यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
रमन्ते तत्र देवता:।।
पिढ्यानुपिढ्या जपलेलं हे सुंदर विचारांचं, सुसंस्काराचं सुभाषित. पण प्रत्यक्ष जगताना, अवतीभवतीची पीडित स्त्री जीवनं पाहताना मनात नक्कीच येतं की सुभाषितं ही फक्त कागदावर. समाज मनावर ती कोरली आहेत का? खरोखरच नारी जन्माचा सोहळा होतो का? स्त्री आणि पुरुष यांचा जेव्हा दोन व्यक्ती म्हणून विचार करताना सन्मानाच्या वागणुकींचं पारडं नक्की कुणाकडे झुकतं? आजही वंशाचा दिवा म्हणून मुलाच्या जन्माचं महत्व आहे. एकतरी मुलगा हवाच ही मानसिकता कमी झालेलली नाही पण जिच्या उदरातून हा वंशाचा दिवा जन्म घेतो तिचा मात्र सन्मान होतो का?
“ तुम्हाला दोन मुलीच?”
या प्रश्नांमध्ये दडलेला,” मुलगा नाही?” हा प्रश्न बोचरा नाही का?
अनेक शंका उत्पन्न करणारे असे प्रश्नही असंख्य आहेत. सुधारलेल्या समाजाची व्याख्या करतानाही हे प्रश्न सतत भेडसावत असतातच आणि याच पार्श्वभूमीवर *औक्षवंत हो* ही डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची गीतरचना माझ्या वाचनात आली आणि मी खरोखरच हे काव्य वाचून प्रभावित झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे या काव्याचा उगम एका पुरुष मनातून व्हावा याचे मला खूप समाधान आणि तितकेच अप्रूपही वाटले.
*औक्षवंत हो*
काजळ घेउनिया नयनीचे तीट लावते तुला
औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।ध्रु।।
पहिली बेटी ही धनपेटी म्हणती दांभिक सारे
आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे
जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदाला
औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।१।।
सीता तू अन् तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता
गार्गी बनुनी विदुषी होई तारी या भारता
सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला
औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।२।।
कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला
वाढविते तू वंशा, निर्घृण तुझाच वैरी झाला
तेजस्विनी हो, सौदामिनी हो,लखलखती तू ज्वाला
औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।३।।
पत्नी जरी तू एका क्षणाची माता तू कालाची
संस्काराचे सिंचन करिते सरस्वती ज्ञानाची
गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला
औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।।४।।
*डॉ. निशिकांत श्रोत्री*.(निशिगंध)
हे गीत वाचल्यावर प्रथमतःच मनासमोर उभी राहते ती प्रेमस्वरूप, वात्सल्य सिंधू आईच. ज्या मातेने नऊ महिने स्वतःच्या उदरात एक गर्भ मोठ्या मायेने वाढविलेला असतो त्याला जन्म देताना मातृत्वाच्या भावनेने ती ओथंबलेली असते, मग ते मातृत्व मुलाचं की मुलीचं हा प्रश्नच उरत नाही. कुशीत जन्मलेल्या बाळाची ती आणि तीच फक्त माताच असते.
*काजळ घेऊनिया नयनीचे तीट लाविते तुला*
*औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।ध्रु।।*
नुकत्याच सोसलेल्या प्रसूती वेदना ती क्षणात विसरलेली आहे आणि जन्मलेल्या आपल्या कन्येला हातात घेताना प्रथम तिच्या मुखातून उद्गार निघतात,” माझ्या डोळ्यातल्या काजळांचं तीट तुला लावते बाळे, औक्षवंत हो! दीर्घायुषी हो! हाच आशीर्वाद मी तुला देते.”
या ध्रुपदाच्या दोन ओळींमध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. हा एका नुकतंच मातृत्व लाभलेल्या आईने जन्मलेल्या अथवा तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या स्त्रीअंकुराला दिलेला आशीर्वाद तर आहेच. पण औक्षवंत हो म्हणताना कुठेतरी तिच्या मनात भय आहे की माझ्या या मुलीच्या जन्माचा सन्मान होईल का? तिच्यावर कधी अशी वेळ येऊ नये की तिला अर्धवटच हे जगणं सोडून द्यावं लागेल कारण सद्य समाजाविषयी ती कुठेतरी मनोमन साशंक आहे.
