ताटी लावता आली पाहिजे
---
ताटी लावता आली पाहिजे..! प्रत्येकाला हे करता आल पाहिजे.स्वतःला आतून काहीकाळ तरी बंद करून घेता आल पाहिजे. मनाला आतून थांबवायचं.! विचारांना आतून थांबवायचं..! चक्क कडी घालायची..! विरक्तपणाची कडी..! माउलींना हे सहज शक्य झालं..! कारण त्यांनी विचारांची झेप त्यांच्या नियंत्रणात ठेवली होती. आपल तस नाही. आपल्याला स्वतःला आवरायला अवघड आहे. पण जमल पाहिजे. समाजाला काही काळ नाकारता आल पाहिजे. नात्यांना काही काळ लांब ठेवता आल पाहिजे. अगदी तो विश्वंभर ही शक्य तेवढा बाजूला ठेवावा. श्वास सुद्धा सखा नाही याची जाणीव व्हावी. ताटी लावून घ्यावी..! कुणाशी वैर नाही.. दुस्वास नाही.. स्पर्धा नाही.. पण अंतर ठेवावं.! ताटी घट्ट करावी..! ताटीबाहेरच्या जगाला त्यांच्याप्रमाणे वागू द्यावं.! तो कोलाहल,त्या हाका ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या. आणि आतल्या आत्मारामाचा आक्रोश ऐकावा.! आतली हाक समजून घ्यावी. स्वतःला समजावून द्यावी.! न जाणो ती हाक जेव्हा आपल्याला कळेल तेंव्हा आपल्या आयुष्यात ही मुक्ताई आपल्या झोपडी बाहेर अवतरेल..! ताटीची गरजच पडणार नाही. तीच हाका देईल..! जोहार मांडेल..! अशा वेळी ताटी उघडुन तिच्या कुशीत जाण म्हणजे आयुष्याचं सार्थक..! हे झालं पाहिजे. या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मी..! पण केंव्हातरी.. ताटी लावता आली पाहिजे..!!!!...
सुंदर लेख. लेखक अज्ञात *जय जय राम कृष्ण हरि*