एक आनंदाचं झाड असावं अंगणात मनाचा काना कोपरा लखलखीत करणारं..
हरवणं आणि मिळवणं ह्याची व्याख्या काय करतो आपण...?
मिळवणं हे फक्त ऐहीक असावं का..? समाधानाची कोणतीच शाश्वती नसते. उर फुटेस्तोवर धावायचं.. हातांतून कधी निसटत चाललेल्या
नात्यांसाठी ..तर कधी ... हे मिळवलं नाही, अजून ते मिळवायचं राहीलंय अतृप्त समंधा सारखं इच्छा, आकांक्षां मागे पळत सुटायचं ...कोणी मागून तं याचा पत्ता नाही, कुणाला पुढं ही जाऊन द्यायचं नाही, सतत ईर्षा, असूया, स्वार्थ यांच्या मखलाश्या करत रहायचं..मग समाधान आहे कुठे ...? अस्थिरतेची गुलामगिरी पत्करायची .. कुठेतरी थांबायला हवंय ना हे .... प्रयत्न आपणच करायचे... सुटणारे हात घट्ट धरायचे ....
तुमच्या असूया,तुमचे स्वार्थ थोडेसे बाजूला ठेवायचे ... नात्यांतल्या दुराव्यांची सांगता करायची ... शेवटी दुःखात उर फुटणारं रडू थांबवायला ही कुणी हवं असतं आणि सुखाचे इमले आनंदानं पहाणारं कुणी हवं असतं ... लावा एक झाड आनंदाचं ....
शुभसंकेतांची उमलून येणारी फुलं खुडावीत जराशी ... नात्यांचं बहरणंही पहावं असोशीनं.... एकटे जाण्या पेक्षा घ्या बरोबर इतरांनाही.... समाधानानं मिळवणं होईलच मग . जन्म मृत्युचे खुलासे मागतांना कित्येक योजनं पार करतो आपण... पाप-पुण्याच्या हिशोबांची वही लपवत ही रहातो कधी सहज कधी मुद्दामहून...
कधीतरी केलेल्या चूका समजावून घेतांना त्या परत न होण्यासाठी काय करतो तर अद्वैताशी बांधून घेतो... एका अनाहूत येणाऱ्या संकटांची कारण मिमांसा न करतांच शरण जातो त्या परमात्म्याला... आत्मशुद्धीची एकेक पायरी चढतांना हरवत जातो स्वतःला ..
कोणतेच संदर्भ मागे ठेवत नाही.. आत्म्याचे तादात्म्य हे उजळत नेतं आयुष्य ... मग हे शकुनांचे संकेत तुम्ही पुन्हा सकारात्मक उर्जेत परावर्तित करता ... हे खरं हरवणं.. जिथे शोधायचं स्वतःला स्वतःतल्या मी ला... ते हरवणं ही सांकेतिक, शोधणं ही भारावणारं...
अनुपमा