• 05 March 2022

    उगवतीचे रंग

     भारतीय संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक : कमळ

    5 360

    *भारतीय संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक : कमळ*

    भारतीय संस्कृतीची काही प्रतीके अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. कमळ, कासव, स्वस्तिक, रांगोळी इ. तशी तर ही प्रतीके धार्मिक दृष्ट्या महत्वाची मानली जातातच पण आपल्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टीही ते आपल्याला सहज शिकवत असतात. ही सगळी प्रतीके म्हणजे सत्य, सुंदर आणि शिवाची आराधना ! अंधारातून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे, क्षुद्रतेतून उदात्ततेकडे ही प्रतीके आपल्याला घेऊन जातात. यातीलच एक महत्वाचे प्रतीक म्हणजे कमळ.

    कमलपुष्पांनी भरलेले एखादे सरोवर आपले मन मोहून टाकते. क्वचित काही बंगल्यांच्या आवारातही कमलपुष्पे आपल्याला दिसतात. पण वनामध्ये किंवा एखाद्या बागेत किंवा एखाद्या सरोवरात फुललेल्या कमलपुष्पांचे सौंदर्य काही वेगळेच ! ते दृश्य मनाला प्रसन्न करते. तशी तर सगळी फुले सुंदरच असतात पण कमलपुष्प काही वेगळेच ! त्याच्या त्या तलम पाकळ्या, सुंदर आणि आकर्षक पाने, कमलपुष्पातील हे तंतू सगळेच भाग कमालीचे सुंदर. आपली सगळी पुराणे, वेद, देवदेवतांची स्तोत्रे कमळविषयक उपमांनी भरलेली आहेत. बहुतेक सगळ्या देवांचे आवडते पुष्प म्हणजे कमळ. भगवान विष्णूंच्या हातात कमळ. लक्ष्मी तर कमळजा. तिला कमला असेही म्हटले जाते. ब्रह्मदेवाची उत्पत्ती तर श्रीविष्णूच्या नाभिकमलातून झाली. गणपती, लक्ष्मी यांना आपण पूजेच्या वेळी कमलपुष्प अर्पण करतो. परमेश्वराच्या बहुतेक सर्व अंगांचा उल्लेख करताना कमलपुष्पाची उपमा दिली जाते.

    श्री रामरक्षास्तोत्रात अनेक ठिकाणी श्रीरामाचा उल्लेख करताना कमळाची उपमा दिली आहे. राम कसा आहे तर ' रामं राजीवलोचनम...' म्हणजे कमळाप्रमाणे नेत्र असलेला राम. ' नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम ' म्हणजे ज्याचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळाशी स्पर्धा करताहेत असा ( श्रीराम ). श्रीराम, सीता यांच्याबद्दल बोलताना करकमल, मुखकमल यासारखे शब्द वापरले जातात.

    मुळात कमळाचे फुलच किती सुंदर असते ! आणि त्याचे प्रकार तरी किती नानाविध ! दिवसा उमलणारे, रात्री फुलणारे. कमळ हे सौंदर्य, पावित्र्य आणि अलिप्तता यांचे प्रतीक आहे. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर कमळे उमलतात आणि सूर्यास्ताबरोबर मिटतात. काही कमळे रात्री चंद्रप्रकाशात उमलतात आणि सकाळी मिटतात. सकाळी उमलणारे कमळ आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. सूर्याबरोबरच ते हळूहळू उमलतं आणि त्याच्याबरोबरच हळूहळू ते मिटत जाते. असे कमळ म्हणजे सूर्यभक्तीची पराकाष्ठा आणि तेजाच्या उपासनेचे प्रतीक आहे. आपलाही दिवस असा सूर्याच्या साक्षीने सुरु व्हावा. दिवसभर आपण पूर्ण क्षमतेने आपापल्या जीवनासाठी, ध्येयासाठी, कार्यासाठी वेळ द्यावा. नंतर कृतार्थ मनाने पुन्हा दुसऱ्या दिवशी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी विश्रांती घ्यावी. चंद्रप्रकाशात उमलणारी कमळं तर सौंदर्याची आणि नाजूकतेची परिसीमा. त्यांना उमलण्यासाठी चंद्रप्रकाशही पुरेसा होतो.

