• 14 November 2024

    गाथा स्त्री जन्माची

    मी कृतार्थ जाहले रसग्रहण: राधिका भांडारकर

    5 33

    स्वप्नं, महत्त्वाकांक्षा, ध्येयंं, नव्या वाटा, नवी क्षितिजे यांची आस बाळगणं त्यासाठी झोकून देणं या सर्वांसाठी लागते चिकाटी, जिद्द मनोबल. या दिशेचा मार्ग सरळ, सोपा नसतो. खाचखळग्यांचा, काट्याकुट्यांचा असतो. स्वप्नपूर्तीच्या मागे लागणाऱ्यांना भवतालचे अनेक घटक सतत मागे खेचत असतात, उणीवांवर बोट ठेवून मानसिक खच्चीकरण करत असतात, या सर्वांवर मात करून अंतप्रेरणेने चालत राहणं, ध्येयपूर्तीचा टप्पा गाठणं यासाठी प्रचंड मनोधैर्य लागतं.

    A WILL WILL FIND A WAY

    किंवा

    *प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे* या उक्तीप्रमाणे एक ना एक दिवस यश दारात उभे राहते आणि त्या वेळेचा जो आनंद असतो त्याला सीमा नसते. अनेक घटिकां-पळांच्या तपस्येचं ते फळ असतं आणि त्या क्षणी “आपण हे करू शकलो, हे मिळवू शकलो” ही भावना कृतार्थ करते. जगणं सार्थ झालं असं समाधान लाभतं. *याचसाठी केला होता अट्टाहास* हा भाव उत्पन्न होतो.

    याच अर्थाचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे *मी कृतार्थ जाहले* हे सुंदर गीत! या गीताचा आपण आज रसास्वाद घेऊया.

    *मी कृतार्थ जाहले*

    स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले

    यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥ध्रु॥

    चिमणीला पदरातिल गरुडपंख लाभले

    उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले

    देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले

    यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥१

    दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

    साथ लाभता मना निग्रहा नसे भीती

    संकल्परूप माझे या वांच्छनेस लाभले

    यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।२

    नाही अहंकार कधी दंभ ना स्पर्शले

    सेवेतुनि जगताच्या कर्मफला जाणिले

    अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले

    यशोमन्दिरात आज मी कृतार्थ जाहले।३

    *डॉ. निशिकांत श्रोत्री*. (निशिगंध)

    हे एक यशोगीत आहे. एक आनंदगीत आहे. साफल्याची भावना व्यक्त करणारे हे सुरेख शब्दातले गीत आहे. पूर्ततेचा आनंद, हर्ष आणि त्यानंतर येणारा कृतार्थतेचा भाव हे गीत वाचताना जाणवतो. एका यशप्राप्त कन्येचे मनोगत या गीतात व्यक्त केलेले आहे.

    स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले

    यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।ध्रु।

    ध्रुवपदात कवितेतल्या आनंदमयी भावना जाणवतात. आनंद कसला तर स्वप्नपूर्तीचा. “अजी मी ब्रह्म पाहिले” सारखाच, त्याच तोडीचा आनंद गीतातल्या या कन्येला झालेला आहे. ती म्हणते,

    “ आज माझं कित्येक वर्षं मनात बाळगलेलं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आणि या यशाच्या शिखरावर मला कृतार्थ झाल्याचे समाधान लाभत आहे.”

    ध्रुवपदाच्या या ओळीतला *यशोमंदिर* हा शब्द खूपच लक्षवेधी आहे. यशाचे मंदिर किंवा यशाचे द्वार म्हणजे जणू काही मंदिरच. यशाला दिलेली ही मंदिराची उपमा फारच पवित्र, मंगलमय आणि सूचक वाटते. चांगल्या मार्गाने मिळवलेल्या यशाची ती ग्वाही देते.

    चिमणीला पदरातिल गरुड पंख लाभले

    उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले

    देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले

    यशो मंदिरात आज मी कृतार्थ जाहले.१

    इतके दिवस मी लहान होते. पंखात माझ्या ताकद नव्हती. उडण्याचे सामर्थ्य नव्हते. म्हणून ते मिटलेल्या अवस्थेत होते पण माझ्या आयुष्यात एक दिवस असा आला की जणू काही उंच गगनात सहजपणे भरारी मारणाऱ्या गरुडाचे पंखच मला लाभले आणि हे जग मी माझ्या मुठीत बंदिस्त करू शकले. जगाला माझं अस्तित्व मान्य करावंच लागलं. *कर ले दुनिया मुट्टी मे* हे माझं स्वप्न जणू काही पूर्ण झालं. माझ्याकडे बघणाऱ्यांच्या नजरेत मला आता आदर, अभिमान आणि आश्वासकता दिसत आहे. हेच मला हवं होतं आणि ते मी मिळवलं म्हणून माझा जन्म सार्थ झाला असे आता वाटत आहे.”

