कधी कधी आपण ऐकतो ना कि कुणाला स्मृतिभ्रंश झाला.
तर हे स्मृती जाणं कधी अनुभवलंय का तुम्ही?? अगदी काही काळ तरी...कदाचित काही सेकंद....
एखादा रस्ता, एखादी वस्तू अगदी माहीत असताना विसरतो आपण. इतकंच काय एखादी व्यक्ती समोर येते, कधी चेहरा ओळखीचा वाटतो पण नावाचं नाही आठवत..... कधी नाव आठवत ... पण संदर्भ आठवतच नाही. हा असा स्मृतिभ्रंश थोडा ना थोडा अनुभवला असेल सर्वांनीच.
खरं सांगू... कधी एकदम निवांत वाटतं तेव्हा... मी माझा प्रयत्न करून मोकळी होते 'मला नाहीच आठवत, आता पुढचं काय ते तुम्ही पहा.' पण मग दुस-यांवर विसंबून राहणं आलं कि आणि दुसऱ्यावर विसंबून राहणे कोणाला आवडेल हो?? कोणालाच नाही...मग विचार केला कि ज्यांची कायमची स्मृती गेलीय त्यांचं जीवन किती परावलंबी, किती काळोखातलं... जणू दृष्टीहीनच.
ज्या डोळ्यात भूतकाळ भरून येत नाही, त्यात भविष्याची स्वप्नं तरी कशी पडणार...?
....स्मृती...असू द्या हो.... असलेली चांगलीच.
- अनुपमा