• 13 January 2020

    मुलाखत ऐश्वर्या नारकर

    मुलाखत ऐश्वर्या नारकर

    0 75

    संवाद तुमचा आमचा मधे......

    ​सुप्रसिद्ध अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर


    शब्दांकन : वैशाली आहेर 


    प्रेक्षकांच्या हृदयात घर केलेल्या अभिनय कलेत पारंगत अशा सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटवला .

     ऐश्वर्या नारकर यांनी बालनाट्य मध्ये साकारलेली पहिली भूमिका होती ज्ञानेश्वरांची तिथूनच सुरू झाला त्यांचा अभिनयाचा प्रवास.आणि हा प्रवास  व्यावसायिक रंगभूमी जाहिरात  सिनेमा मालिका पर्यंत  येऊन ठेपला. ज्ञानेश्वरांची पहिली भूमिका ते स्वामिनी  तसेच  निर्माती म्हणून ही त्यांनी स्वतःला सिद्ध केलं असा त्यांचा प्रवास चालू आहे .....जाणून घेऊ त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल.

    प्रेक्षकांच्या हृदयात घर केलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी बालनाट्यामध्ये साकारलेली पहिली भूमिका होती ती ज्ञानेश्वरांची. तिथून सुरू झालेला अभिनयाचा हा ‘ऐश्वर्य’पूर्ण प्रवास पुढे व्यावसायिक रंगभूमी, जाहिराती, सिनेमे आणि मालिकांपर्यंत येऊन ठेपला. ‘गंध निशिगंधाचा’, ‘मी माझ्या मुलांचा’ ही त्यांची सुरुवातीची नाटकं. ‘महाश्वेता’ मालिकेनं त्यांना घराघरात पोहोचवल. जाहिरात विश्वातही त्यांनी आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटवला.

    बालपण बद्दल ऐश्वर्या भरभरून बोलतात त्या सांगतात माझ्या अभिनयाची सुरुवात बालवयात शाळेच्या व्यासपीठावरूनच झाली. माझी आई खूप हौशी, त्यामुळे तिचा पूर्ण पाठिंबा असायचा. शाळेच्या विविध कार्यक्रमांसाठी, वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ती माझ्याकडून सगळी तयारी करून घ्यायची. समूहगानापासून एकपात्री अभिनयापर्यंत सगळं काही आईनं माझ्याकडून करून घेतलं. या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे माझा अभ्यासही चांगला सुरू होता. त्यात आवडीचं काहीतरी करायला मिळतंय म्हटल्यावर मी देखील उत्साही असायचे. डोंबिवलीतल्या दत्तनगरमध्ये असलेली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ही माझी शाळा. आमची शाळा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खूप सक्रिय असायची. वार्षिक स्नेहसंमेलनात चांगलं काम केल्यानंतर हळूहळू मी शाळेच्या बालनाट्य स्पर्धेत सहभागी झाले. शाळेतल्या बाईंची लाडकी असल्यामुळे त्यांनी मला बालनाट्यात काम करण्याचा आग्रहच असायचा.

     त्यावेळी अभिनयाचा, किंबहुना रंगमंचावर पाळाव्या लागणाऱ्या शिस्तीचा पाया पांडुरंग सरांनी भक्कम केला. कुमार कला केंद्र, लिटिल थिएटर्स यासारख्या बालनाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षीसं पटकावण्याचा सिलसिला शालेय जीवनात कायम राहिला. महाविदयालयीन शिक्षणाद्दल त्या सांगतात शाळेतून कॉलेजमध्ये आल्यावर अभिनयासाठी एकांकिका स्पर्धांचं मोठं विश्व माझ्यासमोर खुलं झालं. पण, अभ्यासात अधिक गुंतल्यामुळे एकांकिका स्पर्धा करायच्या राहून गेल्या. अकरा-बारावीमध्ये तर मी रंगमंचापासून लांबच होते. तेरावीला असताना शाळेच्या पांडुरंग सरांनी माझी ओळख प्रभाकर पणशीकर यांच्याशी करून दिली. त्यावेळी पणशीकर काका ‘चंद्रलेखा’ नाट्यसंस्थेच्या नाटकासाठी एक अभिनेत्री शोधत होते. त्यांनी मला नाटकाच्या वाचनासाठी बोलावलं. मी नाटक वाचलं आणि त्यांनी मला त्या नाटकातल्या मुख्य अभिनेत्रीची भूमिका दिली. ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक, 'गंध निशिगंधाचा'. बालनाट्यापासून थेट व्यावसायिक नाटकावर मी आले. मनात थोडी भीती होती. पण, सारं काही सुरळीत झालं.