    कमळातील मधू प्राशन करण्यासाठी भ्रमर किती अधीर असतात. कठीण असे काष्ठ म्हणजे लाकूड देखील पोखरणारा भ्रमर कमलपुष्पाला मात्र यत्किंचितही इजा करीत नाही. अगदी अलगद मधुप्राशन करतो. कमलपरागचे सिंचनही करतो. कमळाचे आणि त्याचे प्रेम काय वर्णावे ! जणू कमळावर आसक्त झालेला प्रियकरच तो ! त्या प्रेमात मग्न झालेल्या भ्रमराला कधी कधी रात्र झाली आणि कमलिनीच्या पाकळ्या मिटत आल्या आहेत याचे भानही राहत नाही. त्या नाजूक पाकळ्यांमध्ये तो जणू कैद होतो. पण त्याचं प्रेम इतकं की त्या नाजूक पाकळ्यांना धक्का लावण्यापेक्षा प्रसंगी आपले प्राण गमावणे तो पसंत करतो.

    ज्ञानदेवांचा एक सुंदर अभंग आहे. ' रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ...' इथे ज्ञानदेवांनी आपल्या मनाला भ्रमराची उपमा दिली आहे. आपलं मन म्हणजे जणू भ्रमर ! भ्रमरसारखं चंचल. सारखं इकडून तिकडे, तिकडून आणखी कुठेतरी. त्याला स्वस्थता अजिबात नाही. कमळामध्ये असलेला मकरंद सोडून तो इतस्ततः भटकत असतो. कस्तुरीमृगाच्या नाभीत कस्तुरी असते, पण त्याला हे कुठे कळते ? तो तिच्या शोधात धाव धाव धावतो. माणसाचेही तसेच आहे. त्याच्या हृदयात परमेश्वर आहे पण त्याचे मन सारखे बाहेर धाव घेत असते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ' चरणकमलदळू रे भ्रमरा...' संतांच्या, परमेश्वराच्या चरणकमलांचा तू आश्रय घे. किती सुंदर आहे माऊलींचे समजावणे !

    कमळ पाण्यात जन्मते, वाढते म्हणून ते नीरज आहे. चिखलात जन्मते म्हणून पंकज आहे. सरोवरात फुलते म्हणून सरोज आहे. पण कमळाची पाने पाहिली का ! ती पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त ! चिखलात राहून कमळ चिखलापासून अलिप्त. म्हणून कमळाच्या ठायी पवित्रता, सौंदर्य जसे आहे तशीच अलिप्तताही. भोवतालची परिस्थिती कशीही असो, त्याने ते लिप्त होत नाही. जो लिप्त होत नाही तो अलिप्त !

    गीतेत सुद्धा भगवान कर्मयोगी पुरुषाची लक्षणे अर्जुनाला सांगताना म्हणतात, ' कर्म करणारा पुरुष आसक्तीरहित राहून ईश्वरार्पर्ण भावनेने कर्म करतो. तो पापाने लिप्त होत नाही. भोवताली कितीही दलदल, चिखल असू दे, विपरीत परिस्थिती असू दे. तो त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर होऊ देत नाही. किती सुंदर पद्धतीने कमळाचे फुल आपल्याला ही गोष्ट शिकवते. संकटे, विपरीत परिस्थिती, नैराश्य या गोष्टींना कमळाजवळ थारा नाही. ' दैवायत्तम कुले जन्म, मदायत्तम तू पौरुषम ' कोणत्या कुलात, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या जातीत जन्म घ्यायचा हे भलेही दैवाधीन असेल, पण कर्तव्य करणे, पुरुषार्थाची पराकाष्ठा करून आपला उत्कर्ष साधणे हे माणसाच्या हाती आहे. म्हणून परिस्थितीचे रडगाणे गात बसणे हे पराक्रमी माणसाच्या नियमात बसत नाही.

    कमळ हे शतदल, सहस्त्रदल सुद्धा असते. तशीच आपली भारतीय संस्कृती. विविध जाती, धर्म, प्रथा, परंपरा, भाषा. पण कमळ जसे अनेक पाकळ्यांचे बनलेले एकच फुल असते, तशीच आपली संस्कृती. अनेकतेत एकता. तिने या सर्वांना सामावून घेतले आहे. तिचा हा सुगंध दशदिशात पसरावा. कमळाकडे भ्रमर आकर्षित होतात, तसेच जगातील अनेक देश या भारतभूमीकडे आकृष्ट व्हावेत. जगाला मांगल्य, पावित्र्य, सौंदर्य, अलिप्तता यांची शिकवण आपल्या संस्कृतीने द्यावी. विद्यार्थ्यांना शाळेत शिकवताना भारतीय संस्कृतीची अशी सुंदर प्रतीके, त्यांचा अर्थ, त्यांची शिकवण समजावून द्यायला हवी. तरच त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन विशाल व्हायला मदत होईल.

    *© विश्वास देशपांडे, चाळीसगाव*

    *प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२*

    ( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )



    vishwas deshpande


Your Rating
blank-star-rating
Seema Puranik - (06 March 2022) 5
सुंदर

1 0

Swati Deshpande - (05 March 2022) 5

1 0