वयाची तिशी ओलांडली तरी कितीतरी मुला-मुलींचे अजूनही लग्न झालेले नाही. आजकाल मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्यात म्हणे. खरं तर अपेक्षा ह्या आधीपासूनच होत्या फक्त त्या आधी जास्त प्रमाणात मुलांकडून केल्या जायच्या आणि आता मुलींकडून होत आहेत. पण नक्की अपेक्षा मुला-मुलींच्याच वाढलेल्या आहेत की त्यांच्या आई-वडिलांच्या हा प्रश्न पडलाय.
भरघोस पगार हवा, चांगली महागातली कार हवी, त्याचबरोबर टू थ्री बीएचके घर सुद्धा हवं अश्याच काहीश्या अपेक्षा केल्या जात आहेत. काहींच्या शिक्षणासाठी सुद्धा अटी आहेत मुलगा मास्टर किंवा पीएचडी केलेला हवा त्यात वय सुद्धा कमीच हवं. कमी वयामध्ये स्वतःचे घर, कार, दहा लाखाच्या वरती पगार खूप कमी लोकांना हे शक्य होतं. किंवा ज्यांच्या आई-वडिलांकडे आधीच भरमसाठ संपत्ती आहे अशाच मुलांची कमी वयामध्ये भरपूर प्रॉपर्टी होऊ शकते.
मग काहीवेळी आई-वडिलांची संपत्ती सुद्धा बघितली जाते. पण मुलाच्या कर्तुत्वाला मात्र दुय्यम स्थान दिलं जाते. त्यात काही मुलींना सासू-सासर्यांची संपत्ती चालते पण घरामध्ये सासू-सासरे चालत नाही.
स्वतःच्या हिमतीवर शून्यातून जग निर्माण करणारे मुलं आता नकोशे झालेत. "समजून घेणारा, मला प्रोत्साहन देणारा, माझ्यावर खूप प्रेम करणारा मुलगा हवा" मुलींच्या या अपेक्षा हरवत चाललेल्या आहेत.
ही तर झाली मुलाकडच्यांची बाजू मुलीकडच्यांना सुद्धा बाजू आहेच.
अर्थातच आजकाल नोकरी न करणाऱ्या आणि घर सांभाळणाऱ्या स्त्रीला घरामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं. अजूनही अशा स्त्रीच्या घर- दार सांभाळण्याच्या कामाला किंमत दिली जात नाही. नोकरी करणाऱ्या मुलींकडून घर-दार नीट सांभाळावं आणि चाली रीती, नातेवाईक सर्व पद्धतशीर करावं ही अपेक्षा केली जाते. घरकामात स्वतःच्या मुलाने सुनेला मदत केलेली ही नको असते.
लग्न झाल्यावर माहेर परक होतं असं म्हणतात आणि काही मुलींना तर सासरी ती या घरातली नाही याची सतत जाणीव करून दिली जाते. म्हणूनच आता भरपूर मुलींना माझं स्वतःचं असं वेगळं घर हवं असं वाटायला लागलेलं आहे. त्यासाठी ते चांगल्या पगाराची नोकरी शोधतात. भरमसाठ पैसा कमावतात आणि घर घेतात. नक्कीच आता घर घेणं सुद्धा सोपं नाहीये. म्हणूनच यामध्ये खूप वेळ जात असावा.
तर काही मुलींच्या आई-वडिलांना आमच्या मुलीला जास्त मेहनत नको, आमच्या मुलीने गरिबीत दिवस काढू नयेत असं वाटतं. प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी सुखी राहावी असं वाटतं पण त्यासाठी हल्ली मुलांकडून ज्या ज्या अपेक्षा केल्या जात आहेत त्या अर्थातच अति आहेत यामध्ये वादच नाही. प्रेम, चांगला स्वभाव, चांगलं घराणं, या अपेक्षांची जागा आता प्रॉपर्टी आणि पैशांनी घेतलेली आहे.
घटस्फोटांचं प्रमाण वाढण्यामागे हे सुद्धा एक कारण नक्कीच असेल. लग्न जमणं जेवढं कठीण झालंय तेवढेच घटस्फोट होणं सोपं झालंय. अक्षरशः काही महिने सुद्धा आज मुलं-मुली एकत्र राहू शकत नाहीयेत.
खूप भरमसाठ पगार असलेली मुलं आणि मुली घरामध्ये वेळच देऊ शकत नाही. एकमेकांना समजून घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाहीये आणि यातूनच वाद निर्माण होतात. दिवस-रात्र फक्त लॅपटॉप मध्ये डोकं घालून बसलेली असतात. रोज रात्री दोन तास फक्त दिवसातल्या घडामोडींबद्दल चर्चा केली तरी सुद्धा भरपूर प्रॉब्लेम सुटतात. पण यासाठी सुद्धा आजकाल वेळ नाहीये. काम करून एवढी दमलेली असतात की बोलण्याची सुद्धा इच्छा नसते.
जास्त पगार असला म्हणजे त्यासोबत अतिरिक्त काम देखील आले. कामाच्या लोडमुळे चिडचिड होणं सुद्धा स्वाभाविक आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या ताण त्यात अजून भर घालतो.
सध्या हा विषय फार गुंतागुतीचा होत जातोय. मुला-मुलींच्या पालकांचा वाद तर न संपणाराच आहे. आता या विषयावर प्रत्येक व्यक्तीची मते वेगवेगळी आहेत. तरुण पिढीने तरी समंजसपणा दाखवावा हीच ईच्छा....
- श्रद्धा अभिजीत चौधरी