• 20 June 2023

    आदिपुरूष : करायला गेलो गणपती, झाला मारूती !

    आदिपुरूष : करायला गेलो गणपती, झाला मारूती !

    5 123

    आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, "करायला गेलो एक, पण झालं भलतंच !" तशीच आणखी एक म्हण आहे की, " करायला गेलो गणपती, झाला मारूती !" नुकत्याच प्रदर्शित झालेल्या " आदिपुरूष " या सिनेमाच्या बाबतीतसुध्दा असेच म्हणावे लागेल.
    रामकथेचं 'मॉर्डनायझेशन' करायच्या नादात आपण मूळ कथा आणि त्यातील गाभ्यापासून खूप दुर राहून गेलो आहोत, याचं भानं या‌ चित्रपटाच्या मेकर्सला दुर्दैवाने राहिलेलं नाहीये. प्रभु श्रीराम यांचे कार्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नव्या पिढीसमोर आणण्याची एक चांगली संधी मेकर्सने गमावली..
    सुमार डायलॉग्ज, पाश्चिमात्य शोजचे अनुकरण करण्याच्या नादात स्वतःचा तेजःपुंज इतिहास झाकोळला गेलाय.
    स्वार्थ आणि क्रुरतेचा अंधकारात बुडालेली 'सोन्याची लंका' दाखवण्याचे सोडून एखाद्या युरोपिअन नाटकाची थीम करायच्या अट्टहासात सबंध लंकाच काळी करून टाकली गेलीये. वास्तविक जर तुम्ही स्वार्थ आणि अज्ञानात बुडालेले असाल, तर तुम्ही भले सोन्याच्या लंकेत रहा, तुमच्या अहंकाराचा अंधकार हा सोनेरी मुलामा झकोळून टाकण्यास पुरेसा आहे, हा याचा भावार्थ आणि अपेक्षित असलेली शिकवण आहे. पण, पुष्पक विमानात विहार करणारा लंकेश जर डायनासॉर वजा वटवाघूळावर फिरत असेल तर वरील गोष्टींची अपेक्षा आपण काय कपाळ करणार ?
    अशी अनेक लार्जर दॅन लाईफ प्रसंग आपल्या रामायणामध्ये आहेत. जे आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आणखी भव्य दिव्य करता आले असते.
    मी काही खूप रूढीवादी वगैरे आजिबात नाही. फिल्ममेकर्सला सिनेमॅटिक लिबर्टी हवी, याच्याशीही मी सहमत आहे. मात्र या लिबर्टीच्या नादात आमचा रामराया एके ठिकाणी पार येशू ख्रिस्तच दिसू लागला तर प्रेक्षकांनी काय अशोक वाटीकेत जाऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारावा काय ?
    नवे प्रयोग नक्कीच व्हायला हवेत, पण मूळ गोष्टीला धक्का लावून होत असेल तर काय ? लंकेतील बहुतांश राक्षस, अगदी रावणापासून बरेच जण "स्पाईक" हेअरकट मध्ये दिसताहेत, ह्यावर माझा विशेष‌ आक्षेप नाही, पण मेघनाद इंद्रजित टॅटूचं दुकान असल्यासारखा अंगभर टॅटू काढून हिंडताना दिसतो, तेव्हा मनस्वी दुःख होतं.
    हेच रडगाणं संवादांच्याही बाबतीत आहेच. तेरी जलेगी, लंबा कर डाला, लंका लगा देंगे, बुवा का बगीचा, अरे ! ते पुराण काळातील महापुरूष आहेत, की कोणी लफंगे ?
    ज्या कोणाला आपल्या पुढच्या पिढीला ह्या चित्रपटाद्वारे रामायणाची ओळख करून द्यायची असेल, त्यांना हात जोडून विनंती, की कृपया असं करू नका. रामानंद सागर ह्यांची मालिका कधीही उत्तमच. आणि जर लहानग्यांसाठी हवं असेल, तर " रामायण - द लेजेंड ऑफ प्रिंस राम !" ह्या चित्रपटासारखा उत्कृष्ठ पर्याय नाही.
    आता खूप मी ह्यावर तोंडसुख खेत नाही. खरे तर सगळा चिखलंच व्हायचा, पण प्रभु श्रीरामांसाठी दिलेला शरद केळकर यांचा प्रभावी आवाज आणि 'अजय-अतुल' ह्यांच्या संगीताची जादू अशी चालली की त्याचा चिखल होता होता राहिला, आणि किमान मारूती का होईना झालाच !
    बहुत काय लिहीणे ? जय सिया राम !



    नीरज अर्चना नांगरे


Your Rating
blank-star-rating
सीमा कुलकर्णी - (23 June 2023) 5
उत्तम परीक्षण

1 0