प्रथमच मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा स्त्रीच्या मनात अनामिक भावनांचा सागरच उसळतो. स्त्रीत्व आणि मातृत्व या स्त्री जीवनातल्या अनमोल बाबी आहेत. मातृत्व जणू काही स्त्रीत्व सिद्ध करतं. मातृत्व म्हणजे एक प्रकारे तिच्या स्त्री जीवनाची सफलता असते. “आपण आई होऊ शकतो किंवा आपण आई होणार” ही भावनाच स्त्रीसाठी त्रिभुवनातला आनंद देणारी असते. एकाच वेळी हर्ष, हुरहूर, जबाबदारीच्या जाणिवेनं आलेलं भय, देहात होणारे बदल आणि हे “गुपित कुणाला सांगू कसे?” अशा एका निराळ्याच मानसिकतेत ती असते पण सर्वप्रथम हे गोड गुपित तिला “त्यालाच” सांगायचे असते कारण निर्मितीच्या या सुखद वाटेवरचा प्रवास हा केवळ त्या दोघांचाच असतो म्हणूनच या आनंदाच्या क्षणाचा खरा भागीदार तोच असतो. अशाच अर्थाचं एक द्वंद्व गीत म्हणजे *बाळकृष्ण गोजिरा* जे *डॉ. निशिकांत श्रोत्री* यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सहज उतरलेलं आहे. मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर स्त्रीच्या अंतरंगातले तरंग त्यांनी अत्यंत जाणतेपणाने आणि हळुवारपणे टिपले आहेत. स्त्री जीवनातला असा हा अनमोल क्षण, आणि त्यातला जोडीदाराचा सहभाग नेमकेपणाने वेचणारे हे एक गोड युगुल गीत आहे.
*वसविला बाळकृष्ण गोजिरा*
वसविला बाळकृष्ण गोजिरा”ध्रु।।
ती: दान घेऊनी तव तेजाचे
सार्थक झाले या ओटीचे
उजविण्या ज्योत अपुल्या घरा
वसविला बाळकृष्ण गोजिरा।।१।।
तो: प्रेमरज्जुंचे धागे अपुले
ती: रेशीमगाठी बंध जाहले
तो : गुंफिला नवा साजिरा
ती :वसविला बाळकृष्ण गोजिरा।।२।।
तो: मुकुंद अथवा आदिशक्ती
ती :कलिका अपुल्या वेलीवरती
माझ्या पोटी उमलु लागली
वसविला बाळकृष्ण गोजिरा।।३।।
*डॉ. निशिकांत श्रोत्री*. (निशिगंध काव्यसंग्रह)
तीन कडव्यांचं, फक्त पंधरा ओळींचं काव्य पण किती अर्थपूर्ण किती बोलकं! मातृत्वाशी गोड धागा विणला जात असतानाच तिच्या मनातलं अगाध आंदोलन आणि तिच्या स्वप्नरंगात दंग झालेल्या “त्याचे” मन.. किती साध्या आणि सोप्या शब्दांतून या गीतात उलगडलं आहे!
*वसविला बाळकृष्ण गोजिरा*
या ध्रुवपदातला बाळकृष्ण हा शब्दच मनाला हळुवार मोरपिसाचा स्पर्श करतो. लहान बालकांसाठी बाळकृष्णाची ही एक सुंदर उपमा नेहमीच दिली जाते. कृष्ण, कन्हैया, कान्हा या शब्दातच लडिवाळपणा आहे. कृष्णाला कोणी पाहिले आहे? पण त्याचं लडिवाळ, बाळपणीचं रूप सगुणात्मक आहे आणि ते अत्यंत सुंदर गोजीरं आहे म्हणूनच उदरात वाढणाऱ्या गर्भाला या बाळकृष्णाचं रूप लाभावं ही प्रत्येक स्त्रीची मनोकामना असते आणि सहजपणे ती म्हणते, स्वतःशी आणि त्याला सांगताना,
*वसविला बाळकृष्ण गोजिरा*
*मला दिवस राहिलेत किंवा आता आपण आई-बाबा होणार बंर का?” याच भाष्याला सौंदर्याने सजविणारी,
*वसविला बाळकृष्ण गोजिरा* ही ओळ किती काव्यात्मक आहे! इथे *बाळकृष्ण* हा रुपकात्मकही आहे.