आणि म्हणूनच कदाचित तिला आपल्या बाळीला कुणाचीही नजर लागू नये,सर्व दुष्ट शक्तीपासून तिचे रक्षण व्हावे याकरिता डोळ्यातले काजळरुपी तीट लावावेसे वाटत आहे.
*पहिली बेटी ही धन पेटी म्हणती दांभिक सारे*
*आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे*
*जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदला*
*औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।१।*
“म्हणताना म्हणतात हो सारे, पहिली बेटी धनाची पेटी असते. पण ओठावर एक आणि मनात एक असणारे हे सारेच ढोंगी आहेत. पण मी मात्र तुझी आई आहे. माझ्या उदरी जणू काही तुझ्या रूपानने आदीमायेनेच जन्म घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या जन्माने माझी कूस पावन झाली, माझ्या जीवनाची सार्थकता झाली आणि या माझ्या आनंदाला पारावरच नाही. सुखी दीर्घायुष्याचे सगळे मार्ग तुझ्यासाठी मुक्त असावेत हेच माझे आशीर्वचन आहे.”
आशीर्वादाऐवजी कवीने योजलेला आशीर्वचन हा शब्द मला खूपच भावला. जन्मापासूनच तिने आपल्या कन्येचा योग्य प्रतिपाळ करण्याचा जणू काही वसा घेतला आहे. तिने तसे स्वतःला वचनबद्ध केले आहे असे या शब्दातून व्यक्त होते.
*सीता तू आणि तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता*
*गार्गी बनुनी विदुषी होईल तरी या भारता*
*सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला*
*औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।२।*
मुलगी झाली म्हणून त्या मातेला कणभरही कमीपणा वाटत नाही. उलट ती त्या जन्मलेल्या निरागस स्त्री अंशात सीता, द्रौपदी, जिजाऊ माता, विदुषी गार्गी, अगदी अलीकडच्या युगातली अंतराळ वीरांगना सुनीता विल्यमलाच पहात आहे. अशा अनेक गौरवशाली स्त्री व्यक्तिमत्त्वांची तिला आठवण होते आणि आपली ही बालिका ही एक दिवस अशीच दैदिप्यमान कर्तुत्वशाली व्यक्ती असेल असे सुंदर स्वप्न ती पाहते आणि त्या क्षणी पुन्हा पुन्हा ती तिला औक्षवंत हो, कीर्तीवंत हो ,यशवंत हो असे आशिष देत राहते.
*कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला*
*वाढविते तू वंशा निर्घुण तुझाच वैरी झाला*
*तेजस्विनी हो सौदामिनी हो लखलखती हो ज्वाला*
*औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।३।*
मनातल्या ममतेच्या,वात्सल्येच्या वेगाबरोबरच त्या नुकत्याच, या जगात जन्म घेतलेल्या स्त्री जीवाला दुष्ट, संहारी समाजापासून सावध करण्याचेही भान बाळगते. खरं म्हणजे स्त्री ही सृजनकर्ती, जगाची निर्मिती प्रमुख. तिच्याच उदरातून कुळाचा वंश जन्म घेतो. तिच्याशिवाय ज्याचा जन्मच अशक्य आहे तिचाच मात्र तो वैरी बनतो आणि तिची निर्घृण हत्या करण्यास पुढे सरसावतो. ही केवढी विसंगती आहे! पण तरीही ही धीरोदत्त माता आपल्या हातातल्या त्या निष्पाप, अजाण, कोवळ्या कळीला समर्थ, सक्षम करण्यासाठी म्हणते,”तू नको कसले भय बाळगूस. तू मूर्तिमंत तेज हो, थरकाप उडवणारी चपला (वीज) हो, गगनाला भिडणारी लखलखती ज्वाला हो.
*तेजस्विनी* *सौदामिनी* *ज्वाला* हे तीनही शब्द तळपणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठीच आहेत. कवीने या तीन शब्दांची औचित्यपूर्ण गुंफण केली आहे. आईच्या मनातले समर्थ, बलवान, धारदार विचार ते सुंदरपणे व्यक्त करतात.