    हे संपूर्ण कडवं रूपकात्मक आहे. *गरुडपंख लाभले* या शब्दरचनेत आत्मविश्वास, आत्मनिर्भरता याचा मनोमन उगम झाल्याचा अर्थ अभिप्रेत आहे. कवीने योजलेल्या या रूपकात्मक शब्दातून जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवण्याचा अभिमान जाणवतो. “गुलामगिरीच्या शंखला तोडून उच्च स्थानावरचे माझे स्वतःचे असे एक राज्य निर्माण करण्यात मला यश लाभले आहे” हा विश्वास जाणवतो.

    *देवी साम्राज्याची* या शब्दातून तिने रोवलेल्या विजयपताकेचा विलक्षण अभिमान आणि भाग्य ती उपभोगीत आहे हे दिसतं.आजपर्यंत जिला *पायाची दासी* मानलं जात होतं तिला *देवीचं* स्थान मिळालं. एका सक्षम सबल रूपात ती नव्याने अवतरली.

    दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

    साथ लाभता मना निग्रहा नसे भीती

    संकल्प रूप माझीया वांच्छनेस लाभले

    यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले २

    “ यश तर पदरी आलंच पण मागे वळून पाहताना जाणवत आहे की या यशाचा मार्ग सोपा नव्हता. अवघड होता. सरळ नव्हता! वळणावळणाचा होता. एखाद्या असाध्य डोंगराचे शिखर गाठण्यासारखेच होते ते. अत्यंत साहसाचा हा मार्ग होता पण तरीही अंतर्मनाची कुठेतरी विलक्षण साथ होती, मनात जिद्द होती, चिकाटी होती, एक दुर्दम्य आशावाद आणि निग्रहही होता ज्यामुळे मनात दाटलेल्या भीतीवर मी मात करू शकले, निर्भय बनले. स्वशक्तीचा, स्वसामर्थ्याचा वेध घेऊ शकले आणि त्याच बळावर माझ्या या संकल्पांना, इच्छेला एक निश्चित असा आकार मिळू शकला. खरोखरच आज मी धन्य झाले.”

    *गिरीशिखराप्रति* ही शब्दयोजना इथे अगदी चपखल आहे. कुठलाही डोंगर ओलांडणं हे अत्यंत साहसाचं आणि आव्हानात्मक असतं. उरी बाळगलेली स्वप्नं सत्यात उतरवणं हे येर्‍या गबाळ्याचं कामच नव्हे तर त्यासाठी गिरीशिखरावर पोहोचण्याइतकं सामर्थ्य हवं.. हे अधोरेखित करणारी ही शब्दयोजना वाचकाला नक्कीच भावते. या ओळींमध्ये वीरश्री जाणवते. वीर रसाचा इथे भावाविष्कार झालेला अनुभवास येतो.

    गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

    साथ लाभता मना निग्रह नसे भीती

    यात अनुप्रास आणि यमक हे दोन्ही अलंकार अतिशय सुंदरतेने गुंफले आहेत.

    नाही अहंकार कधी दंभ मना स्पर्शले

    सेवेतूनी जगताच्या कर्मफला जाणिले

    अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले

    यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले३

    “ मला जे हवं होतं ते मिळवताना माझी मानसिकता मात्र संतुलित होती. मी माझ्या मनाचा तोल कधीही ढळू दिला नाही. माझ्या ध्येयमार्गावरून जाताना मी कुणालाही तुच्छ लेखले नाही. मी कुणीतरी इतरांपेक्षा वेगळी आहे असा अहंकार बाळगला नाही. कुठल्याही ढोंगीपणाचा बुरखा पांघरला नाही उलट एका सेवाभावाने मी जगताच्या जीवनातला अज्ञानांधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. *मी*- ची ओळख पटवताना मी समाजाच्या जीवनप्रवाहाला कधीही अव्हेरलं नाही. त्यातूनच ठेचकाळत, शिकत, शिकवत, समजावत, पटवत शांततेच्या, अहिंसक मार्गाने मी माझ्या कष्टाचे फळ मिळवले आणि माझे स्वप्न पूर्ण केले. स्वप्नपूर्ती नंतरही माझे पाय सदैव जमिनीवरच ठेवले . यशाने मी हुरळून गेले नाही. भले मी मनस्वी आनंदले असेन पण त्याची नशा किंवा धुंदी मी माझ्या मनावर येऊ दिली नाही. अखेर *कोsहं* या भावनेने मी एक *निमित्तमात्र* असे समजून समर्पित भावानेच या यशाकडे, तृप्त मनाने आणि प्रातिनिधिक स्वरूपात पाहते.”

