स्त्री अनेक रूपात दिसते. ती जितकी शालीन, सात्विक, नम्र असते तितकीच ती करारी, क्रोधित रूपातही दिसते. ती प्रेम स्वरूप असते, ती लज्जित प्रिया ही असते, ती सहचारिणी असते, मायेची सावली असते. उंबरठ्यात तिच्या स्त्रीत्वाची निराळी छटा असते तर उंबरठा ओलांडल्यानंतरची तिची झळाळी वेगळी असते. अनंत रुपातली ही स्त्री खरोखरच अनाकलनीय आहे. तिच्या कायिक आणि मानसिक सौंदर्याचे ही अनेक प्रवाह आहेत पण जेव्हा ती तिच्या नवजात बालकाला पदराशी घेऊन स्तन्य देते त्यावेळेचं तिचं रूप हे अत्यंत लोभस आणि पवित्र असतं. ते एका मातेचं मंगलमय रूप असतं. कोणत्याही स्त्रीला बाळाला पाजताना जे सौख्य प्राप्त होत असतं ते केवळ शब्दातीत तर आहेच पण स्वतःच्या बाळासाठी कधीकधी गैरसमजुतीतून अथवा स्वतःचे सौंदर्य जपण्याच्या वेडगळ कल्पनातून स्तन्य नाकारणाऱ्या स्त्रियांना आईच्या दुधाचे महत्त्व पटवून देणे हे नक्कीच गरजेचे ठरू शकते. अशाच अर्थाचे अथवा अशाच हेतूने प्रेरित होऊन लिहिलेले *डॉक्टर निशिकांत श्रोत्री* यांचे *कवच कुंडले बाळा* हे गीत. आज आपण या गीतातील अंतरंगाचा शोध घेऊया.
*कवचकुंडले बाळा*
प्रसविलेस तू गोंडस बाळा जन्म सार्थ जाहला
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा॥ध्रु॥
सुवर्ण तासामध्येच बाळा चीक देई कोवळा
रोगांचा प्रतिबंध कराया संजीवनी दे बाळा
घेऊनिया छातीवरती गे दावी स्तनमंडळा
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा ॥१॥
स्तन्यच केवळ षण्मासास्तव दुजा न काही काला
नको शर्करा नाही पाणी मध न चाटवी बाळा
पूरक अन्नासवे दूध तव दोन वर्ष दे बाळा
अमृत पाजी तव वक्षीचे कवचकुंडले बाळा॥२॥
निद्रेतूनही बाळासाठी रात्रंदिन तू जाग
बालसंवर्धन होईल त्याचे वक्षस्त्राव तव भोग
सर्व गुणांचा पवित्र दिव्य स्पर्श पसायाला
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा॥३॥
*डॉ. निशिकांत श्रोत्री*
या गीतातून एका आईने आपल्या नुकत्याच प्रसूत झालेल्या कन्येला दिलेला हा उपदेश असावा किंवा कोणाही अनुभवी स्त्रीने तिला दिलेला संदेशात्मक सल्ला असावा अथवा तिला स्तनपानाचं महत्त्व सांगणारा एखादी /एखादा स्त्रीरोगतज्ज्ञ ही असू शकतो पण या संपूर्ण गीतात *स्तनपान* हाच विषय केंद्रस्थानी आहे.
प्रसविलेस तू गोंडस बाळा जन्म सार्थ जाहला
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा॥ध्रु॥
“ मुली! आज तू तुझ्या गर्भातून एका सुंदर गोंडस गोजिरवाण्या बाळाला जन्म दिला आहेस. तू माता झाली आहेस आणि तुझ्या स्त्री जन्माचे या क्षणी सार्थक झाले आहे. तुझ्या शरीरात नैसर्गिक बदल झालेत. तुझ्या वक्षातून अमृतधारा पाझरायला लागल्यात. वात्सल्याचा पान्हा तुला फुटलाय. तुझ्या नवजात बालकाला छातीशी घे आणि त्याच्या इवल्या मुखात या दुग्धधारा पाज आणि लक्षात ठेव की तुझं हे स्तन्य म्हणजे जन्माला येणाऱ्या बालकांसाठी जणू काही कवचकुंडले आहेत.”
