*उगवतीचे रंग*
*माझिया मना...*
' थांबणे ' या नावाचा सुभाष अवचट यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. आपल्यापैकी पुष्कळांनी तो कदाचित वाचला असेलही. त्या लेखात त्यांनी जीवनामध्ये आपण कुठे थांबलं पाहिजे हे अतिशय सुंदर उदाहरणे देऊन स्पष्ट केलं आहे. त्यांनी विंदा करंदीकर, तात्या माडगूळकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आदींची उदाहरणे दिली आहेत. ही सगळी मोठी माणसं एका ठराविक ठिकाणी थांबली. लोकांना आवडते म्हणून ते लिहीत राहिले असते तर लोकांना ते हवेच होते. पण जीवनात किती धावायचे, कुठं थांबायचे हे त्यांना कळले होते. नाहीतर माणूस आयुष्यभर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ऊर फुटेतो धावपळ करत राहतो आणि त्याला कळतही नाही अशा एखाद्या दिवशी संपून जातो.
कविवर्य बा भ बोरकर एका ठिकाणी म्हणतात...
मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो.
या ओळी जीवनाचा खोल अर्थ सांगून जातात. झाडावरचे पिकलेले फळ जितक्या सहजपणाने खाली पडते, तितक्याच सहजपणे ज्यांचे ' मी पण ' गळून जाते, त्यांनाच जीवन कळले आहे असे म्हणायला हरकत नाही. झाडावर फळ होण्याची प्रक्रियाच किती सुंदर ! आधी बीजाचे झाडात रूपांतर, ऊन, वारा , पाऊस यांना तोंड देत ते वाढते. त्यातही आपल्या पूर्ण क्षमतेने ते बहरून येते. मग फुले येतात, त्यांचे रूपांतर फळात होते. एक दिवस ती फळेही पक्व होतात आणि अलगद झाडावरून गळून पडतात. जणू त्यांना कळलेलं असतं की आपला आता इथला रहिवास संपला आहे. आनंदाने ती पुढच्या प्रवासाला निघतात.
नुकतीच आपण वसंत पंचमी साजरी केली. वसंत पंचमी म्हणजे निसर्गाचा रंगांचा अनोखा उत्सव. झाडांना नवीन पालवी आलेली असते. निरनिराळी फुले फुलतात. पळसाला फुले येतात. रानात त्याच्या लालभडक फुलांचे दृश्य फारच मनमोहक दिसते. वसंतोत्सव म्हणजे ऋतुराज ! थंडीने गारठलेला आसमंत आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागतो. वसंत ऋतू निसर्गात जणू नवीन प्राण फुंकतो, नवचैतन्य आणतो. थंडीने आपल्या घरट्यात बसलेले पक्षी आकाशात भरारी घेण्यासाठी अधीर होतात. निसर्गातली सगळीच पंचमहाभूते आपापले कठोर रूप टाकून देऊन मनमोहक रूप धारण करतात. वाऱ्यातला बोचणारा गारवा कमी होतो. पाणी देखील शीतल,शांत, गोड आणि अमृतासमान वाटते. आकाश सुंदर निरभ्र असते. निसर्गाला बदल हवा असतो. क्षणोक्षणी तो बदलत असतो. हा वसंतोत्सवातला बदल कमालीचा सुखद असतो. पण हा बदल तेव्हाच घडून येतो जेव्हा सगळे जुने घटक आपापली जागा स्वखुशीने नवनिर्मितीसाठी खाली करून देतात. झाडांवरच्या जीर्ण झालेल्या पानांनी खाली गळण्यासाठी नकार दिला असता तर...! झाडांना नवीन धुमारे फुटले असते ? हिरवाकंच पर्णसंभार घेऊन, विविधरंगी फुले लेऊन सृष्टी नटली असती ? हे सगळे शक्य झाले ते जुनी पानं, फुलं, फळं अलगदपणे गळून पडली तेव्हा. नवनिर्मितीची, सृजनाची प्रक्रिया होण्यासाठी कुठल्यातरी जुन्या गोष्टी जाव्या लागतात.
