• 24 October 2024

    गाथा स्त्रीजन्माची

    पाळण्यात जोजविली

    5 38

    वात्सल्य रसात ओथंबलेली अंगाई गीतं म्हणजे मराठी साहित्यातला अनमोल मायेचा ठेवा आहे.अंगाई गीत म्हटलं की सहज मनात या ओळींचं गुणगुणणं सुरू होतं.

    *बाळा जोजो रे..निज निज रे लडिवाळा किंवा निंबोणीच्या झाडांमागे चंद्र झोपला गं..*

    अंगाई गीतातल्या शब्दात अशी काय जादू असते की त्या तान्हुल्याला शांत झोप लागतेच? या गीतातला लडिवाळपणा जसा शब्दात जाणवतो तसाच सभोवतालच्या शब्दबद्ध वातावरणातही उमटतो.त्यात चांदोबा असतो, काउ चिऊ असतात,गोठ्यात झोपलेली गाय असते, निंबोणीचं झाड असतं, कधी बागुलबुवाही असतो. अंगाईगीतातून नकळत संस्काराचं अमृतही बाळाला पाजलं जातं. गंमत म्हणजे अंगाई गीत गाणारी माता ही काही गायिकाच असायला हवी अशी अपेक्षा नसतेच. तिला सुरात, तालात गाता येत नसलं तरीही आपल्या बाळाला थोपटून, जोजवून झोपवताना तिच्या ओठातून येणारे हे मायेचे बोल बाळाला सहजपणे गुंगी आणतात. गीतातले शब्द, मातेचा मृदू आवाज, थोपटतानाचा तिचा स्पर्श याचं असं काही अद्भुत रसायन जमतं की बाळ हळूहळू झोपेच्या अधीन सहजपणे होतं मग त्याला हलकेच मांडीवरून उचलून काळजीपूर्वक पाळण्यात ठेवण्यापर्यंत एक हळुवार प्रेम भरला सोहळा या अंगाई गीतातून दृश्यमान होत असतो.

    अशाच एका सुरेख भावस्पर्शी अंगाई गीताचा आज आपण रसास्वाद घेऊया. अर्थातच हे अंगाई गीत लिहिलं आहे *डॉ. निशिकांत श्रोत्री* यांनी.

    *पाळण्यात जोजविली*

    शीतल कर चांदण्यास विनविते माऊली

    पाळण्यात जोजविली छकुली ही निजली

    अवखळते सारा दिस जीवा ना उसंत

    काउ—चिऊ धरण्याला रांगते घरात

    सांजवेळी थकुनिया कुशीत विसावली

    पाळण्यात जोजविली छकुली ही निजली

    मिटलेल्या पापण्यात विश्व सामावले

    परिराणी —परमेश तिथेच भेटले

    निद्रेतच ती हंसली गालावरती खळी

    पाळण्यात जोजविली छकुली ही निजली

    इंद्रधनुतून वेचूनिया रंगा आणिले

    जीवनाचे दान तिच्यावरुनी ओवाळिले

    इडा पिडा दृष्ट टळो तीट तिला लाविली

    पाळण्यात जोजविली छकुली ही निजली

    *डॉ. निशिकांत श्रोत्री*

    खरोखरच हे गीत वाचताना मन पिसासारखं अलगद तरंगतं. शब्द आणि लयीच्या प्रवाहात हलकेच सामावून जातं.

    शीतल कर चांदण्यास विनविते माऊली

    पाळण्यात जोजविली छकुली ती निजली

    बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा प्रहर म्हणजे रात्रीचा— त्याला निजवण्याचा. ध्रुवपदाच्या या दोन ओळीत आपल्या तान्ह्या छकुलीला निजवणाऱ्या आईची भावमुद्रा दिसते.

    खरं म्हणजे *बाळाला वाढवणं* हा आईसाठी २४ तासाचा कार्यक्रमच असतो. बाळाला झोप लागणं हे मातेसाठीही तितकंच आवश्यक असतं. न झोपणाऱ्या बाळाचा तिला राग किंवा कंटाळा नसतोच पण ते पटकन झोपी गेलं पाहिजे ही व्याकुळता नक्कीच असते आणि त्यासाठी ही माऊली अनेक प्रकाराने प्रयत्न करत असते. मग त्यात जोजवणं असतं, थोपटणं असतं, माथ्यावरच्या जाउळातून हळुवार हात फिरवणं असतं त्याचबरोबर भावपूर्ण अशी गायलेली अंगाई पण असते. अशावेळी खिडकीत डोकावणाऱ्या चंद्रालाही ती विनविते, “बाबा रे! तुझ्या चांदण्यांचा गारवा माझ्या बाळाला दे बरं का? बघ ना! अगदी नुकतीच माझी छकुली पाळण्यात कशी झोपी गेली आहे.”

    *शीतल कर चांदण्यास* या *चेतना गुणोक्ती* अलंकाराने झालेली अंगाई गीताची सुरुवात फारच गोजिरवाणी वाटते.

