• 28 November 2024

    गाथा स्त्रीजन्माची

    आठवणीचा एक विसावा

    5 89

    मनाचे अनेक कप्पे असतात आणि एकेका कप्प्यात आयुष्यातल्या असंख्य आठवणी अगदी सहजपणे कळत नकळत साठलेल्या असतात. कडू असतील, गोड असतील, सुखाच्या, दुःखाच्या, मैत्रीच्या, प्रेमाच्या, यशापयशच्या, हव्याशा, नकोशा कितीतरी आठवणी… आयुष्य पुढे सरकतं आणि आठवणी मागून येत असतात. आठवणी म्हणजे विसावा असतो. स्मृतिगंधाचा हा दरवळ कुठेतरी निवांतपणाचा अनुभवही देत असतो. खरोखरच धकाधकीच्या जीवनात कधीतरी मिळणाऱ्या शांत क्षणी या आठवणींमध्ये रमून जावं यासारखं आनंददायी काय असू शकतं? अशाच आशयाची डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची *आठवणींचा एक विसावा* ही कविता. या कवितेचा आज आपण रसास्वाद घेणार आहोत.

    *आठवणींचा एक विसावा*

    अनंत असती मनी पायऱ्या आठवणीच्या मोजू नको

    आठवणींचा एक विसावा तोच कधी तू विसरू नको॥धृ॥

    पैलतीराची ओळख पटली ऐलतिराला विसरू नको

    रंगून जाता सखाया संगे अम्हा कधी तू विसरू नको

    बालमित्र अन त्यांची मैत्री बाल्यासंगे तोडू नको

    जोपासावी विरहासंगे तिला कधी तू खुडू नको ।१।

    पुढे पाहणे पुढेच जाणे हीच जगाची रीत खरी

    मागे उरले ते दुसऱ्याचे ही वृत्ती तर नव्हे खरी

    पुढचे पाऊल पुढे पडू दे ठसे मागचे पुसू नको

    आठवणींची गोड शिदोरी बेचव कधी तू करू नको ।२

    देव्हाऱ्याच्या कोन्यामध्ये तुझ्या असू दे जुन्या स्मृती

    विलसतील त्या रोज एकदा ज्योती संगे निरांजनी

    ज्योतीच्या त्या स्नेहाला ते जाळून आता विसरू नको.

    काजळ होऊन नयनी शोभू अश्रुसंगे ढाळू नको

    अनंत असती मनी पायऱ्या आठवणींच्या मोजू नको

    आठवणीचा एक विसावा तोच कधी तू विसरू नको

    *डॉ. निशिकांत श्रोत्री*.

    ही कविता वाचल्यावर मला असे जाणवले की हा स्वतःच्याच एका मनाचा दुसऱ्या मनाशी झालेला एक आर्जवी संवाद आहे. कवीच्या मनाचे मिटलेले असंख्य पदर हळूहळू उलगडत आहेत आणि त्यांना जाणवत आहे “या जीवन प्रवासात आपले अनेकांशी धागेदोरे जुळले, अनेक नाती आकारली, काळाच्या ओघात खूप काही मागे पडलं आणि आज ती सरलेली, मागे पडलेली आठवणींच्या पडद्यामागे गेलेली नाती जणू पुन्हा खुणावत आहेत.

    किंवा नव्या जगात स्वत:चं भविष्य घडविण्यासाठी पाऊल टाकणार्‍या आपल्या मुलाला एक माता किंवा पिता काही सांगत आहे आणि म्हणत आहे..

    पैलतीराची ओळख पटली ऐलतीराला विसरू नको

    रंगून जाता सखया संगे आम्हा कधी तू विसरू नको

    बालमित्र अन् त्यांची मैत्री बाल्यासंगे तोडू नको

    जोपासावी विरहासंगे तिला कधी तू खुडू नको ।१।

    जीवनाच्या प्रवासात तू खूप लांब वर जाऊन पोहोचला आहेस. पैलतीर गाठला आहेस पण जिथून हा प्रवास सुरू झाला त्या ऐलतीराला तू कधीही विसरू नकोस. तुला तुझ्या रिंगणात आता नवे मित्र, मैत्रिणी मिळाल्या असतील. नवे सगे सोयरे लाभले असतील. ते स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की तू तुझे बालपण विसरावेस, आम्हाला आणि बालपणीचे मित्र, लंगोटी यार— त्यांच्या मैत्रीची नाळ तोडून टाकावीस. आता ते सारे पांगले, दूर गेले, आता भेटीगाठी होत नाहीत पण तुझ्या स्मृतिपटलांवरच्या त्या गोड मैत्रीच्या आठवणी पुसू नकोस.

