13
शेवटचा घास…
पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. पूर्व क्षितिजावर लालसर केशरी रंग अलगद पसरत होता. पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची चाहूल लागली होती. दूरवर एखाद्या बैलाच्या गळ्यातील घंटा मंद आवाजात वाजत होती. पण त्या सकाळीतही एक उदास शांतता होती. कारण जमिनीवर दवबिंदू नव्हते... मातीवर ओल नव्हती... आणि शेतकऱ्याच्या डोळ्यांत आशेची चमकही उरली नव्हती.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तुळशी हे छोटंसं गाव, दुष्काळाशी जणू जन्मोजन्मीचं नातं जोडलेलं. आभाळाकडे डोळे लावून जगणाऱ्या माणसांचं गाव. गावात शिरताच मातीची घरं, अंगणात बांधलेली जनावरं, विहिरीवर पाण्यासाठी लागलेली रांग आणि प्रत्येक चेहऱ्यावर उद्याच्या दिवसाची काळजी दिसायची. तरीही या गावाची एक ओळख वेगळी होती, घरात अर्धी भाकरी असली तरी दारात आलेला माणूस कधी उपाशी परत गेला नव्हता. याच गावात राहत होता धोंडीराम जाधव. वय पंचावन्नच्या आसपास. उन्हाने रापलेला चेहरा, कपाळावर खोल गेलेल्या सुरकुत्या, हातावर कष्टांच्या घट्ट रेषा आणि डोळ्यांत विलक्षण माया. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता; पण हार नव्हती.
त्याच्याकडे अवघी पाच एकर जिरायती जमीन होती. ती जमीन त्याच्यासाठी मालमत्ता नव्हती; ती त्याची आई होती. तो नेहमी म्हणायचा,
"जमीन विकत घेतली जात नाही रे…. ती जपली जाते. आपल्या बापजाद्यांनी घाम गाळून ही माती जिवंत ठेवली आहे. आपण तिचे फक्त रखवालदार आहोत."
घरात पत्नी राधाबाई. शांत, कष्टाळू आणि संसाराचा खरा आधार. स्वतःच्या वाट्याचं दुःख कधीच ओठांवर न आणणारी. घरात धान्य कमी असलं तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी होत नसे.
मात्र निसर्गाने सलग तिसऱ्या वर्षीही पाठ फिरवली होती. शेतात पेरलेलं बियाणं उगवण्याआधीच उन्हाने जळून गेलं होतं. विहिरीचा तळ दिसू लागला होता. जनावरांच्या डोळ्यांतही तहानेची वेदना दिसत होती.
दर संध्याकाळी धोंडीराम शेताच्या बांधावर उभा राहून आकाशाकडे पाहायचा. काळे ढग दिसले की त्याच्या चेहऱ्यावर आशेची एक रेष उमटायची; पण काही क्षणांतच ते ढग वाऱ्यासोबत निघून जायचे. त्या ढगांसोबत त्याची आशाही दूर उडून जायची...
त्या दिवशी सकाळपासूनच धोंडीरामच्या मनात एक अज्ञात अस्वस्थता होती. शेतात जायचं म्हणून तो घराबाहेर पडला, पण पावलं पुढे पडत नव्हती. शेतात उभं असलेलं पिक नव्हतंच; उभ्या होत्या फक्त तडकलेल्या जमिनीच्या भेगा. जणू त्या भेगा जमिनीत नव्हत्या, तर त्याच्या काळजात पडल्या होत्या.
त्याने मातीचा एक चिमूटभर ढेकूळ हातात घेतला. मुठ घट्ट आवळली. पण ती मातीही हातातून निसटून खाली पडली. धोंडीरामच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. "किती दिवस अजून परीक्षा घेणार आहेस रे देवा?" तो आकाशाकडे पाहत पुटपुटला.
