• 05 December 2024

    गाथा स्त्री जन्माची

    नाश अस्तित्वाचा. रसग्रहण: राधिका भांडारकर

    5 52

    *स्त्रीभ्रूण हत्या* म्हणजे मानवी सत्प्रवृत्तीचा, वैचारिकतेचा, नैतिकतेचा संपूर्ण र्‍हास आहे. अध:पतन आहे. भारतात स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये म्हणून कायदा करावा लागतो हेच किती लांछनास्पद आहे. मुलगा कुलदीपक म्हणून त्याच्या जन्माचा सोहळा होतो. कन्या जन्माचं मात्र सदैव ओझं वाटतं. “मुलगी झाली हो!” म्हणून आनंदाने बहरणं हे क्वचितच. काळ बदललाय, समाज बदललाय, बरंच वैचारिक मानसिक स्थित्यंतर झाले आहे, यात कायद्याचाही अंकुश आहे हे मान्य करूनही सामाजिक मानसिकतेत संपूर्ण बदल घडलेला अनुभवास येत नाही. एक उदारमतवादी प्रवाह कुठेतरी रोखलेला वाटतो आणि हे वास्तव नाकारता येत नाही. हीच खंत व्यक्त करणारी *अस्तित्वाचा नाश* हे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे गीत वाचले आणि त्यावर भाष्य करावेसे वाटले.

    *नाश अस्तित्वाचा* रसग्रहण

    (गाथा स्त्रीजन्माची )

    गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला

    मानवाच्या अस्तित्वाला घोर लागला।ध्रु।

    पोसुनिया उदरात

    नवमासाचे ते व्रत

    नाही क्लेषा जुमानत

    जन्म द्यायला उद्युक्त

    जाण तिच्या त्यागाची परि विसरला

    गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला१

    संस्काराने मढविले

    बाळकडू त्याला दिधले

    वक्षामृत ही पाजले

    रात्रंदिन जोपासले

    घोट तरी तिच्या जिवाचा हो घेतला

    गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला२

    शौर्याने देशा राखले

    विज्ञाने-ज्ञाने उजळले

    कर्तृत्वाचे पंख फुटले

    अबला तिजला दुषायाला तो धजावला

    गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला३

    *डॉक्टर निशिकांत श्रोत्री*( निशिगंध)

    या गीतात स्त्रीभ्रूणहत्येचा, त्या हीन मानसिकतेचा निषेध केलेला आहे .आणि ते अघोरी कृत्य करणाऱ्याला एक ठाम जाबही विचारलेला आहे. हे कृत्य किती नीच मनोवृत्तीचे आणि तितकेच स्त्री विषयीच्या कृतघ्नतेचे प्रतीक आहे हे यात सांगितलेलं आहे .

    *गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला*

    *मानवाच्या अस्तित्वाचा घोर लागला ।ध्रु।*

    *गर्भस्थ गर्भाशयाचा* म्हणजेच गर्भाशयात वाढणाऱ्या स्त्री गर्भाचा आणि त्यात उमलणाऱ्या गर्भाशयाची म्हणजेच गर्भाशयातल्या गर्भाशयाचीच एक प्रकारे हत्या झाली आहे. “अरेरे! ज्या गर्भातून मानवाचा जन्म होतो त्या गर्भाशयालाच मिटवलं गेलं आहे. मानव जीवनाच्या अस्तित्वावरच हा घाव नाही का?

    ध्रुवपदातच कवीने स्त्रीभ्रूणहत्या म्हणजे मानवीय उत्पत्तीचाच अंत असे म्हटले आहे आणि ते किती योग्य आहे!

