*तुका आकाशाएवढा* ...
' बोले तैसा चाले..' ही उक्ती सार्थ ठरवणारा संत म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. ज्या भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला, त्या भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य तुकोबांना लाभले. अर्थातच ते त्यांच्या कर्तृत्वाने.त्यांच्या काळात ही भागवत धर्माची पताका उंच आकाशी जाऊन डौलाने फडकू लागली. फाल्गुन वद्य द्वितीया. हाच तो दिवस, की ज्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे म्हटले जाते. हा दिवस ' तुकाराम बीज ' म्हणून ओळखला जातो. दुपारी १२.०२ मी. त्यांनी वैकुंठाकडे प्रयाण केले. त्या वेळी तेथे असलेला नांदुरकी वृक्ष थरारला. आजही हा वृक्ष तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी बरोबर त्याच वेळेला थरारतो ही श्रद्धाळुंची भावना आहे. हा चमत्कार पाहण्यासासाठी आजही हजारो लोक तेथे गर्दी करतात. ' जशी श्रद्धा, तसा अनुभव ' प्रत्येकाला येतॊ.
' अणुरेणिया थोकडा..' असलेला तुका आकाशाएवढा झाला तो त्याच्या प्रचंड कार्याने. आणि खरोखरच आकाशाएवढी उंची असलेला हा संत सर्वसामान्यांसाठी खाली आला. खाली आला म्हणजे त्यांनी सर्वसामान्य माणसाला त्याला समजेल अशा भाषेत वेदांत सांगितला. आणि रोखठोकपणे सांगून टाकले ' वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा , येरांनी वाहावा भार माथा. '
तुकोबा हे मला शाळेतल्या निष्णात शिक्षकासारखे वाटतात. शाळेत शिकवणाऱ्या सर्वच शिक्षकांजवळ मुलांना समजेल अशा पद्धतीने शिकवण्याची हातोटी असतेच नाही. असे मोजकेच शिक्षक असतात. जे त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहतात. तुकोबा असे समाजशिक्षक होते. नाठाळ विद्यार्थ्यांना कसे वठणीवर आणायचे ते कुशल शिक्षकाला उत्तम कळते. म्हणूनच ज्यांना सहज सांगून समजणार नाही अशा नाठाळांच्या माथी काठी हाणण्याचे धारिष्ट्य ते दाखवतात. या अर्थाने तुकोबाराय समाजशिक्षक आहेत.
जो खरा शिक्षक असतो, तो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन घडवून आणतो. त्यांना अधर्म, अनाचार, अंधश्रद्धा यांना बळी पडू नका असे समजावून सांगतो. त्याने दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशात मग ही अज्ञानाची, अंधश्रद्धेची जळमटं नाहीशी होतात.
तुकोबांनी हेच काम केले. त्या काळात समाज आपले स्वत्व हरवून बसला होता. परकीय सत्तांनी महाराष्ट्र आणि भारत व्यापला होता. परकीय सत्ता केवळ या प्रदेशातच नव्हे, तर लोकांच्या मनामनावर राज्य करीत होत्या. लोक गुलामगिरीने , दारिद्र्याने पिचले होते. अधर्म आणि अंधश्रद्धा बोकाळल्या होत्या. अशा वेळी कुणीतरी त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. ते काम तुकोबांनी केले. अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा त्या वेळी लोकांच्या मनावर पगडा होता. अशा वेळी त्यांनापुण्य कशाला म्हणावे आणि पाप कशाला म्हणावे हे अगदी सोप्या शब्दात सांगितले. ते म्हणतात
पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा
आणिक नाही जोडा, दुजा यांसी
तुकोबांना भेदाभेद मान्य नव्हता. हे जगच संपूर्ण विष्णुमय आहे अशी त्यांची भावना होती. म्हणून ते म्हणतात
विष्णुमय जग , वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगल .
हे सगळे जग त्या एका भगवंताचे आहे. आपण सर्व त्या एकाच भगवंताची लेकरं आहोत. मग जातीभेद कशाला पाहिजे ? प्रत्येक जण विष्णूचाच अंश आहे. प्रत्येकात त्याचे रूप आहे. म्हणून तर वारकरी संप्रदायात प्रत्येकाला विठ्ठलाचे रूप समजून एकमेकांना ' माऊली ' म्हटले जाते. साधू कोणाला म्हणायचे हे सोप्या शब्दात सांगताना ते म्हणतात
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा '
असा हा वेदांत तुकोबांनी सोपा केला. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगितला.
' बोले तैसा चाले..' हे म्हणायला सोपे आहे पण आचरणात आणायला तितकेच कठीण. म्हणूनच जो असा बोलण्यासारखा वागेल ' त्याची पाऊले वंदावी ' असे तुकाराम महाराज म्हणतात ते उगीच नाही. त्यांच्या उक्ती आणि कृती यात अंतर नव्हते. ज्यांच्या उक्ती आणि कृतीत अंतर नाही ते संत. बाकी तुम्ही आम्ही सामान्य माणसे. तुकोबांच्या काळात प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यांची सावकारी होती. अशा परिस्थितीत एखाद्याने या परिस्थितीचा फायदा घेऊन आपले सात पिढ्यांचे कल्याण करून ठेवले असते. पण तुकोबा वृत्तीने विरक्त होते. लक्ष विठ्ठलाकडे लागले होते. आणि मुख्य म्हणजे लोकांनी आपल्या अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून आणखी दुःखी कष्टी व्हावे अशी त्यांची इच्छा नव्हती. म्हणून त्यांच्याकडे गहाण असलेली लोकांची कर्जखते त्यांनी इंद्रायणीच्या पाण्यात बुडवली. लोकांना कर्जमुक्त केले. किती कर्जखते त्यांनी इंद्रायणीच्या पाण्यात बुडविली असतील याची कल्पना येणार नाही. पण अंदाज येण्यासाठी सांगतो, थोडीथोडकी नव्हे तर चक्क २५ बैलगाड्या भरून ही गहाण कर्जखाते होती. त्यांचा कुठलाही मोह न बाळगता ती त्यांनी इंद्रायणीत बुडवली.
जणू हीच त्यांची पुण्याई त्यांच्या कामी आली आणि त्याच इंद्रायणीने त्यांचे अभंग तारले. त्यांचे अभंग हे खऱ्या अर्थाने ' अ-भंग ' राहिले. आणि आणखीही वेगळ्या अर्थाने हे अभंग तरले आहेत. हे अभंग आज साडेतीनशे वर्षे झाली तरी, लोकांच्या मुखी आहेत. वारकरी संप्रदायातील लोकांना तर मुखोद्गत आहेत.
खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील अगदी अशिक्षित माणूस सुद्धा बोलताना बऱ्याच वेळेला तुकोबांच्या अभंगाचा दाखला देतो. याही अर्थाने ते ' अभंग ' आहेत , अमर आहेत.
आणि ते ' अ-भंग ' राहिले ते उगीच नाही. त्यांचे अभंगच किती सुंदर..! म्हणून अभंग म्हटला तर तो तुकयाचा असे म्हटले जाऊ लागले. त्यांच्या अभंगात काय नाही. ईश्वरभक्तीची केवढी आर्तता आहे ! केवढा जिव्हाळा, केवढे प्रेम आहे. म्हणूनच त्यांना ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ' हा अनुभव आला. तो पांडुरंग , ज्याला त्यांची पत्नी जिजाबाई रागाने ' काळा ' म्हणत असे ते सावळे सुंदर परब्रम्ह सदैव त्यांच्यासोबत असल्याची अनुभूती त्यांना आली. अर्थात जिजाबाईच्या विठ्ठलावरच्या रागात तिचे प्रेमही होते. म्हणून तर विठ्ठलाला अरे तुरेच्या भाषेत ती बोलू शकली. ती अत्यंत पतिपरायण स्त्री होती. तिची अध्यात्मिक योग्यता फार उच्च कोटीची होती. म्हणूनच विठ्ठलाला असे बोलण्याइतपत तिचा अधिकार होता, हे मान्य करावे लागते.
' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ' हा अनुभव येणे ही सोपी गोष्ट नाही. तुकाराम महाराज इतके विठ्ठलाशी एकरूप झाले होते की फक्त देहाच्या गरजा सोडल्या, तर ते विदेही अवस्थेत जगत होते. म्हणून तर ' आनंदाच्या डोही आनंद तरंग ' उठले. तुकोबांचे अभंग जो मनापासून वाचतो, त्याच्या डोळ्यांच्या कडा नकळत त्यातील प्रेमभावनेने ओलावल्याशिवाय राहत नाहीत.
परमेश्वराकडे जाताना होणाऱ्या मनस्थितीची किती सुंदर वर्णन त्यांनी ' कन्या सासुऱ्यासी जाये ' या अभंगात केले आहे. तर संत किंवा सज्जन माणसे समाजासाठी कसे झिजतात, तर चंदनासारखे हे ' चंदनाचे हात, पायही चंदन ' या अभंगात किती सुदंर सांगितले आहे. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या आवाजाने अमर केलेला अवीट गोडीचा हा अभंग माझा अत्यंत आवडता आहे.
अशा जगद्गुरू संत तुकारामांना वंदन करून थांबतो. आजचा लेख मी लिहिताना जणू आतूनच प्रेरणा होत होती. मी भराभर लिहीत गेलो. महाराजांनीच हा लेख माझ्याकडून लिहवून घेतला असेच मला वाटते. प्रेमभावनेने माझ्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत. ' रामकृष्ण हरी. '
© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*
*प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२*
( *कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा* )