• 17 June 2026

    पुस्तक समीक्षा

    बालमनाचा जिवलग काव्यमित्र - बालमित्र

    0 41

    बालमनाचा जिवलग काव्यमित्र - बालमित्र

    कवी बाबा जाधव यांचा ‘बालमित्र’ हा पहिलाच बालकविता संग्रह आहे. यापूर्वी त्यांचा भूक आणि अवीट गोडवा चारोळ्यांचा हे प्रौढ कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वर्तमानपत्र आणि दिवाळी अंकातून यापूर्वी या संग्रहातील कविता वाचकांपर्यंत पोहचलेल्या आहेत. या सर्व कविता पुस्तकरूपाने आता बालवाचकांसाठी ‘बालमित्र’ या पुस्तकातून भेटायला आल्या आहेत. सुंदर मुखपृष्ठ आणि संपूर्ण सचित्र मांडणी यामुळे हा बालकवितासंग्रह खूपच आकर्षक झाला आहे. लेखक आनंदहरी यांची सविस्तर प्रस्तावना तर या बालक‌वितासंग्रहासाठी साहित्यिक बा. स. जठार यांनी पाठराखण दिली आहे. एकूण चौतीस बालकवितांचा समावेश असलेल्या आणि न्यू अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक छोट्या दोस्तांसाठी वाचनाची पर्वणी घेऊन आला आहे.

    ‘बालमित्र' या बालकवितासंग्रहाची सुरुवात 'पक्ष्यांचा मेळा' या कवितेने झाली आहे. चिऊ काऊच्या गोष्टीत रमत बालपण समृद्‌ध होत जाते. अशाच चिमणी, पोपट, कबूतर, कोकीळा या घराभोवती सतत पिंगा घालणाऱ्या पाखरांच्या मेळ्याची ही कविता बालकांना पाखरांचा सहवास घडवते. घरात लुडबुड करणारी मांजर ‘आमची मनी' या कवितेतून भेटायला येते. तिची सतत चाललेली लुडबुड बघून मन हरखूण जाते. बालपणीच्या रम्य काळाचे वर्णन 'बालपणीचा काळ' या कवितेतून करताना कवी लिहितात,

    चांदण्यात मुक्त घ्यायचं जेऊन

    आजीच्या गोष्टीस जायचं झोपून

    पावसात खेळायला कागदाची नाव

    प्रत्येक ऋतूची होती ओढ मनात राव

    बालपण हे प्राणी, पक्षी, झाडे यांच्या सहवासात, त्यांच्यासोबत खेळण्याबागडण्या सोबत त्यांची गाणी गोष्टी ऐकण्यात व्यतीत होत असते. अशाच प्राण्यांच्या सभेची कविता वाचताना जंगलातील प्राण्यांच्या गमतीजमतींचे अनुभव देते. 'बालमित्र' या शीर्षक कवितमध्ये कवी बालपणीचे मित्र पोपट, मांजर, कुत्रा आणि चिमणी यांची घरातील दंगामस्तीचे वर्णन करताना म्हणतात,

    एकदा काय झाले, बाबांनी आणला पोपट

    माणसासारखा तो ही बोलू लागला पटपट

    ताईनं आणली मनी, सारखी म्यॉव म्याँव करी

    घरभर मारता फेरफटका, उंदीर झाली गायब सारी

    घरातील पशुपक्ष्यांचे असे अनुभव नियमित येत असतात. या संग्रहातील कविता बालकांच्या रोजच्या अनुभव विश्वातील आहेत. त्यामुळे त्या कविता सतत गुणगुणत राहावे असे वाटत राहाते.

    शाळेचा अभ्यास करुन कंटाळलेल्या बालमनाला ‘सुट्टीची ओढ' ही कविता अवतीभवती फेरफटका मारून आणते. या कवितासंग्रहामध्ये 'स्वच्छता दूत, पुस्तके वाचूया, चल मित्रा श्रम करूया, चला, मुलींना वाचवूया, मन भरून बोला यासारख्खा वेगळ्या धाटणीच्या कविताही वाचायला मिळतात. या कविता वाचल्यावर बालमनात विचारचक्रे फिरवण्याचे काम करतात. बालकांचे भवितव्य घडवणारी शाळेची गोडी लावणारी कविता ‘चला शाळेला जाऊ’ वाचताना शाळारूपी विद्यामंदिरात विद्यार्थी कसा घडतो हे वाचकाला सहज समजते. घरातील मुके प्राणी माणसांना ज्याप्रमाणे जीव लावतात, तसेच मुके प्राणीही माणसांना जीव लावतात. हे कवीने ‘आमचा मोती' या कवितेतून सांगितले आहे. कवी म्हणतात,

    आमचा मोती खूपच छान

    लागला लळा मी होतो सान

    बाबांसोबत शेतात जाई

    रात्र सारी जागत राही

    एकदा घरी शिरले चोर

    टॉम्या भाँ करता पळाले दूर

    दैनंदिन वैयक्तिक अथवा सार्वजनिक जीवनात स्वच्छतेला अत्यंत महत्व आहे. स्वच्छतेचा संस्कार लहान वयात मुलांत रुजवणे गरजेचे आहे. 'स्वच्छता दूत' या कवितेतून कविने स्वच्छतेतून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा मंत्र बालमनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. पाऊस म्हटला की बालमनाचा मोर नाचू लागतो. बच्चेकंपनीला पावसात भिजायला, नाचायला खूप आवडते. अशा मन प्रफुल्लीत करण्यासोबत सृष्टीला हिरवळीचा शालू नेसवणाऱ्या पावसाचे वर्णन कविने 'पाऊस' या कवितेत केले आहे. कवी लिहीतात,

    कडकड कडकड विज चमकता

    ढमढम ढमढम ढोलक वाजती

    टपटप टपटप पडता गारा

    सरसर सरसर सरवे येती

    या कवितासंग्रहातील कवितांमध्ये असलेली शब्दांची लयबद्ध मांडणी वाचकाला कविता गुणगुणायला लावते. फुलपाखरु, वासरू, चिऊताई, बेडूकदादा यांसारख्या कविता अवतीभोवतीच्या सजिवांचा लळा लावतात. संतांनी सांगितलेल्या वसुधैव कुटुंबकम्‌च्या शिकवणीस सर्व प्राणीमात्रांना सामावून घेण्याची भावना या कवितांमधून साध्य होते. हा बालकवितासंग्रह वाचकाशी सहज मैत्री करून घेतो. वाचनाचा आनंद देत लळा लावणारा हा बालकवितासंग्रह वाचकांना नक्की आवडेल असा मला विश्वास आहे.

    पुस्तकाचे नाव - बालमित्र

    कवी - बाबा जाधव

    प्रकाशक - न्यू अथर्व पब्लिकेशन, इचलकरंजी

    मूल्य - ८०/- रु.

    पुस्तक परिचय - गुलाब बिसेन (ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर)

    संपर्क - 9404235191



    Gulab Bisen


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!