थंडीच्या दिवसात खाण्याची रेलचेल असते , पदार्थांना सुद्धा एक वेगळीच चव असते .थंडीत काम करता- करता हुडहुडी भरते आणि गारव्याने आरोग्यावर परिणाम होतो , माणसाची कामाची गती हळू होते. थंडीत , शरीराला उष्णता येण्यासाठी , ऊर्जा मिळण्यासाठी चला आपण काही शक्तीवर्धक , उष्मावर्धक असे पदार्थ बनवूया. " जेथे जाऊ तेथे खाऊ " या सदरात आज आलेपाक , डिंकाचे लाडू , मेथीचे लाडू , अळीवाचे लाडू असे बनवूया.
-
********
आलेपाक हा उष्णता वाढवणारा , थंडीपासून वाचवणारा पदार्थ आहे. आलेपाक म्हणजेच आल्याच्या वड्या . ह्या वड्या बनवण्यासाठी अतिशय सरळ , सोप्या , चविष्ट आणि ऊर्जावर्धक आहे.
कृती -
*****
एक पाव आल्याला पाण्यात दोन-तीन तास बुडवून ठेवावे त्यानंतर त्यांना कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसावे . सालं काढून गोल-- गोल बारीक असे काप करावे किंवा ते आले किसून घ्यावे. साधारणपणे एक पाव आल्या आल्यात एक वाटी भरून किस निघतो. एक वाटी किसासाठी दोन वाटी साखर घ्यावी आणि दोन ते अडीच चमचे तूप घ्यावं.
कढईमध्ये तूप घालून त्यात किसलेलं आलं घालावं. त्याला छान एकजीव करून घ्यावं आणि त्यात दोन वाटी साखर घालावी. हे सर्व साहित्य उलथन्याने सतत ढवळत राहावे. आलं कढाईला चुकूनही लावू देऊ नये नाहीतर आलेपाक ची चव चांगली नाही लागणार. आता मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटं शिजवावे. हे भुरकट पिवळटसर साहित्य , तयार होता होता गडद पिवळ्या रंगाचे होते. आलेपाक तयार झाल्याची मुख्य खूण म्हणजे आल्याचा गोळा कढईतून सुटायला लागतो तेव्हा समजायचे की आपला आलेपाक तयार झाला आहे. एका ताटाला एकसारखा तुपाचा हात फिरवायचा .वाटीच्या मागच्या बाजूला तुपाचा हात फिरवायचा आणि आलेपाक कढईतून पटकन काढून पसरवायचा. दोन मिनिटांनी लहान सर वड्यांच्या खुणा करायच्या. या वड्या सकाळी निहारी सोबत किंवा जेवणानंतर खाव्यात.
मेथीचे लाडू -
*********
थंडीत मेथी शरीराला उष्ण उष्णता देते . मेथीदाण्याचा एक लाडू आपल्याला दिवसभराची ऊर्जा आणि शक्ती देतो , रोज एक लाडू खाल्ल्याने उत्तम आरोग्य मिळते. मेथीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
अर्धी वाटी मेथी दाणा मंद आचेवर भाजून घ्यावा. थंड झाला की मिक्सी मधून या मेथीदाण्याची बारीक पावडर करून घ्यावी.
अर्धी वाटी साजूक तूप , तुपात मेथी दाणा पावडर बुडवून , फेटून दोन ते तीन दिवस झाकून ठेवावा. या पेस्ट ला रोज एकदा हलवून घ्यावे.
अडीच ते तीन वाटी मकाणे पावडर , एक वाटी काजू ची मिक्सीतून वाट थोडीशी दरदरीत पावडर , एक वाटी खारीक पावडर , अर्धी वाटी बदाम , अर्धी वाटी पिस्त्याची पावडर , एक वाटी किसलेले खोबरे घ्यायचे. हे सर्व जिन्नस दोन चमचे तुपात परतून घ्यायचं . एक वाटी किंवा चवीनुसार अर्धी वाटी किसलेला गूळ किंवा बारीक साखर घ्यावी. साधारणपणे दोन वाटी साजूक तूप कढईमध्ये कोमट करून , पातळ करावं व त्यात हे सर्व जिन्नस एकत्र करावं. त्याबरोबरच बदाम , पिस्ता , काजू , अखरोडचे बारीक- बारीक काप ही घालावे , किसमिस घालावे आणि लहानसर लाडू वळावे. हे लाडू थंडीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यांनी हाडांचे दुखणे नाहीशी होतात.
डिंकाचे लाडू -
***********
डिंक हा बाभळीच्या झाडातून निघतो बाभळीच्या झाडाच्या खोडातून तयार झालेला डिंक बाहेर पडतो आणि वाळतो तो डिंक खाण्यायोग्य असतो.
अर्धी वाटी डिंक घेऊन त्याला दोन चमचे तुपात तळावे. हा सोनेरी पिवळा डिंक तळल्यावर फुगून पांढरा शुभ्र होतो. थंड झाला की याचीही पावडर करावी . "वरील मेथीच्या लाडवा तून मेथी सोडून इतर सर्व जिन्नस त्याच प्रमाणात घ्यावे " या सर्व जिन्नस मध्ये डिंकाची पावडर घालून अगर तूप हवं असल्यास तू घालून लाडू वळावे. डिंकाचे लाडू हे अतिशय आरोग्यवर्धक , चविष्ट , हाड दुखी दूर करणारे , संपूर्ण शरीराला पोषण देणारे असतात. या लाडवांमध्ये ड्रायफ्रूट्स घातल्याने ड्रायफ्रूट्सची ऊर्जा आम्हाला शरीरात लवकर मिळते , थंडीत आपले शरीर उष्ण राहते.
आळीवाचे लाडू -
************
आळीवाच्या लाडवासाठी एक वाटी आळीव , ओल्या नारळाचे एक वाटी पाणी , अडीच ते तीन वाटी ओलं खोबरं ,( किसलेलं किंवा मिक्सीतून काढलेलं) एक वाटी गूळ चवीनुसार , काजू , बदाम , पिस्त्याचे काप , (अर्धा चमचा ), चवीनुसार जायफळ किंवा वेलदोड्याची पूड .
अळीवातले बारीक खडे , माती काढून एक कप नारळाच्या पाण्यात दोन तास भिजवून ठेवावे. त्यानंतर आळीव , खोबरं ,गुळ एकत्र करून गॅसवर शिजायला ठेवावे. त्यातच अर्धा ते एक चमचा साजूक तूप घालावे. उलथन्याने चालवावे. सतत चालवले की जिन्नस कढईला चिकटत नाही. हे सर्व साहित्य घट्ट होत आलं , कढईतून सुटू लागलं की गॅस बंद करावा आणि कोमट झाल्यावर जायफळ किंवा वेलदोड्याची पूड घालून लाडू वळावे.
खाद्य संस्कृतीचा हा वारसा जपून ठेवण्यासाठी ...... चला की लवकरच बनवूया हे सर्व चविष्ट , मस्त - मस्त पदार्थ !
डॉ. वसुधा गाडगीळ इंदूर