या ध्रुवपदातले *कवच-कुंडले* हे शब्द प्रतिकात्मक आहेत. जन्माला येणाऱ्या बाळाला रोगप्रतिबंधक शक्ती आईच्या दुधातून मिळते. आईचं दूध हे जीवनरक्षक असतं म्हणजेच एक प्रकारे सूर्यपुत्र कर्णाला जन्मत:च मिळालेल्या कवच कुंडलांसारखं सारखं. ते संरक्षक असतं.
सुवर्ण तासामध्येच बाळा चीक देई कोवळा
रोगांचा प्रतिबंध कराया संजीवनी दे बाळा
घेऊनिया छाती वरती गे दावी स्तनमंडळा
अमृत पाजी तव वक्षीचे कवचकुंडले बाळा ॥१॥
प्रसूत झालेल्या स्त्रीसाठी पहिले काही तास हा जणू काही सोनेरी काळ असतो. कारण त्यावेळी तिच्या स्तनमंडळातून वाहणारं दूध हे काहीसं घट्ट आणि पिवळसर चिकासारखं असतं. जे त्याच वेळी बाळाला देणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. कारण त्या दुधातूनच बाळाला रोगाचा प्रतिबंध करण्याची नैसर्गिक शक्ती मिळते. “म्हणून मुली! तू या सोनेरी काळाला दवडू नयेस. झटकन बाळाला पदराखाली घे आणि तुझ्या दोन्ही स्तनांतून पाझरणारं हे अमृततुल्य चिकासमान असलेलं सोनरंगी दूध त्याला पाजावेस जे त्याच्यासाठी अत्यंत पोषक आहे, संजीवनी समान आहे.”
या कडव्यातली *सुवर्णतासामध्ये* ही शब्दरचना खूप लक्षवेधी आहे. कवीने बाळ जन्मल्या नंतरच्या पहिल्या तासांना सुवर्णतास म्हणून त्या वेळच्या स्त्रीच्या स्तन्याचं महत्त्व अधोरेखित केले आहे. शिवाय हीच ती वेळ जी दवडता कामा नये कारण बाळाच्या संपूर्ण आयुष्यासाठी, निरामय आरोग्यासाठी ती महत्त्वाची आहे.
स्तन्यच केवळ षण्मासास्तव दुजा न काही काला
नको शर्करा नाही पाणी मध न चाटवी बाळा
पूरक अन्नासावे दूध तव दोन वर्ष दे बाळा
अमृत पाजी तव वक्षीचे कवचकुंडले बाळा॥२॥
बाळ जन्मल्यानंतर पहिले सहा महिने तर ते आईच्या दुधावरच वाढतं. त्याला दुसऱ्या कुठल्याच बाहेरच्या अन्नाची, आहाराची गरजच नसते कारण हे निसर्गनिर्मित वक्षामृत आहे. यात योग्य प्रमाणात साखर, पाणी, मधाची गुणवत्ता सारंच काही असतं आणि बाळाला ते पाजणं अत्यंत सुरक्षित असतं. सहा महिन्यानंतर मात्र बाळाला हलकं, नरम, काहीसं पातळ बाहेरचं अन्न द्यावं परंतु तरीही त्यासोबत स्तनपान करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. शक्यतो बाळ दोन वर्षाचं होईपर्यंत पूरक अन्नासोबत आईने अंगावरचं दुध पाजणं हे आवश्यक असतं. सर्व प्रकारची जीवनसत्वं या दुधामृतातूनच बाळाला नैसर्गिकरित्या मिळत असतात.
निद्रेतूनही बाळासाठी रात्रंदिन तू जाग
बलसंवर्धन होईल त्याचे वक्षस्त्राव तव भोग
सर्व गुणांचा पवित्र दिव्य स्पर्श पसायाला
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा॥३॥
“मुली! हे मातृत्व सोपं नसतं बरं कां?चोवीस तास तुला बाळाच्या संगोपनासाठी जागृत राहायचं आहे. बाळ झोपेतून जागं झालं त्या क्षणी तू निद्राधीन न होता पटकन जागी हो. उठ आणि त्याला पदराखाली घे. ते भुकेलं आहे आणि तुझ्या वक्षातून वाहणाऱ्या दुग्धधारांनीच त्याचं पोट भरणार आहे आणि पुन्हा ते आनंदे, शांतपणे झोपी जाणार आहे. बाळाचं शक्ती संवर्धन हे अशाच रितीने होत असतं. त्यामुळे तू रात्रंदिवस त्याच्यासाठी जागी रहा कारण त्याचे जीवन बलसमृद्ध करणारा ठेवा फक्त तुझ्यापाशी आहे. ते देण्याचाही परमानंद त्याच क्षणी तूही अनुभव. त्याचा उपभोग घे.स्तनमंडळं रिकामी करत बाळाचं पोट भरण्याचं स्वर्गीय सुख काय असतं याचा अनुभव घे.”
खरोखरच कुठल्याही स्त्रीला कुठेही केव्हाही बाळाला दूध पाजण्याची ना लज्जा वाटत ना कंटाळा येत. तो तिचा स्त्री धर्म, मातृधर्म असतो आणि तो पाळताना ती स्वतः आनंदाच्या डोही तरंगत असते.
या शेवटच्या कडव्यात कवीने आईच्या दुधाची जी महती सांगितली आहे आणि त्यासाठी जी शब्दयोजना केली आहे ती विलक्षण सुंदर आहे. कवी म्हणतात,” सर्व गुणांचा पवित्र दिव्य स्पर्श पसायाला” ही काव्यपंक्ती वाचताना मन कसं भरून जातं! त्रिभुवनातल्या दिव्य गुणांचा स्पर्श या स्त्रीच्या स्तनमंडळातून वाहणाऱ्या पसायाला म्हणजेच दुधाला आहे ही कल्पनाच किती सुंदर आहे! आणि अशा सुंदर कल्पनांचा उगम होण्यासाठी कवीचं मन आणि दृष्टीही सुंदरच असावी लागते आणि ती आहे याची जाणीव *कवचकुंडले बाळा* हे गीत वाचताना होते.
वास्तविक *मातेचे स्तन्य* हेच एक निसर्गनिर्मित सुंदर काव्य आहे. डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी या काव्यातला आत्मा ओळखून त्यास सुंदर शब्दात गुंफून एक महत्त्वाचा संदेश केवळ स्त्री जातीलाच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला दिलेला आहे.
हे वात्सल्य रसातलं गीत वाचताना माझ्या मनात सहज एक विचार डोकावला. थोडे विषयांतर असू शकेल पण तरीही मला थोडसं व्यक्त व्हावसं वाटत आहे.
आजूबाजूला वावरत असताना कित्येक वेळा रस्त्यावर वाढणारं निराश्रीत एखाद्या गरीब स्त्रीच्या मांडीवरचं मूलही किती सतेज आणि गोंडस भासतं! त्याचं एकमेव कारण म्हणजे ती गरीब बिचारी माता त्या बाळाला मोठं करण्याचं स्वप्न बाळगताना अतीव वात्सल्याने फक्त आपलं स्तन्य पाजत असते आणि पुढे जाऊन त्याच्यासमोर उभ्या संकटांना तोंड देण्यासाठी त्याला बलवान करत असते. जणू काही *जो चोच देतो तो चाराही देतो* हे या ठिकाणी सत्यात उतरलेले जाणवते. शिवाय असंही अनुभवण्यास येतं की इतरांपेक्षा ही मुलं भविष्यात अधिक कणखर बनतात कारण त्यांना आईच्या दूधाने घडवलेलं असतं.
थोडक्यात *कवच कुंडले बाळा* या गीताबद्दल मी म्हणेन की साधे शब्द, अलंकारांचा बोजवारा नाही, वेडी वाकडी वळणे नाहीत, कुठलाच अवघडपणा नाही, सरळ अर्थ सांगणारं असं एक सुंदर संदेशात्मक बोधप्रद गीत. एका कवी असलेल्या डॉक्टरने एक महत्त्वाचं जैविक शास्त्र तळमळीने आपल्या सुरेख काव्यातून मांडण्याचा केलेला हा प्रेमळ खटाटोप. एक उपयुक्त सल्ला आणि उपदेश. शास्र आणि काव्यभाव याचा सुरेख मेळ.
हे गीत वाचत असताना आणखी एक विचार मनात येतो की काव्याला विषयाचे बंधन नसते. अशा शास्त्रीय विषयावरही एखादं भावनिक, हळुवार, कोमल, भावस्पर्शी दिव्य काव्य निर्माण होऊ शकतं याचाच हे गीत म्हणजे वस्तुपाठ आहे असं म्हणायला हरकत नाही.
*राधिका भांडारकर*