• 07 January 2021

    गोधडी

    नवी विटी नवे राज्य

    5 170

    नवी विटी नवे राज्य

    तशी आज तिला लवकरच जाग आली.

    बेडरूमच्या खिडकीतून प्रकाश यायला सुरवात झाली होती.अंथरूणावर बसते होत तिने हात जोडत,' कराग्रे वसते लक्ष्मी म्हंटलं. तशीच उठत ती खिडीकीशी गेली.आणि आकाशाचे बदलणारे रंग न्याहाळत राहिली.हवेतला गारवा तिला सुखावून गेला.हळूहळू सूर्यप्रभा फाकत गेली. उगवतीच्या सूर्य दर्शनाने तिचे मन प्रसन्न झाले. पटकन तिला आठवलं,आज या वर्षीचा शेवटचा दिवस.उद्यापासून नवी पहाट,नवा सूर्य आणि नवी सकाळ.मनात

    विचार आला,काय नवीन असणार आहे उद्यापासून मी तिच ,सूर्य तोच.काय नवे घडणार उद्यापासून? ॠतू तेच.तेच ऋतूचक्राच फिरणं.

    तिला नकळत तिने लिहिलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या,

    उमलतो दिवस-सकाळ होते.

    तळपतो दिवस-दुपार होते.

    कोमेजतो दिवस-संध्याकाळ होते.

    मिटतो दिवस- रात्र होते.

    आता आयुष्याची संध्याकाळ.तिनं आयुष्याचा जमाखर्च मांडताना आठवणींचा पुर आला.आणि त्यात तो जमाखर्च वाहून गेला.तीन मग जमाखर्च मांडणच सोडून दिलं.

    वर्षामागुन वर्षे गेली 31 डिसेंबरच्या अशा कितीतरी रात्री आल्या आणि गेल्या बाहेर फटाक्यांचा आवाज टीव्हीवर संगीताचा जल्लोष आणि त्यातच नया साल मुबारक हो अशी अक्षरे धडकली की झाली बाई नवीन वर्षाची सुरुवात काय भराभर वर्ष संपलं तरी असं म्हणत नवीन वर्षाचे स्वागत करायचं हा कितीतरी वर्षांचा शिरस्ता होता

    पण या नववर्षाची पूर्वसंध्या खुपच वेगळे उमलली .जवळ जवळ सात-आठ वर्षे वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या तिच्या मैत्रिणी एकत्र जमल्या .भरपूर गप्पा मारल्या डोळ्यात पाणी येईपर्यंत हसल्या एक ते डिसेंबर ची हि रात्र टीव्हीवरचा एकही कार्यक्रम न पाहता संपली बारा वाजले कधी आणि नवीन वर्ष सुरु झाले कधी हे कळलं नाही .फटाक्यांच्या आवाजाने सगळ्या भानावर आल्या आणि एकमेकींना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पाच मिनिटात नवीन वर्षाची नवोदय विसरली गेली आणि पुन्हा गप्पांचा नवा दर सुरू झाला .पूर्वीचे दिवस आठवत गेले. मन भूतकाळात रमले आणि वर्तमानाचे भान राहिले नाही बघता बघता दोन दिवस कापसासारखे उडाले. प्रत्येकीला घरी जायचे वेध लागले निरोप घेताना पाय अडखळले तरीही घरट्यात परतण्याची अनावर ओढ होती सगळ्यात हळवी झाली ते मुंबई स्टाइल झालेली मैत्रीण आम्ही सगळ्यात अश्या गोव्यातच राहणाऱ्या पण ती एकटीच दूर सहाजिकच निरोप घेताना ती हळवी झाली. गाडीनं सिटी दिली ओलावल्या नजरेने हात हातात देणाऱ्या तिला तिने म्हटलं, तसं नाही गं पुढच्या वर्षी अशाच भेटू आपण बोलून बोलून घसा सुकवायला. एवढ्याशा एका वाक्यात तिच्या भरून आलेल्या मनाला दिलासा मिळाला असावा .नुसत्या कल्पनेनेच ी खुदकन हसली आणि तिच्या चेहर्‍यावरचा तो उन पावसाचा सुंदर खेळ पाहता पाहता गाडीने वेग घेतला कधी ते कळलच नाही ती घरी आली तेव्हा का कुणास ठाऊक, कुणालातरी निरोप घेऊन येताना जाणवतो तसा रितेपणा अजिबात वाटला नाही. मन अगदी तुडुंब भरून गेलं होतं .अखंड जागरणाने सर्दी-खोकला झाला तरी कडवट औषधे तिने निमूटपणे घेतली .वय वाढले तरी काही वेड्यासारखी जागरण सोसायचा असं सर्वानी म्हटलं तरी ती नेहमीसारखी चिडली नाही ही की त्यांच्याशी वाद घातला नाही .कारण ती वेगळ्याच विश्वात होते त्यात खूप काही गवसल्याचा आनंद होता .सोबत करणाऱ्या होत्या मैत्रिणींच्या सहवासातील अनेक आठवणी त्.याला पाखरांचे पंख होते बकुळीचा गंध होता आणि अशा आठवणींचे मोरपीस जगण्यात जपण्याचा एक आगळा छंद तिच्या मनाला लागला होता

    तिला वाटलं,आता वाढत्या वयात आपल्या संवेदना फारच तीव्र होत चालल्या आहेत.आयुष्य वाळूसारखं कणाकणान निसटून चाललंआहे.मग कशाला हवी ती भूतकाळातील आठवणींची स्मरणयात्रा.जे हरवलं तेपुन्हा गवसेल का? मग ते स्मरायचेच कशाला जे वाट्याला आयुष्य आले ते तर भोगून झाले.

    समयाशी सादर व्हावे आणि प्रत्येक क्षण आनंदाचा असावा.

    प्रत्येक संपणारा क्षण ही नवीन येणा-या क्षणाची चाहूल असते .जाणाराक्षण आपल्या ओटीत घालतो आठवणींचे मोरपीस.त्या खुणा मग आपल्या जीवनातील अधुरेपण दाखवून देतात. आणि लागते ती हूरहूर.तिन त्या हूरहूरीची पोटली बांधून दूर फेकून द्यायचं ठरवलं.

    आता ती हळूहळू आतून उमलत आहे.

    तिला ईच्छेवाचून जन्म होतो,श्वासावरही सत्ता नसते हे पटत चालले आहे.

    आता ती सूर्य मावळताना बघते,तेंव्हा तिला

    शिरीष पैंच्या रूबायातील ओळी आठवतात,

    अस्तास चालला सूर्य केशरी लाल

    जाईल शेवटी समुद्रात तो खोल

    उदया हून सुंदर शेवट तो सूर्याचा

    तो रोज उगवतो उद्या ,आज-काल.

    रेखा मिरजकर खारघर नवी मुंबई



    Rekha Mirajkar


Your Rating
blank-star-rating
Veena Kantute - (07 January 2021) 5
खरच आहे. उदयाहून सुंदर शेवट तो सूर्याचा..... तसच भरभरून पण निर्लिप्त मनाने जीवन जगल्यावर संध्याछाया पण मोहक भासतात. लेख वाचून प्रसन्न वाटले.

1 0

ऋचा दीपक कर्पे - (07 January 2021) 5
खरंच...... खूप सुंदर. प्रत्येक नवीन दिवस सुद्धा नवीन वार्षासारखाच साजरा करायला हवा...

0 0