आईचे आपल्या जीवनातले स्थान, तिचे असणे नसणे याविषयीच्या अनेक आठवणी कवितांतून व्यक्त झाल्या आहेत. खरं म्हणजे आई हा विषयच अंतःकरणाला भिडणारा, मायेचा, ममतेचा, जिवाभावाचा, हृदयाच्या अगदी जवळचा असा आहे. असा कवीच नसेल की ज्याने त्याच्या काव्यप्रवासात आईवर कविता लिहिली नसेल.
“आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही”
“ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
“आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर”
“ माय असते दुधावरची साय”
“आई म्हणजे त्याग मूर्ती”
अशा आई विषयीच्या अत्यंत हळुवार भावना कित्येक शतकांपासून कवीने आपल्या काव्यातून व्यक्त केलेल्या आहेत. अशाच कोमल हृदयस्थ भावना व्यक्त करणारी *डॉ. निशिकांत श्रोत्री* यांची *आई* ही कविता वाचताना अलगद मनात उतरली आणि या कवितेविषयी लिहावसं वाटलं.
*आई*
शीतल मोहक चांदण्यामध्ये चल ना आई जाऊ
घोस खुडूनिया नक्षत्रांचे जीवनास नटवू ||धृ||
शिशुपणी मजला अपुल्या संगे उद्यानाअंतरी
थकली तरीही घेई उचलुनी मजला कडेवरी
कुठे पांग फेडू गे तव मी तुझाच तर सानुला
तव स्वप्नांच्या पूर्तीचा मी वसा मनी धरला ||१||
बालपणीची शुभंकरोति निरांजनीची वात
भीमरूपी अन रक्षण करण्या रामरक्षेचे स्तोत्र
स्वाध्यायी उत्कर्ष घडावा ध्यास कसा विसरू
ध्येय तुझे हे साध्य जाहले दुजा कुणा ना वाहू ||२||
वियोग कधि ना तुझा घडावा मनात एकच आंस
सुखशय्येवर तुला पहाणे हाच लागला ध्यास
सारे काही अवगत झाले तुझीच गे
पुण्याई
दंभ नको ना अहंकार या संस्कारा तू देई ||३||
*डॉ. निशिकान्त श्रोत्री*
मन जेव्हा अतिशय हळवं होतं तेव्हाच अशा प्रकारचे शब्द अंतरात उमटतात. या कवितेत आई विषयीच्या आठवणींचा उमाळा उसळलेला दिसतो आणि जेव्हा जेव्हा आईची आठवण येते तेव्हा तेव्हा कुठलीही व्यक्ती स्वाभाविकपणे बालपणात हरवते. आईसाठी मूल कधीच मोठं होत नाही. ते जरी वयानं वाढलं तरी आईचं ते बाळच असतं आणि वाढत्या वयात झालेली आईची आठवण त्यालाही पुन्हा बाल्यावस्थेत घेऊन जाते. आईच बोट धरून केलेल्या जीवनाच्या सुरुवातीत ती घेऊन जाते. पुन्हा एकदा हे सार अनुभवावं याचीही मग ओढ मनाला लागते.
ध्रुवपदात डॉ. श्रोत्री म्हणतात,
शीतल मोहक चांदण्यांमध्ये चल ना आई जाऊ
घोस खुडूनिया नक्षत्रांचे वात्सल्या नटवू ।ध्रु।
लहानपणी आई झोपताना अंगाई गाते, गोष्टी सांगते, परिकथांच्या त्या विश्वातून मुलाला चंद्र चांदण्यांच्या नगरीत फिरवून आणते. कल्पनेच्या आकाशात विहरत असताना नक्षत्रांचे झुबके तोडत त्या बालमुठीत ठेवते, बाळ आनंदाने हसतं, नाचतं, बागडतं आणि अशी ही चांदण्यातील आई बरोबर केलेली अद्भुत सफर आयुष्यभर लक्षात राहते.
