*प्रभातपुष्प*
*नमस्कार मंडळी, सुप्रभात.*
लहानपणी मला एक अभंग फार आवडायचा. त्यावेळी आजच्यासारखी गाणे ऐकण्यासाठी साधने नव्हती. कधी काळी रेडिओवर हा अभंग लागला की मी जीवाचे कान करून ऐकत असे. त्यावेळी त्या अभंगातला अर्थ फारसा कळत नसे. पण अभंगातील गोडवा आणि तळमळ मनाला स्पर्शून जात असे. तो अभंग होता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा-
चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग
दीपालाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड.
तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचिना.
सुमन कल्याणपूर यांनी आपल्या विलक्षण गोड आवाजात हा अभंग अजरामर केला आहे. आजही हा अभंग लागला की मी त्यात हरवून जातो. मग समोरचा माणूस माझ्याशी कितीही महत्वाचे बोलत असला तरी माझे त्याकडे लक्ष नसते. मग कधी कधी, “ अहो, मी काय म्हणतो ? कुठे हरवलात ?” यासारखी वाक्ये ऐकण्याची मी तयारी ठेवतो. असो.
इंद्रायणीचा काठच सुपीक ! जिथे तिच्या काठावर शेती, मळे बागबगीचे फुलले; तिथेच, त्याच काठावर विठ्ठल भक्तीचेही मळे फुलले. एक मळा फुलवला ज्ञानोबा माउलींनी आणि दुसरा तुकोबांनी. या मळ्यामध्ये विठ्ठल भक्तीचे अमाप पीक आले. आणि अवघ्या महाराष्ट्रातील जनता येथून विठ्ठल भक्तीचे बीज नेऊ लागली तरी ते कमी न होता उलट वाढतच गेले. इंद्रायणीच्या काठीच भागवत धर्माचा पाया रचला गेला. एकाने पाया रचला आणि दुसऱ्याने कळस.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.
दोघाही संतांच्या शिकवणुकीत विलक्षण साम्य. दोघानाही समाजातील दांभिकतेची चीड. दोघानाही सर्वसामान्यांच्या उद्धाराची तळमळ. भागवत धर्माच्या रत्नजडीत मुकुटात हे दोन अमुल्य हिरे जडवलेले आहेत. समाजातले वाईट, अमंगल नष्ट व्हावे हीच आस या दोघांच्या मनी. असे करताना समाजातील वाईट, दुष्ट व्यक्ती नष्ट होऊ नये तर त्यांची दुष्ट वृत्ती नष्ट व्हावी म्हणून दोघेही प्रयत्नशील.ज्ञानोबा आपल्या पसायदानात म्हणतात-
जे खळांचीची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे.
आणि तुकोबाराय म्हणतात,
मेणाहुनी मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे.
भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी.
अशा या सर्व संतांच्या शिकवणुकीत साम्य आहे. असे म्हणतात की परमेश्वराला सर्वत्र जाता येत नाही, म्हणून त्याने आई निर्मिली.तसेच मी म्हणेन की परमेश्वराला सर्वाना समजावणे शक्य नव्हते, म्हणून त्याने संतांची निर्मिती केली.सर्व संतांचे हृदय हे आईचेच हृदय. मातेच्या ममतेने संतांनी समाजाचे पालन पोषण केले. माता प्रसंगी बालकाला रागावतेही पण ते त्याच्या हितासाठी. तसे तुकोबा कधी कधी कठोर झाले. पण ते समाजातील अंधश्रद्धा,रूढी, दुष्ट चालीरीती यावर प्रहार करताना. आणि त्या काळात अशा प्रकारे लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता होती. लोक आपले कर्तव्य विसरले होते, गुलामगिरीची वृत्ती अंगी भिनली होती, ढोंगीपणा, बुवाबाजी यासारख्या गोष्टीना ऊत आला होता. लोक देवाची खरी भक्ती विसरले होते आणि नवस सायास करू लागले होते. अशा वेळी ‘ नवसे पुत्र होती, तरी का करणे लागे पती ‘ यासारखे परखड बोल तुकोबांनीच समाजाला ऐकवले. दांभिकतेवर प्रहर करताना ते म्हणतात-
कथा करोनिया दावी प्रेमकळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा
तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लतिका धरी बोंडी नासिकाची
टिळे टोपी माळा देवाचे गबाळे, वागवी ओंगळे पोटासाठी
गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी, तयाचे अंतरी कामलोभ
कीर्तनाचे वेळी रडे, पडे, लोळे, प्रेमेविण डोळे गळताती
तुका म्हणे ऐसे भाषेचे महंत, त्यापाशी गोविंद नाही नाही.
तुकोबांची दुसरी पत्नी आवली. कजाग आणि कर्कश मावली. आणि तुकोबा विठ्ठल भक्त. एवढेच आम्ही जाणतो फक्त. पण खरे म्हणजे असे नव्हते. आवली असेल कजाग आणि कर्कश पण तुकोबांवर तिचे अतिशय प्रेम. म्हणतात ना ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीवरच आपण रागावतो. ते जेवल्याशिवाय ती तोंडात अन्नाचा कणही घेत नसे. आणि तुकोबांची योग्यता ती जाणून होती.
घरामध्ये खायला काही नसायचे. मुलेबाळे, पत्नी उपाशी. अशा परिस्थितीत एखाद्याला आपल्या संसारासाठी थोडा स्वार्थ सुचला असता तर ते क्षम्यच होते. पण तुकोबांनी त्यांच्याकडे चालून येणारा नजराणा नाकारला. शिवरायांनी त्यांच्याबद्दल अतीव आदराने तो पाठवला होता. पण ‘ काय उणे आम्हां विठोबाचे पायी ‘ या भावनेतून तो नम्रपणे नाकारला. त्यांनी त्या नजराण्यावर तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले-
सोने आणि माती, आम्हा समान हे चित्ती
तुका म्हणे आले, घरी वैकुंठ सगळे.
आणि त्यांनी त्या नजराणा घेऊन आलेल्या सरदारांबरोबर निरोप पाठवला, ‘ शिवाजीराजांना सांगा ! तुम्ही स्वतः आमच्याहून थोर आहात. तुम्ही आहात म्हणून देहू गावावर परचक्र आलेले नाही. हाच नजराणा मोलाचा.आम्हाला द्रव्य काय करायचे ? आम्हाला काय उणे आहे ?
असे हे निरिच्छ तुकोबाराय. त्यांचे अभंग तरले कारण ते खऱ्या अर्थाने ‘अ-भंग’ होते. काळाच्या कसोटीवरही ते टिकून राहिले. ते अजरामर आहेत आणि राहतील. वर्षानुवर्षे समाजाला मार्गदर्शन करीत राहतील.
मंडळी, आपला दिवस शुभ जावो.
© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* *१४/३/२०१७*