• 17 August 2023

    पुस्तक परीक्षण

    मूल्यांची रूजवण करणारा - अलादीनचा नवा चिराग

    0 21

    मूल्यांची रूजवण करणारा - अलादीनचा नवा चिराग

    -गुलाब बिसेन, गोंदिया
    मो.नं. 9404235191

    इयत्ता ५ वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील "कठीण समय येता" या पाठाचे लेखक मनोहर भोसले हे संवेदनशील लेखक म्हणून सर्वश्रुत आहेत. प्रौढ साहित्यासोबतच ते सातत्याने बालसाहित्याचे लेखन करत आले आहेत. त्यांच्या अनेक बालकथा प्रमुख मासिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत. आता ते बालवाचकांसाठी "अलादीनचा नवा चिराग" हा बालकथा संग्रह घेऊन आले आहेत.

    बालमन हे अत्यंत संवेदनशील असते. आपल्या अवतीभवती घडणार्‍या घटना ते सतत टिपत असते. अशा संवेदनशील मनाला अधिक सुसंस्कारीत करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. ती गरज बालसाहित्यातून सहज पूर्ण होवू शकते. हाच प्रयत्न लेखक मनोहर भोसले यांनी या पुस्तकातून करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या अवतीभवती वावरणारे पशुपक्षी या पर्यावरणाचा महत्वपूर्ण भाग आहेत. अशा पशुपक्ष्यांचा सांभाळ करण्याची भावना बालमनात रूजवण्याचा प्रयत्न "चिव चिव चिव….जीव लावा जीव…." या कथेतून लेखकाने केला आहे. या कथेतला जितू, त्याचे चिमण्यांसाठी दुकानातून धान्ये गोळा करणे यातून त्याची चिमण्यांना वाचवण्यासाठीची धडपड बालमनात खोलवर रूजून बसते.

    पर्यावरण आणि मानव यांचे नाते हे परस्पर पुरक असल्याने एकमेकांची काळजी घेणे काळाची गरज आहे. मधमाशा मारायला आलेल्या माणसापासून मधमाशांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने झाड हलवून मधमाशाचे पोळे उडवणारा बंड्या हा खोडकर मुलगा वाचकाला "गुपचूप गुपचूप….चुपगूप चुपगूप" या कथेतून भेटतो. या कथेचा नायक असलेला बंड्या आपल्या कृतीतून मधमाशांचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्व अधोरेखीत करत वाचकांना मधमाशांचे महत्व पटवून देतो. "दहा रूपयांचे भांडवल" या कथेत शाळेत हुशार असलेला सोनू महागडी पुस्तके परवडत नसल्याने आपली वाचनाची भूक भागवण्यासाठी एक नविन शक्कल लढवतो. बाबांकडून रडून दहा रूपये घेवून त्या दहा रूपयांत शेजारच्या काकांकडील रद्दी घेतो. त्या रद्दीतून आपल्या वाचनासाठीच्या पुरवण्या आणि उपयुक्त माहिती काढून घेवून ती रद्दी दहा रूपयाला रद्दीवाल्याला विकतो. यातून तो बाबांनी दिलेले दहा रूपये जसेच्या तसे वाचवतो, सोबतच वाचन, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, सुविचार संग्रह असे छंदही जोपासतो.

    पारध्याच्या पिंजर्‍यातून पोपटांची सूटका करवून घेणार्‍या नील आणि त्याचे मित्र "असा हा एक सर्जिकल स्ट्राइक" या कथेत भेटतात. पारध्याच्या कैदेतील पोपटांना सोडवण्यासाठी त्यांची धडपड आणि त्यांनी केलेली युक्ती वाचकाला वेगळा थ्रील अनुवण्याची संधी देतात. त्यांना अप्रत्यक्षपणे साथ देणारे शाळेचे मुख्याध्यापक वाचकाला आपलेसे वाटतात. या पुस्तकाची शिर्षक कथा असलेली "अलादीनचा नवा चिराग" बालवाचकाला नवी दृष्टी देणारी आहे. अभ्यासात आळस करणारा अलादीन सर्व कामे जिन्नीच्या जादूने करून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु हुशार जिन्नी तसे करायला स्पष्ट नकार देतो. जन्माला आलेला प्रत्येक बालक हा जिन्नच असतो. त्याच्याकडे स्वत:ची बुद्धी, शक्ती असते. असे समजावणारा जिन्न तसेच अलादीनला "मोबाईल" रूपी जादूच्या चिरागाविषयी सांगताना मोबाईल जेवढा चांगला तेवढाच घातकही असल्याची जाणीव करून देतो. मोबाईलचा डोळसपणे गरजेच्यावेळीच उपयोग करायला हवे हे वाचकाच्या मनावर बिंबवण्याचे काम ही कथा नकळत करते.

