एक काळ असा होता की मुलगी जन्माला आली की तिचे संगोपन करताना किंवा तिला वाढवताना आई-वडिलांच्या मनात महत्त्वाचा जर कुठला विचार असेल तर “आपली मुलगी वयात आल्यावर तिच्यासाठी एखादा चांगला कुटुंबस्थित जोडीदार पाहायचा आणि तिचा विवाह जमवून द्यायचा म्हणजे आपली जबाबदारी संपली.”
आणि हाच विचार मनाशी बाळगून ती एक सक्षम गृहिणी बनावी, सासर माहेरचा मान तिने वाढवावा असे संस्कार तिच्यावर केले जात. म्हणजे मुलगी म्हटली की तिला स्वयंपाकपाणी आणि घर कामाचे धडे प्रथम विनाअट घ्यावेच लागायचे. तिने किती शिकावे अथवा तिने तिच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी की न करावी या सगळ्या आघाडीवर तिला मान्यता देण्याआधी या सगळ्यांमुळे तिचा विवाह जमवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात हा प्राथमिक पण प्रबळ विचार असायचा. थोडक्यात त्या काळात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणे ही स्त्रीच्या आयुष्यातली अत्यंत अडथळ्याची शर्यतच होती पण हळूहळू काळ बदलला अगदी शंभर टक्के नसला तरी बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच क्षेत्रात, जवळजवळ सर्वच क्षेत्रात आजची स्त्री अग्रेसर होत असल्याचं चित्र दिसू लागलं आणि या परिणामाचा विचार करताना मनात येते की एखाद्या स्त्रीच्या जडणघडणीत आई-वडिलांचा जर डोळस, समंजस सहभाग आणि सामाजिक विचारसरणीला डावलण्याचे बळ असेल तर ती नक्कीच काहीतरी दैदिप्यमान असे करू शकते हे बऱ्याच अंशाने सिद्ध झालेले आहे. याच विचारांचे प्रतिबिंब *डॉक्टर निशिकांत श्रोत्री* यांच्या *अवकाशाची सीमा* या गीतात मला दिसलं. खरोखरच मन आनंदलं आणि या गीताचा रसास्वाद घ्यायलाच हवा असे अगदी मनापासून वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
*अवकाशाची सीमा*
तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ध्रु
ती : हो वीणा सरस्वतीची
हो पद्मिनी पदन्यासाची
सुरसमाधि गंधर्वाची
प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१
तो : खेळाडू मैदानाची
मासोळी जलतरणाची
पाकोळी अवकाशाची
यश राहू दे सदा तुझ्या साथीला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला २
तो: तव प्रज्ञा विनायकाची
ती: ज्ञानाची विज्ञानाची
दोघे :वर्षा तुजवर आशीशाची
तव तेजाचा मार्ग दीप जगताला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला३
*डॉ. निशिकांत श्रोत्री**(निशिगंध)*
हे गीत वाचल्यानंतर प्रथम जाणवतं ते हे एक प्रेरणा गीत आहे. या गीतात एका भाग्यशाली गुणी कन्येला आई-वडिलांकडून मिळणाऱ्या आशीर्वादाचे चित्र शब्दांकित केले आहे. आपल्या कन्येने चौफेर प्रगती करून तिचे स्वतःचे एक स्थान निर्माण करावे आणि जन्मदात्यांची मान उंच करावी अशी अपेक्षा त्यात मांडली आहे आणि त्यासाठी त्यांचं संपूर्ण पाठबळ तिला देत असताना भरभरून आशीर्वादही दिले आहेत हेच प्रथम दर्शनी गीत वाचताना लक्षात येतं. एका उदारमतवादी आईबापांचं आपल्या कन्येविषयीचं स्वप्न यात सुंदरपणे रेखाटलं आहे.
हे एक निराळेच द्वंद्वगीत आहे आणि या गीतातील गायक माता आणि पिता आहेत.
तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला
खुडुनि आणी नभिच्या नक्षत्राला।ध्रु
या गीतातलं हे ध्रुवपदच पित्याने कन्येला दिलेल्या प्रेरणेचं आहे. मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने एक बाप मुलीला सांगत आहे, “ बेटा इतकं मोठं तुझं कर्तुत्व असूदे की त्यासाठी विशाल आकाशाच्या सीमाही तोकड्या पडाव्यात. अशी उंच भरारी घे की आकाशाचा चंद्र तुझ्या झोळीत येईल.” या ध्रुवपदाच्या दोन ओळीतच त्या कन्येच्या सामर्थ्याविषयी पित्याने विश्वास दाखवला आहे आणि तिला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित आणि प्रेरित केले आहे.