ती: दान घेऊनी तव तेजाचे
सार्थक झाले या ओटीचे
उजविण्या ज्योत अपुल्या घरा
वसविला बाळकृष् गोजिरा।१।
द्वंद्व गीत म्हणजे एक संवाद असतो.हाही एक आनंददायी संवाद आहे. या चार ओळी वाचताना वाचकाच्या मनात एक सहजीवनाचे सुंदर चित्र साकारते. “ती अगदी सुखाने त्याच्याजवळ बसलेली आहे. जे गुपित तिला त्याला सांगायचं आहे त्यासाठी हवा असलेला एकांत आणि निवांतपणा दोन्हीही आहे आणि तिला काहीतरी सुखाचं, आनंदाचं आपल्याला सांगायचं आहे पण नक्की काय याचा अंदाज घेत उत्सुकतेने तोही तिच्याजवळ तितक्याच उत्कट प्रेमभावनेने आलेला आहे.”
ती पण पटकन त्याला काही सांगत नाही. म्हणते, *दान घेऊनी तव तेजाचे*... “तुझ्या बीजाचं दान तू मला दिलंस ते फळलं आहे. आता माझी ओटी भरली आहे आणि माझ्या देहातल्या गर्भाशयाच्या अस्तित्वाचे, पर्यायाने माझ्या स्त्रीत्वाचे आता सार्थक झाले आहे. अरे! एक नवा पाहुणा येतोय बरं का आपल्या अंगणी आणि त्याच्या आगमनाने आपल्या घरात नवा प्रकाश उजळणार आहे. असा हा बाळकृष्ण माझ्या उदरात वाढत आहे.”
संपूर्ण कडवं तसे रूपकात्मक आहे.
*दान*, *तेज*, *ज्योत*, *बाळकृष्ण* या सर्वच शब्दांवर भावनांचा सौंदर्य साजआहे. मिलनाच्या क्षणी स्त्री ही *धारक* असते आणि पुरुष हा *दाता* असतो म्हणून स्त्रीसाठी तिला त्याच्याकडून मिळालेलं शुक्रबीज हे जणू काही पवित्र दानासारखे असते. *दान* शब्दाची उत्प्रेक्षा खूपच भावनिक आणि सुंदर वाटते. शिवाय हे दान असंतसं नसून तेज:पुंज आहे. इथे *तेज* हा शब्दही खूप अर्थपूर्ण आहे. घेणे आणि देणे या प्रक्रियेत जेव्हा उदात्तता असते तेव्हा त्या दानाला एक वेगळंच तेज प्राप्त होतं आणि अशा तेजाचं दान मिळालेलं बीज अंकुरताना प्रकाशमय असणार याची खात्री असते.
*बाळकृष्ण* या शब्दात गोजिरेपण, लाडिकपण, सौंदर्य तर आहेच पण त्याचबरोबर एक सात्विकता, मंगल्य, पावित्र्य, देवरुपत्व आहे आणि प्रत्येक स्त्रीला जन्माला येणारं आपलं बाळ असं गुणसंपन्न असावं असं वाटत असतं.
तो: प्रेम रज्जूचे धागे अपुले
ती :रेशीमगाठी बंध जाहले
तो : गुंफिला गोफ नवा साजिरा
ती: वसविला बाळकृष्ण गोजिरा।२।
किती प्रेमळ संवाद! या संवादात झुळझुळ निनादणारा सूर आहे. या ओळी वाचताना सहजच *कवी बी* यांच्या काव्यपंक्ती मनात गुणगुणल्या.
*हे विश्वाचे आंगण
*आम्हा दिले आहे आंदण*
*उणे करू आपण दोघेजण*
शुद्ध रसपान करण्याच्या भावनेतून जणू काही त्याला ती गर्भवती झाल्याचे कळताच तो म्हणतो, “आपलं नातं प्रेमाच्या धाग्यात विणलं आहे”. त्यावर *तीही* म्हणते “आता मात्र आपल्या नात्याची वीण माझ्या उदरात वाढणाऱ्या गर्भामुळे अधिकच घट्ट होणार आहे.”
त्यालाही तिचेही भाष्य मनोमन पटते आणि तोही त्यास दुजोरा देऊन सहज म्हणतो,” खरोखरच आपल्या प्रेमाचं हे प्रतीक आहे. हा एकमेकात गुंफलेला सुंदरसा गोफच आहे.”
