पावसाची सर
पावसाचा आनंद लुटत, भज्यांचा आस्वाद घेत कृषि विद्यापीठाचा परिसर हास्याने दुमदुमत होता. शिवाच्या मोठ्या भावाचे लग्न ठरले होते आणि सगळे मित्र आता पुढ़च्या वर्षी त्याचाही बार उडवणार म्हणून त्याची फिरकी घेत बसले होते. शिवा मनातल्या मनात हसत होता. जर या लोकांना कळेल, कि माझे लग्न लहानपणीच सईसोबत ठरले आहे, फक्त तिला सून म्हणून घरात आणणेच उरले आहे, तर या सर्वांचे काय हाल होणार!
तेव्हांच लटका आवाज काढ़त एक मित्र म्हणाला "आणि मग सौभाग्यवती शिवा म्हणणार, अहो, ऎकलंस का, माझा भाऊराया येणार आहे, त्याला जरा मॉलमध्ये सिनेमा दाखवून आणता का!" आणि सर्वांसोबत या मस्करीचा भाग होत एकीकडे शिवाने सुद्धा त्या मित्राला टाळी दिली पण दुसरीकड़े एका आठवणीने त्याच्या पापणीच्या कडा ओलावल्या.
या शहरात शिकायला येण्यापुर्वीच सई त्याला भेटायला आली होती. ती आपल्या दादाबद्दल सांगत होती. "हे बघा, तुम्ही शहरात फक्त शिकायला जात आहात, नेहेमीसाठी राहायला नाही. दादा तर जो एकदाचा शहरात गेला, तो तिथलाच झाला आहे. पण मी बाबांना वचन दिले आहे, त्यांचे आणि आपले दोघांचेही शेत कधी पोरके होऊ देणार नाही. आपण इथेच राहाणार आहोत, नेहेमीच." आणि तिच्या विचारांवर शिवाच्या आई आणि बाबांनी आशीर्वादांचा जणू पाऊसच पाडला होता. केवढ़ा आनंद झालेला त्यांना!
आणि आत्ता मित्रांमध्ये बसलेला शिवा अचानक बोलून गेला, "हे बघा, असे काहीही होणार नाही. आम्ही तर आमची शहरात शिक्षणावर केलेली मेहेनत आपल्या गावाच्या शेतांवरच लावणार आहोत. आपल्या शेतांना आम्हाला पोरके थोड़ेच करायचे आहे."
माहीत नाही त्या गलक्यात कोणी त्याचे शब्द ऎकले कि नाही, पण हलकेच एक झुळूक आली आणि एक पावसाची सर शिवाला भिजवून गेली. त्याला मनातून असे वाटले, कि एकदा पुन्हा आईच्या आशीर्वादांची सर त्याचा पत्ता शोधत त्याच्यावर बरसून गेली आहे. सईचा चेहरा आठवून तो मनसोक्त त्या सरीत भिजत होता.
- अंतरा करवड़े
हिंदी लघुकथेबद्दल
"झड़ी" या नावाने हिंदी भाषेत लिहिलेली ही लघुकथा शेती आणि तरुण पीढ़ी, हे हरवत चाललेल्या समीकरणाच्या दोन्ही बाजू बरोबर करण्याच्या उद्देशाने लिहिली गेली होती. पंख पसरुन जगभर फिरल्यावरही आपल्या मातीत रोवलेले पायच आधार देत असतात. काळ्या आईविषयी कृतार्थभाव आणि ओलावा हा प्रत्येक मनात असावा, हा वैचारिक संस्कार या रचनेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.