6प्रभावी वक्ते, कुशल संघटक व पर्यावरण प्रेमी नेते - बसवराज म. पाटील नागराळकर
आदरणीय साहेब ,
आपल्यासारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्व
लाभणे हे आमचे भाग्य.
आपल्या प्रत्येक शब्दांत मार्गदर्शन
आणि कृतीत शिस्त असते.
आपले नेतृत्व असेच कायम राहो .
याच वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीरचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी उदगीरचे अध्यक्ष तथा कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था उदगीरचे अध्यक्ष मा. श्री. बसवराज मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर यांची महाराष्ट्रात तत्त्वज्ञ राजकारणी, उत्तम प्रशासक ,अभ्यासू व्यक्तिमत्त्व , प्रभावी वक्ते, कुशल संघटक व पर्यावरण प्रेमी नेते म्हणून ओळख आहे.
मा. बसवराज म. पाटील नागराळकर साहेबांचा जन्म ०१ जानेवारी १९५६ रोजी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील नागराळ या छोट्याशा गावात झाला. महाराष्ट्रात नागराळकर साहेबांची प्रभावी वक्ते, कुशल संघटक, शिस्तप्रिय नेता, सहकार, लोकप्रशासन, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या इत्यादीचा व्यासंग असलेले राजकीय नेते अशी प्रतिमा आहे.
लाखोंच्या सभा आपल्या वक्तृत्वाने जिंकणारा, संघटन कौशल्यात स्वतःचा मानदंड निर्माण करणारा, सर्व राजकीय पक्षात वैयक्तिक मैत्री जपणारा नेता म्हणूनही ते सर्वांना परिचित आहेत.
त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण उदगीर मधील श्यामलाल हायस्कुलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण उदयगिरी महाविद्यालयात झाले. लोकप्रशासन या विषयात त्यांनी एम.ए. केले. शालेय जीवनापासून त्यांना वक्तृत्व, राजकारण व अभिनय या क्षेत्रात आवड होती. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे उदगीर येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेची स्थापना झाली. या माध्यमातून उदगीर परिसरातील नाट्य प्रेमिंना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या नाट्य परिषदेच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कार्यक्रम उदगीर येथे आयोजित करुन नाट्यप्रेमिंना मेजवानी साहेबांनी दिली आहे.
महाविद्यालयीन जीवनापासून त्यांना राजकारणात आवड आहे. ते म्हणतात, राष्ट्र विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांत सामाजिक बांधिलकीची जाणीव असायला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात प्रशिक्षित व जबाबदार माणसांची आवश्यकता आहे. प्रत्येक क्षेत्रात क्षमता असलेली माणसे तयार झाली पाहिजेत. त्यासाठी योग्य नियोजन, संवाद, कौशल्याचा विकास, परस्पर सामंजस्य व योग्य बांधणी करुन कृतिशील कार्यक्रम राबविण्यावरच त्यांचा भर असतो.
2025 मधील उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नागराळकर साहेबांनी त्यांचा मुलगा श्री चंदन पाटील सरांना नगरसेवक म्हणून निवडून आणले. यावेळी त्यांच्या अंगातील संघटन कौशल्याचा परिचय संपूर्ण उदगीरकरांना झाला.
उदगीर येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२२ मध्ये पार पडले. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बसवराज मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर हे होते. या संमेलनाच्या यशस्वीतेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. उदगीर येथे दि. २२ ते २४ एप्रिल २०२२ या कालावधीत संपन्न झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे उदगीरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे कार्य केले आहे. या तीन दिवसांत उदगीर येथे महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी ,
विद्यार्थ्यांनी साहित्य, कला, संगीत,नाट्य याचा आस्वाद घेतला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या, माझ्या मराठी मातीचा ,लावा ललाटास टिळा, हिच्यासंगे जागतील ,मायदेशांतील शिळा, या ओळीप्रमाणे माय मराठीचा हा अमृत कलश पुढच्या पिढीला सोपविण्यासाठी संमेलनातून मंथन करण्यात आले. ते नेहमी म्हणतात, मराठी भाषेचे जतन संवर्धन करणे हे आमच्या प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना लेखन करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न समोर येणे आवश्यक आहे. तरच समाजाचा विकास साधला जातो. या संमेलनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, अशी मागणी करण्यात आली आणि भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि मराठी भाषेला देशपातळीवर मान्यता मिळाली, ही आपल्यासाठी एक अभिमानाची व गौरवाची बाब आहे.
नागराळकर साहेब नेहमी म्हणतात, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या नागराळ या गावी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेटावर एक लाख वृक्षाची लागवड करुन घेतली आहे. त्यानंतर एका वर्षानंतर त्याच वृक्षाची पूजा करुन वृक्षाची वाढ किती झाली ? याची पाहणी केली.
तसेच श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारचे हजारो वृक्षाची लागवड करुन घेतली आहे. या परिसरातील वृक्षांची पाहणी करुन महाराष्ट्र शासनाने वनश्री पुरस्कार सैनिकी विद्यालयास प्रदान केला .
उदगीर येथे नागराळकर साहेबांनी सैनिकी विद्यालयाची स्थापना करुन या परिसरातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले आहे. या विद्यालयातून अनेक विद्यार्थी भारतीय सैन्यात , प्रशासकीय सेवेत, डाॅक्टर , इंजिनिअर , शिक्षक, प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सैनिकी विद्यालयाचे कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात. क्रीडा, एनसीसी, स्काऊट गाईड, स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रात सैनिकी विद्यालयाचे विद्यार्थी उत्कृष्ट प्रदर्शन करत असतात. ते नेहमी शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणतात, सैनिकी विद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी समाजातील चांगला नागरिक बनला पाहिजे. त्याच्या अंगी शिस्त, संस्कार, मोठ्यांचा आदर करणे, सहानुभूती, सहकार्याची भावना इ. गुण जोपासण्यासाठी प्रयत्नशील असावे. सैनिकी विद्यालयाचा दरवर्षी दहावी, बारावी व एनसीसीचा शंभर टक्के निकाल लागतो. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी प्रत्येक सराव परीक्षेसाठी हजारो रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत.प्रत्येक वर्षी अशा पाच सराव परीक्षा घेतल्या जातात. सराव परीक्षेवर इतकी मोठी बक्षिसं देणारे पहिलेच संस्थाचालक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यामुळेच विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन करत असतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पहिली कमाई व पैशाचे महत्त्व समजले पाहिजे, ही भावना नागराळकर साहेबांची आहे. यातून त्यांची अंगी किती दूरदृष्टी आहे, याची जाणीव आपल्याला होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात, शालेय जीवनात वर्तमानपत्र विकुन केलेली पहिली कमाई याचे महत्त्व जेव्हा राष्ट्रपती पदावर असताना पन्नास वर्षांनंतर मागे वळून पाहिल्यानंतर त्या कमाईचे महत्त्व , यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे,याची जाणीव होते.
तत्वज्ञ राजकारणी, उत्तम प्रशासक, अभ्यासू व्यक्तिमत्त्व व आपल्या जीवनात कायम शिस्त आणि स्वच्छता याचे पालन करणारे श्री नागराळकर साहेब यांना जनसेवेसाठी निरोगी दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या व नूतन वर्षाच्या साहेबांना हार्दिक शुभेच्छा!
डॉ. बालाजी ज्ञानोबा मुस्कावाड