• 27 February 2026

    कुसुमाग्रजांच्या साहित्याने मराठी भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले

    Kusumagraja's literature took the Marathi language to a different height

    0 17

    कुसुमाग्रजांच्या साहित्याने मराठी भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले

    27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

    मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक सण नसून तो मराठी भाषेचा अभिमान आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा दिवस आहे.

    मराठी साहित्यातील दिग्गज कवी, नाटककार आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर, जे 'कुसुमाग्रज' या टोपणनावाने ओळखले जातात, त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस आहे. मराठी साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित करण्यात आला. त्यांना 'विशाखा' या काव्यसंग्रहासाठी आणि त्यांच्या एकूण साहित्यासाठी भारतीय साहित्यातील सर्वोच्च 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळाला आहे. त्यांच्या कवितांनी आणि 'नटसम्राट' सारख्या अजरामर नाटकांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

    या दिवशी महाराष्ट्रभर आणि जगभरातील मराठी भाषिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यात शाळा आणि महाविद्यालयात वादविवाद , वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन केले जाते. हा दिवस मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आणि नवीन पिढीला भाषेची गोडी लावण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. या दिवसाचा उद्देश मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि जतन करणे हा आहे.

    मराठी भाषेचे महत्त्व विशद करताना प्रसिद्ध साहित्यिक सुरेश भट म्हणतात,
    "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी."
    धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,
    एवढ्या जगात माय मानतो मराठी."

    मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपली ओळख आहे. तिचा आदर करणे आणि ती शुद्ध स्वरूपात वापरणे हे आपले कर्तव्य आहे.

    महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे .३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषेचे महत्त्व वाढले आहे. मराठी भाषेच्या प्राचीन परंपरा आणि वैभवाचा गौरव करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

    मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळाल्यामुळे केंद्र सरकारकडून विशेष निधी, संशोधनासाठी चालना, आणि विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यास केंद्रे स्थापन करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या दर्जा मुळे प्राचीन साहित्याचे जतन, राष्ट्रीय पुरस्कार, आणि रोजगाराच्या नवीन संधी (भाषांतर/संशोधन) निर्माण होणार आहेत, ज्यामुळे मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्व जागतिक स्तरावर अधोरेखित
    होत आहे.

    आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने ।
    शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥
    शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन l
    शब्द वाटू धन जनलोका ||२||
    तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
    शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥

    संत तुकाराम महाराजांचा हा अभंग शब्दांचे सामर्थ्य, महत्त्व आणि भाषेची श्रीमंती स्पष्ट करतो. याचा अर्थ असा की, संतांच्या मते शब्द हीच खरी रत्ने (धन) आहेत आणि शब्दच शस्त्रे म्हणून कार्य करतात. या शब्दरुपी संपत्तीचे आम्ही जतन करतो, शब्द हेच आमच्या जीवनाचे आधार आहेत आणि आम्ही समाजात ज्ञानाचे शब्द वाटतो. भौतिक संपत्तीपेक्षा शब्दांची किंमत जास्त आहे, कारण ती ज्ञान आणि भक्ती वाढवते. शब्दांचा वापर करून अज्ञान, अंधश्रद्धा आणि वाईट प्रवृत्तींचा नाश (शस्त्र म्हणून) केला जातो. शब्द हे जीवनाचे मूळ आहेत, ज्यांच्यामुळे आपण संवाद साधू शकतो आणि भक्तीचा आनंद घेऊ शकतो. हे शब्दरुपी धन आपण लोकांमध्ये वाटून (प्रवचन, अभंग, कीर्तन) लोकांचे कल्याण करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की, संत तुकाराम महाराज म्हणतात की, शब्दांमध्येच देव आहे, आणि आपण शब्दांच्या माध्यमातूनच देवाचा गौरव आणि पूजा केली पाहिजे.

    थोडक्यात सांगायचे तर, हा अभंग भाषेचा आदर, शब्दांची अचूक निवड आणि ज्ञान प्रसाराचे महत्त्व अधोरेखित करतो. शब्द हे शक्ती, ज्ञान आणि भक्ती यांचे साधन आहे.

    डॉ बालाजी ज्ञानोबा मुस्कावाड
    9834606821



    डॉ बालाजी मुस्कावाड


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!