ध्रुवपदाच्या या दोन ओळीत कवीचं हळवं झालेलं, आठवणींच्या लाटांवर तरंगणारं कोमल मन जाणवतं, हे सारं पुन्हा एकदा घडावं म्हणून मन आर्त होतं. त्या ममतेची, त्या वात्सल्याची कशासही तोड नाही याची जाणीव होते आणि सहज उद्गार निघतात,
“ चल ना आई घोस खुडुनिया नक्षत्रांचे वात्सल्या नटवू”
या ओळीतले *चांदण्या* *नक्षत्रांचे घोस* हे शब्द रूपकात्मक आहेत. बालपणीचा आनंद ,रम्यपणा अधोरेखित करणारे आहेत आणि त्यातून झिरपणाऱ्या मातेच्या वात्सल्याची आठवण करून देणारे आहेत.
रामाने कौसल्येकडे आकाशीचा चंद्र आणून देण्याचा हट्ट केला होता— हा बालहट्ट सर्व परिचित आहे आणि तो जनमानसात रुतून राहण्याचे एकच कारण म्हणजे मातेची माया, ममता, वात्सल्य आणि याचा प्रत्येकाने बालपणी घेतलेला अनुभव.
शिशुपाणी मजला आपुल्या संगे उद्याना अंतरी
थकली तरीही घेई उचलूनी मजला कडेवरी
कुठे पांग फेडू गे तव, मी तुझाच तर सानुला
तव स्वप्नांच्या पूर्तीचा मी वसा मनी धरला १
अत्यंत भावोत्कट आणि मनाला
बिलगणाऱ्या अशा या ओळी आहेत डॉ. श्रोत्रींच्या या ओळी वाचकांच्याही मनातला आईच्या आठवणींचा झरा पुन्हा एकदा उसळवतात. हा मनीचा संवाद केवळ कवीपुरता राहत नाही तर तो कविता वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनाचा होतो.
दिवसभर या ना त्या कामात सतत व्यस्त असलेली, थकलेली, आई आपल्या मुलासाठी मात्र कधीच शिणलेली नसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. लहानपणी ती त्याला रमवण्यासाठी बागेत घेऊन जाते. मूल चालून थकलं की” कडेवर घे” असा हट्ट करतं, कधी कधी तर विनाकारण अंगाला बिलगतं, त्रास देतं रडतं, हट्ट करतं आणि आई मात्र स्वतःचा शीण विसरून त्याला शांत करण्यासाठी उचलून छातीशी कवटाळते. आई आपल्या मुलाला कधीही धुडकावत नाही. बालपणी हे जाणवलेलंच नसतं. आईचं मुलासाठी काहीही करणं हे जणू गृहीत धरलेलं असतं. , याची जाणीव मोठेपणी होते आणि मग वाटतं या माझ्या मातेचे ऋण मी कसे फेडू? स्वप्नपूर्तीसाठी आईपासून दूर नक्कीच गेलो पण आपल्या विषयीचं हे स्वप्न आपल्या आईनेच पाहिलेलं होतं ना? प्रत्येक आईला हेच वाटतं ना की आपलं बाळ पुढील आयुष्यात यशवंत, कीर्तीवंत, धनवंत, गुणवंत व्हावं?
या चरणामध्ये कुठेतरी कवी स्वतःच आईपासून का दुरावलो याचे समर्थन देत असावा असे वाटते. म्हणून त्याच्या मनात हे विचार येतात.
“ तुझ्याच स्वप्नांचा मी ध्यास बाळगला पण आई! मी जगासाठी मोठा झालो असेन पण तुझ्यासाठी मात्र लहानच आहे, तुझा सानुलाच आहे.”
या चरणातला *सानुला* हा शब्द मला फारच आवडला, काळजात जाऊन बसला. सानुला या तीन अक्षरी शब्दात साऱ्या विश्वाच्या बालपणाचे माधुर्य साठलेले आहे.
बालपणीची शुभंकरोति निरांजनीची वात
भीमरूपी अन रक्षण करण्या रामरक्षा साथ
स्वाध्यायी उत्कर्ष घडावा ध्यास कसा विसरू
ध्येय तुझे हे साध्य जाहले दुजा कुणा ना वाहू २
आई म्हणजे प्रेरणा पण आई-वडिलांना विसरत चाललेल्या पिढीच्या या जमान्यात या चरणातल्या ओळी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. संस्काराची एक पौष्टिक शिदोरी आईने जगण्याच्या प्रवासात बांधून दिलेली असते. हे संस्कार कसे होतात? कुठून येतात? संस्काराची माध्यमं कुठली?
“ बालपणी निरांजनाची वात पेटवून त्या मंद शांत सात्विक प्रकाशाला हात जोडून म्हटलेलं शुभंकरोति कल्याणम्, हनुमान स्तोत्र, रामरक्षा स्तोत्रपठण यातून खूप ऊर्जा मिळाली. खरं म्हणजे त्यावेळी त्याचा अर्थही कळत नसेल पण आईने लावलेल्या सवयीतून नियमित झालेल्या या पठणाने अंतरातले ऊर्जेचे दिवे नक्कीच पेटवले आणि ते आयुष्यभर तेवतही राहिले. जीवनात नीतिच्या,
सद्विचारांच्या, सदाचाराच्या मार्गावर स्थिर राहण्यास यांची खूप मदत झाली हे निःसंशय! सतत माझा उत्कर्ष व्हावा हा तुझा ध्यास होता आई— आणि मला खात्री आहे तुझा ध्यास, तुझे स्वप्न मी नक्कीच पूर्ण केलेले आहे. त्याचा मलाही सार्थ अभिमान आहे आणि आज मला जो काही नावलौकिक प्राप्त झाला आहे त्याचे श्रेय मी तुझ्याशिवाय कुणाला देऊ? माझं सर्व काही साध्य मी तुझ्याच चरणी अर्पण करतो,.”
आईच्या संस्कारातून मिळालेली ही लीनता, हा कृतज्ञता भाव या ओळी समर्थपणे दर्शवतात.
*स्वाध्यायी उत्कर्ष घडावा* ही ओळ अतिशय अर्थपूर्ण आहे आणि या ओळीची योजकता कवीने फार सुंदररित्या साधलेली आहे. स्वाध्याय याचा अर्थ स्व अध्ययन. स्वतः केलेला अभ्यास म्हणजेच सेल्फ स्टडी. मनुष्य जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत तो आई-वडिलांचं, इतर बुजुर्गांच बोट धरून चालत असतो, तो एका सुरक्षित कवचात असतो. प्रत्येक पायरीवर त्याला सावध करणारी सांभाळणारी माणसं अवतीभवती असतात पण एके दिवशी तो मोठा होतो. पंख फुटलेल्या पक्षाप्रमाणे घरट्यातून झेप घेतो आणि मग त्याच्यासाठी उरतं ते अथांग आकाश आणि स्वतःच्या पंखातलं बळ. माणसाचंही असंच असतं. वाडवडिलांचे हात सुटतात, जगाच्या अवाढव्य पसार्यात तो ढकलला जातो आणि तेव्हा त्याला त्याच्याजवळ असलेल्या सुसंस्काराच्या भांडवलाची जाणीव होते आणि त्या आधारावर तो स्थिरपणे नेटाने बुद्धीच्छल न होता स्वतःचा उत्कर्ष बिंदू गाठतो आणि हेच प्रत्येक आईचं स्वप्न असतं आपल्या मुलासाठी.
या कडव्यात डॉ. श्रोत्रींनी याचा जाणीवपूर्वक आणि कृतज्ञता भावाने केलेला उल्लेख म्हणजे एक सुरेख संदेशही आहे.
वियोग कधी ना तुझा घडावा मनात एकच आस
सुखशय्येवर तुला पाहणे हाच लागला ध्यास
सारे काही अवगत झाले तुझी गे पुण्याई
दंभ नको ना अहंकार या संस्कारांना देई ।३।
हा चरण वाचताना मला मोरोपंतांच्या केकावलीची प्रकर्षाने आठवण झाली.
*वियोग घडता रडो मन भवच्चरित्री जडो*
इथे ईश्वराप्रती केलेलं हे चिंतन आहे की माझं मन ईश्वरापासून कधीही दूर न जावो, सदैव तिथेच जडलेलं राहो. याचा संदर्भ अशाकरिता की आई हे सुद्धा दैवत आहे. आई ईश्वराचा अंश आहे म्हणून तिची आठवण सतत जागृत ठेवणं म्हणजे ईश्वराला न विसरणं.
