• 03 October 2024

    गाथा स्री जन्माची

    करी मातृत्वासि धन्य. रसग्रहण:राधिका भांडारकर

    5 119

    बाळ जन्माला येतं आणि अत्यंत वात्सल्याने माता त्या कापसासारख्या मऊ, इवल्याशा गुलाबी गोळ्याला जेव्हा पदराखाली घेते तेव्हा तिला मायेचा सहज पान्हा फुटतो आणि उरातून दुग्धधारा बरसू लागतात. तो क्षण स्त्रीच्या आयुष्यातला स्वर्गीय क्षण असतो. सफलतेचा क्षण असतो. त्या वेळेच्या तिच्या सुंदर भावमुद्रेची जगातल्या कुठल्याही सौंदर्याशी तुलना होऊच शकत नाही. नऊ महिने उदरात वाढवलेल्या नवजात बालकाच्या दर्शनाने तिच्या ओठी फक्त याच ओळी येत असतील का?

    बाळा होऊ कशी उतराई

    तुझ्यामुळे मी झाले आई..

    गीतकार पी. सावळाराम यांच्या या ओळी अजरामर झाल्या. आई होण्याचा तो अत्यंत मौल्यवान क्षण जणूकाही या शब्दात सहजपणे बंदिस्त झाला. अशा वेळी मनात विचार येतो “जे अनुभवलं नाही ते कवीच्या काव्यातून जसंच्या तसं

    उतरतंच कसं ? पण हेच तर खरं कल्पनेचं कसब, हीच संवेदनशीलता. न अनुभवलेले क्षणही जाणण्याचं सामर्थ्य आणि अशा सामर्थ्यातून अलगद उलगडलेलं भावनिक काव्य नेहमीच अवीट गोडीचं ठरतं. नेमका हाच अनुभव मला *डॉ. निशिकांत श्रोत्री* यांच्या, *करी मातृत्वासि धन्य* ही कविता वाचताना आला. खरं म्हणजे या ओव्या आहेत. आणि आज आपण स्त्री जीवनाच्या अशा मौलिक क्षणांची अनुभूती देणार्‍या मृदूता, ममत्व, वात्सल्य पाझरणाऱ्या ओव्यांचा रसास्वाद घेणार आहोत.

    *करी मातृत्वासि धन्य*

    सोसूनिया गे तू कळा।प्रसवीले तुझ्या बाळा।

    जन्म सार्थक जाहला। पाजी तया वक्षामृत॥१॥

    सुवर्णाचा थोर तास।चीक पाजावा बाळास।

    प्रतिबंध हो रोगास।तया दिव्य संजीवनी ॥२॥

    छातीवरी तया घेई।स्तनमंडळ ते दावी

    स्तनाग्रांना चोखायला।बाळा पुढे सरकायला ॥३॥

    नको साखर ना पाणी।मध ही ना त्या चाटवी।

    तुझ्या पयोनिधीतून।पूर्ण अन्न साक्ष होई॥४॥

    सहा मास देई स्तन्य।वक्षामृतासि पाजून

    दुजे नको काही अन्न।अमृत ते उरोजन्य ॥५॥

    बाळासाठी झोपेतून। रात्रंदिना तू जागून

    स्तनपान त्या देऊन।होते बालसंवर्धन ॥६॥

    वर्षांपोत्तर तू दोन।देई पूरक त्या अन्न

    सवे पाजी त्यासी स्तन्य।वाण तुझे मातृत्वाचे ॥७॥

    पाज —पाजता बाळासी।चार गोष्टी सांगी त्यासी।

    हितगुज तया संगे।स्तनपान किती रंगे॥८॥

    सर्व गुणांनी पावन।दिव्य स्पर्श तो घेऊन

    पसायाचे करी दान।करी मातृत्वासि धन्य ॥९॥

    *डॉ. निशिकांत श्रोत्री*.

