कुंदा बोकील यांनी गायलेलं आणि बालपणीच्या त्या रम्य दिनी ओठांवर सतत रेंगाळणारं, आठवणीतलं गोड गाणं म्हणजे *शाळा सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली भूक लागली*
पण जस जसे आपण मोठे होत जातो तस तसे अनेक बालगीतांचे अर्थ निराळेपणाने जाणवू लागतात. सरळ सरळ अर्था मधले अनेक दडलेले अर्थ समजू लागतात. त्यापैकीच हे एक गाणं. शाळा, पाटी, भूक हे शब्द वेगळ्याच रंग, रसातले जाणवू लागतात. आयुष्याचीच शाळा झाली, ध्येय, स्वप्ने पाटीच्या रूपाने अवतरली आणि जीवनात असं काहीतरी मिळवाव म्हणून वेगळ्या वाटा शोधण्याची भूकही वाढली.
अशाच अर्थाचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचं हे एकविसाव्या शतकातील एक नारीवादी स्वप्न गीत !शीर्षक आहे *शाळा सुटली*( निशिगंध)
शाळा सुटली.
शाळा सुटली तरीही माझी पाटी ना फुटली
अजूनही शिकायाची कडकडूनी भूक मला लागली ।ध्रु।
नाजुक कलिका नाही व्हायचे परावलंबी होणे
ताठ वृक्ष खंबीर व्हायचे सन्मानाचे जिणे
ज्ञानाचे खतपाणी घ्याया आंस मला लागली
शाळा सुटली तरीही माझी पाटी ना फुटली ।१।
सावित्रीने बीज पेरले स्त्रीच्या उद्धाराचे
उपवन डंवरूनी आले अमुच्या समानतेचे
निशाण घेऊ स्वतंत्रतेचे आण मनी जागली
शाळा सुटली तरीही माझी पाटी ना फुटली।२।
मूल—चुलीचे केवळ बंधन नाही सोसायाचे
झेप घेऊनिया अवकाशी तेजाने झळकायाचे
पदवी घ्याया उच्च म्हणून कंबर मी कसली
शाळा सुटली तरीही माझी पाटी ना फुटली।३।
*डॉ. निशिकांत श्रोत्री*
(निशिगंध काव्यसंग्रह.)
हे गीत वाचताना प्रामुख्याने समोर येते ती एक समाज कोंडीत सापडलेली पण आकाशी झेप घेऊ पाहणारी स्त्री.
शाळा सुटली तरीही माझी पाटी ना फुटली अजुनही शिकायाची कडकडूनी भूक मला लागली ।ध्रु।
डॉ. श्रोत्रींच्या मनातली, शिक्षणाला पारखी झालेली ही स्त्री कदाचित तळागाळातली ही असू शकते किंवा मध्यमवर्गीय समाजातली ही असू शकते, ज्या समाजात स्त्रीने शिकून काय करायचे हाच संकुचित विचार आहे. ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीत *शाळा सुटली तरीही माझी पाटी ना फुटली* हे मूळ गाण्याला दिलेलं वेगळं वळणच मनाला भिडतं.
शिक्षणाचे द्वार माझ्यासाठी बंद झालेलं असू दे पण माझ्यात शिकण्याची जिद्द आहे आणि तीच माझी खरी भूक आहे.
नाजूक कलीका नाही व्हायचे परावलंबी होणे
ताठ वृक्ष खंबीर व्हायचे सन्मानाचे जिणे
ज्ञानाचे खतपाणी घ्याया आस मला लागली
शाळा सुटली तरीही माझी पाटी ना फुटली….
न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति.. हे अजिबात तिला मान्य नाही. म्हणूनच ती म्हणते “मी अबला नाही, परावलंबी जिणे मला जगायचे नाही, ऊन, वारा ,पाऊस यांचे तडाखे सोसुनही वृक्ष जसा वाकत नाही,सदा ताठ राहतो तसे ताठ मानेने मला सन्मानाचे जीवन जगायचे आहे. सन्मानाचे या शब्दांमध्ये आत्मसन्मानाचा अंकुर दडलेला आहे. पुढे जाऊन ती म्हणते माझ्या या जीवनरुपी वृक्षाला मला ज्ञानाचे खतपाणी घालून मोठं करायचे आहे,ज्ञानाची भली भली कवाडे मला उघडायची आहेत आणि तेच माझं स्वप्न आहे, ध्येय आहे, आशा आहे, आकांक्षा आहे,
सावित्रीने बीज पेरले स्त्रीच्या उद्धाराचे
उपवन डवरुनी आले अमुच्या समानतेचे
निशाण घेऊन स्वतंत्रतेचे आणि मनी जागली
शाळा सुटली तरीही माझी पाटी नाही फुटली..
अखेर आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून सावित्रीने स्त्री उन्नतीचे बीजच जणू पेरले. स्त्री पुरुष समानतेच्या आव्हानात्मक घोषणेने आमच्या आयुष्याला नवी पालवी फुटली आणि आमच्या हातात स्त्री स्वातंत्र्याचे निशाण तिने दिले आणि आता आमचे जीवन म्हणजे आमच्या अस्तित्वाच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेली शपथ आम्हाला प्रभावीपणे जागवायची आहे.
