• 10 January 2025

    काळ

    कारण काळ बदलला आहे

    0 14

    कारण काळ बदलला आहे


    शिक्षण...... शिक्षणानं व्यक्ती अति पुढे जात असतो. त्याचा दर्जा वाढतो. समाजात तेवढीच इज्जतही वाढते व मान प्रतिष्ठा सर्वकाही.

    शिक्षण शिकविण्यासाठी गरज पडते शिक्षकांची. शिक्षकच हे विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. त्यांचं जीवन घडवीत असतात. ज्या शिक्षणाच्या भरवशावर व्यक्तीचे विचार प्रगल्भ होत असतात.

    शिक्षक ज्ञान देत असतात. बदल्यात मोबदला घेत असतात. परंतु त्यातही काही शिक्षक हे शिकवीत असतात, तर काही शिक्षक हे शिकवीतच नाहीत.

    शिक्षणातही आज भेदभाव निर्माण होत आहे. काही शिक्षकांना भरपूर वेतन मिळतं. तर काही शिक्षकांना शिकविण्याचं वेतनच मिळत नाही. ज्या शिक्षकांना भरपूर वेतन मिळत असतं. ते शिक्षक ज्या शाळेत शिकवतात. त्या शाळेत विद्यार्थी पटसंख्या कमी असते आणि काही शिक्षक जे कॉन्व्हेंटला शिकवतात. त्या शिक्षकांना पुरेसं वेतनच नसतं. शिवाय पवित्र पोर्टल अंतर्गत सुरुवातीला परीविक्षा कालावधीत असणाऱ्या शिक्षकांना मिळणारं वेतन कमी असतं.

    काल शिक्षणाची व्यवस्था एका आश्रमात असायची. तो आश्रम की ज्या आश्रमात एक कच्चे घर असायचे नव्हे तर काट्याकुट्यानं बनवलेलं वा कुडानं बनवलेलं झोपडं असायचं. ज्यात चारही बाजूनं हवा यायची. सतत जंगली श्वापदाची भीती असायची. ती श्वापदं जंगलातून यायचे व त्या विद्यार्थ्यांवर हमलाही करायचे. त्यातच साप, विंचूसारखे प्राणी वेगळेच. अशा भययुक्त वातावरणात विद्यार्थ्यांची शाळा असायची. त्यातच काही विद्यार्थी पहारा देण्याचेही काम करायचे. शिकणे शिकविणे ही क्रिया एकजुटीनं व मिळून मिसळून घडायची. भेदभाव नसायचा आपापसात, ना ही वर्गातील कोणत्याच विद्यार्थ्यांची एकमेकांविरुद्ध कुरकूर असायची.

    तो काळ व त्यांना शिकविणारा तो गुरु. तो गुरु फक्त विद्यार्थ्यांना आपलं संरक्षण कसं करायचं, तेवढंच शिकवायचा. मात्र तो त्यांचं रक्षण करीत नसे. तर त्या विद्यार्थ्यांसमोर संकटच उत्पन्न करायचा. ज्यातून विद्यार्थी घडायचे. शिवाय विद्यार्थीच आपल्या गुरुचं त्या जंगली प्राण्यांपासून रक्षण करायचे. त्यांना अशा प्राण्यांची भीती वाटलीच वा एखादा प्राणी आश्रमाजवळ आढळलाच तर तेच शिष्य त्या प्राण्यांना हुसकावून लावायचे.

