11दापूर ते दिल्ली - बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा साहित्य प्रवास उलगडणारा दस्ताऐवज
मराठी बालसाहित्यावर आपल्या साहित्य लेखनाने मोहिनी घालणारे आणि त्यामुळेच प्रत्येक घराघरात पोहचलेले बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड हे सुपरिचीत आहेत. आव्हाड उत्तम कवी असून त्यांच्या बालकवितांनी वाचकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तसेच ते उत्तम बालकथाही लिहीतात, सोबतच कविता वाचन आणि कथाकथनाच्या माध्यमातून बालकांचे मनही रिझवतात. अशा या महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेल्या बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या साहित्य प्रवासाचा उलगडा करणारे दापूर ते दिल्ली हे संपादक ज्योती कपिले यांनी संपादित केलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे.
बालसाहित्याचे व्रत घेतलेले एक व्रतस्थ साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा नाशिक जिल्ह्यातील दापूरपासून सुरू झालेला साहित्य प्रवास साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंत पोहचलेला आहे. त्यांच्या या साहित्य प्रवासाची थक्क करणारी कहाणी वाचकाला या पुस्तकातून समजून घेता येईल. एकनाथ आकाड यांच्या प्रकाशित पुस्तकांपैकी एकवीस पुस्तकांचा वेगवेगळ्या समिक्षकांनी करून दिलेला परिचय या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. यामध्ये डॉ. विजया वाड, अजित राहुल, मंगेश पाडगावकर शिरीष पै, डाॅ. कैलाय दौंड, ज्योती कपिले, बबन शिंदे, गुलाब बिसेन, अनुराधा नेरूरकर, उत्तम कोळगावकर आदी मान्यवर लेखकांनी त्यांच्या पुस्तकाचा परिचय करून दिलेला आहे. या पुस्तकांच्या परिचयातून एकनाथ आव्हाड यांची बालसाहित्य लेखनातील संवेदनशीलता, लेखनातील त्यांचे वेगवेगळे प्रयोग, बालकेंद्री लेखनाचा त्यांचा दृष्टिकोण, बालसाहित्यावर असलेली त्यांची निष्ठा, बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यादृष्टीने त्यांचे होणारे प्रयत्न इत्यादीची ओळख वाचकाला यातून होते.
बालमन हे अत्यंत संवेदनशील, हळवे, निरागस असते. त्यामूळे बालकांना आवडतील, त्यांचे मनोरंजन करतील, नकळत चांगले संस्कार करतील आणि जाताजाता मनावर आनंदाची एक लकेर ओढून जातील अशा एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता वाचकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचे बोधाई, गंमतगाणी हे अगदी सुरुवातीच्या लेखनाचे तर अगदी अलीकडील साहित्य अकादमी पुरस्काराची मोहर उमटवणारा 'छंद देई आनंद' हे कवितासंग्रह वाचताना वाचक त्या कवितांमध्ये अक्षरश: हरवून जातो. आनंदाची बाग, एकदा काय झालं!, खळाळता अवखळ झरा यांसारखे कथा संग्रह वाचकाच्या मनात घर करून राहतात. एकनाथ आव्हाड यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कविता, कथेबरोबरच ते काव्यकोडी, नाट्यछटा हे लेखन प्रकारही तितक्याच ताकदीने हाताळतात.
दापूर ते दिल्ली या पुस्तकाच्या दुसऱ्या विभागामध्ये एकनाथ आव्हाड यांच्या मुलाखती आणि त्यांच्यावर मान्यवरांनी लिहीलेले लेख यांचा समावेश आहे. एकनाथ आव्हाड यांच्या मुलाखतीतून त्यांचा दापूर ते दिल्ली व्हाया मुंबई असा झालेला साहित्य प्रवास थक्क करणारा आहे. बालसाहित्य लेखनामागची त्यांची भूमिका, जीवनातील त्यांचा संघर्ष, या संघर्षतून फुललेले त्यांची जीवन, त्यांची कविता लेखनामागची प्रेरणा, पहिली कविता लेखन ते पुस्तक प्रकाशन या प्रवासाची कहानी अत्यंत प्रेरणादायी आहे.
मुलाखत या विभागामध्ये प्रा. डॉ. नरेंद पाठक, ऋचा ठाकूर यांनी घेतलेल्या मुलाखती एकनाथ आव्हाड यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या आहेत. लेखमाला विभागातील डॉ. सुमन नवलकर, गिरिजा कीर, डाॅ. किशोर सानप, विनीता ऐनापुरे, माधवी कुटे, मेधा पाटकर या मान्यवरांनी त्यांच्या लेखांतून एकनाथ आव्हाड यांची बालसाहित्यिक म्हणून करून दिलेली ओळख तसेच त्यांची कन्या कु. वैष्णवी एकनाथ आव्हाड हिने लिहीलेला 'बाबांचा सहवास, फुलवी आनंदांची बाग' हा लेख एक वडिल म्हणून एकनाथ आव्हाड यांची ओळख करून देणारा आहे. चित्रकार संतोष घोंगडे यांनी केलेल्या समर्पक मुखपृष्ठामुळे पुस्तक अधिक बोलके झाले आहे. बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या साहित्यप्रवासाचा हा दस्ताऐवज प्रत्येकाने आपल्या संग्रही जपून ठेवावा असाच आहे.
पुस्तकाचे नाव - दापूर ते दिल्ली
संपादक - ज्योती कपिले
प्रकाशक - जेके मिडिया, ठाणे
किंमत - २३० रू.
परीक्षण - गुलाब बिसेन
संपर्क - 9404235191