शब्द सामर्थ्य..
सौ.वैशाली आहेर....
शब्द आणि लेखक यांच नात हे मायलेकरां सारखंच असतं. शब्दांचा संवाद हि भाषा तhर शब्दा विना संवाद हि मनाची भाषा असते.
शब्द समजून घ्यावे लागतात, शब्द उमजावे लागतात, तितकेच ते तोलून मापुन वापरावे लागतात. एकेका शब्दाची ताकद,त्याची उपयुक्तता आणि प्रयोजन यांचा विचार न करणारा...शब्द मातिमोल करत असतो..
अंगावरचे व्रण पुसले जातात पण शब्दांचा आघात माणूस सहसा विसरत नाही.एखाद्या माणसाला आपल्या कडु, कठोर शब्दांचा आघात सहन करवा लागला तर त्याच्या मनाला अक्षरश: डागण्या बसतात. अपमानाच्या सुया टोचतात. परिस्थीती कितीही बदलली तरीही माणूस आपल्यावर झालेल्या शब्दांचा आघात विसरत नाही.
शब्दांना वजनाबरोबरच किंमतही असते व्यक्तीचे वय, अधिकार, शिक्षण, कर्तृत्व इत्यादि अनेक कारणांमुळे शब्दांची किंमत व वजन वाढत असते.मोठमोठे पुढारी आणि त्यांचे अनुयायी, तसेच साधुसंत आणि त्यांचे भक्त यांच्या कहाण्या ऐकल्यावर लक्षात येते कि; प्रेम, भक्ती आणि विश्वास या कारणांमुळेही शब्दांची किंमत वाढत असते.
शब्दांना जशी किम्मत असते, वजन असते; तसेच दिला शब्द पाळणार्यालाही समाजात मान ही असतो. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले." या संतवचनानुसार अशा व्यक्तींचे शब्द केवळ झेललेच जातात असे नाही तर ते दीर्धकाळपर्यंत लक्षातही रहातात. आणि इतिहासात त्याची नोंदही ठेवली जाते.
शब्दांना जसे वजन, किंमत, मान असतो तसेच शब्दांना धारही असते. एकाच घावात सारे नाते संबंध तोडण्याचे सामर्थ्य शब्दात आहे. शब्दांच्या सहाय्याने ओळखी वाढवल्या जातात, नाती जोडली जातात आणि शब्दांच्याच मार्फत ते तोडलेही जातात. शब्द मनाची शस्त्रे आहेत. हळूवार फुंकर घालून मनाच्या वेदना कमी करण्याची जादू शब्दात आहे. उलट मनाच्या भरलेल्या जखमांची खपली काढून घळाघळा रडायला लावण्याची किमयाही शब्दच करू शकतात. थोडक्यात शब्दांचा संबंध मनाशी आहे , माणूस एकवेळेस हाल अपेष्टा, जीवनात झालेला ञास विसरु शकेल पण शब्दाने झालेला अपमान, आघात आयुष्यभर विसरत नाही. शब्दांची धार विषारी असली तरी...हेच शब्द खोलवर झालेल्या जखमांचा इलाजही करु शकतातच की...!!!
जीवनामधे अनन्य साधारण महत्व असलेले शब्द हे सत्य, शहाणपन, शोध अशा पैलूंचा पाया आहेत. "शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले" ही प्रेमाची परिभाषा फक्त प्रेमिकांनाच कळते. पण सामान्य जनांच्या बाबतीत मात्र आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचे शब्द हेच साधन आहेत.
शब्द सामार्थ्याच्या बाबतीत ख्यातनाम लेखक जावेद अख्तर यांच्या लेखणीतून साकारलेली एक शायरी आहे.
"हर लब्ज को छुते हुए कांप न जाए बरबाद वो अल्फात की औकात करें...."
कुणीतरी म्हणटलं आहे की, क्रांतीचा मार्ग बंदुकीतून जातो पण खरं तर बंदुक हे शस्ञ आहे.क्रांती बंदुकीच्या गोळीतून नव्हे तर शब्दांतून येते. नवी व्यवस्था, नवे विचार, नवे बदल हे सारं शब्दांतूनच येत असतं. शब्द हे फक्त सामर्थ्य नाही तर तो पारंपारीक वारसा आहे.मागच्या पिढीतील अगणित विचारवंत आज आपल्यात नाहीयेत ,त्यांचा नश्वर देह केव्हाच संपला पण त्यांचे विचार अजूनही शाबूत आहेत ,ते शब्दांनीच तर सुरक्षित ठेवले आहेत.
पिढी दर पिढी हे विचाररुपी शब्द आपण पुढच्या पिढीच्या हवाली करत असतो.इतिहासात जे जे प्रभावी ठरले त्यांची शब्दांवरच तर हुकूमत होती. जग हादरवून टाकणार्या शब्दांचं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. शब्दांची हुकूमत ही सर्वव्यापी आहे म्हणून शब्द जसे ,समजून उमजून घ्यायचे असतात तसेच ..निशब्दालाही मान द्यायचा असतो.मौन या शब्दांमधे ब्रम्हांड कवेत घेण्याची ताकद आहे. मौन नसेल तर शब्दांच्या अस्तित्वाला अर्थ तो काय असणार.मौन ही शब्दांच्या दुनियेतील पोकळीच म्हणायची. दोन शब्दांच्या बेटांमधील टप्पा म्हणजे नि:शब्दता म्हणजेच मौन. मौन दोन शब्दांच्या बेटांना जोडणारा सेतू असतो.
मौनात नसतं ते आवाजाचं अस्तित्व,पण शब्दांच अस्तित्व त्या अवस्थेतही असतचं की..!!! किती मोठं सामर्थ्य या शब्दांचं, किती वेगवेगळी रुपं... कठोर, मृदू, जखमा करणारे, जखमा भरणारे, काही दु:खावर फुंकर घालणारे, कधी मायेनं गोंजारणारे, कधी निराशा देणारे तर कधी मनाला उभारी देणारे, कधी हसवणारे तर कधी रडवणारे , कधी भांडणारे तर कधी प्रियकराला साद घालणारे शब्द, प्रेम व्यक्त करणारे शब्द,
चुकणाराला दिशा दाखवणारे शब्द, अन्याया विरुध्द लढणारे शब्द.,सत्याला न्याय देणारे शब्द.
पुर्वी तर ..स्वप्नात दिलेल्या शब्दाचे वचन पाळणार्या पुर्वजांचे आपण वंशज ..आजच्या काळात याच शब्दांना जागतो का.???
असे काही मायेचे शब्द तर काही कोरडे शब्द, आयुष्य उजळून टाकणारे शब्द, तसेच आयुष्य घडविणारेही शब्दचं या शब्दांच वर्णन करताना
संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ''आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू''
पण हे शब्दांचे धन आणि शब्दांची शस्त्रे तुम्ही कोणत्या प्रकारे वापरता यावरच शब्द धनाची उपयुक्तता अवलंबून आहे. शब्द आपल्या मनाचा आरसा आहेत. आपण कोणते शब्द कसे वापरतो यावर आपला स्वभाव, आपली संस्कृती इतरांकडून ठरवली जाते. आपले शब्दच आपल्या नकळत आपली ओळख जगाला करून देत असतात.
या शब्दरूपी धनाचा वापर आपापल्यापरीने योग्य पध्दतीने झाला तरच त्याचं मोल टिकुन राहिल.