    या ओव्या वाचत असताना अगदी नकळत सहजपणे बाळाला स्तन्य देणारी माता मनाच्या पटलावर रेखीवपणे साकारत जाते. स्त्री ही किती सुंदर असू शकते, त्याहीपेक्षा स्त्रीत्वाचा जो अविष्कार या क्षणी घडतो, जे दैवत्व या क्षणी तिच्यात जाणवतं तिथे खरोखरच नतमस्तक व्हायला होते. ब्रह्मदेवानं निर्मिलेली नारी म्हणजे एक चमत्कारच वाटतो.

    *सोसूनिया गे तू कळा*। *प्रसवीले तुझ्या बाळा*

    *जन्म सार्थक जाहला*। *पाजी तया वक्षामृत* ॥१॥

    काही क्षणापूर्वी असह्य वेणा सोसणारी तू.. बाळाला जन्म देताक्षणीच साऱ्या वेदना विसरून जातेस, तुझ्या स्त्री जन्माचं सार्थक झालं म्हणून आनंदी होतेस. तुझ्या वक्षातून त्या नवजात बालकांसाठी अमृतरस पाझरतो आणि ते त्याच्या मुखात घालण्यासाठी तू आतुर होऊन त्याला छातीशी घेतेस. तुला फुटलेला हा पान्हा तुझ्या बाळासाठी अखंड वाहत राहतो.

    या ओळी दृश्यस्वरूप आहेत. कवीच्या लेखणीतून उतरलेल्या शब्दांमधला *कळा* *बाळा* *जाहला* हा अनुप्रास अत्यंत मधुर आहे आणि हा अनुप्रास काव्यभाव आणि लय अतिशय सुबकपणे साधतो.

    *सुवर्णाचा थोर तास*।*चीक पाजावा बाळास*।

    *प्रतिबंध हा रोगास*। *तया दिव्य संजीवनी*॥२

    या ओळी वाचताना त्या अज्ञात शक्तीची विलक्षण किमया समजून थक्क व्हायला होते. या चार ओळीत डॉ. श्रोत्रींनी एक स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून असेल कदाचित पण जन्मलेल्या बाळाला मातेच्या स्तनांमधून प्रथम येणारं काहीसं पिवळसर घट्ट दुध का पाजावं या विषयीचे प्रबोधन केले आहे.

    *सुवर्णाचा थोर तास* या मागचा अर्थ मातेच्या स्तनांतून दूध गळू लागल्यानंतरचा पहिला एक तास हा सुवर्णाचा म्हणजेच अतिशय महत्त्वाचा असतो. ते पहिले पिवळसर घट्ट चीकाचे थेंब म्हणजे रोगप्रतिबंधक आणि बाळाला संजीवन देणारे असतात. हे ज्ञान प्रत्येक माता होणाऱ्या स्त्रीला माहीत असलेच पाहिजे ही कवीची कळकळ त्यात जाणवते आणि त्याचबरोबर एका नैसर्गिक, अद्भुतरम्य सत्याचा उलगडा होऊन मन खरोखरच चकितच होते. *जो चोच देतो तो चाराही देतो* या म्हणीचा अक्षरश:अर्थ लागतो.

    *छातीवरी तया घेई*।*स्तनमंडळ ते दावी*।

    *स्तनाग्रांना चोखायला*। *बाळापुढे सरकायाला*।।

    त्या क्षणापासून या अमृतघटरुपी आईच्या स्तनमंडळावर फक्त बाळाचाच हक्क असतो जणू! आपल्या बाळाची भूक भागविण्यासाठी ती तिचे स्तनमंडळ बाळमुखी देते, त्यासाठी तिला थोडं झुकावं लागतं आणि मग ते बाळ चुटूचुटू चोखू लागतं . स्त्रीच्या आयुष्यातला त्या इवल्या ओठांचा झालेला मृदु स्पर्श प्रत्येक वेळी परमानंदाचा असतो आणि आईच्या घटातील ते अमृत चोखणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावरही एक महान तृप्तीचं तेज पसरत जातं. या पयोदानातला जो निर्मळपणा आहे, जी निरागसता आहे, आनंद आहे, तृप्ती आहे त्याची कुठल्याच दानाशी तुलना होऊच शकत नाही. हे दान निसर्गाचं, ते देणारी नारी ही सुद्धा निसर्गाचीच निर्मिती. मातेच्या वक्षातलं हे पायस कसं मिळवावं, कसं चोखावं याचं काही वेगळं शिक्षणही नसतं. सारं काही निसर्गच जमवून आणतो. ही अलौकिकता हा विलक्षणपणा कवीने इतक्या नेमक्या शब्दात वेचला आहे की कळतच नाही अशा या शब्दांना दाद कशी द्यावी? बाळाला दूध पाजणार्‍या स्रीचं त्यात्या भावांसकट उमटवणारं सुरेख चित्र एखादा महान चित्रकार रेखाटतो तद्वतच कवीचं हे शब्दचित्रही सुंदर वाटते.