सायंकाळी तो घरी परतला. अंगणात नेहमी धावत येणारी गाय आज शांत उभी होती. पाण्याच्या रिकाम्या टाकीकडे पाहत होती. गोठ्यातला बैलही निस्तेज दिसत होता. मुक्या जनावरांच्या डोळ्यांतली भूक माणसांच्या भुकेपेक्षा अधिक वेदनादायी असते. घरात शिरताच त्याने राधाबाईकडे पाहिलं. ती चुलीजवळ बसली होती. चुलीत निखारे होते; पण भांड्यात काहीच नव्हतं. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. काही शब्द बोलण्याची गरजच नव्हती. राधाबाई हळू आवाजात म्हणाली,
"घरात फक्त दोन भाकऱ्या होतील एवढंच पीठ उरलंय... आणि एक कांदा. उद्या सकाळी काय करायचं... मला खरंच कळत नाही." धोंडीरामने एक दीर्घ श्वास घेतला. "जे आपल्या नशिबात असेल ते होईल... पण आज आईला आणि जनावरांना आधी खाऊ घाल." राधाबाईच्या डोळ्यांत पाणी आलं. "आणि तुम्ही?" धोंडीराम हलकंसं हसला. "शेतकरी उपाशी झोपू शकतो गं... पण आपल्या माणसांना उपाशी बघू शकत नाही." राधाबाईने काही उत्तर दिलं नाही. तिने अलगद दोन भाकऱ्या भाजल्या. मिरचीचा ठेचा, अर्धा कांदा आणि माठातलं शेवटचं पाणी. इतक्यात... आकाशात अचानक विजा चमकल्या. वाऱ्याचा वेग वाढला. धुळीचे लोट उठू लागले. काही क्षणांत काळेभोर ढग आभाळभर पसरले. धोंडीराम घराबाहेर आला. त्याने दोन्ही हात जोडले. "विठ्ठला... यावेळी फक्त ढग नकोत... दोन थेंब पाऊसही दे." पहिला थेंब त्याच्या हातावर पडला. मग दुसरा. क्षणातच मुसळधार पाऊस सुरू झाला. राधाबाई आनंदाने अंगणात धावत आली. "धोंडीरामा... पाऊस... खराखुरा पाऊस!" दोघांच्या चेहऱ्यावर कित्येक महिन्यांनी हास्य उमटलं. पण निसर्गाच्या आनंदाइतकाच नियतीचा खेळही अनपेक्षित असतो. रात्र गडद होत गेली. पाऊस अधिकच कोसळू लागला. वीजांचा कडकडाट, वाऱ्याची डरकाळी आणि चारी बाजूंनी अंधार.अचानक...ठक... ठक... ठक...
दारावर कोणीतरी टकटक केलं. धोंडीरामने एकमेकांकडे पाहणाऱ्या राधाबाईच्या डोळ्यांत प्रश्न पाहिला. "अशा वेळी...?" ती कुजबुजली. पुन्हा... ठक... ठक... ठक... यावेळी टकटक अधिक आतुर होती. धोंडीरामने कंदील हातात घेतला. दाराची कडी हळूच उघडली...
समोर साधारण चाळिशीतील एक अनोळखी माणूस उभा होता. अंगावरचे कपडे पूर्ण भिजलेले. पाय चिखलाने माखलेले. थंडीने ओठ थरथरत होते. डोळ्यांत भीती नव्हती... फक्त भूक होती. त्याने दोन्ही हात जोडले. "बाळा... दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही. पाऊस सुरू झाला म्हणून वाट चुकलो. एक रात्र आसरा मिळेल का? आणि शक्य असेल तर... एक अर्धी भाकरी..."
