्टीची नळी जमिनीत एक छोटासा खड्डा करून रोवली. त्याच्याजवळ असलेले थोडेसे कोळसे त्या खड्ड्यात टाकले. हातपंख्याची दांडी तो गरगर फिरवू लागला. एक गमतीदार विचित्र आवाज करत त्या कोळशांनी चांगलाच पेट घेतला. लाल निखारे दिसू लागले. कल्हईवाल्याने मग एक भांडे घेतले आणि त्या विस्तवावर ठेवले. ते चांगले तापल्यावर त्याच्या जवळ असलेल्या पुडीतून नवसागराचा बारीक केलेला भुगा घेऊन त्या भांड्यात टाकला. आता खूपच धूर सुटला. ते भांडे चिमट्याने धरून त्याच्याजवळ असलेल्या फडक्याने त्याने पुसून घेतले आणि त्याच्याजवळ असलेल्या कथिलाच्या पट्टीने त्या भांड्यात एकदोन रेषा ओढल्या. हे सगळे करताना एक वेगळाच वास सुटला होता. पुन्हा त्याने ते भांडे पुसले. तो जणू जादू झाली. आतापर्यंत एकदम काळवंडलेले दिसणारे ते भांडे जणू चांदीचा मुलामा दिल्यासारखे चकचकीत झाले. मग त्याने जवळच भरलेल्या पाण्याच्या बादलीत ते थंड होण्यासाठी टाकले. त्यामुळे तो मुलामा टिकावू होणार होता.
मला लहानपण आठवले. तेव्हा लोक मोठ्या प्रमाणात तांब्या पितळेची भांडी वापरत असल्याने त्यांना कल्हई करावी लागायची. कल्हईवाला नियमितपणे वर्षातून तीनचार वेळा तरी यायचा. तो कल्हई करत असताना पाहणे मोठे गमतीचे असायचे. आम्ही सगळे बालगोपाळ त्याच्या भोवती कडे करून ती नवलाई बघत असायचो. खराब असलेली भांडी काही काळातच उजळून निघायची. ही किमया न्यारीच होती. पण पुढे पुढे अल्युमिनियम आणि स्टीलची भांडी आली. तांब्या पितळेची भांडी मोडीत निघाली किंवा अडगळीत पडली. या अल्युमिनियम किंवा स्टीलच्या भांड्यांना कल्हईची गरज राहिली नाही. काही नवीन आले की माणूस जुन्या गोष्टींना विसरून जातो. तसेच या भांड्यांचेही झाले. कधी कधी जुन्या चांगल्या गोष्टी आपण त्या केवळ जुन्या किंवा कालबाह्य झाल्या म्हणून टाकून देतो. पण कधी तरी कालांतराने त्याचे महत्व पटते. आरोग्यासाठी हीच भांडी चांगली होती असे जाणकार सांगतात.
आता कल्हईवाले कालानुरूप अस्तंगत होत चालले आहेत. तांब्या पितळेची भांडी फारशी कोणी वापरत नसल्याने त्यांचा धंदा होत नाही. त्यांच्या उदरनिर्वाहाचे हे साधन नाहीसे होत चालले आहे. मला त्या कल्हईवाल्याची जुनी सायकल, अंगावरचे साधे कपडे, साधे राहणीमान आणि त्याही परिस्थितीत त्याच्या चेहऱ्यावर असलेले हास्य पाहून कौतुक वाटले. सगळे असूनही दुर्मुखलेले राहणाऱ्या, सतत कुरकुरणाऱ्या लोकांपेक्षा हा कल्हईवाला आहे त्या परिस्थितीत किती आनंदी होता ! त्याने सांगितलेले पैसे तर मी त्यालाच दिलेच पण त्याला विचारले, ' बाबा, चहा घेणार का ? 'त्याला हा प्रश्न अनपेक्षित असावा. तो चमकला. ' असू द्या...' म्हणाला. पण मी त्याला थांबवले आणि चहा दिला. त्याने चहा घेतला पण त्याचा चेहरा तसा निर्विकार होता. चहा मिळाला काय आणि न मिळाला काय त्याने दोन्ही गोष्टींची तयारी ठेवली असावी. जीवनाचे खरे तत्वज्ञान जणू तो कोळून प्यायला होता.
सिद्धहस्त कवी जगदीश खेबुडकर यांचे ' चुडा तुझा सावित्रीचा ' या चित्रपटात एक सुंदर गाणं आहे. जयवंत कुलकर्णी यांनी हे अर्थपूर्ण गीत आपल्या स्वरातून साकार केलंय. ' लावा भांड्याला कल्हई....' हे ते गाणं ! या गीतात शेवटी कवी म्हणतो
कधी स्वप्नी मलाही दिसले
ओठी भिडले चांदीचे पेले
हाती कथलाचे पुसणे आले
परि त्याचे सोने झाले
कष्टाची मोलाची भाकर हक्काची खावी
चांदीचे पेले त्याला स्वप्नात दिसत असतात. पण नशिबाने हाती कथिलाचे पुसणे, कल्हई करणे येते. पण तो जे काही करतो, त्याचे सोनेच झाले आहे. सोन्याचांदीच्या भांड्यातून जेवण्यापेक्षा आपल्या कशातून मिळवलेली सुखाची भाकरी त्याला प्रिय आहे... !
खरंच आपलं जीवनही असंच असतं नाही. जीवनातल्या समस्यांमुळे, अडचणींमुळे आपल्या मनावरचा सुंदर मुलामा कधी कधी निघून जातो. त्यालाही अशीच अधूनमधून कल्हई करणं आवश्यक असतं. घरातला केरकचरा नाही का आपण साफ करत...! परिस्थितीची भट्टी नाही तरी आपल्याला भाजतच असते. कुंभाराचे मडके सुद्धा आगीत भाजल्याशिवाय पक्के होत नाही. सोन्यालाही अग्निपरीक्षा द्यावीच लागते. सदविचारी लोकांचा संग हा नवसागर असतो. कथिलाची तार म्हणजे गुरुतत्वाचा स्पर्श असतो. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की किमया घडते. भांडे उजळून निघते. तांब्या पितळीला चांदीचे मोल प्राप्त होते. एक कल्हईवाला येऊन त्याचे काम करून गेला होता. भांड्याबरोबर मनाचाही गाभारा उजळला होता.
© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*