    या गीतातला हा शेवटचा चरण अतिशय अर्थपूर्ण आहे, संदेशात्मक आहे. आनंद होणं ही सर्वसाधारण सामान्य भावना आहे. ती एक सहज अशी अभिव्यक्ती आहे पण त्याचा अवास्तव आकार न होऊ देणे हे सामान्यातले असामान्यत्व आहे आणि याच असामान्यत्वाचा पाठपुरावा कवीने या शेवटच्या चरणात जाता जाता सहज केला आहे.

    *वोपिले* हा शब्द ज्ञानेश्वरी ची आठवण करून देतो आणि त्या शब्दातला गोडवा सांभाळून या गीतातल्या ओळीत तो अगदी बेमालूमपणे सहज गुंफलेला जाणवतो.

    वोपिले म्हणजे अर्पिले, देऊन टाकले या अर्थाने इथे तो योजला असावा.

    *कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन* याच अर्थाचा बोध करणाऱ्या या शेवटच्या काव्यपंक्ती आहेत.

    *विश्वपदी वोपिले* हा खूप विस्तारित, उदात्त अर्थांचा शब्दसमूह आहे. “ जिथून मिळालं तिथेच अर्पिलं” हा भाव तिथे आहे. “माझं यश हे आता माझ्यापुरतं मर्यादित नाही तर या यशामुळे जे सामर्थ्य, जी ताकद मला लाभली आहे त्याचा सुयोग्य उपयोग या विश्वासाठीच मी करेन.” हा व्यापक निर्धार त्यात जाणवतो.

    विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो ।जो जे वांछील तो ते लाहो।।

    असा एक अव्यक्त दडलेला अर्थ या गीतात व्यापून राहिलेला आहे.

    जे गीत एका सामान्य कन्येच्या यशोनंदाने सुरू होते ते गीत सहजपणे एका विश्वरूपी संदेशात रूपांतरित होते. केवळ १४ ओळीत डॉक्टर श्रोत्रींनी साधलेला हा महान अर्थ वाचकाला एका वेगळ्याच विचारप्रवाहात घेऊन जातो. धन्य तो कवी! धन्य त्याची शब्दलीला!

    या संपूर्ण गीताची *यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले* ही एक टॅगलाईन आहे आणि या टॅगलाईनला , या ओळीला साजेसा प्रत्येक चरणातला तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द …लाभले— वोपिले हे अतिशय लयबद्ध वाटतात..

    यश कोणते, यश कसले याचा स्पष्ट अथवा विशिष्ट असा उल्लेख या गीतात नाही. यश कोणतेही असू शकते. आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अगदी कोणतेही ….पण या गीतातला एक अंतर्गत भाव जाणवतो तो हा की कुठल्याही स्त्रीचे यश, तिची स्वप्नपूर्ती आणि पुरुषाचे यश– सामाजिक फुटपट्टीने मोजले तर त्यात महत् अंतर असते. पुरुषांपेक्षा एखाद्या स्त्रीला तिच्या स्वप्नपूर्तीसाठी जो संघर्ष करावा लागतो तो अधिक आव्हानात्मक आणि अवघड असतो. कुठेतरी कवीने या स्त्री संघर्षाचा सन्मान आणि दखल घेतल्यामुळे एका स्त्रीच्या भूमिकेतून मला त्याचे मूल्य अधिक वाटते हे निःसंशय …

    *राधिका भांडारकर*



    Nishikant Shrotri


Your Rating
blank-star-rating
Gangadhar joshi - (17 November 2024) 5
उत्तम अर्पण

1 1

neelima khare - (14 November 2024) 5
अतिशय सुंदर कविता... यशासमवेत लाभलेला आनंद कसा जगावा याचे उत्तम भान देणारी... तसेच प्रेरणादायी पण... विवेकी विचाराला जोपासणारी .... फार छान.... राधिकाताईंनी रसग्रहण कवितेचा आंतरिक गाभा पूर्णार्थाने उमजून घेऊन केले आहे.. समाधान देणारा काव्यानुभव...👌👏🙏🏼

1 2