धोंडीराम काही क्षण निःशब्द उभाच राहिला. त्याने मागे वळून चुलीजवळ ठेवलेल्या त्या दोन भाकऱ्यांकडे पाहिलं... त्या दोन भाकऱ्या म्हणजे त्या घराचं उद्याचं आयुष्य होतं. आणि दारात उभा असलेला तो तरुण त्याच्या डोळ्यांत फक्त एकच प्रश्न होता - "आज मी जगणार का?" दारात उभा असलेला तरुण थंडीने कुडकुडत होता. त्याच्या ओल्या कपड्यांतून पाणी टपटपत होतं. चेहऱ्यावर उपासमारीच्या खोल रेषा होत्या. दोन दिवस अन्नाचा कण पोटात गेला नसल्याचं त्याच्या अशक्त शरीरावरून स्पष्ट दिसत होतं. धोंडीराम काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग त्याने शांतपणे बाजूला होत म्हटलं, "या दादा. आधी आत या. पाऊस थांबला की पुढचं पाहू." दादाने घरात पाऊल टाकलं. राधाबाईने लगेच जुने पण कोरडे कपडे आणून दिले. चुलीत लाकूड टाकलं. मंद ज्योत पुन्हा पेटली. त्या उबेनं वृद्धाचे थरथरणारे हात जरा स्थिर झाले. राधाबाईची नजर मात्र चुलीशेजारी ठेवलेल्या ताटाकडे गेली... त्या ताटात होत्या फक्त दोन भाकऱ्या. घरात धान्य नव्हतं. पीठ नव्हतं. उद्या सकाळी मुलुखभर शोधलं तरी उसनं मागायला कुणाकडे उरणार नव्हतं. तिने धोंडीरामकडे पाहिलं. नजरेत प्रश्न होता. "काय करू?" धोंडीरामने उत्तर दिलं नाही. तो शांतपणे देवघरातल्या विठ्ठलाकडे पाहत राहिला. लहानपणी वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य त्याच्या कानात घुमू लागलं - "घरात किती आहे हे पाहू नकोस... दारातला माणूस किती भुकेला आहे ते पाह." त्याने खोल श्वास घेतला. "राधे... ताट वाढ." राधाबाई क्षणभर थबकली. "पण... आपल्यासाठी?" धोंडीराम हलकंसं हसला. "आपल्याला उद्या भूक लागेल... यांना आज जीव वाचवायचा आहे." राधाबाईच्या डोळ्यांत पाणी आलं. ती काही न बोलता उठली. तिने दोन्ही भाकऱ्या ताटात ठेवल्या. ठेचलेली मिरची, अर्धा कांदा आणि माठातलं उरलेलं पाणीही त्याच ताटात वाढलं ताट त्या तरुणासमोर ठेवलं. त्याचे हात थरथरत होते. "नको दादा... अर्धी भाकरी पुरेशी आहे." धोंडीराम हसला. "शेतकऱ्याच्या घरात पाहुणा अर्धपोटी उठत नाही." ते शब्द ऐकताच तरुणाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्याने पहिला घास तोंडात टाकला... आणि डोळे मिटले. तो भाकरीचा घास नव्हता.
तो जगण्याचा घास होता. धोंडीराम आणि राधाबाई मात्र समोर बसून त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या पोटात भूक जळत होती. पण मनात एक विलक्षण शांतता होती. त्या रात्री त्यांनी फक्त माठभर पाणी पिऊन समाधान मानलं. तरुणाचं जेवण झालं. त्याने हात जोडले. "तुमचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही." धोंडीराम हसत म्हणाला, "अहो, ऋण कसले? आज तुम्ही आमच्या दारी आलात, उद्या आम्ही कुणाच्या दारी जाऊ. माणूस म्हणून एकमेकांच्या उपयोगी पडलो, एवढंच." रात्र सरली. पहाटे पाऊस थांबला होता. वृद्ध निघताना धोंडीरामच्या हातात काहीतरी ठेवू लागला. धोंडीरामने लगेच हात मागे घेतला. तरुण निघताना धोंडीरामच्या हातात काहीतरी ठेवू लागला. धोंडीरामने लगेच हात मागे घेतला. "नको दादा... भाकरीला किंमत नसते. ती विकली जात नाही." ते ऐकताच तरुणाच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू दाटून आले. त्याने अलगद धोंडीरामच्या पायांवर डोकं ठेवलं. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, "दादा... देव तुझ्या घरात धन देईल की नाही, माहीत नाही... पण तुझ्या घरातली माणुसकी कधी कमी होऊ देणार नाही." इतकं बोलून तो पावसाने धुतलेल्या पायवाटेने निघून गेला. धोंडीराम बराच वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा राहिला. त्याला माहीत नव्हतं... काल रात्री त्याने एका भुकेल्या माणसाला भाकरीचा शेवटचा घास दिला नव्हता... त्याने एका आयुष्याला नव्याने जगण्याची संधी दिली होती. आणि त्या एका घासाचं पीक...वीस वर्षांनी उगवणार होतं. वीस वर्षे लोटली. काळ बदलला.
