• 12 January 2025

    मी बदक झाले

    मी बदक झाले

    0 8

    मी बदक झाले :शुभांगी पासेबंद

    'माझं बदक' हे संबोधन मी लाडाने कौतुकाने माझ्या लाडक्या लेकाला म्हणायचे. परतव्यात तो हसे आणि नवल म्हणजे तो लाडू सुद्धा,पुढे मला बदकच म्हणायचा. आमच्या ऑफिसमध्ये, एक जाड बाई,अशी पाय तिरपे करून खूपच हळू मंद गतीने चालायची, तिला ऑफिस मध्ये बदक म्हणायचे . त्यामुळे तो बदक शब्द त्या बाळाच्या कानावर बऱ्याच वेळा पडला होता. शाळेत असताना,

    एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,

    होते तयार वेडे पिल्लू कुरूप एक!

    अशी कविता पण त्या अपत्यानी ऐकली होती.शाळा सुटली की ते माझं लेकरू, न पेलणारा दप्तराचे वजन घेऊन,तुफान पळत येत असताना, बदकाऐवजी, बहिरी ससाणा वाटे.मी हळूहळू हातात पिशव्या घेऊन, जेव्हा त्याच्या शाळेच्या समोर रस्ता क्रॉस करताना दिसली, की ते बदक पळत येऊन, त्याच्या मळक्या कुळक्या हातांनी चिकटायचं. म्हणायचं, "माझं बदक, माझी आई,माझं बदकू,पाय वाकडे टाकत टाकत आले."

    त्याच्या लहानपणी एवढी काय आधुनिक खेळणी नव्हती. एक निळं प्लास्टिकचे,पंख असलेले,असं एक फूट उंचीचे, बदक मिळायचं. त्या बदकाला पुढे जाण्यासाठी ओढायला, पोटासमोर पुढे हुकला दोरी बांधलेली असायची.ते क्वक्ट क्वक करायचं नाही, पण विचित्र विचित्र आवाज काढायच. माझा लेक आणि त्याचे मित्र,त्याना बदकाला घेऊन बाळलीला करत घरभर फिरायला आवडे..मुलांबरोबर आम्ही आई वडील देखील, माझ्या लेका बरोबर,त्या खेळण्यांबरोबर खेळत असायचो .

    अपत्याच्या खेळण्यांसाठी,एक मोठा निळा प्लास्टिकचा ड्रम आणला होता आणि त्याच्यात सगळी खेळणी आम्ही भरून ठेवत असू. रोज खेळणी ओतून तो त्याच्यातून कशाशी तरी खेळात वेळ घालवायचा. कसतरी आई ऑफिस मधून येईपर्यंत बदक मन रमवायचे,ते लेकरू खेळायचं. परत खेळणी भरायचं काम मात्र मला लागलेल असायचं.

    माझं पोरग वाढत गेलं. हळूहळू वयात आलं. छोटा वैज्ञानिक झालं.हळूहळू बुद्धिमान झालं. एकदा तो शालेय सहलीला नाणेघाटात गेला होता. इतकं चालायची सवय नाही. पाऊस होता. परत आला तेव्हा पाय सुजले होते ,सोलवटले होते. त्याच्या शालेय बसपाशी त्याला घ्यायला गेले ना, तेव्हा मला मिठी मारली आणि म्हणाला, " आई मी आज बदक झालोय ."

    बाकीचे सगळे बदका मधून, यांनी राजहंस बनाव इतकी त्याच्यात कॅपॅसिटी होती.त्याला आम्ही थोडं पुढे मागे ढकलल सुद्धा. बाकीच्या डबक्यातल्या,तलावातल्या पोहणाऱ्या, बदका पेक्षा तो माझ्या मते वेगळा झाला.तो राजहंस झाला , असं मी मानते.पण कविकल्पनेने तसे म्हणता येणार नाही. कारण माझ्या लेखी तरी अजून माझं ते लाडक बदकच आहे.

    असं म्हणतात खार, खारुताई,जी धनधान्याच कण आणि फळ, बिया कपारी मध्ये दडवून ठेवते,त्यामुळे पर्यावरणाला मदत होते.अनेक झाडांची बियाणे सुरक्षित राहतात. पाऊस पडल्यावर या बियांमधून झाड उगवतात.तसंच माझ्या या बदकाची आठवणीमुळे माझ्या मनातल्या आतला कलाकार,कायम जिवंत राहिला. खरंतर माझ्या लिखाणाचं श्रेय या बदकाला द्यायला हवं.

    रस्ता क्रॉस करण्यासाठी कोणी मदत मागत असेल ना,तर माझं हे बदक सगळ्यात आधी जायचं. 'समबडिज मदर /फादर वाँट्स हेल्प असं म्हणायचं.'.

    आता तो दूर गावी नोकरीला गेला. रस्ते बदलले वाटा बदलल्या. एकमेकांच्या आयुष्यातली गुंतवणूक कमी कमी होत गेली.

    मी माझ रड गाणं,माझं हे दुखतं ते दुखत, हे माझ्या बदकाला सतत सांगत राहिले.कोरोना झाला म्हणुन रडले. नंतर समजलं की त्याचवेळी त्याला देखील कोरोना झाला होता.त्या बदकाचे पण काहीतरी दुखत असेल,त्याला पण काही प्रश्न असतील,हे मी तिला / त्याला विचारलंच नाही. संथ पाण्याच्या लहरीवर तरंगणारे बदक फक्त चित्रातच असतात प्रत्यक्षात बदकांना पण तर, काही कारणाने झुंडीने वावरायला हवं असतं. पाण्यातल्या शेवाळ्याचा,तरंगांचा, शिकाऱ्यांचा,अन्य काही गोष्टींचा त्रास बदकांना होत असतो. एका वयानंतर तर सगळेच बदक सारखेच दिसायला लागतात. राजहंस वगैरे फक्त कवितेतच उरतात.

    अरे घरोट्या घरोट्या, माझे दुखले रे हात,

    तरी या संसाराचं गाणं मी बसले गात!

    आज त्या बदकाच्या मदरला, मला काही कामांसाठी हेल्प हवी आहे, जो 'संबडीज मदर निड्स हेल्प 'म्हणून नैसर्गिक प्रतिक्रिया या रूपाने इतरांना मदत करत असे.पण हल्ली काळ बदलल्यामुळे,रस्ता क्रॉस करायला, इतरांना लोक मदत करायला घाबरतात. माझं वय वाढलं आहे . आजार वाढले आहेत. माणसं बदलली आहेत . आता देखील हातात काही वजन दार असत.पिशव्यामधील सामान जास्त नसलं ना तरी धड भरभर, चालता येत नाही.पडायची,चक्कर यायची भीती वाटते.धडपडत चालताना वाहन अंगावर येण्याची भीती वाटते.चालताना आधारासाठी काठी हातात घ्यायची तर हातातून काठी वस्तू काळ धैर्य सर्व निसटून जात.

    कधी काठी घेतली तर लोक हसतील, म्हणुन काठी घ्यायची लाज वाटते.नोबडी अंडरस्टॅण्ड्स!

    आता मी खरंच बदकासारखे चालायला लागले आहे. मी बदक झाले आहे.

    **



    Shubhangi Paseband


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!