    स्त्री ही निर्मितीक्षम आहे. स्त्रीच नसेल तर उत्पत्ती चक्रच थांबून जाईल. ध्रुवपदाच्या या दोन ओळीतच कवीने स्त्री जन्माचे महात्म्य तर सांगितलेलेच आहे पण स्त्रीभ्रूणहत्या हे किती निंदनीय कृत्य आहे याची समज दिली आहे. “केवळ मुलगी नको” या भावनेने मानवता, सुजाणता, सजगता विसरून गर्भात कन्येला चिरडून टाकणाऱ्या त्या माथेफिरूला कवी सांगतात ,

    *पोसुनिया उदरात*

    *नवमासाचे ते व्रत*

    *नाही क्लेषा जुमानत*

    *जन्म द्यायला उद्युक्त*

    *जाण तिच्या त्यागाची परि विसरला*

    *गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला ॥१॥*

    “अरे मुर्खा! आज तू या भूवरी कुणामुळे आहेस? तुला जन्म देणारी माता जिने नऊ महिने तिच्या उदरात तुझा भार पेलला, कलेष सहन केले, अनंत यातना सोसल्या पण तुला जन्माला घातले. तेही प्रेमाने, मायेने, वात्सल्याने आणि उत्सुकतेने. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आणि तू तिचा त्याग विसरलास? अरे तुला जन्म देणारी एक स्त्री होती आणि आज स्त्रीचाच हा नवांकुर तू कोणत्या भावनांतून खुडायला निघाला आहेस ? या तुझ्या कृतीने तू तुझ्या मातेचाही एक प्रकारे अवमान करत आहेस. नव्हे स्त्री जन्माचीच तुझ्याकडून अवहेलना होत आहे.

    *संस्काराने मढविले*

    *बाळकडू त्याला दिधले*

    *वक्षामृतही पाजले*

    *रात्रंदिने जोपासले*

    *घोट तरी तिच्या जिवाचा हो घेतला*

    *गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला॥२॥*

    “ज्या स्त्रीच्या गर्भातूनतू या विश्वात पहिला श्वास घेतलास त्या तुझ्या आईचा तुला जन्म देण्यापुरताच कार्यभाग होता का? तिने तुझं संगोपन केलं, तुला स्तन्य दिलं, तिच्या दुग्धामृतातून तुझ्यावर चांगले संस्कार घडवले गेले, रात्रंदिवस तुझ्या खस्ता काढत तुला वाढवले, जोपासले आणि आज एका स्त्रीच्या गर्भाशयातला कन्येचा गर्भ चिरडताना तुला लाज कशी वाटत नाही रे? तुला कळतंय का? या तुझ्या क्रूर कृत्याद्वारे तू एक प्रकारे तुझ्या मातेच्याच जीवाचा घोट घेत आहेस.

    *घोट तरी तिच्या जिवाचा हो घेतला* ही ओळ प्रातिनिधिक स्वरूपात आहे. ज्या नारी च्या गर्भातून तुझा जीवन प्रवास सुरू होतो त्याच नारीच्या जीवावर तू घाव घालतो आहेस. तू एक अत्यंत निर्दयी, कृतघ्न, माणूसही न म्हणण्याच्या लायकीचा आहेस. “ हा तीव्र उद्रेक या ओळीत जाणवतो.

