आता विसाव्याचे क्षण...
लता गेली नाही. लता आमच्या साठी विसाव्याचे क्षण सोडून गेली. लता आमच्यासाठी सुखाचे क्षण सोडून गेली.
लता अनेकांच्या जीवनाची शिदोरी आहे.
विसाव्यातच आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलायचं असतं. सामान्य माणसांच्या जीवनात नक्षत्रांचे देणे लता मुळेच अवतरलं. लताने अनेकांना स्वप्ने दिली.
सुर, संगीत ,लय ताल व लता यांनी मानवी जीवन समृद्ध केले आहे . आई जशी असताना पेक्षा नसतांना जास्त कळते तसेच लताचं आहे.
अनेक गाणी लता साठी लिहिलेली होते की काय असं आता प्रत्येक लताचं गाणं ऐकताना मनाची अवस्था होते. तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा म्हणत लताआमच्या बरोबर असणार आहे. लताने आयुष्य समृद्ध केले आहे. आमचं आयुष्य अजूनही व्यापणारी एकच गोष्ट म्हणजे लता.
जीवनात ही घडी अशीच राहू दे याची सतत आठवण करून देणारी लता. आमचा प्रत्येक श्वास आमचा प्रत्येक गाणं लतामय आहे.गाण्यात
जगणं हेच मध्यमवर्गीयांचे साम्राज्य आहे. ऐ मेरे वतन के लोगो म्हणत रडवणारी लताच असतें.
देव आपल्या आवाक्यात नसतो, आपल्या पाहण्यात नसतो मग अशा वेळेस काही माणसांना आपण देवत्व बहाल करतो त्या पैकीच लता. गाण्यावर सुद्धा प्रेम करायचा असतं, गाण्याला सुद्धा खुप जपायचं असतं, गोंजारायचं असतं आपल्या श्वासाची उब गाण्याला द्यायची असते .गाणं सुद्धा एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतरच त्याचा अर्थ अधिक मनाला भिडतो आणि हे लतानी केलं आहे .कवी गाणं लिहितो गायक त्याच्या पुढची दालनं आपल्यासाठी खुली करतो. आमच्या क्षणांना जर कोणी सुखावलं असेल तर ते लतानीच. असंख्य समाधानाच्या हिंदोळ्यावर आम्ही झुललों असेल तर लताच्या गाण्यांवरच.आमचं भरणपोषण लता च्या गाण्यांनी झालं आहे व उर्वरित आयुष्य सुद्धा लताच्या गाण्यावर आम्ही आनंदाने काढणार आहोत. लताची गाणी असल्यामुळेच संध्याछाया भिववित नाहीत.
अभिजात शब्दाचा अर्थ आम्हाला लतांचा गाण्यांनीअधिक कळला.
आमचा समृद्ध वारसा रक्तातूनच वाहत नाही तर लताच्या गाण्यातून ही वाहतो.
सर्व सामान्यांना गाता येत नाही. गाण्याच्या माध्यमातूनच सामान्य माणसें आपली स्वप्न पूर्ण करतात. गाणाऱ्याच्या जागी, अभिनय करणाऱ्या च्या जागी स्वतःला कल्पूनच अनेक जणांनी आत्मविश्वास कमावला. शब्दांना शिस्त लावावी लागते. शब्दांना वळन लावावे लागते. शब्दांना अंकित ठेवावे लागते. शब्दांना श्वास रोखून धरायला शिकवावे लागते तेव्हा कुठे सूर निघतात.
गुरु समोर नतमस्तक व्हायला होते तसे लता समोर शब्दही नतमस्तक होत.
लता आमच्या अस्तित्वाचा आरसा आहे. लता आमचा वारसा आहे. वारसा जपल्या ने आयुष्य समृद्ध होतं. आम्हाला अभिमान आहे लता आमचा वारसा आहे.
डॉ.अनिल कुलकर्णी ९४०३८०५१५३