• 01 November 2024

    गाथा स्रीजन्माची

    भातुकलीचा संसार

    5 29

    बालपण आणि भातुकली यांचं अगदी लडिवाळ नातं आहे. विशेषतः मुलींच्या जीवनातलं. तुम्हाला खरं सांगते आजही मी कधी काही खरेदी करायला बाहेर पडले आणि मला एखाद्या दुकानात भातुकलीचा खेळ दिसला तर तो चटकन विकत घ्यावासा वाटतोच. त्या बुडकुल्यांमध्ये कितीतरी बालपणीच्या माझ्या आठवणी दृश्यमान होतात. आता कालपरत्वे भातुकलीच्या खेळातली ती इवली भांडी बदलली असली तरीही भाव मात्र तोच आहे.

    एक अत्यंत मधुर, भावुक, गोड लडिवाळ गीत *भातुकलीचा संसार* वाचनात आलं आणि कुठेतरी माझंही बालपण मला सहज आठवलं आणि मी त्या गीतात गुंतून पडले. या गीताचे गीतकार आहेत *डॉक्टर निशिकांत श्रोत्री*

    आज आपण या सुंदर भावस्पर्शी गीताचा रसास्वाद घेऊया.

    *भातुकलीचा संसार*

    ये ना आई भातुकली खेळायला

    संसार पहायला ॥ध्रु॥

    तुझा पाहुनी शेजार

    सजविला माझा संसार

    खेळ मांडिला, कसा थाटला

    ये ना बघायला॥१॥

    तुझी जशी मी छकुली ग

    तशी माझी ही बाहुली ग

    जिवाची राणी, गोजिरवाणी

    लाड करायला॥२॥

    सकाळपासून किती राबले ग

    छान छान सैपाक करते ग

    पहा शिजवला, भात हा लटका

    खोटे खोटे जेवायला॥३॥

    बाबांची मी किती लाडकी ग

    हिला मात्र ना कोणी ग

    देईन तुला पापा, देई तिला पप्पा

    लाड करायला ॥४॥

    *डॉ. निशिकांत श्रोत्री*(निशिगंध काव्यसंग्रहातून)

    किती सुंदर प्रेमळ गीत!

    भातुकलीचा खेळ मांडून रमलेली ती बालिका आणि अधून मधून तिच्या खेळात डोकावणारी तिची आई हे सारं दृश्य अगदी सहजपणे गीत वाचताना नजरेसमोर येतं.

    ये ना आई भातुकली खेळायला

    संसार पहायला॥ध्रु॥

    मुलं खेळात किती रंगतात! त्यांच्यासाठी खरं म्हणजे खेळातल्या या लटकेपणाचा विसरच पडलेला असतो. याही बालिकेला तिने मांडलेला तो भातुकलीचा खेळ म्हणजे जणू काही तिचा खराखुरा संसारच वाटतोय आणि या तिच्या भातुकलीच्या खेळातल्या आनंदात आपल्या आईनेही सहभागी व्हावे असे तिला मनापासून वाटते. आईला वेळ नाही, आई किती कामात आहे किंवा कदाचित आईची ही विश्रांतीची वेळ असेल पण त्याचा विचार या लहानग्या बालिकेने का करावा?

    *येना आई भातुकली खेळायला* यात तिचा एक बालहट्ट ही जाणवतो. तिच्या खेळात आईने असायलाच हवे या भावनेची गंमत वाटते. तिने मांडलेला तिचा हा इवलासा संसार आईने नको का पाहायला? हवाच की आणि आईकडून कौतुकही व्हायलाच हवे. ध्रुवपदाच्या या दोन ओळीत लेकीच्या जीवनातली भविष्याची स्वप्नं सहज जाणवतात. जडणघडणीच्या काळात बालपणीचे हे खेळ किती महत्त्वाची भूमिका निभावतात! बालिका आईला बोलावते आणि सांगते,

    तुझा पाहुनी शेजार

    सजविला माझा संसार

    खेळ मांडिला, कसा थाटला

    ये ना बघायला ॥१॥

    लहान मुलं ही नेहमीच अनुकरणप्रिय असतात. त्यांच्या अवतीभवती ते जे पहात असतात, ऐकत असतात तेच त्यांच्या मनावर घट्ट चिपकतं आणि म्हणूनच त्यांच्या बाललीलांमधून ते असं प्रदर्शितही होतं. ती इवलीशी, आईला सांगते, “ बघ तुझं पाहूनच मीही माझा अगदी तुझ्यासारखाच संसार मांडलाय. तू कशी आपल्या घरात भांडीकुंडी नीट लावून ठेवतेस तशीच अगदी तशीच मी माझ्या खेळातली भांडी मांडली आहेत. बघ! ये ना आई माझा हा थाटलेला संसार बघायला.”

