11मनोरंजन आणि सुसंस्काराचा सुंदर मेळ - खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी.
समीक्षक - गुलाब बिसेन.
'माझे गाणे आनंदाचे', 'जाणिवांची फुले', 'आई, मी पुस्तक होईन' यांसारख्या दर्जेदार बालसाहित्याचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांचा 'खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी' हा लाडोबा प्रकाशनने प्रकाशित केलेला बालकथा संग्रह. बालकांचे भावविश्व आणि बालसुलभ भाषा यांचा उत्तम मेळ या कथासंग्रहात लेखकाने घातला आहे. या कथासंग्रहामध्ये एकुण बारा कथांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी यांची आटोपशीर प्रस्तावना या संग्रहाचे साहित्यमूल्य वाढवते.
'खारूताईचे जंगल झाणि इतर गोष्टी' या कथासंग्रहामध्ये खारुताईचे जंगल, आजी आणि चिमणी, कॉल केला की हजर, दोन चिमण्या, आभाळाची फुले, कापसाची पोर, मधुने वाचवला वड, मोहिम फत्ते अशा वाचनीय कथांचा समावेश आहे. लेखक डॉ. कैलास दौंड यांची बालसाहित्यावर असलेली पकड या कथांच्या मांडणीवरून लक्षात येते. बालसुलभ विषयांना मूल्यांची दिलेली जोड ही या कथासंग्रहाची जमेची बाजू म्हणावी लागेल.
शीर्षक कथा असलेल्या 'खारूताईचे जंगल' या कथेतील विसरभोळ्या खारुताईचे 'नेकी कर दर्या मे डाल' हा गुण अनुकरण्यासारखा आहे. अडचणीच्या काळात खायला उपयोगात येतील म्हणून बिया पुरून ठेवणारी खारुताई, उन्हाळ्याच्या दिवसात गरजेच्या वेळी बिया कुठे लपवल्या तेच विसरून जाते. आणि पुढे पाऊस पडल्यावर त्या पुरुन ठेवलेल्या बिया अंकुरल्यावर खारूताईला आपण बिया पुरल्या एकीकडे आणि शोधत होतो दुसरीकडे याची होणारी जाणीव तिच्या विसराळूपणातही तिच्या उदात्त हेतूची जाणीव करून देते. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी झाडांची लागवड ही आपणच करू शकतो किंवा करतो असा टेंभा मिरवणारा माणूस नावाचा प्राणी खारुताईच्या कृतीपुढे किती खूजा आहे, याची खारूताई आपल्या कृतीतून जाणीव करून देते.
महापुरामध्ये भिजलेले गहू फेकून न देता ते वाळवून पाखरांसाठी ठेवणारी ममता आजी 'आजी आणि चिमणी' या कथेतून वाचायला मिळते. शहरातील झगमगाटी, सुखवस्तू जीवनाला भूललेली रिंकी चिमणी आणि गावातील कष्टप्रद परंतु समाधानी आणि आरोग्यदायी जीवनात सुखाने राहणारी पिंकी चिमणी यांच्यातील द्वंद्व वाचताना वाचक आपसूकच अंतर्मूख होतो.
समाजामध्ये अंधश्रद्धेचा खेळ मांडणारे भोंदूबाबांचे कारनामे अधूनमधून आपल्या वाचनात येतच असतात. साध्याभोळ्या जनतेला श्रद्धेच्या आडून अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलून लुबाडणारे अनेक भोंदूबाबा दिवसागणीक बघायला मिळतात. अशाच एका भोंदूबाबाचा पर्दाफाश करणारा धाडशी अरुण 'मोहिम फत्ते' या कथेत भेटतो. तो आपल्या सद्विवेकबुद्धिच्या जोरावर भोंदूबाबाची फसवेगीरी ओळखून पोलिसांना खबर देतो आणि भोंदूबाबाला पोलिसांच्या हवाली करतो. याची रंजक कथा वाचकाचा विज्ञानवादी दृष्टीकोन जागृत करते.
आईबाबांकडे हट्ट धरत दारात फुलाचे रोप लावणा-या निरागस सारीकाच्या मनातील कुतूहल 'आभाळाची फुले' या कथेतून वाचायला मिळते. घरी लावलेल्या रोपाला कळी आल्यानंतर होणारा आनंद तिच्या निरागस मनाचे प्रतिबिंब दाखवते. आकाशात जमणार्या पांढऱ्या ढगांना आकाशाची फुले संबोधणारी छोटी सारीका बालवाचकाला सभोवतीच्या निसर्गाचा लळा लावल्याशिवाय राहत नाही. या बालकथासंग्रहातील खारूताईचे जंगल, दोन चिमण्या, आभाळाची फुले, मला नको मोराचे पीस, मधुने वाचवला वड इ. कथा वाचकाचे पर्यावरणाशी नाते जोडण्यासोबत समृद्ध भविष्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. आजी आणि चिमणी, मोहिम फत्ते, कापसाची पोर या कथांतून लेखकाने बालमनावर सुसंस्कारांची रुजवण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. हा कथासंग्रह वाचताना पानोपानी लेखकाने चांगल्या विचारांची केलेली पेरणी अनुभवायला मिळते. मनोरंजनासोबत कुतूहल, जिव्हाळा, प्रेम, परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्याचा लेखकाने आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या कथा निखळ मनोरंजनासोबत सुसंस्कारांची शिदोरी देण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
परिस्थतीची जाणीव झाल्यामुळे आई बाबांच्या कपड्यांसाठी शनिवार रविवारला दुसऱ्यांच्या शेतात कापूस वेचून पैसे जमवणारी रामा आणि सीमा ही भावंडं वाचकाच्या मनात कायमचे घर करून जातात. कपड्यांसाठी साठवलेले पैसे मुलांच्या सहलीला देणारे आईबाबा आणि आपल्या आईबाबांच्या कष्टांची जाणीव ठेवणारी रामा आणि सीमा ही लेकरं 'कापसाची पोर' या कथेतून वाचताना डोळ्यांच्या पापण्या पाणावून सोडतात. यासोबतच या बालकथासंग्रहामध्ये मोबाईलच्या आहारी गेलेला रामू 'कॉल केला की हजर' या कथेतून भेटतो. आजच्या मोबाईलच्या काळात मोबाईलचे जडलेले व्यसन किती विघातक पातळीवर पोहचलेले आहे, याची जाणीव करून देतो. 'मधूची धमाल आणि जादूगारांची फजिती, माणसाची मुक्तता, पहिल्या भाषणाचे पहिले बक्षिस यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या कथा वाचकाला आपल्याशा करून जातात. कथांचा आशय आणि त्यांची लेखकाने केलेली मांडणी, कथांना समर्पक असलेली चित्रे, आकर्षक मुखपृष्ठ आणि लाडोबा प्रकाशनाची उत्तम निर्मिती यांचा सुरेख मेळ यामुळे हा बालकथासंग्रह आकर्षक आणि वाचनीय झालेला आहे. बालवाचकांना तो नक्की आवडेल.
पुस्तकाचे नाव - खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी
लेखकाचे नाव - डॉ. कैलास दौंड
पुस्तकाचा प्रकार - बालकथासंग्रह
प्रकाशक - लाडोबा प्रकाशन
किंमत- 100 रु.
समीक्षक - गुलाब बिसेन, ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर)
मो.नं. - 9404235191