    हळूहळू काळ बदलला. त्या बदलत्या काळानुसार अनेक बदलाव शिक्षणात झाले. आश्रमाची जागा जावून इमारत आली. विद्यार्थ्यांना पुर्ण शरीर झाकेल असा पोशाख आला. तसं पाहिल्यास पुर्वीच्या काळात विद्यार्थी हे शरीर थोडेसे नागडे ठेवूनच संन्यासी वृत्तीनं शिक्षण घ्यायचे. ते सर्वप्रथम आपलं शरीर बनवायचे. आज तसं नाही. तशीच आज बैठक व्यवस्थाही बदलली. आज विद्यार्थ्यांना बसायला बाक आला, जो काल नव्हता. आज शिक्षणाची व्यवस्था सध्या एका पक्क्या इमारतीत झाली आहे. ज्या इमारतीला रंग मारावा लागतो. कशासाठी? तर इमारत चांगली असेल तर विद्यार्थी येईल या भावनेनं. शाळा चालावी या भावनेनं. शिक्षणात जणू स्पर्धा निर्माण झाली आहे. कारण आज दिखाव्याचं जग आहे. आज शिक्षणाला पाहिजे त्या प्रमाणात वाव नाही. जेवढा भपकेबाजपणा, तेवढं शिक्षण. असं आजचं शिक्षणाचं गणित आहे. कारण शाळेचा दर्जाच अशा भपकेबाजपणावर अवलंबून आहे.

    आज काळ बदलला आहे. तसा समाजही बदलला आहे व बदलत्या समाजानुसार शिक्षणाची व्याख्याही बदलली आहे. त्यानुसार असं वाटतं की आज खरं शिक्षण शाळेतून मिळतच नाही. जे काल परीसरातून मिळत होतं.

    काही शिक्षक ज्या शाळेत शिकवतात. त्या शाळेत विद्यार्थी पटसंख्या कमी असते आणि काही शिक्षक जे कॉन्व्हेंटला शिकवतात. त्या शिक्षकांना पुरेसं वेतनच नसतं. तसंच अलिकडेच आलेलं पवित्र पोर्टल. या काळातही शिकवीत असतांना मिळणारं वेतन हे अत्यल्पच असतं. असं वाटत असतं की तेही शिक्षक आणि हेही शिक्षकच. मग असला भेदभाव का?

    खरं शिक्षण हे शिक्षणाचा भेदभावच करीत असतं. पुर्वीही असाच भेदभाव होत होता व तो आजही आहे. पुर्वी अस्तित्वात असलेला एकलव्य. तो एक विद्यार्थी होता व त्याला शिक्षण शिकायची आवड असल्यानं तो शिक्षण शिकण्यासाठी आपल्या गुरुकडे गेला. परंतु गुरुनं त्याला शिकवलं नाही. कारण होतं शिक्षणात असलेला भेदभाव. शिक्षणाची संधी ही शुद्र वर्गासाठी नव्हतीच. ती क्षत्रीय वर्गासाठी व ब्राह्मण वर्गासाठी होती. शिक्षणात शिक्षकामधील भेदभाव दिसतो. तोही वेतनावरुन. एका घटकाला तो तेवढेच शिक्षण शिकवीत असूनही त्याला तुटपुंजे पैसे मिळतात. शिकवायचं वेतन एकच असायला हवे शिक्षकांना. मग तो माध्यमिक, महाविद्यालयीन वा प्राथमिक विभागातील का असेना, शिकवायला कसब वेगवेगळं लागत नाही. मेहनतही वेगवेगळी लागत नाही. परंतु भेदभाव बराच दिसतो. वेतनाच्या बाबतीत तर निश्चीतच दिसतो, जो काल दिसत होता. कालही काही गुरुंना वेतन नव्हतंच. हा भेदभावच होता वेतनातील शिक्षकांच्या बाबतीत होत असलेला. आता शिकविण्यातील विद्यार्थ्यांच्या बाबतीतील भेदभाव. काल एकलव्य सारख्या एका विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाची इच्छा होती. त्याला राजवाड्यातील मुलांना जे शिक्षण मिळतं, ते शिकायचं होतं. परंतु ते शिकायला मिळालं नाही. शिवाय व्यतिरीक्त त्याचा अंगठाही घेण्याची कृती घडली. आजही तेच घडत आहे. आजही शिक्षणात भेदभावच केला जात आहेत. आजच्या शिक्षणातील भेदभाव कोणता? असा विचार केल्यास आज शिक्षणात गरीब विद्यार्थ्यांना कॉन्व्हेटचं शिक्षण मिळत नाही. शिवाय उच्च शिक्षण घेतो म्हटल्यास तेही घेता येत नाही. एखाद्या गरीब विद्यार्थ्यानं डॉक्टर, इंजीनियर बनतो म्हटलं तर ते बनता येत नाही. कारण त्याला पैसा लागतो. तो पैसा गरीबांजवळ राहात नाही. हा शिक्षणातील भेदभावच नाही का? हा भेदभावच आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत असलेला. विशेष म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी यातही भेदभाव होवू नये. आज एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना जर डॉक्टर, इंजीनियर बनायचं असेल वा एखाद्याला एकलव्यासारखी शिकायची आवड असेल तर ती आवड पैसे नसल्यानं मोडावी लागते. शिक्षणातून मोठं होण्याची इच्छा असेल, तरीही त्याला पुर्ण करता न येणे. हा एक भेदभावच कालपासून तर आजपर्यंत सुरु आहे व तो सुरुच राहणार की काय? असं वाटत आहे. शिवाय काल असलेला जातीतील भेदभाव आजही उघडपणे दिसत आहे. आज शाळेत जाणाऱ्या लहान मुलाला, ज्यावेळेस जात म्हणजे काय? हे समजत नाही. त्याचकाळात जात चिकटवून देवून पुढे जात माहीत झाल्यावर विद्यार्थ्यांच्या समजसुचकतेत जो बदल होतो. जो बदल एका श्वानाच्या तोंडात बाण मारून व त्याचा भुंकण्याचा आवाज बंद करुन एकलव्यानं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं. हे अर्जुन व द्रोणाचार्यला माहीत होताच अर्जुनात व द्रोणाचार्यात जो बदल झाला, त्यासारखाच असतो.

