कलंदर कवी कवाफी आणि इथाका
विसाव्या शतकात कवाफी ( Cavafy )नावाचा एक कलंदर कवी होऊन गेला. त्याच्या कविता आज जगभर प्रसिद्ध आहेत. एकट्या इंग्रजी भाषेत त्याच्या कवितांची एक डझनाहून जास्त भाषांतरे उपलब्ध आहेत. त्याच्या कवितांचा मोह भल्याभल्याना पडला आणि त्यांनी आपल्या आवाजात त्याच्या कवितांचे वाचन केले. या कविता, हे वाचन यु ट्यूबवर उपलब्ध आहेत.
कवाफीला कलंदर म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्या कविता त्याने त्याच्या हयातीत कधीही प्रसिद्ध केल्या नाहीत. एवढेच नव्हे तर एखाद्या कवितेच्या तो काही ओळी लिहायचा आणि पाकिटात बंद करून ठेऊन द्यायचा. पुढे कधीतरी काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी तो आपली ही कविता पूर्ण करायचा. ' वन नाईट ' या नावाच्या त्याच्या कवितेच्या काही ओळी त्याने १९०७ मध्ये लिहिल्या आणि ही कविता त्याने १९१६ मध्ये पूर्ण केली. कवाफीच्या काही कविता त्याच्या हयातीत खाजगी वितरणासाठी मात्र प्रसिद्ध झाल्या होत्या. पण पुढे या कवितेतली ताकद, त्यात व्यक्त झालेला आशावाद, मानवी भावभावनांचे बारकावे वाचकांच्या लक्षात आले आणि कवाफीला एक आधुनिक कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली.
कवाफीच्या एकशे चोपन्न कविता आज उपलब्ध आहेत. १९३३ मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि १९३५ मध्ये त्याच्या कवितांचा एक इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. १९१२ मध्ये मात्र त्याच्या समग्र कविता डॅनियल मेंडेलसन याने प्रकाशित केल्या. या कवितांचा इंग्रजी अनुवादही मूळ कवितांएवढाच प्रभावी झाला आहे. ही मेंडेलसनच्या अनुवादाची ताकद आहे.
कवाफीच्या कविता तशी कळायला दुर्बोध आहेत. त्यांची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय त्यांचा आस्वाद घेणे कठीण आहे. कवाफीच्या कवितांमध्ये ग्रीक पुराणातील मिथकांचा वापर केलेला आपल्याला आढळतो. आपल्याकडेही पुराणातील अनेक कथांचे जसे दाखले अनेक कवी, लेखक देतात तसाच वापर कवाफीने केलेला आहे. मात्र हे पुराणातील संदर्भ त्याच्या कवितेत आधुनिक रूप धारण करतात. त्या अनुषंगाने जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. मग त्या पुराणातील राहत नाहीत. ताज्या टवटवीत वाटतात.
आपल्या जीवनात आशेनिराशेचे अनेक प्रसंग येतात. कोणत्या प्रसंगी कसे वागावे याचे काही रेडिमेड उत्तर आपल्याला कुठे मिळत नाही. आपल्या अनुभवाच्या, बुद्धिमत्तेच्या आधारेच आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. अशा प्रसंगातून जगण्याचा मार्ग आपल्याला कवाफीच्या कविता दाखवतात. रिमोर्स, वन नाईट, मॉर्निंग सी, वॉल्स अशा त्याच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. पण सगळ्यात गाजलेली त्याची एक कविता म्हणजे ' इथाका. '
मी वर म्हटल्याप्रमाणे या कवितेला ग्रीक मिथकांचा संदर्भ आहे. इथाका हे ग्रीसमधलं एक बेट. या इथाकाचा एक राजा ओडीसियस हा आपलं प्रचंड मोठं सैन्य घेऊन ट्रॉयच्या युद्धात भाग घेण्यासाठी जातो. ओडीसियस हा अत्यंत शूर आणि लढवय्या असतो. तो युद्धात ट्रॉयला विजय मिळवून देतो. आपल्याकडे रामायण, महाभारतातली किंवा इतिहासातली युद्धे जशी प्रदीर्घ काळ चाललेली आहेत तसेच हे युद्ध सुमारे दहा वर्षे सुरु असते. हे युद्ध संपल्यानंतर विजयी झालेला ओडीसियस आपल्या सैन्यासह इथाकाकडे जायला निघतो. त्याचा हा परतीचा प्रवासही दहा वर्षांचा आहे. या प्रवासात त्याची कसोटी लागते. त्याच्या बरोबरीचे अनेक शूर सैनिक मारले जातात. त्यांची शस्त्रं, घोडे, बोटी, आरमार या साऱ्या गोष्टी नष्ट होतात. ओडीसियस जवळ काहीच राहत नाही. तो एकटा उरतो. तशाही अवस्थेत तो इथाकाला पोहोचतो. जवळपास वीस वर्षानंतर ओडीसियस इथाकाला परतलेला असतो. या अवधीत एखाद्या फकीरासारखी त्याची अवस्था होते. दाढी मिशा वाढलेल्या, शरीरावर जखमांच्या खुणा आणि अंगावर वृद्धत्वाच्या खुणा. पण खरेच ओडीसियसने सर्व गमावलेले असते का ? या प्रश्नाच्या उत्तरात या कवितेचे सौंदर्य दडलेले आहे.
ओडीसियसचा इथाकाकडे होणारा प्रवास म्हणजे जीवनाचे एक प्रतीक आहे. हे प्रतीक आहे मानवी जीवनातील दुर्दम्य आशेचं. कवी म्हणतो, ' तुम्ही इथाकाकडे निघालात तर खूप मार्गक्रमण करण्याचं वरदान मागा. तुमच्या मनात सतत इथाका असलं आणि इथाकाला पोहोचणं हे तुमचं उद्दिष्ट असलं तरी तिथे पोहोचायची अजिबात घाई करू नका.' इथाकाकडे होणारी तुमची वाटचाल जास्त महत्वाची आहे. या वाटचालीत अनेक संकटे तुमच्या मार्गात येतील. ग्रीक पुराणकथेतील नरभक्षक असे लिस्त्रायगनीज, सायक्लॉप्स यासारखे राक्षस तुमची वाट अडवतील. पोसायडन सारख्या समुद्रदेवतेच्या कोपाला बळी पडावं लागेल. पण तुम्ही तुमच्या मनात निर्भयतेला थारा दिलात तर या असल्या गोष्टी तुमची वाट अडवू शकणार नाहीत. ' इथाका ' ही कविता जीवनाच्या वाटचालीचं प्रतीक आहे. या वाटचालीत तुम्ही अनुभवसंपन्न आणि ज्ञानसंपन्न झालेले असाल. ' इथाकाने ' तुम्हाला दिलेली ही संधी आहे. या वाटचालीचा आनंद घ्या. त्यातील सौंदर्य, आनंदाचे क्षण वेचा. जीवनाला खुल्या मनाने सामोरे जा. अशी वाटचाल तुम्ही केलीत तर जशी जीवनाची पहाट रम्य असते तशीच तुमच्या आयुष्याची संध्याकाळ देखील रम्य असेल. आपल्या जीवनाचा अर्थ एखाद्या कवितेत सापडणं यापेक्षा एखाद्या कवितेचं सौंदर्य किंवा तिची सार्थकता काय असू शकेल ?
© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*
*१३/०२/२०२२*
*प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२*
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )