• 25 September 2026

    गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या…

    गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या…

    0 6



    गणपती बाप्पा मोरया!
    पुढच्या वर्षी लवकर या…

    मला येऊन आज दहा दिवस झाले…पण खरंच सांगतो, हे दहा दिवस कसे गेले हे कळलंच नाही.

    तुमचा उत्साह, तुमचं प्रेम, तुमची भक्ती आणि माझ्यासाठी केलेली धावपळ पाहून मन खरंच भरून आलं. प्रत्येक घरात, प्रत्येक मंडळात, प्रत्येक रस्त्यावर माझ्यासाठी केलेला उत्सव पाहताना खूप आनंद झाला.

    पण यावेळी जाताना मनात थोडीशी खंतही आहे…

    मला एक गोष्ट विचारायची आहे —
    मी तुमच्याकडे येतोय की तुम्ही माझ्यासाठी माझ्यापेक्षा मोठा उत्सव उभा करत आहात?

    कुठे DJ साठी उपोषण करणारे माझे कार्यकर्ते पाहिले…
    कुठे मोठमोठ्या मंडळांमध्ये दर्शनासाठी तीन वेगवेगळे दरवाजे पाहिले —
    एक VIP साठी, एक VVIP साठी आणि एक सर्वसामान्यांसाठी.

    पण माझ्याकडे?

    माझ्याकडे एकच दरवाजा आहे…
    आणि तो सगळ्यांसाठी कायम खुला आहे.

    माझ्यासमोर ना VIP, ना VVIP, ना सामान्य.

    माझ्यासाठी सगळे सारखेच.

    काही ठिकाणी माझ्या मंडळातीलच कार्यकर्त्यांमध्ये अहंकार, Ego आणि “मी”पणा पाहायला मिळाला.
    “तो आला तर मी येणार नाही…” “त्याच्यामुळे मी काम करणार नाही…”
    अशा छोट्या छोट्या गोष्टींनी माझ्या उत्सवातच मनं दुरावलेली पाहिली. काही ठिकाणी माझ्या नावाने उत्सव करताना व्यसनांचाही अतिरेक पाहायला मिळाला. आणि अजून एक गोष्ट मनाला लागली…

    मोबाईल आणि सोशल मीडिया!

    माझी आरती सुरू आहे, माझ्यासमोर दिवा लावला आहे,
    पण काही जण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत.

    कोणी Chanting करत आहे,
    कोणी Video बनवत आहे,
    कोणी Status टाकत आहे,
    तर कोणी माझ्यासोबतचा फोटो जगाला दाखवण्यात व्यस्त आहे.

    पण मला एक सांगा…

    तुम्ही मला दाखवत आहात की जगाला दाखवत आहात?

    माझ्या आगमनासाठी मला मोठमोठ्या सजावटींची गरज नाही.
    मला मोठमोठ्या DJ ची गरज नाही.
    मला झगमगती Lightingची गरज नाही.

    मला फक्त…

    एक मनापासून केलेली प्रार्थना,
    दोन क्षणांची शांत भक्ती,
    आणि मनापासून केलेला एक नमस्कार…

    एवढंच पुरेसं आहे.

    माझ्यासाठी वर्गणी गोळा करताना कोणाच्या घरावर ओझं टाकू नका.
    माझ्यासाठी खर्च करताना कोणाचं मन दुखवू नका.
    माझ्या नावाने उत्सव करताना एकमेकांमध्ये भांडू नका.

    कारण मला सजवलेला मंडप नकोय…

    मला सजलेली माणसं हवी आहेत.

    मला मोठा आवाज नको…

    मला मोठी मनं हवी आहेत.

    मला हजारो मोबाईलचे Camera नकोत…

    मला काही क्षण मनापासून माझ्याकडे पाहणारे डोळे हवेत.

    आणि मला माझ्या नावावरचा अहंकार नको…

    मला माझ्या नावाने एकत्र आलेली माणसं हवी आहेत.

    यावेळी जाताना एवढंच सांगतो…

    या दहा दिवसांत जे पाहिलं, त्याचा थोडासा विचार करा.

    काही बदल करावासा वाटला तर करा…
    नाही वाटला तर काही हरकत नाही…

    तुमचा उत्सव आहे, तुमची इच्छा आहे…
    चालू द्या आपलं असंच!

    पण पुढच्या वर्षी जेव्हा मी पुन्हा येईन ना…

    तेव्हा मला मोठी सजावट नको,
    मोठा DJ नको,
    मोठी Lighting नको…

    फक्त थोडी अधिक माणुसकी,
    थोडी कमी स्पर्धा,
    थोडा कमी अहंकार,
    थोडी अधिक भक्ती
    आणि मनापासून केलेला एक नमस्कार हवा.

    आता निघतो…

    तुमचा उत्साह, तुमचं प्रेम आणि तुमची भक्ती मनात घेऊन.

    पुढच्या वर्षी पुन्हा येईन…
    पण यावेळी मला तुमच्या सजावटीपेक्षा
    तुमची मनं पाहायला आवडतील.

    गणपती बाप्पा मोरया!
    पुढच्या वर्षी लवकर या!



    राहुल (दाद्या) बळीराम निंबाळकर
    Gold Medalist Engineer | Printing & Packaging Professional | Author | Motivational Speaker.















    राहुल निंबाळकर


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!