    अवखळते सारा दिस जीवा ना उसंत

    काऊ चिऊ धरण्याला रांगते घरात

    सांजवेळी थकुनिया कुशीत विसावली

    पाळण्यात जोजविली छकुली ती निजली

    ही गोड निरागस तान्हुली नुकतीच पाळण्यात निजली आहे. तिच्या मिटल्या पापण्यांकडे, मिटल्या इवल्या ओठांकडे, वळलेल्या नाजूक मुठींकडे बघत असताना ती माउली कशी कौतुकाने पाझरते! दिवसभराच्या तिच्या बाललीला तिला सहजपणे आठवतात. किती अवखळपणा करते, दिवसभर खेळते, मस्ती करते, रडते, हसते.. क्षणाची उसंत तिला नसते. सतत काही ना काही या बाललीला चालूच असतात.

    घरभर रांगते, अंगणात वावरणाऱ्या चिऊ काऊलाही तिला धरायचे असते. त्यांना पकडण्यासाठी कशी लुटूलुटू सरकत राहते पण मग संध्याकाळ होते, सूर्य हळूहळू क्षितिजापार जातो, दिवेलागण होते आणि मग खेळून खेळून थकलेली सानुली आईच्या कुशीत सहज विसावते. या संपूर्ण चरणामध्ये आपल्या प्रिय छकुलीच्या विचारात पार डुबलेली माताच दिसते. स्त्रीचं एक सुंदर सहज, नैसर्गिक प्रेमस्वरूप या कडव्यात डोळ्यासमोर उभं राहतं. एक सुरेख *स्वभावोक्ती* येथे अनुभवायला मिळते.

    *अवखळते*, *जीवा ना उसंत*, *काऊ चिऊ धरण्याला रांगते* *कुशीत विसावली* *जोजविली* *छकुली* हे सारेच शब्द किती मुलायम आणि प्रेम व्यक्त करणारे आहेत! मातेच्या मनातला हा प्रेमाचा पाझर लिहिताना कवीने काही क्षणाचे का होईना कल्पनेतलं मातृत्व अनुभवलं असावं. *डॉक्टर श्रोत्रींच्या* काव्यातली ही भावनिक वास्तविकता हा या अंगाई गीताचा गाभा आहे.

    मिटलेल्या पापण्यात विश्व सामावले

    परिराणी— परमेश तिथेच भेटले

    निद्रेतच ती हसली गालावरती खळी

    पाळण्यात जोजविली छकुली ही निजली

    नुकत्याच झोपलेल्या बाळा बरोबरचे मातेचे हे काही मूक क्षण कवीने अगदी अचूकपणे टिपले आहेत. बाळ झोपलं आणि आई दुसऱ्या क्षणी त्याला सोडून लगोलग निघून गेली असं कधीही होत नाही. तिचं चित्त यि पिल्लापाशीच घुटमळतं. काही क्षण ती चाहूल घेते. ते जागं नाही ना होणार म्हणून काळजीही घेते. झोपणाऱ्या बाळाला पहात राहणं हे तिच्यासाठी खूप सुखाचं असतं हो! आई आणि बाळामधला तो एक शांत अबोल क्षणही खूप बोलका असतो. अनंत कल्पनांनी ठासून भरलेला असतो. झोपलेल्या बाळाकडे पाहताना आईला सहज वाटतं,” खरोखरच अवघं विश्व या मिटलेल्या पापण्यामागे दडलं असणार. झोपेतही बाळ कुठल्यातरी अज्ञात जगात सफर करत असणार. कुठलं बरं असेल हे बालविश्व? आपण सांगितलेल्या कथेतील ती परिराणी त्याला भेटत असेल का तिथे? तिच्यापुढे आपणच साकारलेला देवबाप्पा तिला तिथे दिसत असेल का? नक्कीच.. “पहा कशी झोपेतच खुदकन् हसली आणि गालावर एक कोमल छानशी खळीही उमटली.” छकुलीचं हे निरागस कोवळं रूप पाहतानाच माऊली कशी हरखून जाते आणि शब्दशब्दांतून ओथंबणारं हे भाव विश्व वाचकाच्या मनावर अलगद ओघळतं.

    *मिटलेल्या पापण्यात विश्व सामावले* ही ओळ अतिशय अर्थपूर्ण आहे. गर्भाच्या काळोखातून या अवाढव्य विश्वात पहिला श्वास घेताना बालकाने नक्की काय अनुभवलं असेल आणि मिटलेल्या पापण्यांमध्ये तो कुठल्या विश्वात सैर करत असेल? कुठल्यातरी अज्ञानात नेणारी एक जाणीव बाळ अनुभवात असेल का? हे केवळ कल्पनातीत आहे. समंजस माणसांना जशी स्वप्नं पडतात तशी नुकतंच जगणं सुरू झालेल्या नवजात बालकालाही पडत असणार आणि त्याला पडणारी स्वप्नं ही फक्त आईलाच कळू शकतात किंवा आईच त्यांना कल्पनेत पाहू शकते.