“तुझ्या ध्येयासाठी SKY IS THE lIMIT असू दे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
*खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला* ही काव्यपंक्ती रूपकात्मक आहे. *नभिचे नक्षत्र आणावे* यात तिने उंच भरारी घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवावे ही अपेक्षा बाळगलेली आहे.
कन्येच्या स्वप्नात भागीदार असलेली तिची माता ही हेच म्हणते,
ती: हो वीणा सरस्वतीची
हो पद्मिनी पदन्यासाची
सूर समाधी गंधर्वाची
प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१
जे कुठलं क्षेत्र तू निवडशील त्यात तू स्वतःला अत्त्युत्तम सिद्ध कर. त्या क्षेत्रातील शिखर गाठण्याचा प्रयत्न कर. संगीत क्षेत्रात तुला जर एखदे तंतुवाद्य शिकायचं असेल तर त्यात इतकं यश तुला मिळो की तुझ्या हाती वाजणारी वीणा ही जणू काही साक्षात सरस्वतीचीच वाटावी.
जर तुला नृत्यकलेत काही करून दाखवायचं असेल तर पदन्यासाचे शास्त्र इतकं आत्मसात कर की तुझं नृत्य पाहताना साक्षात पद्मिनीचेच दर्शन होईल आणि श्रेष्ठ गायिका बनायचं असेल तर सुरांची कठोर तपश्चर्या करून स्वर्गीय गंधर्वांची कला आत्मसात कर. तुझे गायन हे गंधर्वगायन ठरो. कुठल्याही कलेचं सर्वार्थाने, सर्वांगाने आव्हान तुला पेलता आलं पाहिजे.
आईने व्यक्त केलेलं हे कलेचं स्वप्न तर पित्याची आणखी काही निराळी इच्छा..
तो: खेळाडू मैदानाची
मासोळी जलतरणाची
पाकोळी अवकाशाची
यश राहू दे सदा तुझ्या साथीला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला२
आपल्या उमलत्या कन्येला मोठ्या अभिमानाने हा पिता सांगत आहे,” तुला जर क्रीडा क्षेत्रात तुझं स्थान निर्माण करायचं असेल तर मग मैदान गाजव. मैदानी खेळात असं प्राविण्य मिळव की सारं जग एक उत्तम खेळाडू म्हणून तुझं नाव घेईल. पाण्यात पोहायचं असेल तर मासोळी सारखं डोळ्यांचं पारणं फिटणारं पोहणं शिकून घे.इतकी गती,इतकं चापल्य त्यात असूदे! अंतराळात झेप घे आणि अवकाशालाच गवसणी घाल.
मी नेहमीच तुला यशासाठी शुभेच्छा देईन. जे वांछित आहे ते तुला मिळेलच. यश तुझ्या पदरात आपणहून येईल. फक्त डळमळू नकोस. असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न कर. एक लक्ष्य ठेव. कधीही ध्येयाच्या मार्गावरून तुझं पाऊल मागे पडू नये. सदैव पुढे जात रहा.”
या ओळींमध्ये *पाकोळी अवकाशाची* ही शब्दरचना जरा विस्मित करते. खरं म्हटलं तर पाकोळी म्हणजे एक आकाशात भिरभिरणारं लहानसं पाखरू. *पाकोळी* हे पित्याने कन्येच्या “आज ती लहान असल्याचं” दर्शविण्यासाठी वापरलेला प्रतिकात्मक, रूपकात्मक शब्द असावा.
“बाळ आज तू माझं छोटंसं पाखरू आहेस पण तू जर अवकाशाचा वेग घ्यायचं ठरवलंस ना तर तुझ्या पंखातील ताकद नक्कीच वाढेल आणि आत्मनिर्भरतेने तू भविष्यात अंतराळात भरारी घेऊन चंद्र तार्यांशी दोस्ती करू शकशील हा विश्वास मला आहे. एक पाकोळी अवकाश ताब्यात घेऊ शकते हे जगाला दिसू दे.”
पुढचा चरण अतिशय वाचनीय, आणि भावना उचंबळून टाकणारा आहे
तो: तव प्रज्ञा विनायकाची
ज्ञानाची विज्ञानाची
दोघे: वर्षाव आशीशाची
तव तेजाचा मार्गदीप जगताला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ३
पहिल्या ओळीत पित्याने कन्येला म्हटलं आहे, *तव प्रज्ञा विनायकाची*
“विनायक म्हणजेच गणेश म्हणजेच बुद्धीची देवता. मुली तू प्रज्ञावंत आहेस, बुद्धिमान आहेस, त्या गणेशाची तुझ्यावर कृपा आहे आणि त्याने बहाल केलेल्या बुद्धीचा तू योग्य रीतीने उपयोग करून घे.”
