• 19 June 2026

    पुस्तक समीक्षा

    लहानग्यांसाठी आनंद, साहस आणि संस्कारांचा खजिना - चिंटू अस्वल आणि त्याचे घर

    0 7

    लहानग्यांसाठी आनंद, साहस आणि संस्कारांचा खजिना - चिंटू अस्वल आणि त्याचे घर

    - गुलाब बिसेन

    कविता, कथा, कादंबरी, ललित, बालसाहित्य अशा विविध लेखनप्रकारांमध्ये सकस लेखन करणारे प्रसिद्ध लेखक, कवी रवींद्र जवादे यांचा 'चिंटू अस्वल आणि त्याचे घर' हा बालकांसाठीचा कथासंग्रह वाचनात आला. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांची प्रस्तावना असलेला हा बालकथासंग्रह मुलांच्या भावविश्वाला पुरक असलेल्या कथा, सुंदर मुखपृष्ट आणि संपूर्ण रंगीत सचित्र मांडणी यामुळे अधिकच आकर्षक झाला आहे.

    या पुस्तकामध्ये 'चिंटू अस्वल आणि त्याचे घर' या शिर्षक कथेसोबत एकूण सहा कथांचा समावेश आहे. चिंटू अस्वल आणि त्याचे घर, पूर, प्रवेश निषेध, चारुलता शाळेत जाते, डिनो, जादूचा कंपास या सहाही कथांमध्ये विषयांची विविधता आहे. शिर्षक कथेतील चिंटू अस्वल त्याचे मित्र ससोबा आणि मयंक नावाच्या हरिणासोबत जंगलात राहतो. एक दिवस जोराच्या वादळाने तो ज्या झुडुपाच्या आडोशाने राहायचा ते झुडूपच उखडून नेलं. त्यावेळी त्याला स्वतः च्या घराची जाणीव झाली. त्यावेळी त्याला आपले जिवाभावाचे मित्र साथ देतील अस वाटलं. परंतू मित्रांनी निराशा केली.

    आश्रयाच्या शोधात भटकणारा चिंटू जवळच्या नविन जंगलात आपले घर कसे बनवतो याची रंजक कथा वाचकाला खिळवून ठेवते. कालांतराने पूर्वीच्या जंगलात कोरडा दुष्काळ पडल्यावर पूर्वीचे चिंटूचे मित्र आश्रयाच्या शोधातच चिंटूला कसे शोधतात. तिथे चिंटूच्या घरावर पाटी लावलेली असते, त्यावर लावलेला मजकुर, चिंटू मित्रांना घरात प्रवेश देतो की नाही हे सारे वाचताना उत्कंठा शिगेला पोहचते. ही कथा वाचताना वाचकाला चिंटूच्या मनाची उदारता, मोठेपणा, त्याची क्षमाशील वृत्तीचे दर्शन घडते.

    गावाजवळून वाहणाऱ्या नदिला आलेल्या पूरात वाहून गेलेल्या शुभमला वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावणारा आणि त्याला वाचवणारा जिगरबाज नितीन 'पूर' या कथेतून भेटतो. तो पट्टिचा पोहणारा असला तरी पूराच्या पाण्यात पोहताना त्याचा कस लागतो. पुरामध्ये वाहून गेलेल्या शुभमला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या नितीनची ही कथा वाचताना अंगावर शहारे येतात. पृथ्वीवरील सुंदर जंगल नष्ट करण्यासाठी आसुसलेला माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असताना, वन्य प्राण्यांच्या जंगलात भरलेल्या सभेच्या माध्यमातून डोळे उघडण्याचा प्रयत्न लेखकाने 'प्रवेश निषेध' या कथेत केला आहे. भरमसाठ जंगलतोड करत असलेल्या माणसाला जंगलात प्रवेशबंदी करणारे प्राणी अडाणी माणसाला शहाणपणा शिकवताना जंगलात 'प्रवेश निषेध'ची पाटी लावतात. हे वाचताना वाचकाचे डोळे आपसूकच उघडले जातात.

    चारुलता या हुशार आणि गुणी मुलीला शाळेच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे वाघ गुरुजी, तिच्या शिक्षणासाठी पैसे गोळा करणारे इतर शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थी आपल्याला 'चारुलता शाळेत जाते' या कथेतून भेटतात. गुणी चारूलताचे अभ्यासासोबत इतरांना मदत करण्याचे किस्से या कथेतून वाचताना वाचकाच्या मनात मदतीचा भाव निर्माण होतो. सातव्या वर्गात शिकणारी, वर्गाची मॉनिटर असणारी चारुलता बालवाचकासांठी एक रोल मॉडेलप्रमाणे लेखकाने रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. रस्त्यावरच्या वाहनांमुळे जखमी झालेला 'डिनो' नावाचा पोपट, त्याला प्राण्यांच्या दवाखान्यात नेणारे प्रभाकर काका, प्राणी पक्ष्यांना बंदी बनवून पाळणे कायद्याने गुन्हा असतानाही पोपटाला दहा हजारात विकत घेऊन पाळणारा मालक आणि माणसारखं बोलण्यामुळे माणसांच्या कैदेत सापडल्याची पोपटाला होणारी जाणिव 'डिनो' या कथेतून वाचताना बंदी बनवून पाळल्याजाणाऱ्या प्राण्यांची व्यथा मांडते.

    अभ्यासात हुशार असलेल्या प्रज्वलला जादुचा कंपास भेटल्यावर परीने सांगितल्याप्रमाणे अवाजवी मागणी न करता त्या जादूच्या कंपासाचा उपयोग इतरांच्या मदतीसाठी कसा करतो. याची रंजक कथा 'जादूचा कंपास' या कथेतून वाचायला मिळते. जादूच्या कंपासाने तो काय काय करतो हे वाचणे खूप रंजक आहे. या कथासंग्रहांमध्ये विषयांची विविधता आहे. प्राणी, पक्षी, मुले यांच्या रोजच्या जगण्यातल्या कथा असल्यामुळे त्या वाचकाला आपल्याशा वाटतात. या कथांमधून लेखकाने कोणत्याही प्रकारचा उपदेश न करता वास्तवतेला धरून कथांची केलेली रचना या बालकथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. छोट्या दोस्तांसोबत मोठ्यांनाही आवडेल असा हा बालकथासंग्रह वाचनाची सुंदर मेजवानी ठरेल असाच आहे.

    पुस्तकाचे नाव - चिंटू अस्वल आणि त्याचे घर
    लेखकाचे नाव - रवींद्र जवादे
    पुस्तकाचा प्रकार - बालकथासंग्रह
    प्रकाशक - परिस पब्लिकेशन
    किंमत - २०० रु.
    समीक्षक -गुलाब बिसेन
    मो. नं. 9404235191



    Gulab Bisen


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!