    महत्वपुर्ण बाब ही की आज आपण काळ बदलला म्हणतो. समाज सुधारला म्हणतो. काळानं पाश्चिमात्य विचारसरणीचा अवलंब केला म्हणतो. परंतु खरं, सांगायचं झाल्यास खरी सुधारणा झालेली दिसते का? लोकं आजही शिकत असले. शिकले सवरले असले तरी कालच्या अंधश्रद्धेचा बुरखा वापरलेल्या लोकांच्या मनातून जुन्या अंधश्रद्धा जात नाहीत. भेदभावही जात नाही. मग तो जातीतील भेदभाव असो वा शिक्षणातील भेदभाव असो. माणसानं जी जात नाही तिला जात ठरवलं असून आज विद्यार्थ्यांच्या मनावरही जातच बिंबवली जात आहे. जरी समाज सुधरला आहे असं आपण मानत असलो तरी. तसंच शिक्षण हे गरीबांसाठी नाहीच. तुम्ही हमालच बना. असं आजचं शिक्षण हे गरीबांना खुणावतही आहे.

    विशेष म्हणजे आज जिथं आपण समाज सुधरला असे म्हणतो. तिथं जातीप्रथा व शिक्षणातील होत असलेला भेदभाव तरी दूर व्हायलाच हवा. निदान शिक्षणात तरी भेदभाव होवू नये. शिक्षण सर्वांनाच निःशुल्क व्हावं. त्यातच उच्च शिक्षणही. मग तो व्यक्ती गरीब असो की श्रीमंत. एखाद्या गरीब मुलांची जर इच्छा असेल, डॉक्टर, इंजीनियर बनायची तर त्याला ते बनता यावं. तशाच लोकांनी अंधश्रद्धा सोडाव्यात व तेवढ्याच जातीप्रथा आणि जातही. कारण काळ बदलला आहे आणि बदलत्या काळात सर्वच अनैतिक गोष्टी बदलायला हव्यात हे तेवढंच खरं. नाहीतर देश कितीतरी मागं जाईल. देश घडणार नाही व शिक्षणासाठी आणखी एक मोठी क्रांती घडवावी लागेल यात शंका नाही.


    अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०



    अंकुश रामचंद्र शिंगाडे


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!