    या संग्रहातील "पी फाॅर पारितोषिक" ही कथा अनोळखी व्यक्तिच्या गाडीवर न बसणारी मुले आणि अनोळखी व्यक्तिची गाडी थांबवून बसणारी मुलगी अशा दोन बाजूंनी कथा पुढे सरकते. स्वसंरक्षणाचे धडे गिरवलेली श्रेया शाळेत आलेल्या पाहुण्यांच्या "तुला, एखाद्या माणसाने किडनॅप केलं तर?" या प्रश्नावर ती "के फाॅर खल्लास. कायमचा." असे बिनधास्त उत्तर देत पाहुण्यांना आश्चर्यचकीत करते. मी तलवारबाजी, कराटे, बाॅक्सिंग शिकले आहे असे सांगते. ही कथा आजची मुलगी ही बिचारी नसून ती विचारी आणि सक्षम असल्याचे दर्शवते. शाळेतील शिक्षक आणि पालक यांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारी "पालकांनी….शिक्षकांशी मैत्री करावी." ही कथा शिक्षकांच्या कामापेक्षा पगारावर बोट ठेवणार्‍यांच्या डोळ्यात अंजण घालण्याचे काम करते. सोबतच शिक्षक - पालक नातेसंबंध चांगले असतील तर मुलांच्या प्रगतीची दारे खुली होतात याचा धडा वाचकाला देवून जाते.

    चाॅकलेट, गोळ्या खावून दात किडलेला हट्टी बिट्टू "मचक पचक" या कथेत भेटतो. तो आईकडून पैसे घेवून चाॅकलेट, गोळ्या खातो. आईने सांगितलेले अजिबात ऐकत नाही. शेवटी आई गावात आलेल्या माकडवाल्याची मदत घेते. माकडवाला आपल्या माकडाला बिट्टूचे नाव घेवून प्रश्न विचारतो. माकडाच्या कृतीने सगळी मुले बिट्टूला हसतात. त्यामुळे सर्वांसमोर बिट्टूला आपली चूक समजते. या कथेत माकडवाला माकडाच्या माध्यमातून मुलांना सकाळ संध्याकाळ दात घासायचे शिकवून जाते. "विद्यार्थीप्रिय" ही कथा शाळेसमोर गोळ्या विकणारी आजी, मुख्याध्यापकांच्या आज्ञेवरून तिला हाकलण्याचा प्रयत्न करणारा शिपाई आणि शेवटी आजीला चाॅकलेट ऐवजी फळे विक्रीसाठी फळे देवून शाळेच्या आवारात फळे विकायला परवाणगी देणारे मुख्याध्यापक वाचकाच्या मनात घर करून जातात.

    "गर्व आहे मला मी रोबोट असल्याचा" या कथेतून शाळेच्या स्नेहसंमेलनात रोबोट बनून भाग घेणारा रोहन कार्यक्रमात वाया जाणारे अन्न, शेतात राबणारा शेतकरी, शिक्षक पालकांचे न ऐकणारी मुले, कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या इत्यादी समस्यांवर भाष्य करताना दिसतो. मानवी मूल्यांची बालमनात रूजवण करण्यात लेखक मनोहर भोसले हे या कथासंग्रहाच्या माध्यमातून यशस्वी झाले आहेत. या कथा वाचताना वाचकाला स्वत:मध्ये डोकावून बघायला भाग पाडतील ही आशा आहे. या कथांग्रहाची पाठराखण राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक डाॅ. श्रीकांत पाटील यांनी केली असून गौरव साहित्यालय, सोलापूर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. निश्चितच अलादीनचा नवा चिराग हा कथासंग्रह प्रेरणादायी आहे. कायमस्वरूपी संग्रही ठेवावा असा आहे.
    .....
    पुस्तकाचे नाव - अलादीनचा नवा चिराग
    लेखक - मनोहर भोसले
    प्रकाशक - गौरव साहित्यालय, सोलापूर
    मूल्य - १३० रू.
    संपर्क - ९७६७० ४४५०९



    Gulab Bisen


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!