    पुढे पाहणे पुढेच जाणे हीच जगाची रीत खरी

    मागे उरले ते दुसऱ्याचे ही वृत्ती तर नव्हे खरी

    पुढचे पाऊल पुढे पडू दे ठसे मागचे पुसू नको

    आठवणींची गोड शिदोरी बेचव कधी तू करू नको

    काळ थांबत नाही. कालचक्र अव्याहत सरकत असते. आणि काळाबरोबर पुढे जाणं हीच तर जगाची खरी रीत आहे. पण पुढे जाताना काहीतरी मौल्यवान असं मागेही राहतच ना? जे गेलं ते संपलं आता त्याचा आपला काही संबंध नाही ही वृत्ती मात्र चांगली नव्हे.

    तुझी पावलं सदैव पुढेच पडू दे. ती कुणाकडूनही मागे खेचली जाणार नाहीत पण आपल्याच पावलांचे या वाटेवर उमटलेले ठसे मात्र पुसले जाऊ नयेत. हे ठसे म्हणजेच आठवणी. एक जीवनोपयोगी शिदोरी, तिला कधीही बेचव मानू नकोस.

    या चार ओळींमध्ये कवीने एक फार मोठा संदेश दिलेला आहे.मनुष्याची जडणघडण होत असताना त्याच्या मनावर बाळपणापासूनच आई-वडील, सगे सोयरे, गुरुजन यांच्याकडून संस्कार घडत असतात. परंपरा, रितीभाती, धर्म! निती, आचार— विचार यांची एक भक्कम संहिता त्याच्याभोवती आकारात असते आणि तीच त्याच्या जीवनाची घट्ट मातीत रुतलेली खरी मूळं असतात. पण उंबरठ्याबाहेर पडल्यानंतर, जगाच्या मुक्तांगणात वावरताना माणसाच्या जीवन पद्धती फार फरक पडत जातो. तसा बदल घडणे हे गैर नक्कीच नाही पण हे अंतर इतकंही ताणलं जाऊ नये की आपल्याच पायाखालच्या मातीत रुजलेली आपलीच मूळं कोणती हे शोधण्याची वेळ यावी.

    देव्हाऱ्याच्या कोन्यामध्ये तुझ्या असू दे जुन्या स्मृती

    विलसतील त्या रोज एकदा ज्योती संगे निरांजनी

    ज्योतीच्या त्या स्नेहाला ते जाळून जाता विसरू नको

    काजळ होऊन नयनी शोभू अश्रूसंगे ढळू नको ।३।

    देव्हारा म्हणजे घरातला एक मंगलमय कोपरा असतो. अशाच देवघरासारख्या तुझ्या मनाच्या कोपऱ्यात या जुन्या स्मृतींचा तू सांभाळ कर. भक्ती भावाने त्यांना जप. निरांजनात ज्योत जशी तेवत राहते तशा त्या तुझ्या मनात सतत उजळत राहोत. मात्र निरांजनातील वात तेल संपताच विझते तसे मात्र तुझे होऊ नये. तुला जो इतरेजनांचा स्नेह लाभला त्या मायेचा,त्या प्रेमाचा तुला कधीही विसर पडू नये.

    नयनांना जसे काजळ शोभा देते त्या काजळासम या स्नेहास तुझ्या डोळ्यात जपून ठेव. डोळ्यातून वाहणार्‍या अश्रुंसोबत ते कधीही वाहून जाऊ देऊ नकोस.

    अनंत असती मनी पायऱ्या आठवणींच्या मोजू नको

    आठवणींचा एक विसावा तोच कधी तू विसरू नको

    जीवन म्हणजे एक लांबलचक शिडी आहे आणि यावर आठवणींच्या अनेक पायऱ्या आहेत. मोजता येणार नाहीत इतक्या अगणित पायर्‍या आहेत म्हणून त्या मोजण्याच्या भानगडीतही तू पडू नकोस. या पायऱ्यांवरच अंमळ थांब! बैस आणि विश्रांती घे. तुझ्या यातायातीच्या जीवनात ही आठवणीची पायरी म्हणजेच खरा विसावा आहे याची जाणीव ठेव.