    *नको साखर ना पाणी*। *मध ही ना ती चाटवी*

    *तुझ्या पयोनिधीतून*। *पूर्ण अन्न साक्ष होई*॥४॥

    आईचं दूध हेच नवजात बालकांसाठी पूर्ण अन्न आहे. ज्या ज्या घटकांची त्याच्या वाढीसाठी आवश्यकता आहे ते सगळेच घटक तिच्या दुधातच स्थित आहेत. त्यांत ना साखर घालण्याची गरज, ना पाणी ना मध! हे! माते तू धन्य आहेस! तुझ्यातूनच निर्मिलेल्या या संजीवन झऱ्यातून तू जन्माला आलेल्या बालकाला वाढविण्यास समर्थ आहेस. पूरक घटक, माफक गोडवा आणि तपमान, योग्य पातळपणा असणारे हे दुग्ध म्हणजे संजीवनधाराच आहेत.

    *सहा मास देई स्तन्य*। *वक्षामृतासि पाजून*।

    *दुजे नको काही अन्य*। *अमृत ते उरोजन्य* ॥५॥

    *बाळासाठी झोपेतून*। *रात्रंदिन तू जागून*।

    *स्तनपान त्या देऊन*।*होते बालसंवर्धन* ॥६॥

    स्तनपनाचे महत्त्व सांगताना कवीने या ओळींमधून मातृत्वाच्या महानतेची दखल घेतली आहे.हे फक्त स्त्रीच करू शकते. हे केवळ स्त्रीच्या ठायीच प्रसवते. सोपं नसतं मातृत्व निभावणं. जन्माला आलेल्या बालकाला सहा महिने उरातूनच निर्माण झालेलं ते अमृत ती अत्यंत वात्सल्याने पाजते. दुसऱ्या कुठल्याही अन्नाची तेव्हा गरजही भासत नाही. तिचे हे वक्षामृतच बाळाच्या वाढीसाठी संपूर्ण असते. या ओळीतले *वक्षामृत*, *उरोजन्य* या शब्दांमध्येच अमृताची गोडी आहे. किती पवित्र, मंगलमय आणि सुंदर क्रिया आहे ही— याची जाणीव या ओळीतून कवीने करून दिलेली आहे.स्तन्य,अन्य,उरोजन्य ही अनुप्रासयुक्त यमकेही तितकीच नादमय वाटतात.

    कुठल्याही मातेला बाळाला दूध पाजण्यचा भार होतच नाही. रात्रंदिवस ती दर दोन एक तासांनी बाळाला केवळ कर्तव्य बुद्धीनेच नव्हे तर अत्यंत प्रेमाने हे स्तन्य पाजत असते आणि त्या नवजात बालकाचे थेंबाथेंबाने संवर्धन करत असते. स्त्री ही किती महान असते! ती कधीही स्वसुखाचा विचारही करत नाही. मनाने, कायेने ती संपूर्णपणे फक्त आपल्या बाळाचा विचार करत असते आणि तिच्यातला हाच प्रेमाचा झरा त्या दुग्ध पान्ह्याला वाहता ठेवतो. या साऱ्या नैसर्गिक बाबी! या शारीरिक क्रियेत मन, भावना याचाही तितकाच मोठा वाटा आहे आणि या सर्वच बाबींची दखल कवीने अत्यंत जाणीवपूर्वक सहजसुंदर शब्दांतून घेतली आहे. या शब्दाशब्दात ना केवळ स्त्रीत्त्वाचं महात्म्य आहे तर अदृश्यपणे उमटलेला एक कृतज्ञतेचा भावही आहे.