    इंद्रधनुतून वेचूनिया रंगा आणिले

    जीवनाचे दान तिच्यावरुनी ओवाळले

    इडा पिडा दृष्ट टळो तीट तिला लाविली

    पाळण्यात जोजविली छकुली ही निजली

    या चार ओळीत *स्त्रीत्त्व ते मातृत्त्व* असा अत्यंत संवेदनशील भावनिक प्रवास जाणवतो. उदरात गर्भ वाढत असताना कदाचित गर्भवतीला बाह्य जगातले रूढीप्रिय, पारंपरिक, सामाजिक मनाचे संकुचित प्रवाह टोचले असतील पण तिने मात्र तिचा गर्भ कन्येचा की पुत्राचा हा विचार न करता जन्माला येणाऱ्या बालकांसाठी इंद्रधनुचे सुंदर रंगच वेचले. कुठल्याही मळकट, गढुळ वैचारिक रंगांना तिने जराही जवळ केले नाही आणि आता या क्षणी पाळण्यात सुखाने निजलेल्या छकुलीला ती सांगते,” तुला जीवनात मी जगातले जे उत्तम असेल तेच मिळवून देईन. जीवघेण्या कळा सोसून मी तुला जन्म दिला आणि यापुढे माझं जीवन हे फक्त तुझ्यासाठीच असणार आहे. हे बघ तुझ्या गालावर मी हे *तीट* लावते ज्यामुळे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या इडा— पिडा टळून जातील. तुला कधीही कुणाची वाईट नजर लागणार नाही.”

    हा शेवटचा चरण मला अतिशय आवडला. यात नारी जन्माचा एक सन्मान सोहळा आहे तसंच नकळतपणे नारी जीवनावरची गढुळ सामाजिक प्रवाहाची एक काळी सावलीही अदृश्यपणे शब्दबद्ध केलेली जाणवते आणि या सगळ्यांवर मात करणारी एका मातेची तळमळ, व्याकुळता आणि सक्षमता याची अनुभूती येते. मातेने कन्येला दिलेलं एक मूक वचन या शब्दांमध्ये दडलेलं आहे.

    “ कवीराज तुमच्या वैचारिकतेला आणि सहज शब्दातून उलगडणाऱ्या अर्थाविष्काराला मी मनापासून दाद देते.

    *इंद्रधनुतून वेचूनिया रंगा आणिले* या ओळीने तर माझं मन भारावून गेलं. यात इंद्रधनु म्हणजे निव्वळ सुंदरता! आई आणि आईचं प्रेम किती थोर असतं याची जाणीव या ओळीतून होते. आपल्या बाळाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा, सुंदर असावा असेच तिला वाटते. प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या जीवनात सुरेख सप्तरंग भरायचे असतात आणि हीच तिच्या अंतरातली तळमळ असते.

    *जोजविली छकुली निजली* हा *अनुप्रास* अंगाई गीताला एक माधुर्य देऊन जातो.

    खिडकीतलं चांदणं, जोजवणारी माऊली, अंगणात चिऊ काऊ च्या पाठी रांगणारी सानुली, पाळण्यात शांत निजलेली छकुली, स्वप्नात खुदकन हसणारी तिची निष्पाप मुद्रा, हे सारं या गीतात कसं मनमोहक आणि चित्रदर्शी वाटतं!

    शेवटी इतकच म्हणेन एक भावस्पर्शी, मधुर, मृदू, मनस्पर्शी, अर्थपूर्ण असं हे जोजवणारं अंगाई गीत ज्यातून हलकी वाऱ्याची झुळूक जाणवते, शीतल चांदणं बरसतं, पक्ष्यांची कोमल किलबिल ऐकू येते, मायेचा मृदू स्पर्श शब्दातून पाझरत राहतो आणि नारीचं अलौकिक मातृत्व स्वरूप यातून उलगडतं.

    *राधिका भांडारकर*



    Nishikant Shrotri


Your Rating
blank-star-rating
Aruna Mulherkar - (10 November 2024) 5
छकुलीला जोजवतांना आईचं मन जितकं हळुवार शब्दात कवी डाॅ.निशिकांत श्रोत्री यांनी रेखाटलं आहे,तितक्याच हळुवार आणि भावस्पर्शी शब्दांनी केलेलं हे राधिकाताईंचे रसग्रहण आहे असे मी म्हणेन.

1 1

Gangadhar joshi - (28 October 2024) 5
सुंदर 👌👌👌

1 1

Vijaya Bhange - (24 October 2024) 5
खूप सुंदर भावपूर्ण शब्द सामर्थ्य वापरून कवितेचे समीक्षण केले. लिखाणाला एक एक शब्द मायेने परिपूर्ण असाच आहे. वाचतांना मनावरून ममत्व पांघरल्याची अनुभूती येत होती. खूपच सुंदर लिहिले.

1 1