     मुळात मला शिकण्याची आवड असल्यामुळे मी सर्व आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होते, मग ते समोरच्या नटाचं काम असो किंवा दिग्दर्शकाच्या सूचना. हे नाटक म्हणजे माझ्यासाठी एक नाट्यकार्यशाळा होती. नाटकात माझ्या भूमिकेचं नाव 'सोनल' असं होतं. इकडेच माझी आणि अविनाशची पहिल्यांदा भेट झाली होती. 

    विक्रम गोखलेंसोबत काम य‘गंध निशिगंधाचा’ नाटक सुरू असताना दुसरीकडे 'चंद्रलेखा' नाट्यसंस्थेतच 'मी माझ्या मुलांचा' हे नाटक सुरू होतं. त्यात विक्रम गोखले यांची मुख्य भूमिका होती. नाटकातल्या एका मुलीनं काही कारणास्तव नाटक सोडल्यामुळे मोहन वाघ यांनी त्या भूमिकेच्या रिप्लेसमेंटसाठी मला विचारलं. विक्रम गोखले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करायला मिळणार म्हटल्यावर मी होकार दिला. माझ्या अभिनय शैलीला आकार देण्यासाठी या भूमिकेचा मला खूप फायदा झाला. 'गंध निशिगंधाचा' या नाटकात मी माझ्या वयापेक्षा मोठी असणारी व्यक्तिरेखा साकारत होते. पण, 'मी माझ्या मुलांचा' नाटकामध्ये मात्र मला माझ्याच वयाच्या मुलीची भूमिका साकारायची होती. त्यामुळे ती भूमिका आत्मसात करायला आणि माझ्यासारख्याच मुलीची भूमिका साकारताना मला खूप समाधान वाटलं. त्याहून मोठं समाधान याचं होतं की, विक्रम गोखले यांना अभिनय करताना जवळून पाहणं. नाटकादरम्यान त्यांच्याकडून नकळत माझ्यावर अभिनयाचे संस्कार झाले आहेत. प्रयोगादरम्यान मी नेहमी त्यांच्या कामाचं निरीक्षण करत बसायचे. नाटकात इला भाटे देखील होत्या. त्यामुळे माझ्यासाठी या नाटकातून शिकण्यासारखं खूप काही होतं आणि तेच मी केलं. त्या भूमिकेचं नाव वैशाली असं होतं. 

    मालिका आणि सिनेमात काम करायला सुरुवात करण्यापूर्वी मी जाहिरातींमधून काम करायला सुरुवात केली होती. मी जाहिरातीत काम करावं असा अविनाशचा आग्रह होता. त्यानंच मला पहिल्यांदा जाहिरातीच्या ऑडिशनसाठी पाठवलं होतं. सुरुवातीला मला जाहिरातींचं जग आणि त्या झगमगाटाचा सवय नव्हती. इतका तामझाम मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. पण, एकामागोमाग एक बड्या-बड्या कंपन्यांच्या जाहिराती मला मिळू लागल्या. माझा चेहरा सर्वांच्या ओळखीचा व्हायला लागला होता. जाहिरातींमुळेच गर्दीमध्ये माझा चेहरा ओळखला जाऊ लागला. माझी एक जाहिरात बघून दिग्दर्शक व्ही. के. नाईक यांनी माझा नंबर मिळवून मला फोन केला. 'सून लाडकी सासरची' हा सिनेमा त्यांनी मला ऑफर केला. तो माझा पहिला सिनेमा. 

    अशोक सराफ, अर्चना पाटकर, उषा नाईक यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांची दमदार फळी सिनेमात होती. या सगळ्यामध्ये मी मात्र नवखी होते. सिनेमातली मध्यवर्ती, म्हणजे सुनेची भूमिका मी साकारली होती. सिनेमानं रौप्य महोत्सवी यश मिळवलं. पश्चिम महाराष्ट्रात तर हा सिनेमा कमालीचा हिट झाला होता. 