    *वर्षापोत्तर तू दोन*। *देई पूरक त्या अन्न*।

    *सवे पाजी त्यासी स्तन्य*।*वाण तुझे मातृत्वाचे*॥७॥

    बाळ जसं वाढतं तसं हळूहळू त्याला थोडं थोडं बाहेरचं अन्न विशिष्ट पद्धतीने द्यावं लागतं. तरीही आईच्या अंगावरच्या दुधाची गरज संपत नाही. या अन्नासोबत निदान दोन वर्षे तरी मातेने आपल्या बाळाला तिचं दूध पाजायला हवं आणि ते ती आनंदाने करतच असते. हे निसर्गाने दिलेलं मातृत्वाचं वाण आहे आणि त्याचं पावित्र्य, योग्य भूमिका स्त्री स्वानंदाने पार पाडत असते. आईचं दूध ही फक्त संज्ञा नाही तर ती एक फार मोठी शक्ती आहे. ज्या शक्तीतला कण नि कण बाळाचे भविष्यातले निरोगी जीवन अनेक पातळीवर, अनेक प्रकाराने घडवत असते.

    यातील *वाण तुझे मातृत्वाचे* ही शब्दरचना खूप अर्थपूर्ण आहे. मातृत्वाचं वाण हे केवळ नारीजन्मासाठीच निसर्गदत्त आहे. ही अतिशय गौरवशाली गोष्ट आहे. या पवित्र वाणाशी ती आपल्या बाळासाठी बांधील आहे. आणि हाच निसर्गाचा नियम आहे.

    *पाज— पाजता बाळासी*।*चार गोष्टी सांगी त्यासी*।

    *हितगुज तया संगे*। *स्तनपान किती रंगे* ॥८॥

    या चरणात कवीने अत्यंत सहजपणे माता आणि बालकाचं हे नवं नातं कसं बांधलं जातं याचं सुंदर वर्णनच केलेलं आहे. ही केवळ यांत्रिक, कायिक क्रिया नसून त्या समवेत एक संस्कारधाराही वाहत असते. आईचे बोल बाळाला कळतात. पाजण्याच्या क्रियेत बाळाशी तिचा मधुर संवाद घडतो. त्याचवेळी ती त्याला छान छान गोष्टी सांगते. शिवाय, “तुला मी छान वाढवेन, मोठा करेन” असे मनोगतही व्यक्त करते. तिच्या जीवनात त्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हेही ती त्याला लडिवाळपणे गोंजारून सांगते.तिच्या त्या अमृतधारांतून त्या निरागस बालकावर गोंडस संस्कार घडत असतात आणि कळत नकळत ते बाळाच्या प्रवाहात मिसळत असतात, त्याच क्षणी त्या नव्याने जगात प्रवेश केलेल्या बालकाला आपल्या जन्मदात्रीच्या माध्यमातून एक संरक्षक कवच मिळतं. मातेचं स्तन्य हे केवळ उदरभरण नसतं तर जगताना सुरक्षित भाव निर्माण करणारं एक बलवान शस्त्र असतं.

    *स्तनपान किती रंगे* ही काव्यपंक्ती वाचताना सहज वाटते की *स्तनपान*हा एक अपूर्व सोहळा आहे आणि तो फक्त त्या दोन जीवांचाच आहे. हे सगळं कमालीचं दृश्यरूप आहे. या संपूर्ण काव्यात हा स्वभावोक्ती अलंकार अगदी सहजपणे साधला गेलेला आहे.

    कविराज शेवटच्या चरणात म्हणतात,

    *सर्व गुणांनी पावन*।*दिव्य स्पर्श तो घेऊन*।

    *पसायाचे करी दान*।*करी मातृत्वासी धन्य*.॥९॥

    खरोखर बाळाला दूध पाजणे म्हणजे अथांग पावित्र्याचं दानच. त्या बालकाचा अत्यंत मृदू ओष्ठस्पर्श मातेच्या स्तनमंडळाला जेव्हा होतो.. तो क्षण आणि तो स्पर्श दिव्यत्वाचा अनुभव देतो. अत्यंत ममतेने आपल्या बाळाला पसायदान देणारी माता धन्य आणि तिचे मातृत्व धन्य!