*पत्नी जरी तू एक क्षणाची माता तू कालाची*
*संस्काराचे सिंचन करते सरस्वती ज्ञानाची*
*गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला*
*औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।४।*
स्त्री जन्माविषयी असेच म्हणतात ना? क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता. किती सार्थ आहे हे भाष्य! मातृत्व ही अशी भावना आहे किंवा अशी भाववाचक संज्ञा आहे की जिचा काल अनंत आहे. ज्या क्षणापासून तिच्या उदरात गर्भ रुजतो त्या क्षणापासून ते तिच्या जीवनाच्या अंतापर्यंत ती केवळ आणि केवळ माताच असते. स्वतःच्या उदरातून जन्माला आलेल्या तिच्याच अंशाच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी ती अविरत झटत असते. या काव्यामधली ही माता म्हणूनच त्या अंशाला तिच्या जन्माचं महत्त्व पटवून देते. तिला संस्काराचे सिंचन करणारी सरस्वती, ज्ञानदा म्हणून संबोधते आणि निस्सिमपणे एक आशा मनी बाळगते की कळी उमलण्यापूर्वीच खुडली न जावो. केवळ “मुलीचा गर्भ” हे निदान होताच तिची गर्भातच हत्या कधीही न होवो. आणि म्हणूनच या ठिकाणी *औक्षवंत हो* या आशीर्वाचनाला खूप व्यापक असा अर्थ लाभतो.
*अनंत कालची माता*हा स्त्रीविषयीचा उल्लेखही खूप विस्तारित अर्थाचा आहे. आयुष्याच्या एकेका टप्यावर पती पत्नीचं नातंही नकळत बदलतं. शृंगारमय यौवनाचा भर ओसरतो आणि त्याच पतीची ती उत्तरार्धातच नव्हे तर वेळोवेळी कशी मातेच्या रुपात भासते हेही सत्य नाकारता येत नाही.मातृत्व हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. ती पुत्राचीच नव्हे तर पतीचीही माता होते. असंहे मातृत्व खरोखरच अनंतकाली आहे.
डॉक्टर श्रोत्रींना मी मनापासून वंदन करते, की या गीत रचनेतून त्यांनी स्त्रीचे महात्म्य अधोरेखित करणारा केवढा मौल्यवान संदेश समाजाला दिला आहे! भृणहत्ये विरुद्ध उभारलेलं हे एक काव्यरूपी शस्त्रच आहे.हे गीत वाचल्यावर निश्चितपणे जाणवते ते हे की हे एका कन्येची माता होणाऱ्या अथवा झालेल्या स्त्रीचे मनोगत आहे. कदाचित जन्मलेल्या कन्येशी किंवा गर्भांकुराशी होत असलेला हा एक प्रेमळ,ममतापूर्ण तरीही काहीसा भयभीत, चिंतामिश्रित संवादही आहे.. आपल्या उदरात वाढणारा गर्भ हा मुलीचा आहे असे समजल्यावर तिने सर्व समाजमान्य कल्पनांना डावलून केलेला एक अत्यंत बलशाली निर्धार आहे. तितक्याच समर्थपणे ती तिच्या गर्भासाठी एक संरक्षक कवच बनलेली आहे.
सर्वच दृष्टीने हे गीत अर्थपूर्ण आणि संदेशात्मक आहे. मातेची महती सांगणारे आहे.
वात्सल्य रसातले तरीही वीरश्रीयुक्त असे रसाळ, भावनिक गीत आहे,
*धनाची पेटी* *तेजस्विनी* *सौदामिनी* *ज्वाला* आणि ती लखलखती या स्त्रीला दिलेल्या उपमा खूपच सुंदर वाटतात, आणि यथायोग्य वाटतात.
सारे —न्यारे” माता —भारता’ घाला— झाला— जीवाला ही यमके यातला अनुप्रास हा अतिशय डौलदार आहे.
साधी, सहज भाषा, नेमके शब्द अलंकार, वजनदार तरीही अवघड न वाटणारे सुरेख नादमय शब्द यामुळे *औक्षवंत हो* हे गीत मनावर एक वेगळीच जादू करते. एका वेगळ्याच भावना प्रवाहात अलगद घेऊन जाते.
श्री. विलास अडकर यांनी हे गीत संगीतबद्ध केले आणि मंजुश्री ओक यांनी त्यांच्या सुरेल आवाजात ते तितक्याच भावपूर्णतेने गायले आहे,हे या गीताचे आणखी एक अभिमानास्पद श्रेय आणि वैशिष्ट्यही.
डॉ.श्रोत्री आपले मनापासून आभार आणि अभिनंदन! अशा समाजाभिमुख गीतांचे योगदान नव्या विचारांचा नव समाज घडवू शकतो यात शंकाच नाही.
धन्यवाद!
*राधिका भांडारकर पुणे*.