मुल— चुलीचे केवळ बंधन नाही सोसायाचे
झेप घेऊनिया अवकाशी तेजाने झळकायाचे
पदवी घ्याया उच्च म्हणून कंबर कसली
शाळा सुटली तरीही माझी पाटी ना फुटली..
रांधा— वाढा—उष्टी काढा.. हेच एकमेव स्त्री जीवनाचे गाणे मला गायचे नाही. या परंपरेला मी झुगारून देणार आहे. मला उंच आकाशात भरारी घ्यायची आहे आणि स्वयं तेजाने झळकायचे आहे. असं एकही क्षेत्र माझ्यासाठी बंद नसावं. मी जग पदाक्रांत करू शकते आणि त्यासाठीच मी माझी कंबर कसलेली आहे.
या शेवटच्या चार ओळीतला तिचा जो निर्धार आहे तो दुर्दम्य आहे, विलक्षण आहे. इथे *पदवी* याचा अर्थ मी अस्तित्व असा मानते आणि *कंबर कसली* म्हणजे समाज रीती, परंपरेच्या प्रचंड अवरोधाला झुगारून लावण्याची प्रबळ मानसिक शक्ती मिळवेनच आणि यशस्वी होईनच हे मनोबल निर्देशिते.
मी माझी स्वतःची ओळख प्रस्थापित करेन. *मी* ही मीच असणार आहे, कुणाची कुणी हे माझं समाजातलं स्थान नसून माझी स्वतःची अशी निश्चित सामाजिक जागा, ओळख (self identity)असणार आहे.
ही संपूर्ण कविता निश्चितच स्त्रीवादी आहे. या कवितेत एका स्वप्नाळू पण प्रबळ मनाचा अत्यंत सकारात्मक असा निर्धार आहे प्रतिकूल परिस्थितीला शौर्याने आणि धैर्याने सामोरं जाऊन स्वतःला सिद्ध करण्याची प्रचंड जिद्द आहे. *हम होंगे कामयाब एक दिन* हा वीरश्रीचा नारा आहे.
या कवितेतले तीन मुख्य शब्द म्हणजे शाळा, पाटी आणि भूक. हे रूपकात्मक शब्द आहेत. सखोल आणि अर्थपूर्ण आहेत. *शाळा सुटली* या शब्दांमधून कवीने स्त्री समोरची किंवा स्त्री जगत असतानाची नकारात्मक पार्श्वभूमी उल्लेखलेली आहे आणि पुढे जाऊन कविराज म्हणतात *पाटी ना फुटली*. पाटी हा शब्द इथे सुंदर रूपक बनूनच येतो.. पाटी म्हणजे काळा दगड, मनाची जिद्द, उंच भरारी मारण्याचं गगनचुंबी ध्येय. नकारात्मक परिस्थितीतही माझं आकाशाला गवसणी घालणार मन लेचपेचं झालेलं नाही, ते सक्षम आहे, सबळ आहे, निडर आहे, लढाऊ आहे, टिकाऊ आहे.संघर्षाभिमुख आहे.आण आहे जिंकण्याची, आस आहे, स्वतःला सिद्ध करण्याची.
या संपूर्ण गीतात *अबला ते स्वयंसिद्धा* हा स्त्री जीवनाचा एक अवघड पण जिद्दी प्रवास, मोजक्या आणि प्रभावी शब्दात कवीने उलगडलेला आहे.
*नाजूक कलिका* *ताठ वृक्ष* *ज्ञानाचे खतपाणी* *समानतेचे उपवन* या उपमा त्या त्या ठिकाणी चपखल आहेत. होणे —जिणे— लागली —सुटली —फुटली जगली —कसली— सोसायाचे —झळकायाचे ही सहज स्वरयमके आणि यातला अनुप्रास गीतातली गेयता, रस आणि लय टिकवतात.
खरं म्हणजे या संपूर्ण गीतात कुठेही आडवळणे नाहीत, शब्दांचा फापट पसाराही नाही. विचाराची सरळसोट रचना आहे. जे म्हणायचं आहे ते खूप स्पष्ट आहे. पण तरीही डॉक्टर श्रोत्रींच्या काव्यरचनेतला वेगळेपणा म्हणजे विचारांच्या मागून धावणारे अनेक अदृश्य विचार. एक काळच ते उभा करतात. अजुनही टिकून असणार्या सामाजिक समस्येवर तळमळीने,आत्मीयतेने भाष्य करतात. *समाजको बदल डालो* ही त्यांची कळकळ जाणवते.आणि सुधारणेचा झेंडा हाती घेऊन ते त्यांच्या रचनेत एक आक्रोश मांडतात.त्यामुळे त्यांच्या कविता चाकोरी बुद्ध न वाटता, तेच तेच चावून चोथा झालेली विचारांची घुसळण न वाटता मनावर ती अलगदपणे एक वेगळेपणा,नाविन्य, वैविध्य घेऊन भिडते. आणि शाळा सुटली याही त्यांच्या गीतासाठी मी हे माझं मत पुनश्च अधोरेखित करते..
धन्यवाद!
*राधिका भांडारकर*