    *शौर्याने देशा राखले*

    *विज्ञाने-ज्ञाने उजळले*

    *कर्तुत्वाचे पंख फुटले*

    *अबला तिजला दुषायाला तो धजावला*

    *गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला*॥३॥

    “पुरुष म्हणून जन्माला आलास. निसर्गाने दिलेल्या पौरुषाचा खरा अर्थच तुला समजला नाही. तू बाळगलास तो फक्त पुरुषीपणाचा अहंकार. खूप काही मिळवलंस जगत असताना. देशाच्या सीमा शौर्याने राखल्यास. तू विद्वान झालास. शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ, धन्वंतरी ही झालास. तुझ्यासाठी जी जी क्षेत्रे आव्हानात्मक होतीस ती पार केलीस. तुझे अलौकिक कर्तुत्व तू गाजवलेस. जमिनीवरून अंतराळातही गेलास. तुझी झेप, तुझी भरारी निश्चितच डोळे दिपवणारी आहे पण पुढची पावलं पडत असताना तुला पहिलं पाऊल उचलायला एका आई नावाच्या स्त्रीने शिकवलं होतं हे मात्र तू पार विसरलास. तुझ्या मनातल्या अहंकाराने खरं म्हणजे तुलाच संकुचित केलं कारण तुझ्या जीवनाभोवती ज्या स्त्रीचं भक्कम कवच होतं तिलाच तू दुर्बल, अबला म्हणण्याचा घोर अपराध नव्हे गुन्हा केलास. सीमेवर शत्रूला मारणं ही वीरता आहे पण कन्येचा अव्हेर करताना तिच्यावर गर्भातच घाव घालणं हा गुन्हा आहे. यात शौर्य नसून मनाचा कमकुवतपणा आहे. ही एक लाजीरवाणी रक्तरंजित माघार आहे.पळपुटेपणा आहे. गर्भातल्या कळीला खुडायला निघालेल्या अधमा! तुला समजत कसं नाही की या कळीतल्या नव्या गर्भाशयाचा ज्यातून भविष्यात विश्व निर्मिती होणार आहे तीच तू नष्ट करत आहेस. खरोखरच तू मानवी जीवनाचा गुन्हेगार आहेस. उत्पत्ती चक्राला भेदणारा तू क्रूर काळ आहेस. मूळ स्त्रीत्वालाच नाकारणारा तू एक नपुंसक पुरुष आहेस. तुझ्या वृत्तीचा धिक्कार असो!”

    ही कविता वाचताना वाचकांचे रक्त उसळल्याशिवाय राहत नाही. समजावत किंवा समंजसपणे” तू हे करू नकोस” अशा पद्धतीने जरी या गीताची सुरुवात होत असलेली वाटली तरी ओळी मागून ओळी लिहिताना कवीच्या मनातला विषाद तीव्र होत जाताना जाणवतो. शब्दांना धार चढते. उपहास निर्माण होतो आणि उपहासातून क्रोधरसाची सहज झालेली उत्पत्ती मनाला भडकवते.

    या गीतातली लक्षवेधी सौंदर्य स्थळे म्हणजे प्रत्येक कडव्यातील सहज यमके आणि अनुप्रास.

    *अबला तिजला दुषायाला तो धजावला* या ओळीतला अनुप्रास अतिशय सुंदर साधला गेला आहे.

    *नाश अस्तित्वाचा* हे सामाजिक हीन मनोवृत्तीवर बोट ठेवणारं गीत आहे. एक संदेश गाणे आहे आणि त्यात स्त्रीजन्माला सन्मान देण्याचं आणि निसर्गचक्राचं संतुलन राखण्याचं एक महान आव्हान आहे. कवीच्या उदात्त विचारांना मी मनोभावे वंदन तर करतेच पण या गीताच्या पलिकडे जाऊन मला माझं एक मत मांडायचं आहे.

    सदर गीत हे पुरुषाला केंद्रस्थानी धरून लिहिलेलंआहे. पुल्लींगी आहे. पण “आता तिसरी मुलगी नको” म्हणून कन्याजन्माची चाहूल लागताच गर्भपात करण्यास जी स्त्री प्रवृत्त होते .. तिच्याविषयी काय बोलायचे? हा तर आत्मघातच नव्हे का? स्वत्त्वावरचाच आघात नव्हे का? हे अधिक भयानक वाटते मला. मातृत्वावरचाच हा कुर्‍हाडीचा घाव आहे..

    *राधिका भांडारकर*



    Nishikant Shrotri


Your Rating
blank-star-rating
Aruna Mulherkar - (05 December 2024) 5
डाॅ. श्रोत्रींनी विविध विषयावर भावगीते लिहावी आणि त्यावर राधिकाताईंनी त्यांच्या अत्यंत प्रभावी लेखनशैलीत भाष्य करावे हा म्हणजे मणी-कांचन योगच म्हणावा लागेल.

1 1

Mrudula Raje - (05 December 2024) 5
खूप छान 🙏💐

1 1

Gangadhar joshi - (05 December 2024) 5
उत्तम

1 1