    खरंच याही ओळीत लेकीच्या पुढील आयुष्यातील संसाराच्या कल्पनाच जणू प्रतिबिंबित झालेल्या आहेत. लेकीचं लग्न होणार, तिचा स्वतःचा संसार सुरू होणार आणि त्या संसारात आईच्या शिकवणीचे, आईच्या प्रत्येक कृतीचे पडसाद नकळत तिच्या जीवनात उमटणार. प्रत्येक लेकीला आपल्या संसारासाठी आईकडून पावती मिळायला हवी असते, शाबासकी हवी असते आणि या भावनांचा उगम हा असा बाल्यातच खेळाच्या माध्यमातून होत असतो.

    इथे— “तुझा पाहुनि शेजार” या ओळीतला *शेजार* हा शब्द खूप बोलका आहे.

    ही सानुली आईला सांगू पाहते की,” आता माझाही वेगळा संसार आहे बरं का आणि तुझा संसार आता माझ्यासाठी शेजारचा संसार आहे आणि तोच पाहून मी अगदी तसाच माझा ही संसार सजवला आहे. तू ये आणि बघ आता.” *शेजार* या शब्दाचा अक्षरशः अर्थ न लावता शेजार म्हणजे सहवास याही अर्थाने उलगडता येईल. आईच्या सहवासातच लेक वाढत असते आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव हा नकळत लेकीवर पडतच असतो.

    तुझी जशी मी छकुली ग

    तशी माझी ही बाहुली ग

    जीवाची राणी, गोजिरवाणी

    लाड करायला॥२॥

    आता या सानुलीच्या खेळात एक नवं पात्रही आलं आहे. तिची अत्यंत आवडती बाहुली. मातृत्व, आईपण यातलं गांभीर्य, काठिण्य हे काही लहान मुलांना समजत नसतं पण ही आईची भूमिका मात्र त्यांना त्यांच्या खेळात करायला फार आवडते. मग ही बालिका तिच्या इवल्या बाहुलीची इवली आई ही बनते. यातही एक गोड अनुकरणच असतं. आईपणातून जाणवलेला अधिकार तिलाही तो तसाच तिच्या बाहुलीवर गाजवायचा असतो आणि तो तिचा निखळ आनंद असतो. आई प्रेम करते, शिस्त लावते,कधी रागावते,कधी चापटपोळीही देते आणि या सार्‍याचे प्रयोग बाहुलीची आई बनून तिलाही करायचे असतात.गंमत म्हणजे नेहमीच लहान मुलांना लहानपणापेक्षा मोठेपण आवडतं. मोठेपणाचं त्यांना फार आकर्षण असतं. या गीतातल्या बालिकेच्या बाबतीतही नेमकं हेच पाहायला मिळतं. ती गोजिरवाणी आईला सांगते ,”हे बघ मी तुझी छकुली ना मग माझी छकुली ही माझी बाहुलीच. मी जशी तुझ्या जीवाची राणी तशी माझी बाहुली ही माझी राणीच आहे आणि तू जसे माझे लाड करतेस ना अगदी तसेच मीही माझ्या बाहुलीचे लाड करणार. बालमनीच्या या भावना— या ओळीतून डॉक्टर श्रोत्रींनी अतिशय गोडव्याने टिपल्या आहेत आणि त्यातली मधुर वास्तविकता या ओळी वाचताना जाणवल्याशिवाय राहत नाही. *जीवाची राणी गोजिरवाणी* या शब्दरचनेतला अनुप्रासही मनाला भावतो.

    सकाळपासून किती राबले ग

    छान छान सैपाक करते ग

    पहा शिजवला, भात हा लटका

    खोटे खोटे जेवायला ॥३॥

    बाल्यावस्थेत असताना मुलीच्या मनावर आईचं हेच चित्र कोरलेलं असतं. दिवसभर आई आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी राबत असते. सर्वांसाठी खायला, प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपून छान छान खाण्याचे पदार्थ करण्यात ती मग्न असते. बालिका ते पहात असतेच. मग तिलाही वाटते आपणही आईसारखंच सारं काही काम करावं. मग पुन्हा ती तिच्या कल्पनेत रमते. तिच्या बालविश्वात जाते. तिच्या गोजिरवाण्या संसारासाठी तीही कल्पनेतच राबराब राबते, छान स्वयंपाक करते आणि आईला परत हाक मारते,” “बघ ग आई! राबराब राबून मी हा माझ्या बाहुलीसाठी भात बनवला. खोटा खोटा भात..खोटेखोटे जेवायला. तू पण ये ना माझ्याकडे आता खोटं खोटं जेवायला”. या *खोटं खोटं* मध्ये हे सारं काही खरं असल्याचा भास मात्र बालिकेच्या मनाला नक्कीच होत असतो. भले अभिनय असेल पण त्या क्षणी मात्र तिने आईची ती भूमिका सर्वांगाने जगलेली असते. या ओळीतला हा भावाविष्कार खूपच सुंदर आहे. अतिशय लाघवी आहे. खोटं खोटं करता करता तिने मांडलेल्या या संसाराच्या प्रतिकृतीतल्या अपेक्षा मात्र आता फारच वाढत चालल्यात बरं का? पुढच्या चरणात ही कन्या म्हणते,

