शोपीज़नच्या सर्व वाचकांना नमस्कार !
कालच शीख समाजाचा मोठा सण म्हणजे गुरुनानक जयंती साजरा झाला. गुरुनानक जयंती कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते , याला प्रकाश पर्व किंवा गुरू परब असेही म्हणतात. शीख धर्माच्या लोकांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. हे धर्मावलंबी नगर कीर्तन आणि अनेक कार्यक्रम सादर करतात या दिवशी प्रभात फेरी काढली जाते आणि शिख लोक भक्ती भावनेने गुरुद्वारात कार सेवा करतात.
गुरुनानक जयंतीच्या काही दिवस आधीच मी अमृतसर येथे गेले होते. दिव्य ,चमत्कारी स्वर्ण मंदिर चे दर्शन घेऊन मी तेथील फुलकारी चे वस्त्र आणि खाद्य संस्कृतीवर थोडी अभ्यासदृष्टी घातली आणि तिथल्या खाद्य संस्कृती बद्दल मनामध्ये जिज्ञासा झाली पंजाब मधली काही विशिष्ट खाद्यपदार्थांची रेसिपी शिकून, बनवून त्याचा यशस्वी प्रयोग केला.
तेव्हाच " जेथे जाऊ तेथे खाऊ " च्या मागील सदरात मी छोले कुलचा या खाद्यपदार्थ ची रेसिपी दिली होती.
अमृतसर मध्ये " सुबह की सैर " करताना सकाळचा थंड वारा आणि थंडीची चाहूल वातावरणात जाणवत होती. मुख्य म्हणजे हेही जाणवले की पंजाबची खाद्य संस्कृती थंडीमध्ये स्वादेंद्रियांना काही औरच चव देते. या खाद्य संस्कृती मधला एक विशिष्ट खाद्यपदार्थ म्हणजे " सरसो दा साग और मक्के की रोटी " असा आहे. पंजाब मध्ये थंडी सुरू झाल्यावर सरसोदा साग आणि मक्याची रोटी हा चविष्ट पदार्थ वरचेवर बनवतात. सरसो ची पालेभाजी ही उष्ण असून शक्तीवर्धक असते, यासोबत मक्याची (कणीस) ची पोळी , ताक किंवा लस्सी ,पुलाव , सलाद आणि गुळ असे जेवण बनवले जाते. मला ही डिश मनापासून आवडली तेव्हा आज मी आपल्याला " सरसो दा साग और मक्के की रोटी " ची रेसिपी सांगते.
सरसो का साग -
अर्धा किलो सरसो ची पालेभाजी
एक पाव बथुवा (चाकवत ची भाजी )
एक पाव चवळी (चौलाई) ची पालेभाजी
शंभर ग्राम शेपूची भाजी
एक पाव पालक
एक कांदा
आल्याचा तुकडा एक इंच
लसूणच्या आठ कळ्या
दोन हिरव्या मिरच्या
तीन टमाटर
तीन चमचे मक्याचा आटा
दोन चमचे साजूक तूप
पाव वाटी लोणी
चिमूटभर हळद
अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ.
वरील सर्व पालेभाज्यांना व्यवस्थित निवडून घ्याव्यात आणि त्यांना तीन ते चार पाण्यात धुऊन काढावे. रोळीमध्ये ठेवून पालेभाज्यांचे पाणी काढून घ्यावे
. या पालेभाज्यांना कापून कुकरमध्ये अर्धी वाटी पाणी वर येईल एवढ्या पाण्यात ठेवावे , त्याच्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा, लसणाच्या आठ कळ्या, एक हिरवी मिरची या तिन्ही पदार्थांना वस्तूंना ठेचून सरसो व इतर पालेभाज्या सोबत कुकरमध्ये ठेवून साधारणपणे दहा मिनिटं शिजवावे. दोन ते तीन शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करावे ,वाफ दबल्यावर या भाज्यांचे मिश्रण परातीत काढून कोमट करावे. भाज्यांचे मिश्रण कोमट असतानाच त्यांना मॅश करावे (कुस्करावे किंवा मिक्सीतून जाडसर दळावे ) आणि कढाई मध्ये साजूक तूप घालावे. त्या तुपात अर्धा चमचा जिरं घालून आलं , हिरवी मिरची, लसणाचा ठेचा घालावा. हळद आणि बारीक चिरलेला कांदा घालावा .ह्याला सोनेरी रंग आला की टमाटर बारीक- बारीक चिरून घालावेत तेही शिजले की कुकर मध्ये शिजवलेले सरसो की सागच मिश्रण या मसाल्यात घालावे .हे मिश्रण व्यवस्थित हलवून त्यात दोन ते तीन चमचे मक्याचा आटा( कणिक) घालावी . मक्याच्या कणकेने साग एकजीव आणि चविष्ट बनते , ही भाजी शिजत आली की त्यात लोणी घालावे ,चवीनुसार मीठ घालावे.
मक्के की रोटी -
तीन वाटी मक्का
एक चमचा तेल
चवीपुरते मीठ
दोन चिमूट ओवा
कोमट पाणी
मक्याच्या आट्यात( कणिसच्या कणकेत) तेल , ओवा ,मीठ ,घालून त्याला कोमट पाण्याने मळावे आणि दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून मुरु द्यावे. 15 मिनिटांनी लाटी बनवून पोळपाटावर लाटावे .तव्याला थोडंसं गरम करून त्यावर थोडंसं तूप पसरवावे आणि ही पोळी घालावी. पोळी एका बाजूने फुगू लागली की तिला उलटावे आणि नंतर गॅसवर दोन्हीकडून भाजून सरसोदा साग बरोबर ताटात सर्व करावे , त्यावर लोणी घालावे . सरसोच्या साग वरती अर्धा चमचा लोणी घालावे. सरसोदा साग आणि मक्याच्या रोटी सोबत पुलाव ,ताक किंवा लस्सी , गुळ आणि सलाद ,सर्व्ह करावे.सलादमधे मुळा ,लिंबू विशेष करुन सामिल करावा त्याने भाजीचा स्वाद द्विगुणित होतो.
सरसो दा साग मध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स ,मिनरल्स , लोहलवण हे मिळतात. ही भाजी अतिशय चविष्ट, शक्तीवर्धक आणि पौष्टिक असते. मक्के की रोटी मध्ये भरपूर कार्ब्स मिळतात. लोण्यात फॅट मिळतात या सर्व पोषक तत्त्वांनी थंडीत शरीराला उष्णता तर मिळतेच शिवाय ऊर्जा आणि चैतन्यही मिळते . हा मेन्यू फक्त थंडीतच मिळणार बरं कां ! चला की , मग यंदा थंडीत बनवूया " सरसो दा साग , मक्के की रोटी " !
- डॉ. वसुधा गाडगीळ , इंदूर.