    अतिशय सुरेख कविता! भावार्थी काव्य. मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यात कंपनं जाणवून देणारं, अत्यंत भावुक, गहिवर आणणारं, हळुवार काव्य!

    कुठेतरी ठप्प झालेल्या, बोथट, बधिर झालेल्या भावनांना हलकेच झोका देणारं, फुंकर घालणारं काव्य.

    *सॉनेट* हा एक इंग्रजी काव्यप्रकार आहे. मराठीत या काव्य प्रकारास *सुनीत* असे म्हणतात. १४ ओळींचे हे काव्य असते. चार ओळींचे पहिले तीन चरण आणि नंतर काव्यास कलाटणी देणाऱ्या शेवटच्या दोन ओळी अशा एकूण १४ ओळी.

    डॉ. श्रोत्रींची आठवणींचा एक विसावा* ही काव्यरचना या सुनित काव्यप्रकारातलीच आहे.

    सुरेख साधलेली यमके या सुनीतला सहज ठेका देतात.

    ही एक उपदेश पर काव्यरचना आहे असे मात्र मी म्हणणार नाही. ही कविता वाचताना उपदेशापेक्षा हे कवीच्या अंतर्मनातले कढ आहेत असेही मला वाटते. विवेक बुद्धी असलेल्या, तरतम भावांचे भान असलेल्या व्यक्तीच्या मनातलेच हे हुंकार असावेत असा माझा तर्क आहे.मनाच्या गाभार्‍यात कुणी अदृष्यपणे केलेलं हे कथीत आहे. किंवा यात एक आर्जव आहे, एक कळकळीचं सांगणं आहे असंही जाणवतं.

    आठवणींच्या पायऱ्या, आठवणींचा विसावा, आठवणींची गोड शिदोरी या उपमा काव्याला माधुर्य प्राप्त करून देतात.

    *ठसे मागचे पुसू नको* ही ओळही खूप अर्थपूर्ण आहे.

    *ठसे मागचे* म्हणजे आपले संस्कार,आपली संस्कृती. कोणत्याही परिस्थितीत ती जपणे हे मनुष्य जीवनासाठी,स्वास्थ्यासाठी जरुरीचे आहे.हा संदेश ही ओळ देते.

    *ज्योतीच्या त्या स्नेहाला* या ओळीत *श्लेष* अलंकार साधला आहे. *स्नेह* हा शब्द द्व्यर्थी आहे.

    स्नेह म्हणजे तेल, तूप अथवा तत्सम स्निग्ध पदार्थ, जो निरांजनात वात पेटवण्यासाठी माध्यम म्हणून वापरला जातो. आणि दुसऱ्या अर्थाने *स्नेह* म्हणजे प्रेम, माया, वात्सल्य वा आपलेपणा.

    या कडव्यात कवीने हा *स्नेह* शब्द श्लेष अलंकारात आणि रूपकात्मक वापरून,”ज्योत जशी तेल संपल्यानंतर विझते तशी तुझ्यावर अनेकांनी केलेल्या प्रेमामुळे,तुझ्या जीवनात तेवणार्‍या या प्रेमरुपी ज्योतीला मात्र तू या पद्धतीने विझू देऊ नकोस”. असा सुरेख संदेश अगदी सहजपणे दिला आहे.

    मी या कवितेबद्दल असं म्हणेन की या काव्यात काठीण्य नाही, कठोरपणा नाही, दुसऱ्याला काही सांगतानाही त्याला आरोपी ठरवलेलं नाही, दोषी ठरवलेलं नाही. अतिशय गोंजारुन, चुचकारुन आणि मनापासून प्रेमाचेच धागे सांभाळत, गोडवा जपत पण तरीही हिताचं, जरुरीचं असं केलेलं एक सुंदर भाष्य आहे.

    *राधिका भांडारकर*



    Nishikant Shrotri


Your Rating
blank-star-rating
Gangadhar joshi - (28 November 2024) 5
व्वा उत्तम काव्य रसग्रहण पण चपखल

1 1

Vandana .vijay16 - (28 November 2024) 5

1 0