13निरागस भावनांचा सुरेल स्वर - आई, लॉकडाऊन म्हणजे काय?
साहित्य, कला, संस्कृती आणि शैक्षणिक क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देणारे, लेखक प्राध्यापक डॉ. धनराज खानोरकर यांचा ‘आई, लॉकडाऊन म्हणजे काय?' हा बालसाहित्यातला नितांत सुंदर असा बालकविता संग्रह आहे. लॉकडाऊनच्या काळातील आठवणी जागवणाऱ्या कवितासंह सुंदर कवितांनी हा कवितासंग्रह सजलेला आहे. प्रा. धनराज खानोरकर यांनी प्रौढ साहित्यामध्ये अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. 'संजोरी' हे अलिकडे प्रसिद्ध झालेले पुस्तकाचा
गोंडवाना विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकात समावेश झाला आहे. लेखक प्रा. धनराज खानोरकर यांनी के ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यपद भूषवलेले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांची प्रस्तावना आणि पाठराखण असलेला हा बालकविता संग्रह समीक्षा पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे.
कवी प्रा. धनराज खानोरकर यांनी प्रस्तुत काव्यसंग्रहामध्ये आमची समू, खारूताई, कॅलेंडरचे दिवस, चांदोमामा उपाशी, चिऊताई सांभाळ जीव, बाहुलेदादा लगीन का रे मोडले? अशा बावण्ण कवितांचा संग्रहात समावेश केला आहे. प्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे पुस्तकाला देखणे रूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण सचित्र असलेले पुस्तक बालवाचकांना आपलेसे करून घेणारे आहे.
कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन लागल्याने घरात बंदिस्त झालेले निरागस बालपण कविने शिर्षक कवितेत मांडले आहे. बालमनातून उमलेले भाव मांडताना कवी लिहितो,
शाळा नाही खेळ नाही, मित्र- मैत्रीणींचा मेळ नाही
परीक्षा नाही पेपर नाही अभ्यास केला नाही
म्हणून गुरुजींची आता थापड नाही
सांजसकाय खाय अन फक्त टी. वी. कडे पाय
आई, हे लॉकाऊन म्हणजे आहे तरी काय?
लहान बालकांमध्ये प्रसिद्ध असणारे डोरेमॉन, शिंचॅन, नोबिता, हिमावारी, छोटा भीम, पिकाचू, हेन्री यांसारख्या कार्टून्सची दुनिया कवीने 'बस करो हेन्री' या कवितेतून कवीने चित्रीत केली आहे. ‘जंगलातला खाऊ’ या कवितेमध्ये कवी जंगलामध्ये मिळणारा रानमेवा शब्दबद्ध करताना लिहितात,
चिंच, आंबा, टेंभूर अन् आवळा
रानमेवा खायला मित्रांना बोलवा
बोर, मोह, चिचबिलीही मस्त
जंगलात आहे वाघोबाची गस्त
निसर्ग आणि मानवाचे नाते कविने 'झाड आणि मुलगा' या कवितेतून अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलगी आणि वडिल यांच्या नात्यातली विन अधोरेखित करताना कवी 'आईसोबत बागेत मला फिरायला न्याल काय?' या कवितेत लिहितात,
परीक्षा माझी झाली बाबा अभ्यास छान केला
शेवटचा आज पेपर माझा खूपच चांगला गेला
आपल्या छकुलीला बक्षीस तुम्ही घाल का?
आईसोबत बागेत मला फिरायला न्याल का?
अशा पद्धतीने एका निरागस बालकाने बागेत फिरायला नेण्याची अपेक्षा आपल्या बाबांकडे व्यक्त केली आहे.
या कवितासंग्रहातील कवितांमधुन कविने मुलांचे भावविश्व, त्यांना पडणारे अनेकानेक प्रश्न, मनातील कल्पनेसोबतच बालमनाला भुरळ घालणाऱ्या विविध पात्र आणि प्रसंग यांची सुरेख गुंफन केली आहे. त्यामुळे आपसूकच या कविता ओठावर रुळतात. चिऊताई, झाड आणि मुलगा यांसारख्या कविता वाचकाला वास्तवतेचे भान देतात. कवितासंग्रहातील कविता वाचताना शब्दांतील गोडव्याने बालमन पाण्यासारखे निर्मळ होऊन जाते. आई, बाबा, ताई आणि दादा यांचे पाय काय करामती करतान याचे वर्णन 'आपले पाय' या कवितेत वाचायला मिळते. कवीच्या शब्दांतच म्हणायचे झाले तर,
पाय बाबाचे कधी जागेवर नाही
शेतावर जायची करतात घाई
त्या पायांच्या कष्टामधूनी
वावरातले सोने घरात येई
अशाप्रकारे पायाचे कष्ट कवीने कवितेतून मांडले आहेत.
झाडावर राहणाऱ्या माकडाच्या लग्नाची सुंदर कल्पना कवीने ‘माकडाचं लग्न' या कवितेत केली आहे. ती वाचताना माकडांच्या विश्वात लग्न कशापद्धतीने होत असेल, याचा विचार मनात येतो. ‘सांग ना गं, आई मला!’ या कवितेमध्ये बालमनाला पडणाऱ्या प्रश्नातून कवीने सुंदर कविता फुलवली आहे. घरातील छोट्यांचा पुरवला जाणारा लाड, घरात सतत सुरु असणारी छोट्यांची उठाठेव, त्यांची दिनचर्या याचे वर्णन करणारी ‘छकुली' ही कविता प्रत्येक घरातल्या छोट्या बाळाचे प्रतिनिधीत्व करते. बालमन खेळण्यांमध्ये जास्त रमतो अशा खेळण्यांमध्ये बाहुली प्रमुख खेळणी असते. कविने ‘बाहुलीचे लगीन’ या कवितेत बाहुलीच्या लग्नाचे वर्णन केले आहे. कवी लिहितात,
लग्नाला येतील वऱ्हाडी बहु
नवरदेव आहे श्रीमंत भाऊ
इवाई-ईइन मग जमणार जोडी
बाहुलीच्या लग्नात नाचेल आजी
कवितासंग्रहातील ‘बालभारतीचे पुस्तक' ही कविता बालभारतीच्या पुस्तकांची आठवण जागवते. कोरोनाकाळामध्ये अनिश्चिततेच्या सावटाखाली शाळाही अनिश्चितकाल बंद राहिल्या. अशावेळी घरात कोंडली गेलेली बालके ‘बापजन्मी अशी सुट्टी कधी भेटणार नाय’ या कवितेतून कोरोना काळातील सुट्टीचे वर्णन वाचताना बालमनावर सुट्यांमुळे झालेले परिणाम दर्शवते. बालमनाचे निखळ मनोरंजन करणे हा बालसाहित्य लेखनाचा मुख्य गाभा आहे. त्याचे पुरेपुर पात्लन करत मनावरील मळभ दूर करून बालमनात नवचैतन्य पेरणारा हा बालकवितासंग्रह वाचकांनी एकदातरी वाचावा असाच आहे. कवी प्रा. धनराज खानोरकर यांच्या या बालकवितासंग्रहाला वाचक भरभरून प्रेम देतील हे मात्र नक्की.
पुस्तकाचे नाव - आई, लॉकडाऊन म्हणजे काय?
कवीचे नाव - प्रा. धनराज खानोरकर
प्रकाशक - समीक्षा पब्लिकेशन
किंमत - १२०/- रु.
समीक्षक - गुलाब बिसेन, ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर)
संपर्क - 9404235191