गणेशाने आईला प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वीप्रदक्षिणेचे मोल पदरी पाडून घेतलं हे सर्वज्ञात आहे. हाच अर्थ मनात ठेवून कवी या चरणात म्हणत आहे,
“ माझ्या मनी एकच आस आहे आई, की तुझा वियोग मला कधीही न घडो.”
इथे वियोग याचा अर्थ दुरावा, विरह इतकाच नसून विसर असाही आहे.
“आयुष्यभर आई! तू माझ्यासाठी खस्ता खाल्ल्यास, कष्ट केलेस, मला मोठं केलंस, माझ्यावर संस्कार केलेस, दमलीस, शीणलीस पण माझ्यासाठी तुझी ऊर्जा कधीही कमी झाली नाही. माझ्या जडणघडणीसाठी तू सदा तत्पर राहिलीस. आता मात्र माझंही एकच स्वप्न आहे, एकच ध्यास आहे— तुला सुखात ठेवण्याचं! तुझा हा वृद्धत्वाचा काळ पूर्णपणे विश्रांतीचा, आनंदाचा ठरावा. परिपूर्ण जीवन जगल्याचा, जीवन सार्थकी लागल्याचा आनंद तुला मिळावा.”
इथे *सुखशय्येवर तुला पाहणे* यात मला काहीसा श्र्लेषही जाणवतो. सुखाचे, विश्रांतीचे दिवस तुला लाभोत असे म्हणताना एकीकडे कवीला असेही वाटत असेल की आईचा अंतिम क्षण हा सुखाचा, शांततेचा असावा. कुठलेही वेदनादायी भोग तिच्या वाट्याला न येवोत आणि त्यासाठी माझ्या हातून तिची सेवा घडावी!
आईच्या बाबतीत असं म्हटलं जातं स्त्री ही क्षणाची पत्नी असते आणि अनंत कालची माता असते म्हणूनच आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जगत असते. काया—वाचा— मनाने झटत असते. पुढे मुलगा मोठा होतो आणि आईसाठी झटण्याची त्याची वेळ येते ही जाणीव कवीने या काव्यरचनेतून उत्कृष्टपणे मांडलेली आहे. पुन्हा पुन्हा कवी आई विषयी म्हणतात,
“ आज जो काही मी आहे ही सारी तुझी पुण्याई आहे. तुझ्यामुळे मी इथे आहे हे मला ठाऊक आहे, समजत आहे आणि याची मला जाणीवही आहे. तूच तर मला संस्कार दिलेस.’ कितीही यश मिळाले तरी तुझे पाय जमिनीवर राहोत, यशाचा गर्व नको, अहंकाराचा दर्प नको, दंभ —ढोंगीपणा तुझ्या मनालाही शिवू नये’ ही शिकवण मला दिलीस आणि याच तुझ्या संस्कारांमुळे माझी बुद्धी स्थिर आहे, विचलित नाही.”
डॉ. श्रोत्रींनी *आई* या गीतातून अत्यंत नम्रपणे, आदराने आणि कृतज्ञता भावनेने आपल्या मातेला वाहिलेली ही शब्द सुमनांजली आहे. हे गीत वाचल्यावर माझ्या मनात आले की ही कवीची आदरांजली प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. मातृप्रेमाच्या आठवणीने उद्गम होणारे हे सर्वांच्या अंतरातले बोल आहेत. आईच्या ममतेची, मातृत्वाची महती सांगणारे आणि त्याचवेळी *फिटेना जन्मदेचे ऋण* हा विचार देणारे हे एक सर्वांग सुंदर काव्य आहे. यात केवळ आणि केवळ वात्सल्य रस आहे. वात्सल्यातून निर्माण होणारा भक्तिरस आहे. ही एक संस्कारक्षम मनातून उमटलेली भावपूर्ण प्रांजळ प्रार्थना आहे. एक मनापासून घातलेला दंडवत आहे. *आई थोर तुझे उपकार* या शब्दफुलांची मातेच्या चरणी अर्पण केलेली एक ओंजळ आहे…
राधिका भांडारकर