    'महाश्वेता'ची राधा 'भय इथले संपत नाही' हे शीर्षकगीत तेव्हा कमालीचं लोकप्रिय झालं होतं. डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या 'महाश्वेता' या गाजलेल्या कादंबरीवर 'महाश्वेता' नावाचीच ही मालिका होती. ही माझी टीव्हीवरील पहिली मालिका.  तेव्हा आजच्या सारख्या खूप टीव्ही चॅनल्स नव्हती. तेव्हा दूरदर्शन होतं. दुपारी चार वाजले घराघरांतून 'भय इथले संपत नाही' हे मालिकेचं शीर्षकगीत ऐकू यायचं. जसा माझ्या पहिल्या सिनेमातल्या भूमिकेनं मला गावाकडचा प्रेक्षकवर्ग मिळवून दिला, तसा 'महाश्वेता'मुळे मला शहरी भागातला प्रेक्षकवर्ग मिळाला. साहित्यिकदृष्ट्या ही मालिका खूप उजवी आणि परिपूर्ण होती. मालिकेतल्या माझ्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. प्रेक्षक पत्रं पाठवून कामाचं कौतुक करायचे. आजही अनेकदा मला 'महाश्वेता'मधली 'राधा' म्हणूनच जुने प्रेक्षक ओळखतात. प्रेक्षकांकडून मिळालेलं हे प्रेम शब्दांत व्यक्त करता येण्यासारखं नाही. 

    मी तसं फार निवडक काम केलं आहे. माझ्या अभिनय प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवर मी केलेल्या भूमिकांनी मला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. 'सून लाडकी सासरची'मधली 'माया', 'महाश्वेता' मालिकेतली 'राधा' इथपासून 'या सुखांनो या'मधल्या 'सरिता' या भूमिकेनं मला मोठा प्रेक्षकवर्ग मिळवून दिला. त्याचप्रमाणे 'घर की लक्ष्मी बेटीया'मधली 'सावित्री', 'माझे मन तुझे झाले'ची 'निलीमा', सिनेमात 'होऊ दे जरासा उशीर'मधील रुक्मिणी, 'आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे' या आणि यासारख्या अनेक भूमिकांनी मला माझा अभिनय प्रवास समृद्ध केला आहे. 

    सध्या सुरू असलेल्या 'सोयरे सकळ' नाटकातली भूमिका ही माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होती. या भूमिकेची अचूक नस पकडणं कठीण होतं. संपूर्ण नाटकच सादरीकरणाच्या दृष्टीनं तसं अवघड आहे. आज माझ्या भूमिकेचं कामाचं कौतुक होतंय, एकामागोमाग एक पुरस्कार मिळताहेत. त्यामुळे केलेल्या मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान आहे. नाटकात मी 'आत्या' आणि 'माई' अशा दोन भूमिका साकारतेय. मध्यमवयीन आणि दुसरी वृद्ध महिलेची ही भूमिका आहे. त्यामुळे चालू प्रयोगात दोन भिन्न रूपं रंगमंचावर साकारणं आव्हानात्मक आहे.


     टीव्हीवर 'लेक माझी लाडकी', नाटकांमध्ये 'सोनपंखी', सिनेमांमध्ये 'ओळख', 'झुळूक' आदींमधून काम करणं समाधानकारक होतं. 

    निर्मिती बद्दल विचारले असता त्या सांगतात

    मनोरंजन क्षेत्रात काम करत असताना, आपल्याला हव्या त्या विषयावर नेहमी काम करायला मिळेलच असं नाही. त्यामुळे साठवलेल्या पैशांतून निर्मिती करण्याचा निर्णय मी आणि अविनाशनं घेतला. निर्माती म्हणून काम करणं अधिक समाधानकारक आहे. कारण इकडे स्वत: काहीतरी निर्माण केल्याची भावना आहे. ‘चॅम्पियन’ हा मी निर्मिती केलेला पहिला सिनेमा. नाटकात 'तक्षकयाग', 'सोबत संगत' केलं. या मनोरंजनसृष्टीचा एक भाग म्हणून आपणही तिचं काहीतरी देणं लागतो; या भावनेनं मी निर्माती झाले आहे. त्यांच्या आगामी प्रयोग बद्दल त्या सांगतात ..त्यांची स्वामिनी ही ऐतहासिक मालिका लवकरच येत आहे..

    ऐश्वर्या नारकर यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.... मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ..!




    वैशाली आहेर


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!