आपली लघुकथा
पितृपक्षात खरे तर आपले आप्त स्वकीय आठवतात! कोणीतरी आपले, ज्यांच्यासोबत जन्मत: आपले नाते आहे. त्याच नात्याला पाहिले, तर आपली मातृभाषा सुद्धा त्याच ओलाव्याचा एक स्रोत असते. आपल्या जीवनातील कटु गोड आठवणींना तयार करण्यात तिचा वाटा मोलाचा असतो. तीच एक आधार असते आणि तिच्याच मदतीने आपण एक एक पाउल पुढ़े जात आपले जगणे सार्थक करत असतो. एक भाषेचा प्रवाह कसा आपल्याला पुढ़े नेतो हे जाणून घेऊया डॉ. वसुधा गाडगीळ यांच्या लघुकथेत!
निखळ
ऑस्ट्रेलियाच्या पैरामेटा नदीच्या काठावर हिरव्या गवतात सगळे पर्यटक काही वेळ आराम करुया म्हणून बसले होते. तनया सुद्धा त्यांच्या सोबत पहुडली होती. ती निर्निमेष नदीकड़े बघत होती. नदीचा निखळ प्रवाह तिला भूतकाळात घेऊन गेला...
"आई... अगं आई! मुंबई, हैदराबाद, काशी आणि आता इथे.... शाळेत कोणालाच माझी भाषा कळत नाही! मैडम पण म्हणतात कि तुझी भाषा बरोबर नाहीये!" शाळेतून आल्यावर तनयाची भुणभुण सुरु होती.
"हे बघ बाळ, ही संधी सर्वांच्या नशिबात नसते! या सर्व भाषांना मन लावून शिकून घे!" आईने तिची समजुत घालत म्हटले.
"काय हे...!" तनयाचा पारा चढ़लेलाच होता. "बाबांनी अशी काय नोकरी धरली आहे, दहा ठिकाणी फिरावे लागते!"
"हे बघ तनया, अशी नोकरी करणे देखिल सरळ नाहीये बरं! आणि लक्षात ठेव घाटाघाटाचे पाणी आणि ठिकठिकाणची वाणी, आपल्याला किती काय शिकवतात!"
आईच्या शब्दांना तनयानी लक्षात ठेवले.
"होय आई, तू खरंच सांगत होती तेव्हां!" तनया भानावर आली. मराठी, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, जापानी, फ्रेंच आणि कितीतरी भाषांमध्ये भाषांतरकार आणि दुभाष्या म्हणून काम करणारी तनयाने आता जागतिक पातळीवर शिखर सर केले होते. ती पैरामेटा नदीकडे बघत विचार करु लागली
"खरचं, या सर्व नद्या सुद्धा, किती चढ़ उतार सोसत, त्रासातून मार्ग काढ़त शेवटी मधुर निखळ प्रवाहात आपले सौन्दर्य साकार करत असतात!"
- डॉ. वसुधा गाडगीळ
हिंदी लघुकथेबद्दल
मातृभाषा आपल्या संस्कारांसारखी, एखादा वारसा मिळाल्यासारखी आपली सोबती असते. कधीतरी मैत्रीण म्हणून तर कधी माध्यम म्हणून ती आपल्याला प्रगतिचा मार्ग सुकर करुन देत असते.
"कलकल" शीर्षकाने हिंदी भाषेत ही लघुकथा एक वास्तविक अनुभवार आधारित असून यात आपल्या भाषेबद्दल असलेले प्रेम आणि आपुलकी निखळ वाहात असलेली वाटते.
- अंतरा करवड़े