मला वाटतं निसर्ग आपल्याला हे अप्रत्यक्षपणे शिकवीत असतो. पण जीवनाच्या धावपळीत आपल्याला कुठे वेळ असतो त्याच्याकडे लक्ष द्यायला ? आपण धावत राहतो शेवटपर्यंत. कोणी पैशाच्या मागे, कोणी प्रतिष्ठेच्या, कोणी सत्तेच्या. धाव आणि हाव शेवटपर्यंत संपतच नाही. नव्यांना जागा आपण खाली करून देतच नाही. कुठं थांबायचं हे भल्याभल्याना कळत नाही. जणू आपण सगळे म्हणजे शर्यतीचे अश्व ! जग धावत असते, आपणही धावत राहतो. कुठल्यातरी मोहाच्या अदृश्य बंधनाने आपण बांधले गेलेलो असतो. आपण सगळे प्रवाहाच्या बरोबर वाहत जातो. स्वतःला जाणून घ्यायचे असेल तर उलटा प्रवास करावा लागतो. नदीला जाणून घ्यायचे असेल तर उगमाकडे जावे लागते. कबीर म्हणतात,
मंदिर पैसी चहूं दिसी भीजे, बाहरी रहै ते सुखा
या ओळींचा अर्थ असा आहे की पाऊस सुरु असताना जो मंदिराच्या आतमध्ये आहे, तो पूर्णपणे भिजलेला आहे आणि जो बाहेर उभा राहिला तो कोरडा ! कबीर बरेचदा उलट बोलतात. त्यात गहन अर्थ सामावलेला असतो. मंदिरात राहणारा कसा काय भिजतो ? तर हे मंदिरच वेगळे आहे. हे मंदिर आहे स्वतःच्या आत डोकावण्याचे. यात जो बुडेल, त्याच्यावर अमृताचा वर्षाव होईल, तो चिंब भिजेल. बाहेर राहणारा म्हणजेच ज्याच्या मनाची धाव सारखी बाहेरच आहे, तो कोरडाच राहणार. ओशो आपल्या ' मृत्यू अमृताचे द्वार ' या पुस्तकात एक गोष्ट सांगतात. एक फकीर असतो. रस्त्यावर भीक मागण्यासाठी बसलेला. तो कोणाकडे काही मागत नाही. लोक स्वतःहूनच त्याला पैसे देतात. होता होता एक दिवस या फकीराकडे भरपूर पैसा जमतो. तो विचार करतो मला काय करायचा हा पैसा ! देऊन टाकावा. तो असं जाहीर करतो की गरिबातल्या गरीब माणसाला तो हा पैसा देऊन टाकेल. हे कळल्याबरोबर त्याच्याकडे लोकांची रीघच लागते. प्रत्येकजण मी किती गरीब आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तो त्यांच्यापैकी कोणालाच काही देत नाही. तो म्हणतो खरा गरीब अजून यायचा आहे. तेवढ्यात तिकडून राजाची स्वारी येते. तो फकीर राजाला आवाज देऊन बोलावतो आणि हे पैसे घेऊन जा म्हणून सांगतो. जवळ जमलेले लोक ओरडू लागतात ' हा अन्याय आहे. ज्याला गरज नाही त्याला तुम्ही देत आहात. ' फकीर म्हणतो, ' हा सगळ्यात गरीब आहे कारण याच्याजवळ एवढे असूनही त्याला अजून हवेच आहे. त्याची हाव संपलेली नाही. '
ही फकीर आणि राजाची गोष्ट खूप काही सांगून जाणारी आहे. राजा त्याच्याजवळ सगळे असूनही अजून हवे म्हणून धडपडत असतो. तो शेवटपर्यंत धडपडतच राहतो. आणि देणारा फकीर ? तो तर देऊन आपले सगळे लुटवून मुक्त होऊन जातो. म्हणून ' माझिया मना, जरा थांबना...! '
*© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*
*०६/०२/२०२२*
*प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२*
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा )*