अस्तित्वाच्या पाउलखुणा: डॉ अनिल कुलकर्णी.
प्रत्येकाला वाटतं आपल्या अस्तित्वाची कोणीतरी नोंद घ्यावी. जाणीव झाल्यापासून माणसं स्वतःला इतकी जपतात की आपल्याच विश्वात जगतात.
अस्तित्व टिकवण्यासाठी व दाखवण्यासाठी माणसें काही ही करतात. अस्तित्वाला हादरें बसल्याशिवाय माणसें सुधारत नाहीत. पाण्याला सुद्धा वाटतं आपल्या तरंगाची दखल घ्यावी, तसंच मनाला ही वाटतं आपल्या विचारांची दखल कुणीतरी घ्यावी.
बेदखल नैराश्य घेऊन येतं आणि दखल आशा घेऊन येतं.अस्तित्वं ठरवतं आपलं व्यक्तिमत्वं.
नोंद नसेल तर अस्तित्वाला अर्थ नाहीं. रानफुलांची नोंद कोण घेतं? केवळ निर्माल्यां साठीच फुलायचं नसतं.
निर्माल्य पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर चा प्रवास ठरवतों अस्तित्व. फुलणं ते निर्माल्य होणें यामधील प्रवास म्हणजेच जीवन.फुलालां कुठे माहित असतं फुलल्यानंतर त्याला चुरगाळलं जातं कां एखाद्या सौंदर्यवतिच्या केसात माळलं जातं, कां चितेवर रवानगी केलं जातं. प्रत्येक टप्प्याचा अनुभव वेगळां पण तो घेण्यासाठीच फुल निर्माल्य होईपर्यंत तग धरतंच.
आपल्या अस्तित्वाचं वलय विस्तारलं जावं असं प्रत्येकाला वाटतं. बिंदूला ही वाटतं वर्तुळ ही मोठं व्हावं,विशालव्हावं.
अस्तित्वाचा प्रत्येक टप्पा सुखद करण्यासाठी माणूस धडपडत असतो. अस्तित्व श्वासाबरोबर येतं आणि श्वासाबरोबर जातं, पण अस्तित्वाच्या खुणा मृत्यूनंतर ही शिल्लकराहतात.
पृथ्वीवरच्या माणसांना चंद्राच्या साक्षीचं अप्रूप असतं आणि म्हणून पृथ्वीवरच्या माणसांनी चंद्रावर आपल्या पाऊलखुणा उमटवल्या.
माणसें जिवंतपणीच अस्तित्वा साठीच धडपडत नाहीत तर मृत्यूनंतरही आपलं अस्तित्व कायम राहावं म्हणून धडपडत असतात. प्रत्येकाचं अस्तित्व ठरलेलं असतं, तेवढ्या काळात जगायचं आणि जगवायचं. प्रत्येक क्षणाला अस्तित्व असतं. प्रत्येक क्षण माणूस अस्तित्वासाठी जगतो.क्षणांची मालिका ठरवते अस्तित्व.
आपलं अस्तित्व तर केवळ आपल्या हातात असतं असं नाही तर ते दुसऱ्यांच्या ही हातात असतं.
अस्तित्वाला आव्हान दिलं की अस्तित्व तावून सुलाखून निघतं.
कुणाच्या तरी मनात आपल्याला, आपल्या अस्तित्वाला स्थान असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपल्याच अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव नसतें.
प्रसंगानुरुप काही गोष्टी अस्तित्व सिद्ध करतात. अस्तित्व हे अनुवंशिकतेंच देणंआहेच, पण अंगावरच्या दागिन्या प्रमाणे स्वतःचं अस्तित्व समृद्ध ही करायचं असतं. आनुवंशिकतेतून गोड गळा मिळेल पण रियाज करून अस्तित्व टिकवावं लागतं. संधी मिळाली की अस्तित्व बहरतं. कापलेल्या वृक्षातूनही अंकुर आपले अस्तित्व दाखवंत. खडकातही बिज अंकुरतं.
अस्तित्वाच्या पाऊलखुणांची पाऊलवाटच ठरवतें तुमचंं अस्तित्व.
डॉ.अनिल कुलकर्णी.