तुळशी गावात काही बदल झाले होते, पण काही गोष्टी अजूनही तशाच होत्या. उन्हाळा आला की विहिरीचा तळ दिसायचा, पाऊस आला की गावकरी देवाचे आभार मानायचे. नवीन पिढी शहराकडे वळत होती, पण मातीवर प्रेम करणारे काही हात अजूनही शिवारात राबत होते. मात्र एक गोष्ट कायमची बदलली होती... धोंडीराम आता या जगात नव्हता. त्या घटनेनंतर काही वर्षांनी आजारपणाने त्याने जगाचा निरोप घेतला होता. शेवटच्या क्षणीही त्याने राधाबाईचा हात हातात घेऊन एवढंच म्हटलं होतं, "आपण आयुष्यभर खूप काही मिळवलं नाही... पण कुणाच्या ताटातला घास कधी हिसकावला नाही. एवढं पुरेसं आहे." राधाबाई आजही त्या आठवणींच्या आधारावर जगत होती. घर तेच. अंगण तेच. चूल तीच. फक्त तिच्यासमोर बसून हसणारा धोंडीराम नव्हता. त्या दिवशी सकाळपासून गावात वेगळीच लगबग होती. गावच्या शाळेच्या मैदानात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. शहरातून एक नामांकित समाजसेवी संस्था येणार होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाणलोट विकास, शेततळी, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि महिलांसाठी स्वयंरोजगार अशा अनेक योजनांची घोषणा होणार होती. संपूर्ण गाव जमलं होतं. लोकांच्या चर्चेला एकच विषय होता. "आज येणारे साहेब खूप मोठे माणूस आहेत म्हणे... हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली आहे." थोड्याच वेळात गाड्यांचा ताफा गावात दाखल झाला. पांढऱ्या केसांचा, साध्या खादीच्या कुर्त्यातला एक साठीतील गृहस्थ गाडीतून उतरला. त्याच्या चेहऱ्यावर मोठेपणाचा गर्व नव्हता. डोळ्यांत मात्र विलक्षण शांतता होती. तो थेट व्यासपीठाकडे न जाता आजूबाजूला पाहू लागला... जणू तो कोणाला शोधत होता. कार्यक्रम सुरू झाला. गावच्या सरपंचांनी त्यांचा सत्कार केला. टाळ्यांचा कडकडाट झाला. भाषणासाठी त्यांना बोलावण्यात आलं. त्यांनी माईक हातात घेतला... पण काही क्षण ते बोललेच नाहीत. त्यांची नजर समोर बसलेल्या गावकऱ्यांवर फिरत राहिली. अचानक त्यांनी एक प्रश्न विचारला.
"या गावात... धोंडीराम जाधव यांचं घर कुठं आहे?" संपूर्ण मैदान शांत झालं. सरपंच हळू आवाजात म्हणाले, "साहेब... धोंडीराम काका जाऊन बरीच वर्षे झाली. त्यांच्या घरी आता राधाबाई एकट्याच राहतात." हे ऐकताच त्या गृहस्थांच्या डोळ्यांत पाणी दाटलं. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. जणू वीस वर्षांपूर्वीची ती काळोखी रात्र पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली होती... मुसळधार पाऊस... थरथरणारं शरीर... भुकेने व्याकूळ झालेलं पोट... आणि एका शेतकऱ्याने स्वतःचा शेवटचा घास त्यांच्या ताटात वाढलेला... त्यांनी माईक बाजूला ठेवला. शांत आवाजात एवढंच म्हणाले, "कार्यक्रम नंतर करू... आधी मला त्या माणसाच्या घरी घेऊन चला. कारण आज मी इथे प्रमुख पाहुणा म्हणून नाही... तर एक ऋणी माणूस म्हणून आलो आहे." संपूर्ण गाव स्तब्ध झालं. कोणालाच समजत नव्हतं... एका साध्या शेतकऱ्याचं नाव घेताच इतक्या मोठ्या माणसाच्या डोळ्यांत अश्रू का आले? पण त्या प्रश्नाचं उत्तर...
राधाबाईच्या छोट्याशा मातीच्या घरात दडलं होतं. गावकऱ्यांच्या गर्दीतून तो गृहस्थ हळूहळू धोंडीरामच्या घराकडे चालत होता. तुळशी गावातील तीच जुनी पायवाट... तेच मातीचं अंगण... आणि तेच छोटंसं घर... फरक फक्त एवढाच होता की वीस वर्षांपूर्वी तो या घराच्या दारात एक भुकेला अनोळखी माणूस म्हणून उभा होता... आणि आज तो हजारो लोकांना आधार देणारा माणूस म्हणून परतला होता. राधाबाई अंगणात तुळशीला पाणी घालत होती. अचानक इतक्या लोकांना पाहून ती गोंधळली. सरपंचांनी हळू आवाजात सांगितलं, "राधाबाई... हे साहेब खास तुम्हाला भेटायला आले आहेत." त्या गृहस्थांनी पुढे येऊन राधाबाईंच्या पायाला हात लावला. राधाबाई घाबरून दोन पावलं मागे सरकली.