    अतिशय सुंदर, भावपूर्ण अशा या ओव्या! यातले शब्दसामर्थ्य वाखाणण्यासारखं. काव्य भावाच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर यातून एक वैज्ञानिक, शास्त्रीय उपयुक्त संदेश दिला जातोय. आईच्या दुधाचं महत्व सांगणारा बहुमोल संदेश! प्रत्येक चरणामधून, आईच्या स्तनांमधून पाझरणारं हे निसर्गनिर्मित दूध हे बालकाचं पूर्णान्न कसं आहे आणि ते जन्माला आलेल्या मुलाचं हक्काचं अन्न तर आहेच पण त्याचबरोबर त्याच्या जीवनाची एक भक्कम पायाभरणी आहे आणि प्रत्येक मातेने ते कसे जाणले पाहिजे ही शिकवण कवीने या ओव्यांच्या माध्यमातून फार कौशल्याने दिली आहे. एक जनजागरण यातून झालेलं आहे.यात सहजच एक सामाजजिकतेचा भाव आहे. एकाच वेळी कवीमध्ये स्थित असलेला डॉक्टर आणि काव्यभाव यांचं सुरेख मिश्रण झालेलं या काव्यातून पाहायला मिळतं.

    अत्यंत साध्या, सोप्या शब्दातल्या या ओव्या वाचताना स्त्रीचं मातृरुप मनासमोर साकारतं. ते शब्दांमधून पहात असताना मनात अनेक विचार येतात. स्त्रीचं हे निर्मितीक्षम जननरूप किती महान आहे याची जाणीव होते.

    जेव्हा ती बाळाला दूध पाजते तेव्हा त्यातूनच ती सर्वार्थाने बाळाचे संवर्धन करत असते. त्याच्या शारीरिक वृद्धीबरोबर त्याची मानसिक वाढ ही होत असते. त्यासाठी स्तन्य देणारी स्त्री ही सदैव आनंदी, सुविचारी, क्रोध, क्षोभ, असूया, मत्सर या विकारापासून दूर असावी तितकीच ती सुरक्षित असावी हा एक महत्त्वाचा विचार येथे जाणवतो कारण तिच्या माध्यमातूनच एक सुंदर समाज निर्माण होणार असतो म्हणूनच स्त्री आणि तिच्या भोवतीचा समाज हे परस्परावलंबी आहेत. स्त्री जीवनाचा चौफेर विचार केल्यावर हे लक्षात येते की नारी जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर तिच्यासाठी समाजाने सुरक्षिततेचं एक भक्कम कवच निर्माण केले पाहिजे तरच मानवी जीवन सुंदर होईल. हा या कवितेत अदृश्यपणे दडलेला कर्तव्य भाव मला जाणवला म्हणून मी हे भाष्य केले. ते करणे मला जरुरीचे वाटले.

    कवितेचं शीर्षक *करी मातृत्वासि धन्य*

    हे काव्यातलं संपूर्ण सारच अधोरेखित करते. तिच्यात वाहणार्‍या अमृताचं दान देऊन * *ज्याचं होतं त्याला दिलं* या भावनेत ती धन्यता मानते.

    शेवटी इतकंच म्हणेन एक पवित्र मंगल अशा स्तनपानाचं महत्त्व सांगणारा संदेश देताना कवीने यातला शास्त्रीय वैज्ञानिक आणि काव्यात्मक दृष्टीकोन अतिशय समतोलपणे साधलेला आहे.

    राधिका भांडारकर



    Nishikant Shrotri


Your Rating
blank-star-rating
ज्योती अलोणे - (04 October 2024) 5
खूप सुंदर रसग्रहण

1 0

Gangadhar joshi - (03 October 2024) 5
उत्तम पसाय दान रसग्रहण उत्तम

1 1