*गोफ* हा शब्दही नात्यांच्या संदर्भात मला खूप आवडला. विणलेल्या गोफात धाग्यांचा सहज न सुटणारा पीळ असतो. तिच्या उदरातल्या बीजाशी त्याने दिलेल्या अंशाचा संयोग झाल्यामुळे त्यांचे नाते विणलेल्या गोफासारखे घट्ट झाले आहे.
कडव्यातला एक एक शब्द मोत्यासारखा पाणीदार आणि गोजिरवाणाही आहे. दोघांच्या नात्याला दिलेली “*प्रेमरज्जुचे धागे*” ही उपमा अगदी निखळ आहे. *रेशीमगाठी बंध जाहले* … देवाधर्माच्या साक्षीने प्रेमाची एक रेशीमगाठ बांधली तर जातेच पण या गाठीचा बंध तेव्हाच होतो जेव्हा दोघांच्या मिलनातून झालेल्या निर्मितीच्या क्षणाची अनुभूती मिळते. स्त्री —पुरुषांचं नातं, प्रीत आणि प्रणयाचं फलित या स्त्री जीवनातल्याच नव्हे तर सहजीवनातल्या किती महत्त्वाच्या पायऱ्या आहेत यावर डॉ. श्रोत्री अगदी सहजपणे भाष्य करून जातात.
तो: मुकुंद अथवा आदिशक्ती
ती: कलिका अपुल्या वेली वरती
माझ्या पोटी उमलू लागली
वसविला बाळकृष्ण गोजिरा।३।
मातृत्वाची चाहूल लागताक्षणीच दोघांच्याही मनात तेव्हाच एक उत्सुकताही सहजपणे जागृत होते. *मुलगा होणार की मुलगी?*
या काव्यपंक्तीत उल्लेख असलेला “तो। मात्र अत्यंत समतोल, समंजस वृत्तीचा आहे अथवा विनाकारणच ताण देणारा किंवा घेणाराही नाही. त्याला गर्भधारणेच्या प्रक्रियेतील नैसर्गिकता पूर्णपणे ज्ञात आहे आणि त्या बाबतीत त्याची मनापासून स्वीकृती आहे म्हणून तो तिला म्हणतो,
*मुकुंद अथवा आदिशक्ती* या संज्ञा किती सुरेखपणे साधल्या आहेत! युगंधराचं तत्व घेऊन जन्माला येणारा मुलगा असो अथवा शक्तीचं साक्षात रूप घेऊन जन्माला येणारी मुलगी असो दोघांचे स्वागतच आहे. *मुकुंद* आणि *आदिशक्ती* या दोन्ही शब्दातून, जन्म घेणाऱ्या नवजाताचा अत्यंत सात्विकपणे आणि महात्म्य अधोरेखित करून गौरवच केलेला आहे आणि तीही त्याच्या विचारांना अनुमोदन देऊन स्वीकृत भावनेने म्हणते, “खरोखरच आपल्या संसार प्रीतीच्या वेलीवर उमलणारी ही कलिका आता माझ्या उदरात वाढत आहे आपण दोघेही तिचे स्वागत करूया.?
असं हे अत्यंत गोजिरवाणं आणि भावनिक गीत ! छोटसं, साध्या शब्दातलं! उपमा उत्प्रेक्षांनी सजवलेलं प्रतीकात्मक रूपकात्मक असं गोड गोजिरंगाणं! या गाण्यांमध्ये जाणवतं ते नात्यातलं मांगल्य, साफल्याची भावना, सार्थकतेचा अनुभव आणि स्त्री जीवनाचा मातृत्वाशी जोडलेला एक अभंग भावनांचा बंध आणि या सर्वांशी एकरूप, समरस होऊ शकणारं कवीचं संवेदनशील मन!
या गीतात साधलेली *तेजाचे*/ *ओटीचे* *घरा*/ *गोजिरा*/ *साजिरा*/ *अपुले*/ *जाहले* *आदिशक्ती*/ *वेलीवरती* ही सहजयमके गीताला एक ताल आणि लय प्राप्त करून देतात*
डॉक्टर श्रोत्रींच्या काव्यातले एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे शब्दांचा अजिबात नसलेला फापटपसारा,नगण्य काठिण्य, अलंकारांचा अवजडपणा टाळून सहजपणे फुलणारा शब्दांचा साज! *डॉ. श्रोत्री* तुमच्या काव्यप्रतिभेला माझा मनापासून प्रणाम!
*राधिका भांडारकर पुणे*.