या म्हणण्याला त्या मातेचेही अनुमोदन आहे आणि ती लगेच म्हणते,
*ज्ञानाची विज्ञानाची*
ईश्वराने तुला ज्ञानी बनण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. यथाशक्ती तू योग्य असे ज्ञानकण वेचून तुझ्या ज्ञानाची झोळी भरून घे.”
या इथे कवीने वापरलेल्या *विज्ञानाची* हा शब्द फार सूचक आहे. यात असा अर्थ अभिप्रेत आहे की,” जगाने विज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे. या विज्ञान युगात तू यत्किंचीतही मागे पडू नकोस. जे जे नवे ते ते स्वबुद्धीने आत्मसात कर. रचनात्मक प्रगत विज्ञानाचा सकारात्मक पाठपुरावा करून तुझ्या हातून काहीतरी अलौकिक घडू दे!”
मातापित्यांच्या स्वप्नाचे सूर एकमेकात मिसळतात आणि दोघेही एकत्रपणे म्हणतात,
वर्षाव तुजवर आशीशाचा
तव तेजाचा मार्गदीप जगताला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला..
आम्ही दोघेही तुझ्यावर मनापासून आशीर्वादांचा वर्षाव करतोय आणि विश्वास व्यक्त करतो की जिथे कुठे जाशील, जे कुठले क्षेत्र निवडशील त्यात तुला झळाळते लखलखीत यश लाभो आणि तुझ्या यशोतेजाने तू तुझ्या मागून येणाऱ्यांना प्रकाश दे. त्यांचाही मार्ग उजळ. जगासाठी एक आदर्श उदाहरण तुझ्या रूपाने ठेव. पुढच्या पिढीसाठी तू दीपस्तंभ हो आणि आकाशातील चंद्र तारे वेचण्याचं तुझं धडाडीचं स्वप्न पूर्ण होऊ दे.”
अशा रीतीने हे संपूर्ण गीत उलगडताना एका सुंदर प्रेरणागीताचा अनुभव मनाला प्रसन्न करतो. या गीतात आई-वडिलांनी कन्येला दिलेला प्रेमळ आणि प्रांजळ असा मौलिक आशीर्वाद आहे.
॥शुभास्ते पंथान: संतु॥ याच भावाचा तो आशीर्वाद आहे. आपल्या कन्येसाठी कला, क्रीडा ,साहित्य, संगीत, विज्ञान, ज्ञानाची सर्व दालने त्यांनी खुली ठेवली आहेत.कसलाही दबाव तिच्यावर नाही.एका कळीतून सुंदर फुल पूर्ण उमलू दे हीच भावना.
*डॉ. निशिकांत श्रोत्री* एक महान कवी तर आहेतच पण आजपर्यंत त्यांच्या ज्या अनेक कविता मी वाचलेल्या आहेत त्यातून त्यांचं *स्त्रीवादीपण* प्रकर्षाने झिरपलेलं आहे. कुठलीही कविता असूदेत पण त्यांच्या शब्दातून मनापासून स्त्रीचा सन्मान करणारेच भाव प्रकट होत आले आहेत. अगदी त्यांच्या शृंगारिक कवितेत सुद्धा त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारे विकृतपणे स्त्रीचे चित्र कधीही चितारलेलं मला आठवत नाही. कदाचित माझ्याकडून हे थोडं विषयांतर होत असेल पण कवीच्या मनाचे अंतरंग किती निर्मळ असू शकतात हे आजच्या त्यांच्या *अवकाशाची सीमा* या गीताविषयी लिहिताना मला जाणवलं आणि ते अधोरेखित करावसं वाटलं कारण एखादं काव्य सुंदर का वाटतं तर तिथे कवीचं सुंदर मन असतं म्हणूनच.
*अवकाशाची सीमा* या गीतातील साधीच, फारसे क्लिष्ट अलंकार, छंद, वृत्त नसलेली पण प्रेमळ आई-वडिलांचे मुलीबद्दलच्या भविष्याचे स्वप्नरंजन करणारी प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आणि प्रेरणादायी शब्दरचना वाचकाच्या मनाला थेट भिडते. फक्त इतकच नसून हे गीत समाज विचारसरणीला शंभर पावले पुढे नेतं म्हणून तेही अधिक महत्त्वाचं वाटतं. या गीतातला वात्सल्य रस आणि माता पित्यांच्या कन्येविषयीच्या उच्च भावना माझ्यासारख्या स्त्रीवाचकाला आणि दोन कन्येच्या मातेला नक्कीच भारावून टाकतात. या गीताचं हेच परमयश आहे असंच मी मानते.
*राधिका भांडारकर*