    बाबांची मी किती लाडकी ग

    हिला मात्र ना कोणी ग

    देईन तुला पापा, देई तिला पप्पा

    लाड करायला॥४॥

    मला खरोखरच कौतुकाचं हसू आलं हे वाचताना. किती निरागस असते बालबुद्धी! शिवाय हे कडवं वाचताना सहजपणे आपण त्या निष्पाप बालिकेच्या मनातला गोंधळही टिपू शकतो. तिला वाटत आहे मला तर आई आहे, बाबाही आहेत पण माझ्या बाहुलीला फक्त मी म्हणजे आईच आहे मग हिला नकोत का माझ्यासारखे बाबा लाड करायला? मग ती लगेच आईलाच एका गोड करारात बांधते. म्हणते ,”आई माझ्या गालाचा पापा मी तुला देईन आणि त्या बदल्यात तू माझ्या बाहुलीला तिचे लाड करणारे पप्पा देशील ना?”

    किती गोड हे बाल बोल! *देईन तुला पापा* ही शब्दरचना तर अमृताहुनी गोड आहे. मला सांगा आईसाठी *बाळाचा मुका* म्हणजे त्रिभुवनातली संपत्ती असते हो! हे वाचताना सहजपणे मनात येते कन्येची मागणी ऐकून आई ही हसलीच असणार ना? मनातच म्हणाली असेल,” अग! तुझ्या बाहुलीचा पप्पा म्हणजे तुझा नवरा ना आणि तो कसा काय इतक्या लहान मुलीसाठी मी आणू? छान मोठी हो, समंजस हो, सक्षम हो, मग आणेन बरं तुझ्यासाठी साजिरा गोजिरा नवरा आणि तुझ्या बाहुलीसाठी बाबा..”

    हे सगळे अव्यक्त संवाद या गीतातून हळुवारपणे शब्दातून ऐकता येतात. मनोरंजन तर होतेच पण त्याच वेळी मनात येते स्त्री जन्माची ही प्राथमिक तत्वे आपोआपच या भातुकलीच्या खेळामधून तिच्यात रुजत जातात. त्यामुळे *भातुकलीचा संसार* हे गीत वरवर जरी बालगीत वाटत असलं तरी त्या शब्दांच्या पलिकडची, स्त्री म्हणून जगतानाची जडणघडण, संस्कृती कुठेतरी जाणवत राहते. अशा वेळी भातुकली ही केवळ रूपकात्मक भासते.

    *भातुकलीचा संसार* हे संपूर्ण गीतच माझ्या मते एक निखळ रुपक आहे. संसाराचा रथ सक्षमपणे ओढणारं एक कणखर होऊ घातलेलं भविष्यातलं स्त्रीरूपच या बालगीतात उमटतं. मायेने, प्रेमाने काटेकोरपणे संसार सांभाळणारी, सुसंस्कार देणारी अशी एक नित्यरुपी आदर्श स्त्री या गीतातून मनावर साकारते. *डॉ. निशिकांत श्रोत्री* यांचे शब्द सामर्थ्य इतके अलौकिक आहे की त्यांच्या काव्यामागचा अव्यक्त काव्यभाव आणि संदेश वाचकाला नेहमीच मंत्रमुग्ध करतो.

    बाकी गीतात साधलेली सहज यमके, गीतातली अकृत्रिम लय याबद्दल निराळेपणाने काय सांगावे?

    *राधिका भांडारकर*



    Nishikant Shrotri


Your Rating
blank-star-rating
Aruna Mulherkar - (10 November 2024) 5
ही कविता वाचताना मी नकळत माझ्या बाल्यात गेले.मे म हिन्याच्या सुट्टीत आम्ही मैत्रीणी जमून असाच भातुकलीचा संसार मांडत होतो.आता फार मजा वाटते. एकीचा बाहुला,एकीची बाहुली असे त्यांचे लग्नही लावत होतो. राधिकाताईंच्या रसग्रहणामुळे कविता वाचताना मन अधिकच खुलले.

1 1

Gangadhar joshi - (01 November 2024) 5
सुंदर, सृजनात्मक काव्य वाटते.

1 1