"अहो साहेब, हे काय करता?"
त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. ते म्हणाले, "आई... मला ओळखलं नाहीत ना?" राधाबाईने बारकाईने त्यांच्याकडे पाहिलं. पण वीस वर्षांच्या काळाने चेहरा बदलला होता. आठवणी मात्र बदलल्या नव्हत्या. ते हळू आवाजात म्हणाले,
"वीस वर्षांपूर्वी एका पावसाळी रात्री... एक भिजलेला, भुकेला माणूस तुमच्या दारात आला होता. त्याला तुम्ही आसरा दिलात. तुमच्या घरात दोनच भाकऱ्या होत्या... तरी तुम्ही त्या त्याला खायला दिल्या." राधाबाईच्या हातातून तुळशीची ओंजळ खाली पडली. तिच्या डोळ्यांसमोर ती रात्र पुन्हा उभी राहिली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "अरे... तू तोच का?" त्यांनी मान हलवली. "हो आई... मी तोच." क्षणभर दोघेही काही बोलू शकले नाहीत. फक्त डोळ्यांतून भावना वाहत होत्या. तो गृहस्थ पुढे म्हणाला,
"त्या रात्री माझ्याकडे काहीच नव्हतं. मी गावोगावी कामाच्या शोधात फिरत होतो. भुकेने आणि थकव्याने माझी आशा संपली होती. पण तुमच्या घरात मला फक्त भाकरी मिळाली नाही... मला माणुसकी मिळाली."
"त्या एका घासाने मला जगण्याची ताकद दिली. मी पुन्हा उभा राहिलो. शिक्षण पूर्ण केलं. काम केलं. आणि आज जे काही आहे, ते त्या एका घासामुळे आहे." राधाबाईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, "बाळा... आम्ही तेव्हा काही मोठं केलं नव्हतं. दारात आलेल्या माणसाला जे होतं ते दिलं." तो गृहस्थ हसला. "आई... तुमच्यासाठी ती साधी भाकरी होती. पण माझ्यासाठी तो माझ्या आयुष्याचा शेवटचा आशेचा घास होता."
त्यांनी गावकऱ्यांसमोर घोषणा केली -
धोंडीराम जाधव यांच्या नावाने गावात शेतकरी मदत केंद्र उभारण्यात येईल. गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची मदत केली जाईल आणि गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली जाईल. संपूर्ण गाव टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. पण राधाबाई मात्र शांतपणे घराच्या जुन्या चुलीकडे पाहत होती. त्या चुलीवर कितीतरी वर्षांपूर्वी दोन भाकऱ्या भाजल्या होत्या. त्या दिवशी धोंडीराम आणि राधाबाई उपाशी झोपले होते... पण त्यांनी एका माणसाच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवला होता. संध्याकाळ झाली. सूर्य मावळतीला जात होता. राधाबाईने घराच्या भिंतीवर लावलेल्या धोंडीरामच्या फोटोसमोर दिवा लावला. फोटोसमोर हात जोडून ती हळू आवाजात म्हणाली -
"पाहा हो धोंडीरामा... तुमचा शेवटचा घास वाया गेला नाही. त्या घासाचं आज हजारो भाकऱ्यांमध्ये रूपांतर झालं."त्या क्षणी बाहेरच्या शेतावर हलका पाऊस सुरू झाला.मातीचा सुगंध पुन्हा एकदा हवेत दरवळला.जणू निसर्गही सांगत होता - "शेतकरी फक्त धान्य पिकवत नाही... तो माणुसकीची बीजं पेरतो." आणि म्हणूनच... कधी कधी आयुष्यात दिलेला एक छोटासा घास... कुणाच्या तरी संपूर्ण आयुष्याची भूक मिटवून जातो.
कथेचे तात्पर्य –
आपल्या ताटातला एक घास कमी झाला तरी चालेल, पण आपल्या मनातली माणुसकी कधीच कमी होता कामा नये. कारण दिलेला एक घास क्षणभराची भूक भागवतो, पण दिलेली माणुसकी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते."