कधी कधी वाटतं जेव्हा आपण स्त्री जीवनात क्रांती अथवा प्रगती झाली असं अभिमानाने म्हणत असतानाच स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ऐकल्या किंवा वाचनात आल्या की मनात येतं खरंच का काही बदललंय? समाजवृत्तीचा विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर म्हणावं तितकं होकारार्थी मिळत नाही. आजही स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तूच समजली जाते आणि याचे पुरावे स्त्रीवर होणाऱ्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या, विकृत मानसिकतेतून होणाऱ्या बळजबरीच्या घटनांतून मिळतात आणि मग असाहाय्य, भेदरलेली, चुरगळलेली, केवीलवाणी झालेली स्त्री मनावर आघात करते. *डॉक्टर निशिकांत श्रोत्री* यांनी त्यांच्या एका गीतात अशाच एका स्त्रीचं अतिशय विदारक आणि मनाची चिंध्या करणारं चित्र साकारलं आहे. कवितेचं शीर्षक आहे *बाबरलेली जखमी हरिणी*
*बावरलेली जखमी हरिणी*
बावरलेली जखमी हरिणी धावे सैरावैरा
छाया ही नच नाही मृगजळ कुठेही थारा॥ध्रु॥
हिंस्र लांडगे कराल दाढा वखवखल्या नजरा
पाठीवरती हात फिरविती जखमा करण्या खूपऱ्या
आर्त वेदना केविलवाण्या नजरांतून धारा
छाया ही नच नाही मृगजळ नसे कुठेही थारा॥१॥
धुक्यापरी ही धूसर झाली पावन सारी नाती
मोल न काही लेकीला ती केवळ पैशापोटी
विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा
छाया ही नच नाही मृगजळ नसे कुठेही थारा ॥२॥
*डॉ. निशिकांत श्रोत्री* (निशिगंध)
ही कविता वाचल्यावर क्षणभर मन सुन्न होतं. मनात अनेक प्रश्नही उभे राहतात. का प्रत्येक वेळी स्त्रीबाबत हेच घडतं? जिला जननी म्हणायचे ती केवळ भोगविलासिनीच का ठरते? तिच्या देहाची विटंबना करणाऱ्या या विकृत आडदांड पुरुषी मानसिकतेचे समूळ उच्चाटन का होऊ शकत नाही?
अशाच विकल मनस्थितीत कवी डॉक्टर श्रोत्री या गीताच्या ध्रुवपदात म्हणतात,
घाबरलेली जखमी हरिणी धावे सैरावैरा
छाया ही नच नाही मृगजळ असे कुठे थारा॥ध्रु।।
अत्याचारित स्त्रीला त्यांनी बावरलेल्या हरिणीची उपमा दिली आहे. प्रत्यक्ष भक्षकापासून संरक्षण मिळवण्यासाठी हरिणी जशी जंगलात सैरावैरा पळत असते तशीच स्थिती या बलात्कारित स्त्रीची झाली आहे. वेड्यासारखी, जीव घेऊन ती संरक्षणासाठी तिच्या देहाची शिकार करू पाहणाऱ्या पारध्यापासून सुसाट धावत आहे, आसरा शोधत आहे, सावली मिळावी म्हणून तडफडत आहे. पण अरेरे! ना तिला कुठली विश्वासाची छाया मिळते, ना आश्रय, ना आधार, ना संरक्षण! एखादी घायाळ हरिणीला आभासी पाणी, मृगजळ तरी दिसतं आणि त्या दिशेने तरी ती आशा बाळगून धावते पण या जखमी मानवी स्त्री देहाला तर हे भासमय मृगजळ सुद्धा दिसत नाही. तिच्याभोवती माजला आहे तो फक्त काळा, बरवटलेला, वासनारुपी चिखल.
हिंस्त्र लांडगे कराल दाढा वखवखल्या नजरा
पाठीवरती हात फिरविती जखमा करण्या खूपऱ्या
आर्त वेदना केविलवाण्या नजरांतून धारा
छाया ही नच नाही मृगजळ नसे कुठेही थारा ॥१॥
वासनरुपी भयाण जंगलात तिच्या भोवती आहेत लांडग्यासारखे हिंस्र पशु. त्यांच्या कराल दाढा आणि बुभुक्षित, कामवासनेने बरबटलेल्या नजरा. त्यांचे ओंगळ स्पर्श तिच्या देहावरती तीक्ष्ण जखमा करत आहेत. ती केविलवाणी होऊन करुणा भाकत आहे, दयेची याचना करत आहे. प्रचंड वेदनांच्या डोंगराखाली गाडली जात असताना तिचं हे असं आर्त किंचाळणं आणि करुण रुदन ऐकवत नाही. तिची फरपट पहावत नाही पण त्या क्षणी तिला आधार देणारं, तिचं रक्षण करणारं,तिथे कुणीही नाही. ती निराधार, निराश्रीत, निश्चेतन झाली आहे.
*कराल दाढा वखवखल्या नजरा* हे सारे शब्द उत्प्रेक्षात्मक आणि रूपकात्मक आहेत. स्त्रीच्या शरीरावर झडप काढणाऱ्या लिंगपिसाट पुरुषवृत्तीला *हिंस्र लांडगाच जणू” असे म्हटले आहे. त्याची नजरही जणू त्या लांडग्यासारखीच भक्ष्याभोवती जिभल्या चाटत आहे आणि तिच्या देहाचे निर्घुण लचके तोडणारा त्याचा जबडाही अगदी तसाच हिंस्र पशु सारखा आहे. कवीने अगदी वैफल्याने या विकृत पुरुषवृत्तीचा निषेध केला आहे.
धुक्यापरी ही धूसर झाली पावन सारी नाती
मोल न काही लेकीला ती केवळ पैशापोटी
विश्वासाचे धाम ही झाले काटेरी पिंजरा
छाया ही नच नाही मृगजळ नसे कुठे थारा॥२॥
नात्यांचे पावित्र्य तरी या समाजात राहिले आहे का? धुक्यासारखी, धूसर धुरकट, मळभ आलेली ही नाती आहेत. कोणाला बंधू म्हणायचं कुणाला पिता म्हणायचं? सारंच नावापुरतं उरलं आहे. या नात्यांच्या गर्भात आहे तो फक्त एक माजलेला अहंकारी पुरुष जो त्याच्या सहवासातल्या स्त्रीला फक्त एका कठपुतली समान मानतो. त्याच्या बळावर, त्याच्या इशाऱ्यावर थयथयणारी एक अबोल अबलाच! केवळ पैशासाठी एक बाप जेव्हा आपल्या कन्येचं स्त्रीत्व न जुमानता तिची विक्री करतो, अथवा तिनं मिळवलेल्या पैशावर अवलंबून राहून तिच्या भविष्याचा, बाप म्हणून कर्तव्य बुद्धीने विचार करत नाही तेव्हा त्याच्या या अधमकृत्याला काय म्हणावे? कुणावर कुठल्या शाश्वत नात्यावर मग तिने डोळे झाकूनन विश्वास ठेवावा? जेव्हा कुंपणच शेत खातं तेव्हा त्या स्थितीला नेमकं कस सामोरं जावं? जे घर ज्या चार भिंती म्हणजे तिचं विश्वासाचं, सुरक्षित असं स्थान असतं तेच जर असंख काटे असलेल्या पिंजर्या सारखे झाले तर त्या भेदरलेल्या, बाबरलेल्या, घायाळ, जखमी, रक्तरंजित नारीने कुणाकडे विश्वासाची, रक्षणाची अपेक्षा करावी? तिच्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती किती भयानक किती विदारक आहे!
*विश्वासाचे धाम ही झाले काटेरी पिंजरा* ही काव्यपंक्ती अंगावर काटा आणते, वेदना देते. जे घर आपुलकीचे, जे घर विश्वासाचे, भयमुक्त, निर्भय असायला हवे तेच कैदेसारखे भासत आहे. या काटेरी कैदेत बंदीवान झालेली नारी समाजाला जणू काही सांगू पाहत आहे. अंतस्थ ती अत्यंत तुटलेली आहे आणि तिचा आत्मा अक्षरशः तळतळत आहे.
*कवी डॉक्टर श्रोत्रींनी* *बावरलेली जखमी हरिणी* या गीतात या नारीची फक्त वेदना मांडली आहे. व्यथित, दु:खी होऊन अनुकंपेने तिचं हे केविलवाणेपण परिणामकारक रितीने शब्दांत उभं केलं आहे. सदयतेने कवी या नारीच्या दु:खाशी जोडले गेलेत.
हे गीत उपहासात्मक आहे समाजसुधारणेच्या नुसत्या गप्पा मारणाऱ्या आणि त्याच वेळी स्त्री देहाची राजरोस विटंबना करणाऱ्या, तिला भोग्य मानाणाऱ्या, गलिच्छ पुरुषवृत्तीच्या समाजावर बेमालूम, बेभानपणे शब्दांचे आसूड हातात घेऊन जोरदार फटके मारले आहेत. या संपूर्ण काव्यातला बीभत्स रस अत्यंत यातनादायी आहे. मन सुन्न करणारा आहे पण तरीही एक वास्तव या गीतात कवीने प्रभावीपणे उघडून दाखवलं आहे आणि वाचकाला हे वास्तव नाकारता येत नाही.
हे गीत वाचताना महाभारतातल्या द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचीही आठवण येते. खाली माना घालून बसलेला तो अपुरुषेय जमाव दिसतो आणि मग या गीतातली घायाळ हरिणी त्या द्रौपदीच्या प्रातिनिधीक स्वरुपात दिसू लागते आणि आजही समाज खाली मान घालूनच बसलाय हे जाणवतं.
*राधिका भांडारकर*