चिटपिट चिटपिट धुमधडाका.....
खूप वर्षांनी माझ्या मामेभावाच्या लग्न सोहळ्यात आम्ही सहभागी झालो. माझं आजोळ फार लांब असून खूप वर्षात माझ आजोळी जाणं झालं नव्हत. त्यावर आजी-आजोबा, दोघे मामा आता कैलास निवासी... माझी मामी खूप प्रेमळ असून नाती-संबंध जपणारी आहे, तिच प्रेमळ आणि आग्रहाचे आमंत्रण येताच आम्ही तिघेही लग्नाच्या तयारी ला सुरूवात केली.
खूप वर्षांनी सगळ्यांना भेटलो... ज्या लहान-लहान भाऊ बहिणींना कडेवर उचलून फिरायचो तेचं भावंड आता चतुर्भुज झाले आहे हे पाहून खरंच खूप आनंद होत होता. कोणाची हसण्याची पद्धत मामा सारखी होती तर कोणाचे नाक डोळे अगदी मोठ्या मावशी सारखे. कोणी मावशी सारखं स्पष्ट बोलणारं तर भाऊ अगदी लहानपणापासून जसा खट्याळ होता तसाच अजून ही आहे, नाकावर राग घेऊन फिरणारी मावस बहीण आता फक्त आपल्या नवऱ्याच्या मागे फिरती आहे हे पाहून खरंच खूप हसू आलं. पहिला दिवस पुन्हा नव्याने भेटण्यात गेला... पण हे मात्र आतून जाणवलं की अजून ही...ही सगळी आपलीच माणसं आहेत.
दुसऱ्या दिवशी आता सगळे जण मोकळे वागत होते... लहानपणी आजोळी मामीच्या हाताच्या आलु-पराठ्यांची ची चव, आजी-आजोबांच्या कहाण्या, मामा बरोबर फिरणं, चॉकलेट आईस्क्रीम खाणं.. सगळ नव्याने आठवलं. संध्याकाळी मोठ्या हॉटेलच्या गार्डन मध्ये मोठ्ठं रिसेप्शनच होत. इंग्रजी गाणी तरीही शांत सुंदर वातावरणात आम्ही सगळे ग्रुप फोटो काढायला गेलो... आमच्या सगळ्यांच्या लग्नातील मामाच्या आठवणी जश्या अचानक उजळून आल्या... आमच्या लग्नात मामा ने आमच्या सगळ्यांकडून मोठ्या ने बोलवून केलेला कल्लोळ “चिटपिट चिटपिट धुमधडाका हे मामा म्हणायचा..... आणि आम्ही म्हणायचो हुं हा... हुं हा....”
काही केल्या ते मनातून जात नव्हतं अचानक मींच त्या शांत आणि शानदार सोहळ्यात जोराने ओरडले...चिटपिट चिटपिट धुमधडाका... आणि माझी सगळी भावंडे सहज उत्तरली हुं हा..... हुं हा....” हा आमच्या मामा ने बनवलेला नारा सगळीकडे गुंजला....
कोणाला काय वाटलं हा विचार न करता मला आता खरंच आमच्या आजोळी लग्न सोहळा झाल्या सारखं वाटल..........
सौ. मीनल आनंद विद्वांस