सवय
मनुष्य हा कर्मानुसार घडत असतो. त्याचे कर्म म्हणजेच त्याच्या सवयी. चांगल्या सवयी असतील तर जीवनावर विधायक परिणाम होतील आणि वाईट सवयी असतील तर नकारात्मक परिणाम होतील. जीवन आनंदी, समाधानी असावे असे प्रत्येकाला वाटते त्यामुळे चांगल्या व्यक्तींची संगत आणि चांगली सवय अंगी बाणवली गेली पाहिजे.
एखादी सवय असते. हळू हळू अगदी पक्की सवय होते. मग ती अपरिहार्य गरज बनू लागते. यातल्या कुठल्याही टप्प्यावर ती सवय सोडण्यासाठी बरीच कारणं समोर आलेली असतात, पण आपण तिथे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असतो. अन वाटलंच कधी एखादी सवय सोडायची की मेंदू जरा मनाशी स्ट्रीक्ट वागू लागतो. आता हे बंद, हे करायचंच नाही हे घोकायला लावतो. पण सवय म्हणजे व्यसनच. हळूहळू सोडू, एकदोनदा करून सोडू असे विचार येतात. मग मात्र ...बंदच करायचं हा पक्कावाला निर्णय...
मग त्या सवयीशी निगडीत काही मोहक, ह्रद्य आठवणी येतात... खूप आतून... खूप भिडणाऱ्या. पुन्हा एकदा प्रयत्न... आता पुन्हा कधी ते माहीत नाही म्हणून परत तेच होतं. एव्हाना जाणवायला लागलेलं असतं, इतकी काही वाईट सवय नाहीय. आपण जे काही करतोय ते चांगलंय की. लोक ही कौतुक करतात. का उगाच ती सवय मोडायची नं मग...?
ती तशीच्या तशीच राहते... नव्हे आणखी दृढ होते...
चांगल्या सवयी लावणं कठीण असतं, असं म्हणतात. पण खरंतर हे सगळे केवळ मनाचे खेळ आहेत. एकदा आपण आपलं मन तयार केलं की सगळे प्रश्न दूर होतात. नकारात्मकता लवकर अंगी जडते पण सकारात्मकता जडायला थोडा वेळ द्यावा लागतो.... कठीण नक्की नाही.
अनुपमा